'बाई साहेबांचा' प्रवास

 

'सर रिचर्ड बर्टन' ही व्यक्ती जवळपास सर्वांना परिचित आहे ते म्हणजे एका महत्वाच्या कारणामुळे ते म्हणजे 'अरेबियन नाईट्स' या १६ खंडांच्या पुस्तकांचे इंग्रजी भाषांतर यांनी केले यासाठी म्हणून प्रसिद्ध आहे. परंतु 'सर रिचर्ड बर्टन' हे उत्तम गुप्तहेर देखील होते. या प्रसिद्ध 'सर रिचर्ड बर्टन' यांची पत्नी 'इसाबेल बर्टन' ही इ.स. १८७९ मध्ये 'मुंबई' आणि परिसर बघायला आली होती. या भेटीमध्ये या 'इसाबेल बर्टन' हिने 'मुंबई' आणि 'पुणे' परिसराचे भेटीचे फार उत्तम वर्णन केलेले आपल्याला बघायला मिळते.


'मुंबई' मधून प्रवास करत या 'मुंबई' भेटी दरम्यान 'इसाबेल बर्टन' हिने 'मुंबई' शहरामध्ये आल्यावर त्याकाळातील 'मुंबई' शहरातील प्रसिद्ध हॉटेल 'वेस्टन्स एस्प्लेनड' मुक्काम केला होता. त्याकाळात मुंबई मधील अत्यंत प्रसिद्ध असे हे हॉटेल होते. नंतर तिने मुंबई मध्ये फेरफटका मारला तेव्हा तेथील लोकांचे राहणीमान याचे देखील वर्णन केलेले आहे. तसेच 'इसाबेल बर्टन' हिने 'एलिफंटा' म्हणजेच 'घारापुरी' लेण्यांना भेट देऊन तेथील हत्तीचे देखील वर्णन करून छायाचित्र देखील काढले आहे. 


'मुंबई' मध्ये फिरल्यानंतर दिनांक २१ फेब्रुवारी १८७९ रोजी तत्कालीन जी.आय.पी. रेल्वेच्या ट्रेनने 'इसाबेल बर्टन' ही 'माथेरान' येथे जाण्यास निघाली तेव्हा तिला वाटेमध्ये भायखळा, चिंचपोकळी(चिंचुगल्ली), परळ, दादर, सायन, कुर्ला, भांडुप, ठाणे, दिवा, ही स्टेशन लागली असे 'इसाबेल बर्टन' आपल्या प्रवास वर्णनामध्ये वर्णन करते. ती या प्रवास वर्णनामध्ये असेही नमूद करते की 'परळ' येथून आम्ही 'मुंबई' येथील अनेक टेकड्या बघितल्या. तसेच 'माहिम' या गावाला जंगलाने वेढलेले दृश्य देखील बघितले. 'ठाणे' शहराबाबत ती लिहिते की "ठाणे हे मोठे खेडे होते परंतु अत्यंत गलिच्छ" तसेच 'ठाणे' येथे आम्हाला निळ्या-काळ्या रंगाचे काही पक्षी बघायला मिळाले तसेच काही पांढरे शुभ्र पक्षी देखील शेतांच्या मध्ये दिसले. 


'इसाबेल बर्टन' हिने 'एलिफंटा' म्हणजेच 'घारापुरी' लेण्यांना भेट  दिली आणि छायाचित्रे काढली.

'इसाबेल बर्टन' आपल्या प्रवास वर्णनामध्ये 'कल्याण' बाबत 'कल्याण' हे जंक्शन असल्याचे देखील नमूद करते. असा प्रवास करत 'इसाबेल बर्टन' ही 'नेरळ' येथे पोहोचते. मुंबई ते नेरळ हे अंतर ३३ मैल असल्याचे ती आपल्या प्रवास वर्णनामध्ये लिहून ठेवले आहे. 'नेरळ' बद्दल 'इसाबेल बर्टन' हिने लिहिले आहे की 'नेरळ' हे प्रख्यात 'नाना फडणीस' यांचे जन्मगाव आहे. या 'नेरळ' गावामधून आम्ही वेडेवाकडे रस्ते ओलांडत आम्ही मोठ्या कष्टाने 'माथेरान' येथे पोहोचलो. 'माथेरान' येथील निसर्गाचे दृश्य फारच अप्रतिम होते तसेच 'माथेरान' येथील हवा ही देखील फारच चांगली आहे असे 'इसाबेल बर्टन' आपल्या प्रवास वर्णनात लिहिते. तसेच 'इसाबेल बर्टन' 'माथेरान' बद्दल लिहून ठेवते की 'माथेरान' याठिकाणी यायचे दोन हंगाम आहेत. एक म्हणजे उन्हाळ्यात आणि दुसरे म्हणजे पावसाळ्यानंतर हिरव्यागार वनश्री मध्ये. तसेच 'माथेरान' इथे वाघ, सिंह यांसारखे मोठे प्राणी नाहीत परंतु इतर वन्य श्वापदे आहेत. 


