लोककथांमधून सापडणारा महाराष्ट्राचा 'वारसा'

 

आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक जागी प्राचीन संस्कृतीच्या खुणा सापडतात बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सांगितले जाते कि येथे काही मंदिर किंवा लेण्या या पांडवांनी बांधल्या किंवा काही ठिकाणी महाभारतामधल्या राजांचे तेथे वास्तव्य होते किंवा त्या महाभारतातील राजाच्या राज्याची राजधानी म्हणून एखादा भाग आहे हे हमखास सांगितले जाते तसेच महाराष्ट्रातील प्राचीन मंदिरे ही कोणी बांधली तर स्थानिक लोकं त्याला यादवांचा प्रधान हेमाडपंत याने मंदिर बांधलेले आहे असे उत्तर आपल्याला मिळते. कोकणासारख्या भागात मोठ्या प्रमाणात पांडवांचे वास्तव्य होते हे तेथील मंदिर आणि लेण्यांच्या स्थानिक लोकांच्या आख्यायिकांवरून आपल्या समजते.


या सर्व आख्यायिका आणि स्थानिक लोककथांमधून आपल्याला त्या गावाचा इतिहास आणि संस्कृती समजण्यास आपल्याला मदत होते. बऱ्याचदा छोट्या खेडेगावांमध्ये आपल्याला काही 'पांढरीची टेकाड' किंवा 'जुन्या पडलेल्या गढ्या' सापडतात त्याबाबत गावाच्या लोकांमध्ये काही आख्यायिका पसरलेल्या असतात त्यामध्ये त्या गावामध्ये कोणी एक राजा राहिला होता त्याची राजधानी म्हणजे ते गाव होते अश्या काही आख्यायिका किंवा लोककथा आपल्याला त्या पांढरीच्या टेकाडाबद्दल किंवा जुन्या मातीच्या गढीबद्दल आपल्याला समजतात त्यावरून आपल्याला त्या पांढरीच्या टेकाडावर किंवा आजूबाजूला आपल्या इतिहासाच्या पाऊलखुणा या विविध खापरांंच्या रुपाने आपल्याला सापडण्यास मदत होते. तसेच ज्यावेळेस ह्या गोष्टी आपण लोकांकडून जाणून घेतो त्यावेळेस त्यांना 'पांढरी' म्हणजे काय असते हे समजावून सांगितले असता गावातील लोकांना योग्य ती माहिती समजण्यास मदत होते आणि त्या भागातील तो प्राचीन वारसा देखील जपला जातो.


'नालासोपारा' येथे सम्राट अशोकाने बांधलेला स्तूप. 


ऐतिहासिक वारसा रुपात लोककथांमध्ये आपल्याला अशीच एक लोककथा आपल्याला सापडते ती 'नालासोपारा' बाबतीत. ‘सोपारा किंवा शूर्पारक’ प्राचीन महाराष्ट्रातील एक महत्वपूर्ण ठिकाण या नालासोपाऱ्यामध्ये एक प्राचीन स्तूप होता हा स्तूप संपूर्ण नालासोपाऱ्यामध्ये ‘बुरुड राजाचा किल्ला’ म्हणून प्रसिद्ध होता याबाबत एक स्केच आणि एक पत्र 'जेम्स. एम्. कॅम्पबेल' यांनी 'पंडित भगवानलाल इंद्रजी' यांना दिला दिले त्यामध्ये त्यांनी या ‘बुरुड राजाच्या किल्याबद्द्ल’ देखील माहिती दिली होती. 'पंडित भगवानलाल इंद्रजी' यांनी जेव्हा या ‘बुरुड राजाच्या किल्याचे’ म्हणजे प्राचीन स्तूपाचे जेव्हा उत्खनन केले तेव्हा त्यामध्ये तांब्याचा एक करंडक सापडला त्यामध्ये भगवान गौतम बुद्धाच्या विविध रुपातील आठ मूर्ती सापडल्या आणि प्राचीन काळातील एक महत्वपूर्ण वारसा जगासमोर नव्या रुपामध्ये बाहेर आला. महाराष्ट्राच्या लोककथांमधून सापडलेले हे एक उत्तम उदाहरण आपल्याला म्हणता येईल.


