महाबळेश्वर येथील 'माल्कम पेठ'

 

महाराष्ट्रामध्ये थंड हवेची ठिकाणे म्हटले कि आपल्या डोळ्यासमोर पाहिले नाव येते ते लोणावळा, खंडाळा, माथेरान आणि महाबळेश्वर या ठिकाणांचे. या सर्व ठिकाणांची प्रत्येकाची आपआपली वैशिष्ट्ये आहेत. असेच महाराष्ट्रातील 'महाबळेश्वर' ठिकाण हे फारच प्रसिद्ध आहे ते म्हणजे तेथील 'स्ट्रॉबेरी' या फळाच्या उत्पन्नासाठी. प्राचीन काळापासून 'महाबळेश्वर' याचे उल्लेख आपल्याला मिळतात. इंग्रजांच्या काळात थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध झालेल्या 'महाबळेश्वर' येथे जिथे मुख्य बाजार भरतो त्या जागेला एक वैशिष्ट्यपूर्ण नाव आहे ते म्हणजे 'माल्कम पेठ'. आता हा प्रश्न तर नक्की तुम्हाला पडणार कि याला 'माल्कम पेठ' असे नाव का पडले. चला तर मग जाणून घेऊया या 'माल्कम पेठ' नावाच्या मागे काय आहे.


इ. स. १८१८ साली मराठ्यांची सत्ता संपल्यावर संपूर्ण भारतामध्ये इंग्रजांची सत्ता चालू झाली. जेव्हा इंग्रज हे आपल्या राजसत्तेचे व्यवस्थित पाय रोवत होते तेव्हा इंग्रज भारताच्या विविध ठिकाणी असलेल्या ऐतिहासिक गोष्टींचा मागोवा देखील घेत होते तसेच नोंदी करून करून ठेवत होते. तेव्हा इ.स. १८२४ साली 'जनरल लॉडविक' हा जेव्हा साताऱ्याच्या रेसिडेंट या पोस्टवर होता तेव्हा 'जनरल लॉडविक' याने पहिल्यांदा 'महाबळेश्वर' येथे भेट दिली. 'महाबळेश्वर' येथील हवा फार उत्तम आहे आणि 'महाबळेश्वर' हे स्थळ अत्यंत उत्तम आहे असे 'जनरल लॉडविक' याने पत्र लिहून मुंबई येथील 'गव्हर्नर' याला देखील 'महाबळेश्वर' याठिकाणाबद्दल कळविले. 


'महाबळेश्वर' येथील 'सर जॉन माल्कम' यांच्या नावाचा 'माल्कम पॉइंट. 


पुढे जेव्हा 'कर्नल ब्रिग्ज' हा जेव्हा सातारा येथील रेसिडेंट झाला तेव्हा त्याने इ.स. १८२६ साली 'महाबळेश्वर' येथे येऊन एक सुंदर बंगला बांधला. तसेच 'कर्नल ब्रिग्ज' याने साताऱ्याचे तत्कालीन 'छत्रपती प्रतापसिंह महाराज' यांच्याकडे पाठपुरावा करून 'सातारा' ते 'महाबळेश्वर' गाडी रस्ता बनवून घेतला. काही काळ गेल्यावर त्याकाळातील मुंबईचे  तत्कालीन गव्हर्नर 'सर जॉन माल्कम' हे देखील थंड हवेचे ठिकाण म्हणून 'महाबळेश्वर' येथे थंड हवा खाण्यासाठी आणि मुक्कामासाठी आले. संपूर्ण परिसर पाहिल्यावर 'सर जॉन माल्कम' यांनी सर्वप्रथम इथे आजारी ब्रिटीश सैनिकांसाठी याठिकाणी एक हॉस्पिटल बांधले. यानंतर 'महाबळेश्वर' येथे विविध ब्रिटीश अधिकाऱ्यांनी इथे भेटी  दिल्या.


'कर्नल जॉनब्रिग्ज' हा जेव्हा सातारा येथील रेसिडेंट होता.


