'किनकेड साहेबाची' संगम माहुलीची मोटारीने सफर

 

जुनी स्थलवर्णने वाचताना नेहमीच मजा येते त्याचे मुख्य कारण म्हणजे त्या काळात एखाद्या ठिकाणी जाण्याच्या सोयीसुविधा तसे वाहने यांची उपलब्धता आपल्याला त्यामधून समजून येते किंवा एखाद्या प्रसिद्ध ठिकाणी करायचा प्रवास किती खडतर असायचा हे देखील समजून येते. आजकाल आपण सगळे 'कार' ने प्रवास मोठ्या प्रमाणात करतो परंतु जवळपास ११२ वर्षांपूर्वी 'मोटर गाडी' हे प्रकरण फारच नवीन होते. याचकाळात 'चार्ल्स अलेक्झांडर किनकेड' हा 'सातारा' शहराचा डिस्ट्रिक्ट जज म्हणून काही काळ सातारा येथे वास्तव्य करून होता. या आपल्या वास्तव्याच्या काळामध्ये 'चार्ल्स किनकेड' याला सातारा हा प्रांत फारच आवडला. याच काळात त्यांनी त्यांच्या एका भारतीय मित्राकडे 'संगम माहुली' पाहण्याची आपली इच्छा व्यक्त केली. 


त्याच दिवशी मित्राशी बोलून त्यांचे 'संगम माहुली' येथे जाण्याचे ठरवले. 'चार्ल्स किनकेड' यांच्या मित्राच्या घरी त्यादिवशी काही पाहुणे हे 'मोटरगाडी' घेऊन आले होते. त्यामुळे या सर्वांनी 'संगम माहुली' इथे मोटरगाडी घेऊन सहलीला जायचे ठरवले. त्याकाळी मोटरगाडी हे प्रकरण नवीन असल्याने आजूबाजूची सगळी लोकं आश्चर्यचकित होऊन मोटरगाडी कुतूहल नजरेने बघत असत. 'संगम माहुली' येथील प्रवास हा अवघ्या तीन मैलांचा होता. या सहलीमध्ये तीन जणांना गुजराथी येत होते तसेच चार जणांना इंग्रजी येत होते तर पाच जणांना मराठी येत होते सगळ्यांच्या सहमतीमुळे मराठी भाषेमध्ये त्यांचे संभाषण या प्रवासामध्ये झालेले आहे. तसेच 'चार्ल्स किनकेड' यांना देखील मराठी उत्तम प्रकारे येत होती. 


'संगम माहुलीचे' या सहलीचे प्रवास वर्णन आपल्याला 'द टेल ऑफ द तुलसी प्लँट अँड अदर स्टडीज' या पुस्तकात 'टू माहुली बाय मोटर' या प्रकरणात वाचता येते. हे प्रवास वर्णन वाचताना आपल्याला एवढे मात्र समजायला मदत होते की जवळपास ११२ वर्षांच्या कालखंडात आपण काय काय गोष्टी बघण्यासाठी मुकलेलो आहोत हे या प्रवासवर्णनावरून समजते. 'चार्ल्स किनकेड' आणि मंडळी जेव्हा 'संगम माहुली' येथे जाऊन पोहोचली त्यानंतर 'चार्ल्स किनकेड' आपल्या वर्णनामध्ये लिहितात की कृष्णा नदी माहुली गावाच्या मधूनच वाहत असल्याने गावचे दोन भाग झालेले आहेत. एक 'श्रीक्षेत्र माहुली' तर दुसरे 'संगम माहुली'. 'संगम माहुली' येथे कृष्णा आणि वेण्णा नद्यांचा संगम होतो. या नदीच्या संगमाचा उल्लेख हा वाल्मिकी रामायणात देखील आहे असे म्हणतात असे 'चार्ल्स किनकेड' यांनी नमूद केलेले आहे. तसेच 'समर्थ रामदास' स्वामी हे देखील विविध प्रसंगी 'माहुली' येथे आल्याचे देखील उल्लेख आहेत असे ते नमूद करतात. 