'सातारा' आणि परिसरात एखाद्या किल्यावर तुम्ही फिरायला गेला तर आजूबाजूचे गावकरी आपल्याला हे त्या किल्यांच्या बाबतीत सांगतात कि 'वाई' नगरी ही महाभारतामधील 'विराट' राजाची राजधानी होती. येथील पांडवगड, वैराटगड हे 'विरा'ट राजाचे मुख्य किल्ले होते. तसेच ‘वैराटगडावर’ या 'विराट' राजाचा मुक्काम होता किंवा तो त्या ठिकाणी राहायचा. परंतु या ठिकाणी आपल्याला असे दिसते कि सातारा आणि परिसरातील सर्व किल्यांचे निर्माण शिलाहारांच्या काळात केले गेले आहे. तरीसुद्धा या 'विराट राजाच्या' नावामुळे हे आडवाटेवर असलेले सुंदर किल्ले गावातील लोकांनी आजही टिकवून ठेवले आहेत.


‘वैराटगडावर’ विराट राजाचा मुक्काम होता असे स्थानिक सांगतात.


अश्याच काही आख्यायिका या योध्यांच्या वीरगळाबाबत गावामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येतात हे सर्व वीरगळ गावाच्या एखाद्या मंदिरात किंवा मंदिर परिसराच्या आजूबाजूला बाहेर शेंदूररुपात आपल्याला बघायला मिळतात. या प्राचीन वीरगळांंच्या बद्दल देखील अश्याच काहीश्या कथा स्थानिक लोकांनी पांडवांशी संबंधित आख्यायिका जोडलेल्या आपल्याला आढळून येतात. त्यामध्ये एक वीरगळाबद्दल एक लोककथा खूप प्रसिद्ध असून ती कथा कायम सांगितली जाते ती अशी कि ‘या गावामध्ये पांडव मुक्कामी होते त्यांनी हे दगड कोरून ठेवले आहेत’. 


या वीरगळांमध्ये आपल्याला गावातील लोकं जे वीर लढत आहेत त्या ठिकाणी आपल्याला सगळे पांडव देखील दाखवतात. या लोककथांमधून आपल्याला आपला इतिहासातील गोष्टी समजण्यास देखील मदत होते यामधून आपल्या ऐतिहासिक ठेव्याचे संवर्धन देखील होते. परंतु सध्या सोशल मिडीयाच्या माध्यमांच्या मदतीने लोकांच्यामध्ये या वीरगळांंच्या बाबत चांगलीच जनजागृती झालेली असून बऱ्याचश्या गावांच्यामध्ये वीरगळ म्हणजे काय त्याचे महत्व काय याबाबत सविस्तर फलक लावून माहिती दिलेली आपल्याला वाचायला मिळते. तसेच या फलकांच्यावर वीरगळ कसा वाचायचा हे देखील उत्तमरीतीने समजावून सांगितले असते. 


काही आख्यायिका या योध्यांच्या वीरगळाबाबत गावामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येतात.


महाराष्ट्रातील प्रत्येक गावामध्ये विविध ऐतिहासिक लोककथा प्रसिद्ध आहेत परंतु यामध्ये सगळ्यात सारखी गोष्ट म्हणजे ‘पांडव’ यामध्ये पांडवांचे महत्व आपल्याला फार दिसून येते. अशीच एक गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामध्ये 'दुर्गाव' नावाचे गाव आहे तेथे भारतामध्ये फार क्वचित आढळणारे 'दुर्योधन' याचे मंदिर आहे त्या मंदिरात 'दुर्योधनाचे' एक शिल्प असून त्याच्यासमोर एक फरशी लावून ठेवलेली आहे. त्याच्यामागची स्थानिक लोकांची कथा अशी आहे कि जर ती फरशी बाजूला काढली तर 'दुर्योधनाची' वाकडी नजर त्या गावावर पडेल आणि पाऊस पडणार नाही अशी एक लोककथा या संपूर्ण परिसरात प्रचलित आहे. यावरून आपल्याला असेही दिसून येते कि आपल्या महाराष्ट्रातील विविध गावांमध्ये स्थानिक लोककथांचा मोठा पगडा आपल्याला दिसून येतो. या लोककथांच्यामधून आपल्याला भरपूर महत्वाच्या गोष्टी समजण्यास मदत होत असते तसेच इतिहासाच्या कडा देखील जोडण्यास मदत होते