पुढे जेव्हा 'कर्नल रॉबर्टसन' जेव्हा साताऱ्याचा रेसिडेंट झाला तेव्हा त्याने 'महाबळेश्वर' इथे भेट दिल्यावर स्वतःसाठी एक बंगला बांधून घेतला. इ.स. १८२८ साली पुन्हा जेव्हा नोव्हेंबरमध्ये 'सर जॉन माल्कम' हे महाबळेश्वर इथे आले तेव्हा ते येताना आपल्यासोबत एक 'डॉ. विल्यम' नावाच्या डॉक्टरला घेऊन आले आणि त्याच्याकडून 'महाबळेश्वर' येथील हवा कशी आहे याबाबत चिकित्सा करून घेतली. याच्यानंतर 'सर जॉन माल्कम' यांनी महाबळेश्वर येथे सरकारी बंगले बांधण्यासाठी जागा निवडल्या आणि येथे एक स्वतःचा खाजगी बंगला देखील बांधून घेतला त्याला नाव दिले 'माउंट शारलॉट' तसेच या बंगल्याचा अजून एक उल्लेख मिळतो तो म्हणजे 'माउंट माल्कम'. याच ब्रिटीश गव्हर्नर 'सर जॉन माल्कम' याच्या सांगण्यानुसार सातारा येथील तत्कालीन 'छत्रपती प्रतापसिंह महाराज' यांनी 'नहर' येथे एक गाव वसविले या गावाला 'सर जॉन माल्कम' याचे नाव दिले आणि गावाचे नाव 'माल्कम पेठ' असे ठेवले. सध्या हेच 'माल्कम पेठ' हे 'महाबळेश्वर' येथील मुख्य बाजारपेठ आहे. 


'ईस्ट इंडिया कंपनी' आणि साताऱ्याचे 'छत्रपती प्रतापसिंह महाराज' यांच्यामध्ये तह झाला.


सातारा येथून महाबळेश्वर येथे जाण्यासाठी एक जुना रस्ता होता तो रस्ता देखील 'सर जॉन माल्कम' याने तत्कालीन सातारा येथील 'छत्रपती प्रतापसिंह महाराज' यांच्याकडून रडतोंडी घाटाने महाबळेश्वर घाटमाथ्याखाली 'पार' घाटापर्यंत चांगला बांधून घेतला. तसेच 'नहार' म्हणजेच 'माल्कम पेठ' याठिकाणी पाण्याचा तोटा होता म्हणून 'वेण्णा तलाव' देखील बांधून घेतला. पुढे इ. स. १६ मे १८२९ रोजी 'ईस्ट इंडिया कंपनी' आणि 'छत्रपती प्रतापसिंह महाराज' यांच्यामध्ये तह होऊन 'माल्कम पेठ' आणि आजूबाजूची १५ मैल परिघाची जागा 'छत्रपती प्रतापसिंह महाराज' यांनी 'ईस्ट इंडिया कंपनी' यांना दिली. 


'सर जॉन माल्कम' याच्याच नावाने 'माल्कम पेठ' वसवली. 


याच 'माल्कम पेठे' मध्ये 'सर जॉन माल्कम' यांच्या स्मरणार्थ एक दगडी स्तंभ 'महाबळेश्वर' मधील 'नहार' उर्फ 'माल्कम पेठ' येथे उभारला गेला. मध्यंतरी हा स्तंभ वीज पडल्याने उध्वस्त झाला होता नंतर तत्कालीन नगराध्यक्षा 'श्रीमती इराणी' यांनी हे 'सर जॉन माल्कम' यांचे स्मारक पुन्हा उभारले. या 'सर जॉन माल्कम' याला पर्शियन आणि हिंदी उत्तम येत होती. अशी ही 'माल्कम पेठ' आपल्याला एक महत्वाचा इतिहास नक्की सांगते. आजही 'सर जॉन माल्कम' यांनी वसवलेले 'माल्कम पेठ' हे गाव 'महाबळेश्वर' येथील अत्यंत महत्वाचे ठिकाण आणि बाजारपेठ म्हणून फार महत्वाचे आहे. 

______________________________________________________________________________________________

संदर्भग्रंथ:-

१) Maharashtra State Gazetteers Satara District Vol-xix:- Government Printing, Bombay, 1885.

२) Mahabaleshwar:- D. B. Parasnis, Lakshmi Art Printing Works, Bombay, 1916.

३) महाबळेश्वर क्षेत्र आणि सॅॅनिटोरियम यांचे वर्णन:- दत्तात्रय कमलाकर दीक्षित, ज्ञानप्रकाश छापखाना, १९०२.  


कसे जाल:-

पुणे - वाई - पाचगणी - महाबळेश्वर.   

______________________________________________________________________________________________


महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात.

४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.

______________________________________________________________________________________________


लिखाण आणि छायाचित्रे © २०२१ महाराष्ट्राची शोधयात्रा


1 comment:

Thank You For Comment...!!! :)

INSTAGRAM FEED

@maharashtraheritage