गुहागर येथील 'उफराटा गणपती'

 

'गुहागर' हे मुळात प्रसिद्ध आहे ते 'श्री व्याडेश्वर' मुळे. परंतु या 'गुहागर' मध्ये काही ठिकाणे अशी देखील आहेत कि जिथे फारशी वर्दळ देखील नसते. 'गुहागर' मध्येच असलेल्या सुंदर ठिकाणांच्या पैकी एक ठिकाण म्हणजे 'गुहागर' येथील 'उफराटा गणपती'. आता या 'गुहागर' मध्ये असलेल्या 'गणपतीला' उफराटा असे नाव कसे पडले ते आपण जाणून घेऊया.


तसे पहायला गेले तर कोकणातला 'गणेशोत्सव' हा सगळ्या जगामध्ये प्रसिद्ध आहे. तसेच कोकणातील गणपती हे देखील फार वैशिष्ट्यपूर्ण आहेत अश्याच काही गणपती मूर्तीपैकी 'उफराटा गणपती' हा देखील नक्कीच वैशिष्ट्यपूर्ण आहे तो केवळ त्याच्या पांढऱ्या रंगामुळे. या पांढऱ्या रंगामुळे 'उफराटा गणपती' हा वेगळा ठरतो. 'उफराटा गणपती' मंदिर हे गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यापासून अगदी जवळ आहे. 'उफराटा गणपती' मंदिराच्या बाहेरील बाजूस आपल्याला महाराष्ट्र राज्य पर्यटन मंडळाने लावलेला एक फलक देखील बघायला मिळतो. अत्यंत साधे आणि छानसे कौलारू असलेले मंदिर आपले लक्ष नक्कीच वेधून घेते. सभामंडप आणि गाभारा असे या मंदिराचे स्वरूप आहे.


'उफराटा गणपती' मंदिर.


या उफराटा गणपती बद्दल एक कथा सांगितली जाते ती पुढीलप्रमाणे:-

सुमारे ३५० वर्षांपूर्वी 'उफराटा गणपती' याची मूर्ती ही कोळ्यांना समुद्रामध्ये सापडली. त्याच्यानंतर या कोळ्यांनी या 'उफराट्या गणपतीची' मूर्ती विधिपूर्वक एका छोट्या मंदिरात स्थापन केली. पण पुढे समुद्र खवळल्यामुळे गुहागर येथील समुद्राचे पाणी हे गावामध्ये मोठ्याप्रमाणात शिरले. हे समुद्राचे पाणी एवढे होते कि अक्षरशः 'गुहागर' गाव बुडायला आले होते. जेव्हा गाव बुडायला आले होते तेव्हा 'गुहागर' गावातल्या सगळ्या ग्रामस्थांनी गावावरचे संकट दूर होण्यासाठी 'उफराट्या गणपतीला' साकडे घातले. तेव्हा या पूर्वाभिमुख असलेल्या 'उफराट्या गणपतीने' आपले तोंड पश्चिमेकडे वळवले आणि समुद्र मागे हटला आणि 'गुहागर' गावावरचे संकट टळले. या 'गुहागर' गावात असलेल्या 'गणपतीने' आपले तोंड उफराटे केले म्हणून या 'गणपतीचे' नाव 'उफराटा गणपती' असे झाले. अशी कथा संपूर्ण गावामध्ये प्रसिद्ध आहे. 


सभामंडप आणि 'उफराटा गणपती' इतिहास.  


'उफराटा गणपतीची' मूर्ती ही संपूर्ण पांढरीशुभ्र असून चतुर्भुज आहे. या  चतुर्भुज असलेल्या 'उफराटा गणपतीच्या' हातामध्ये आपल्याला परशु, त्रिशूळ, मोदक आणि कमळ पहायला मिळते. या मूर्तीचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या मूर्तीला मुकुट नाहीये. 'उफराटा गणपती' याची मूर्ती ही डाव्या सोंडेची असून गणपतीच्या पोटाला नागसुत्र देखील आपल्याला बघायला मिळते. 'खरे' घराण्याचे हा गणपती कुलदैवत असून भाद्रपद महिन्यामध्ये मातीच्या गणपतीची स्थापना 'खरे' घराण्यातील लोकं करत नाहीत तर पितळी मूर्ती आणि गणेश गोट्यांची पूजा 'खरे' घराण्यातील लोकं करतात. 


'उफराटा गणपती' याची सुंदर मूर्ती. 


असा हा निसर्गरम्य 'गुहागर' मध्ये असलेला 'उफराटा गणपती' आणि गुहागर मधील सुंदर समुद्रकिनारा हा आपल्या मनाला नक्कीच भुरळ घालतो. अश्या निसर्गरम्य ठिकाणी असलेल्या 'उफराटा गणपती' याचे दर्शन आपल्याला नक्कीच सुखावून जाते.

______________________________________________________________________________________________  

कसे जाल:-

पुणे - भोर - वरंधा घाट - महाड - पोलादपूर - खेड - चिपळूण - गुहागर.   

______________________________________________________________________________________________


महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात.

४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.

______________________________________________________________________________________________


लिखाण आणि छायाचित्रे © २०२१ महाराष्ट्राची शोधयात्राNo comments:

Post a Comment

Thank You For Comment...!!! :)

INSTAGRAM FEED

@maharashtraheritage