'माथेरान' येथील बाजारपेठे पासून जवळच एक व्यायामशाळा, रोमन कॅथेलीक आणि प्रॉटेस्टंट चर्च आहेत. तसेच माथेरान सारख्या उंच डोंगराच्या जागेवर पोस्ट आणि टेलिग्राफ यासारख्या सुविधा देखील उपलब्ध आहेत. 'माथेरान' येथे ७० बंगले आहेत. तसेच 'माथेरान' येथे 'आलेक्झांड्रा' या नावाचे हॉटेल स्वस्त आहे. असे वर्णन 'माथेरान' बद्द्ल 'इसाबेल बर्टन' करते. दिनांक २२ फेब्रुवारी १८७९ रोजी आम्ही भल्या पहाटे 'माथेरान' येथून निघून थोडे थकलेल्या अवस्थेमध्ये 'नेरळ' स्थानकावर पोहोचलो नंतर आमचा प्रवास 'लोणावळा' येथे जाण्यासाठी सुरू झाला. सकाळी १० वाजता आमची ट्रेन 'नेरळ' स्थानकामध्ये आली आणि आमचा प्रवास सुरु झाला असे 'इसाबेल बर्टन' हिने लिहिलेले आहे.


इसाबेल बर्टन हीने माथेरान येथून काढलेले छायाचित्र.


पुढे 'इसाबेल बर्टन' लिहिते की 'नेरळ 'येथून निघून आम्ही जवळपास 'बोर घाटामधून' तीन तासांचा प्रवास करत 'लोणावळा' येथे पोहोचलो. लोणावळ्याचा उल्लेख 'इसाबेल बर्टन' ही 'लानौळी' असा करते. 'लोणावळा' स्थानक यायच्या आधी 'खंडाळा' गाव आम्हाला लागले या गावामधील हवा ही स्वच्छ आणि आल्हाददायक आहे असे 'इसाबेल बर्टन' म्हणते. तसेच 'इसाबेल बर्टन' असे देखील म्हणते की या भागामध्ये दोन 'किल्ले' देखील आहेत. 'इसाबेल बर्टन' ही लोणावळा इथे पोहोचल्यावर ती एका चांगल्या हॉटेल मध्ये उतरली. या हॉटेलमध्ये असणारा आचारी हा उत्तम स्वयंपाक बनवतो. दुसऱ्या दिवशी सकाळी 'इसाबेल बर्टन' ही 'कार्ला' येथील लेणीला देखील भेट देते. 'कार्ला' लेणीला पोहोचल्यावर ती असेही म्हणते की भारतातील एका सुंदर बौद्ध लेणीला आम्ही भेट दिली आणि तिथे एका गुहेमध्ये 'गौतम बुद्ध' यांचा पुतळा देखील होता. तसेच येथूनच जवळून इंद्रायणी नदी देखील वाहते असे देखील 'इसाबेल बर्टन' हिने आपल्या प्रवासात लिहून ठेवले आहे. 


'कार्ले' येथील लेणी बघून झाल्यानंतर साधारणपणे आम्ही  सकाळी ११ च्या सुमारास हॉटेलमध्ये जात असताना आम्हाला काही 'मराठी खेडी' बघायला मिळाली तसेच 'हिंदू' वंशातील लोक फार सुसंस्कृत आहेत. येथील खेड्यातील झोपड्या या शकारलेल्या आहेत. तसेच आम्ही जात असताना एका शेतकऱ्याने मोठ्या अगत्याने घरी बोलवून मला बसायला स्टूल दिला आणि तेथून निघताना मी त्या शेतकऱ्याला १ रुपया दिला असे वर्णन 'इसाबेल बर्टन' करते. पुढे आम्ही हॉटेलमधून ब्रेकफास्ट करून रेल्वे प्रवासासाठी लोणावळा स्थानकावर गेलो तेव्हा तिथे एका 'स्टेशन मास्टरने' एक 'पाणमांजर' मारून तिला टबमध्ये ठेवले होते. इथून पुढे २ तास अंतरावर 'पुणे' होते. पुण्याचा उल्लेख 'इसाबेल बर्टन' ही 'पुनाह' असा करते. 