 'द टेल ऑफ द तुलसी प्लँट अँड अदर स्टडीज' या पुस्तकात 'टू माहुली बाय मोटर' या प्रकरणात वाचता येते.


पुढे 'चार्ल्स किनकेड' असे लिहितात की एकदा ग्रहण कालामध्ये छत्रपती शाहू महाराज (पहिले) माहुलीच्या संगमावर स्नान करण्यासाठी आले असताना तिथे संकल्प सांगण्यास कोणीही राजोपाध्ये नव्हते. राजाराम महाराजांनी पंतप्रतिनिधीचे नवे पद तयार केले होते त्या पदावर असलेले श्रीनिवासराव उर्फ श्रीपतराव महाराजांच्या सोबत होते. कुणीही ब्राम्हण उपस्थित नाही म्हणून पंतप्रतिनिधी यांनीच संकल्प सांगितला आणि हा प्रसंग निभावून नेला म्हणून 'संगम माहुली' येथील गावठाण पंतप्रतिनिधी यांना छत्रपती शाहू महाराज यांच्याकडून दक्षिणेच्या रूपाने मिळाली. १२० बिघ्यांची मिळालेली ही दक्षिणा श्रीनिवासराव यांनी स्वतःसाठी न वापरता त्याठिकाणी ६० घरे बांधली आणि चार शाखांच्या दशग्रंथी ब्राम्हणांची तिथे वसती करविली यासाठी त्या भागाला 'वस्ती माहुली' असे देखील म्हटले गेले. 


क्षेत्र माहुली येथील बरीचशी मंदिरे ही पंतप्रतिनिधी यांनी बांधलेली आहेत. यापैकी दहा मंदिरे ही कृष्णेच्या पूर्व काठावर आहेत. कृष्णेच्या पूर्व काठावर राधा-शंकराचे मंदिर आहे. हे मंदिर ज्या घाटावर आहे तो घाट बापूभट गोविंदभट यांनी इ.स. १७८० च्या सुमारास बांधला तर मंदिर हे भोरच्या पंतसचिवांच्यापैकी ताईसाहेबांनी इ.स. १८२५ च्या सुमारास बांधले. याच काठावर असलेले दुसरे देऊळ हे श्रीपतराव पंतप्रतिनिधी यांनी इ.स. १७४२ मध्ये बांधले हे मंदिर 'बिलवेश्वर' मंदिर म्हणून ओळखले जाते. या मंदिराच्या पलीकडे घाटाच्या पायऱ्या इ.स. १७३८ मध्ये आनंदराव भिवराव देशमुख अंगापूरकर यांनी बांधविल्या. तिसरे रामेश्वराचे मंदिर हे त्याही अगोदर म्हणजे इ.स. १७०८ मध्ये देगाव येथील परशुराम नारायण अनगळ यांनी बांधविले होते. 


याच्यासमोर पश्चिम काठावर दुसऱ्या बाजीरावाने बांधलेला घाट अपुरा राहिलेला आहे. तसेच पश्चिम घाटावर दत्तात्रेय, शंकर-पार्वती, हनुमान यांची देखील मंदिरे आहेत. बिलवेश्वर मंदिराच्या समोर पश्चिम काठावर संगमेश्वर महादेवाचे हेमाडपंथी मंदिर आहे. हे मंदिर देखील इ.स. १७४० मध्ये श्रीपतरावांनी बांधविले. याशिवाय वेण्णा नदीच्या दक्षिण काठावर सर्वात मोठे असे मंदिर आहे ते विश्वेश्वर महादेवाचे आहे. हे मंदिर देखील श्रीपतरावांनी इ.स. १७३५ मध्ये बांधले. याच ठिकाणी इ.स. १७४४ साली पोर्तुगीजांच्या वसई मोहिमेतून पळवून आणलेली घंटा आहे. दुसरा बाजीराव आणि सर जॉन माल्कम यांची भेट माहुलीस झाल्याचा उल्लेख देखील सापडतो. तसेच माहुली स्थलविशेष या क्षेत्र महात्म्यात आहे. तसेच इ.स. १८६५ मध्ये साताऱ्याच्या राणीसाहेबांनी  बांधलेल्या देवळाजवळ आणि घाटाजवळ छत्रपतींच्या घराण्यातील कित्येक व्यक्तींच्या समाध्या आहेत. असे सगळे वर्णन या प्रवास वर्णनात 'चार्ल्स किनकेड' नमूद करतात.