कोकणातील आसूद येथील केशवराज अत्यंत सुंदर असलेले हे कोकणातील दगडी मंदिर आपल्या वैशिष्ट्यपूर्ण विष्णूमूर्ती साठी प्रसिद्ध आहे. याच मंदिराच्या परिसरामध्ये आपल्याला एक दगडी पोलपाट तसेच एक दगडी पाटा वरवंटा आपल्याला पहायला मिळतो. याबाबत मंदिरातील पुजारी तसेच आजूबाजूची लोकं त्याबाबत सांगतात कि पांडव ज्यावेळेस येथे मुक्कामी होते तेव्हा या दगडी पोलपाटावर 'द्रौपदी' पोळ्या लाटून देत असेही गोष्ट ते सांगतात. त्यामध्ये बऱ्याचदा पांडव जेव्हा अज्ञातवासात होते तेव्हा त्यांनी हे 'केशवराजाचे' देखील मंदिर एका रात्रीमध्ये बांधले असे सांगितले जाते. ह्या अश्या वेगवेगळ्या लोककथा आपल्याला कोकणामध्ये फार मोठ्या प्रमाणात पहायला मिळतात.


कोकणातील आसूद येथील केशवराज मंदिर.


नाशिक भागामध्ये वणीची 'सप्तश्रृंगीदेवी' हे एक अर्धे शक्तीपीठ या शक्तीपीठाचे महत्व फार मोठ्या प्रमाणात संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये आहे या देवीसंबंधी एक लोककथा आजूबाजूच्या पंचक्रोशी मध्ये प्रचलित आहे ती म्हणजे 'सप्तश्रृंग' गडाच्या समोर एक 'मोहनदरी' नावाचा किल्ला आहे त्या किल्ल्यावर मोठे 'नैसर्गिक नेढे' तयार झाले आहे. या नेढ्याबद्दल असे सांगितले जाते कि जेव्हा 'सप्तश्रृंग देवी' ही महिषासुराशी लढत होती तेव्हा तिला हा 'मोहनदरीचा' डोंगर ओलांडून पलीकडे जायचे होते तेव्हा तिने त्या डोंगराच्या भिंतीला लाथ मारली आणि त्यातून हे भगदाड तयार झाले आणि त्यातून ती गेली असे सांगितले जाते.


अशीच एक गोष्ट साल्हेर किल्यावरील अवाढव्य पायांबद्द्ल सांगितली जाते ती म्हणजे साल्हेर किल्यावर उमटलेले मोठे पाय हे परशुरामाचे आहेत म्हणून. त्याबाबत सांगितली जाणारी गोष्ट म्हणजे जेव्हा परशुरामाला अपरांताची निर्मिती करायची होती तेव्हा त्याने साल्हेर किल्यावर उभे राहून बाण चालवले आणि कोकण प्रदेशाची निर्मिती केली परशुराम ज्याठिकाणी उभा होता त्याठिकाणी त्याची पावले उमटली म्हणून साल्हेर किल्यावर परशुरामाची पावले दाखवली जातात.


'सप्तश्रृंग देवी' ही महिषासुराशी लढत होती तेव्हा तिला हा 'मोहनदरीचा' डोंगर ओलांडून पलीकडे जायचे होते.