इसाबेल बर्टन हीने टिपलेले मुंबई येथील बाजाराचे चित्र.

साधारपणे 'इसाबेल बर्टन' ही आपल्या सहकाऱ्यांच्या सह संध्याकाळी ६.३० वाजता पुण्यामध्ये पोहोचली. रेल्वने पुण्यामध्ये पोहोचल्यानंतर पुण्याबाबत 'इसाबेल बर्टन' लिहिते की "पुणे शहर म्हणजे पेशव्यांचा बालेकिल्ला होता." तसेच पुण्यात आल्यावर 'इसाबेल बर्टन' हिने पुण्यातील 'नेपियर हॉटेल' येथे मुक्काम केला. हे एका 'पारशी' माणसाचे हॉटेल होते. त्याने या हॉटेलमध्ये खूप स्वछता ठेवली होती. तसेच हॉटेलमध्ये असलेले फर्निचर देखील खूप सुंदर होते. येथील 'पारशी' जमात खूप आतिथ्यशील आहे आणि बुद्धीमान आहे तसेच त्यांना इंग्रजांबद्दल ममता आहे. या 'पारशी' लोकांची राहणी ही इंडोयुरोपियन आहे. 


'इसाबेल बर्टन' असेही म्हणते की रेल्वे येण्यापूर्वी १९० मैल अंतरावर असलेल्या पुण्याच्या प्रवासासाठी २४ तास लागत असत तेव्हा यासाठी ६ पौंड द्यावे लागत असे. पुढे 'इसाबेल बर्टन' ही पुण्यामध्ये देखील फिरली तेव्हा तिने पेशव्यांच्या शनिवार वाडा येथे देखील भेट दिली त्याबद्दल ती लिहिते की "पेशव्यांच्या या राजवाड्याच्या तळघरात ग्रंथालय आणि वरच्या बाजूस देशी लॉ कोर्ट आहे. तसेच येथे दिवाणखान्यातील पेशव्यांचा दरबार हॉल देखील पाहिला. दुसरा बाजीराव या वाड्यामध्ये राहत होता. दुसरा बाजीराव याच्या सैन्याचा इंग्रजांनी पराभव करून त्याला कैद करण्यापूर्वी त्याने पळ काढला परंतु जॉन माल्कम याला तो शरण गेला. 


इसाबेल बर्टन हिचे छायाचित्र.


यासाठी इंग्रजांनी त्याला वर्षाचे ८०००० रुपये पेन्शन म्हणून दिले. तसेच पेशव्यांचा या महालामध्ये विष्णू, शंकर आणि विठोबा अशी तीन देवळे देखील होती." असे 'इसाबेल बर्टन' आपल्या या वर्णनामध्ये नमूद करते. याच्यानंतर 'इसाबेल बर्टन' हीचा जवळपास मुक्काम एक आठवडा पुण्यात होता तेव्हा तिने पुण्यात काही इतर ठिकाणे देखील पाहिली आणि त्यानंतर तिने 'हैद्राबाद' येथे निजामाच्या भेटीला जाण्याचे निश्चित केले. एकंदरीतच 'इसाबेल बर्टन' हिच्या वर्णनावरून तत्कालीन मुंबई आणि पुण्याची स्थिती समजण्यास नक्कीच मदत होते आणि 'मुंबई-पुणे' प्रवास याचे एक सुंदर वर्णन देखील वाचायला मिळते. 'इसाबेल बर्टन' हिची 'शनिवार वाड्याला' भेट देणे आणि वर्णन लिहिणे ही गोष्ट देखील नक्कीच महत्वाची ठरते. 

______________________________________________________________________________________________

संदर्भग्रंथ:-

१) The Romance of Isabel, Lady Burton, by Isabel Lady Burton (1831-1896) Volume II.

______________________________________________________________________________________________


महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात.

४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.

______________________________________________________________________________________________


लिखाण आणि छायाचित्रे © २०२१ महाराष्ट्राची शोधयात्रा

No comments:

Post a Comment

Thank You For Comment...!!! :)

INSTAGRAM FEED

@maharashtraheritage