संगम माहुली येथील काशी विश्वेश्वर मंदिर.


तसेच 'चार्ल्स किनकेड' यांनी आपल्या या माहुलीच्या सहलीच्या वर्णनात लिहिले आहे की दुसऱ्या शाहू महाराजांच्या निधनानंतर त्यांचा अंत्यविधी हा राजघराण्याच्या शिरस्त्यानुसार माहुली येथेच करण्यात आला. सगुणाबाई या शाहू महाराजांच्या राणीसाहेबांनी इ.स. १८७४ मध्ये शाहूसमाधी बांधून घेतली. या समाधीच्या शेजारी अन्य आप्तांच्या समाध्या आहेत. त्या सर्व समाध्यात एक समाधी आगळी वेगळी आहे. ती आहे शाहू महाराजांच्या प्राणप्रिय खंडया नामक कुत्र्याची. शाहू महाराजांच्या दरबारात या खंड्याच महत्व अनन्यसाधारण होते असे म्हणतात असे 'चार्ल्स किनकेड' आपल्या प्रवास वर्णनात लिहितात. 


याबाबत 'चार्ल्स किनकेड' लिहितात की शाहू महाराज खंडयाला आपल्या सोबत घेऊन शिकारीला गेले असता त्यांची नजर दुसरीकडे असताना एक वाघ त्यांच्यावर झडप घालण्याचा प्रयत्न करत असताना त्या खंडया कुत्र्याने मोठंमोठ्याने भुंकून महाराजांना सावध केले आणि त्यांचे प्राण वाचविले. या गोष्टीमुळे शाहू महाराजांनी खंड्याला आपल्या दरबारात एक स्थान दिले तसेच जहागिरी देखील दिली. तसेच खंडयाच्या मृत्यूनंतर त्याच्यावर शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्यात आले. तसेच त्याच्या अस्थींचे विसर्जन न करता त्या ज्या ठिकाणी पुरल्या तिथे लाल दगडाचे स्मारक उभारण्यात आले. स्वतः 'चार्ल्स किनकेड' यांनी ती प्रतिमा पाहिल्याचे ते नमूद करतात. 


'चार्ल्स अलेक्झांडर किनकेड' यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या आतील तुळशीचे पूजन करताना एक स्त्री हे  छायाचित्र .


तसेच 'चार्ल्स किनकेड' असे देखील नमूद करतात की छत्रपती शाहू महाराजांची समाधी देखील उन्हापावसाच्या माऱ्यामुळे भग्नावशेष रूपामध्ये पाहायला मिळते. त्या स्मारकावर दोन शिवलिंगे पाहायला मिळतात. याबाबत एक कथा सांगितली जाते असे 'चार्ल्स किनकेड' म्हणतात. छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीवर सुरुवातीला एक शिवलिंग होते परंतु ते पुराच्या पाण्याबरोबर वाहून गेले म्हणून त्या समाधीवर शिवलिंगाची प्रतिष्ठापना केली गेली. काही कालावधी नंतर वाळूमध्ये नदीच्या पुराबरोबर वाहून गेलेले शिवलिंग सापडले म्हणून त्याची देखील परत प्रतिष्ठापना केली गेली. 