जशी लोककथांमधून माहिती आपल्याला मंदिरे आणि किल्यांबद्द्ल मिळते तशीच माहिती आपल्याला ही लेण्यांच्याबाबत देखील लोककथांमध्ये सापडते. अगदी काही आपल्याकडच्या लोककथा या अगदी प्राचीन काळातील परदेशी प्रवाश्यांनी देखील लिहून ठेवल्या आहेत. अशीच एक लोककथा जगप्रसिध्द ‘अजिंठा लेणी’ बद्दल सांगितली जाते ते खुद्द ‘युआन श्वांग’ याने देखील आपल्या प्रवास वर्णनामध्ये लिहून ठेवली आहे ती पुढीलप्रमाणे:-


महाराष्ट्रामध्ये ‘आचार’ नावाचा ‘अर्हत’ राहत होता. त्याची माता मरण पावली तिला याच देशामध्ये पुनर्जन्म घ्यावा लागला आहे हे त्याला त्याच्या अंतर्ज्ञानाने समजले. तेव्हा तो तिचा शोध करत फिरू लागला. एका खेड्यामध्ये तो भिक्षा मागत फिरत असताना एका घरातून एक बालिका त्याला अन्न वाढावयास आली असता हीच आपली माता असे त्याने ओळखले. ‘अर्हत’ याला पाहताच त्या लहान बालिकेला पान्हा फुटला. कोवळ्या वयात पान्हा फुटला म्हणून या बालिकेच्या मैत्रिणींना आश्चर्य वाटले. हे मोठे दुश्चिन्ह आहे अशी त्यांची समजूत झाली आणि साऱ्याजणी दु:खित झाल्या.


‘युआन श्वांग’ याने देखील आपल्या प्रवास वर्णनामध्ये लिहून ठेवली आहे.
(छायाचित्र आंतरजालावरून घेतलेले आहे)


तिच्या पूर्वजन्मीचा वृत्तांत सांगून ‘अर्हताने’ त्यांचे समाधान केले. त्या बालिकेला धर्मदीक्षा देऊन तिच्यासह तो ‘अजंठा’ येथे आला. कृतज्ञतेने प्रेरित झालेल्या ‘अर्हताने’ येथे सोईस्कर जागा पाहून संघराम खोदविले आणि उभारिले आणि त्याच्या भिंतीवर बुद्धाच्या जीवनातील अनेक प्रसंगाची चित्रे कोरवून घेतली. ही दंतकथा असल्याने यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट आपल्याला दिसून येते ती म्हणजे हा जो ‘अर्हत’ आहे तो महाराष्ट्रामधील होता ही गोष्ट या दंतकथेतून आपल्याला समजून घेता येते. ही झाली अजिंठ्याच्या बाबतीमधील कथा. अश्याच पद्धतीमध्ये वेरूळ लेणी बाबत देखील काही लोकं दंतकथा सांगतात कि वेरूळ येथील कैलास लेणे हे भीमाने एका रात्रीमध्ये खोदले ही अशी दंतकथा वेरूळ येथील भागात मोठ्या प्रमाणात प्रचलित आहे.


अशीच एक दंतकथा ही शिरवळ येथे असलेल्या लेणीसमूहाबाबत सांगितली जाते. शिरवळ येथील लेणीचा समूह हा 'पांडवदरा' म्हणून प्रसिद्ध आहे त्याचे कारण आपल्याला लोकांकडून समजते ते असे कि पांडव येथे अज्ञातवासात असताना मुक्कामी होते तसेच 'शिरवळ' येथील लेणीतील विहार हे द्रौपदीचे स्वयंपाकघर होते म्हणून आजूबाजूच्या परिसरातील लोकं आपल्याला लोकंकथेमधून सांगतात. तसेच लेणीमधील जो स्तूप आपल्याला बघायला मिळतो त्यासमोरील शिवलिंग हे भीमाने स्थापन केली असे देखील हे सर्व लोकं सांगतात. त्यामुळे या संपूर्ण लेण्या या आज या लोककथांमुळे जपल्या गेल्या आहेत.


शिरवळ लेणी मधील स्तूप.