'चार्ल्स किनकेड' लिहितात की इतक्या वर्षांनंतर देखील छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीच्या शिवलिंगाची षोडशोपचारे पूजा केली जाते हे षोडशोपचार कोणते आहेत ते देखील ते नमूद करतात यामध्ये आवाहन, आसन, पाद्य, अर्घ्य, आचमन, स्नान, वस्त्र, यज्ञोपवित, गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, मंत्रपुष्प, प्रदक्षिणा, आणि नमस्कार अश्या पध्दतीने पूजा केली जाते. ही पूजा पहायची 'चार्ल्स किनकेड' यांना फार उत्सुकता होती त्यांनी तेथील पुजारीला विचारले असता तेथील पुजाऱ्याने देखील पूजा पाहण्यासाठी 'चार्ल्स किनकेड' आणि मंडळीला परवानगी दिली. 


या छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीच्या पूजेचे देखील वर्णन 'चार्ल्स किनकेड' करतात या समाधीच्या इथे आलेल्या दोघा तिघा व्यक्तींच्या हातामध्ये चांदीची मूठ असलेले मोरपिसांचे पंखे होते. पंख्यानी समाधीवरच्या राजचिन्हांना वारा घातला गेला. त्याच्यानंतर गगनभेदी तुतारी वाजवली गेली. पुजाऱ्याने मूर्ती आणि शिवलिंग स्वच्छ धुतले. तसेच त्याच्यावर हळद आणि कुंकू वाहिले. तांदळाचे दाणे त्या दोघांच्या भोजणप्रित्यर्थ उधळले गेले. पुन्हा एकदा वारा घातला गेला, तुताऱ्या वाजवल्या गेल्या तसेच धूप- उदबत्ती यांचा सुगंध संपूर्ण परिसरात दरवळत होता या धुरामुळे अंधार अधिक धुरकट झाला या धुरकट वातावरणात छत्रपती शाहू महाराज यांची प्रतिमा उभी राहिल्याचा भास झाला. असे 'चार्ल्स किनकेड' यांनी आपल्या या प्रवासवर्णनामध्ये नमूद केले आहे. 


छत्रपती शाहू महाराज यांची संगम माहुली येथील समाधी.


जेव्हा तुताऱ्या पुन्हा एकदा वाजल्या तेव्हा 'चार्ल्स किनकेड' भानावर आले समाधीची षोडशोपचारे पूजा झाल्यावर पुजाऱ्याने पोर्तुगीज घंटा देखील वाजवली आणि सगळीकडे फुले उधळली. पुजाऱ्याप्रमाणे या संगम माहुलीच्या सहलीला आलेल्या आम्ही सगळ्यांनी गुढघे खाली टेकवून छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीला नमस्कार केला.अश्या या भारावलेल्या वातावरणामध्ये आमची 'संगम माहुली' येथील सहल समाप्त झाली. सगळी मंडळी मोटारीत बसली आणि आम्ही सगळे काही वेळात साताऱ्यामध्ये आलो सुद्धा. असे हे 'संगम माहुलीच्या' सहलीचे ११२ वर्षांपूर्वी लिहिलेले वर्णन नक्कीच महत्वाचे ठरते. ११२ वर्षांपूर्वी 'चार्ल्स किनकेड' यांनी पाहिलेल्या कितीतरी गोष्टी काळाच्या ओघामध्ये बदललेल्या आहेत हे आपण जेव्हा 'संगम माहुली' हे स्थान पाहायला जातो तेव्हा नक्कीच समजते. 

______________________________________________________________________________________________

संदर्भग्रंथ:-

१) द टेल ऑफ द तुलसी प्लँट अँड अदर स्टडीज:- C.A.KINCAID, D.B. Taraporwala & Sons, 1916

______________________________________________________________________________________________


महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात.

४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.

______________________________________________________________________________________________


लिखाण आणि छायाचित्रे © २०२१ महाराष्ट्राची शोधयात्रा

No comments:

Post a Comment

Thank You For Comment...!!! :)

INSTAGRAM FEED

@maharashtraheritage