अशीच एक कथा ‘शैल कळसूबाई’ बद्दल सर्वत्र प्रचलित आहे ती कथा अशी सांगितली जाते प्राचीनकाळी ‘कळसू’ नावाची कोळ्याची मुलगी होती. ती पाटलाच्या घरी कामाला होती. कामाला लागण्यापूर्वी तिने पाटलाला अट घातली होती की, मी केर काढणे व भांडी घासणे सोडून इतर कामे करीन. एकदा पाटलाच्या घरी भरपूर पाहुणे आले, पाटलाने 'कळसूला' भांडी घासायला लावली, त्यामुळे चिडून 'कळसू' डोंगरावर जाऊन राहू लागली. तोच 'कळसूबाईचा' डोंगर होय. या कळसूबाई शिखरावर ‘कळसू’ ची यात्रा देखील भरते आणि नवरात्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणात श्रद्धाळू लोकांची गर्दी असते.


‘शैल कळसूबाई’ बद्दल देखील आख्यायिका सर्वत्र प्रचलित आहे.


अशीच अजून एक लोककथा कोकणातील 'सवतसडा' धबधब्याबद्दल 'परशुराम' या भागातील पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध आहे. या धबधब्याच्या जवळ कोणीतरी गृहस्थ राहत होता. या गृहस्थाला दोन बायका होत्या. आता पूर्वीच्या ज्या आपल्याला गोष्टी सांगतात कि एक राजा होता त्याला दोन राण्या असायच्या त्यातली एक आवडती राणी आणि एक नावडती राणी त्याप्रमाणेच या गृहस्थाच्या देखील दोन बायकांपैकी एक बायको आवडती आणि एक बायको नावडती. त्यामधील मोठी बायको नावडती बायको होती आणि धाकटी बायको आवडती होती.


एकदा या दोन्ही बायका या धबधब्याच्या ठिकाणी आल्या तेव्हा मोठी जी होती ती छोटीला म्हणाली मी तुला 'वेणी' घालून देते यावरून या गृहस्थाच्या धाकट्या बायकोला शंका आली तेव्हा त्या धाकट्या बायकोने स्वतःच्या पदराची आणि गृहस्थाच्या थोरल्या बायकोच्या पदराची हळूच गाठ बांधली आणि 'वेणी' बांधायच्या दरम्यान या गृहस्थाच्या मोठ्या बायकोने धाकटीला खाली धबधब्याच्या कड्यावरून ढकलून दिले या ढकलण्याने मोठ्या बायकोला अंदाज आलाच नाही कि तिचा पदर देखील धाकट्या बायकोने आपल्या पदराला बांधलेला आहे त्यामुळे या धबधब्याच्या कड्यावरून दोघीही खाली कोसळल्या म्हणून या धबधब्याचे नाव 'सवतसडा' असे पडले. अश्या या लोककथा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये विविध रूपात ऐकायला मिळतात.


सवतसडा धबधबा. 


या विविध लोककथांमध्ये बऱ्याच गोष्टी लपलेल्या असतात या सर्व कथांमध्ये लपलेले बोध घेऊन त्याचा अर्थ आपल्याला इतिहासाशी जोडणे आणि त्यातून इतिहासातील महत्वपूर्ण धागे शोधायला या कथांचा आपल्याला फार उपयोग होतो. या कथांमुळे लोकांमध्ये त्या प्रत्येक ऐतिहासिक जागेबद्दल काही ना काही महत्व असते या लोककथांमुळे आपल्या आजूबाजूचा ऐतिहासिक वारसा मात्र या लोककथांमुळे जपला जातो हे नक्की.

______________________________________________________________________________________________


महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात.

४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.

______________________________________________________________________________________________


एक छायाचित्र हे आंतरजालावरून घेतले आहे.
लिखाण आणि आठ छायाचित्रे © २०२० महाराष्ट्राची शोधयात्रा


1 comment:

  1. खूप छान साईट आहे!अजिंठ्याची वर दिलेली वर्णन कुठे वाचायला मिळेल.

    ReplyDelete

Thank You For Comment...!!! :)

INSTAGRAM FEED

@maharashtraheritage