पुण्यामधील 'महात्मा फुले संग्रहालय'

 

पुण्याची ओळख ही जशी 'ऑक्सफर्ड ऑफ दि ईस्ट' म्हणून आहे तशीच पुण्याची अजून एक ओळख म्हणजे पुणे हे संग्रहलयांचे देखील शहर आहे. पुणे शहरामध्ये जवळपास चाळीस संग्रहालये आहेत. यामध्ये आपल्याला खूप वेगवेगळ्या गोष्टी पहायला मिळतात. पुण्यातील अश्याच एक महत्वाच्या संग्रहालयाची आज आपण माहिती बघणार आहोत ते म्हणजे पुण्यातील 'घोले रोड' येथे असलेले 'महात्मा फुले संग्रहालय'.


पुण्यामधील प्रसिद्ध असलेला 'जंगली महाराज रस्ता' हा 'घोले रस्ता' याला जेथे छेदतो त्या चौकामधून 'घोले रस्त्यावरून' थोडे पुढे आपण चालत गेलो कि डाव्या बाजूला आपल्याला एक मोठे संग्रहालय पहायला मिळते ते संग्रहालय म्हणजे 'महात्मा फुले संग्रहालय' होय. आज 'महात्मा फुले वस्तूसंग्रहालय' या नावाने प्रसिद्ध असलेल्या या संग्रहालयाचे पूर्वीचे नाव हे 'लॉर्ड रे इंडस्ट्रीयल म्युझियम' असे होते. या 'लॉर्ड रे इंडस्ट्रीयल म्युझियम' याच्या आधी पुण्यामध्ये इ.स. १८७५ मध्ये एक संग्रहालय स्थापन करण्यात आले होते ते पुण्यातील सर्वप्रथम वस्तूसंग्रहालय होते.


या 'महात्मा फुले संग्रहालय' याचे पूर्वीचे नाव हे 'लॉर्ड रे इंडस्ट्रीयल म्युझियम'


इ. स. १८८५ मध्ये याच पुण्याच्या प्रथम मान मिळालेल्या वस्तूसंग्रहालयाचे नामकरण हे 'लॉर्ड रे इंडस्ट्रीयल म्युझियम' असे करण्यात आले. या पुण्याच्या पहिल्या 'लॉर्ड रे इंडस्ट्रीयल म्युझियम' याचे सगळे व्यवस्थापन हे 'पुणे नगपालिका' यांच्याकडे होते. या पुण्याच्या पहिल्या संग्रहालयाला इंग्रजांनी 'रे मार्केट टॉवर' म्हणजेच सध्याची 'महात्मा फुले मंडई' इथे वरच्या मजल्यावर जागा देण्यात आलेली होती. याच्यापूर्वी  या संग्रहालयातील विविध गोष्टी या नानासाहेब पेशवे यांनी उभारलेल्या 'हिराबाग' येथे इंग्रजांच्या काळात उभारलेला 'टाऊन हॉल' मेहेंदळे यांचा वाडा तसेच सध्याच्या लक्ष्मी रोड येथील दगडी 'कॉमन वेल्थ बिल्डिंग' याठिकाणी या वस्तूसंग्रहालयातील गोष्टी प्रदर्शित केल्या जात असत.


इ. स. १९४७ नंतर महाराष्ट्र राज्य सरकारचा जेव्हा 'महाराष्ट्र औद्योगिक वस्तूसंग्रहालय अधिनियम' हा तयार झाला त्याच्यानंतर या 'लॉर्ड रे इंडस्ट्रीयल म्युझियम' याचे कार्य हे 'महाराष्ट्र औद्योगिक वस्तूसंग्रहालय अधिनियम' याच्या अंतर्गत सुरु झाले. पुढे या संग्रहलायची उपयुक्तता वाढविण्यासाठी या संग्रहलायला इतिहास आणि संस्कृतीची जोड देण्यात यावी ही कल्पना पुढे आली आणि संग्रहालायाचा विस्तार आणि विकास केला गेला. जेव्हा आपण घोले रस्त्याने जातो तेव्हा आपल्याला 'लॉर्ड रे इंडस्ट्रीयल म्युझियम' आत्ताचे 'महात्मा फुले संग्रहालय' पहायला मिळते या संग्रहालयाच्या मुख्य दारातून प्रवेश केला कि तोफगाड्यावर ठेवलेली एक 'पितळी तोफ' आपले लक्ष सर्वप्रथम वेधून घेते. इ. स. १८५९ मध्ये बंगाल राज्यातील काझीपूर येथे ही तोफ तयार करण्यात आली होती. बंगाल मध्ये बनवलेली ही तोफ १२ पौंड वजनाचे गोळे डागू शकत असे. 


बंगाल मध्ये बनवलेली ही तोफ १२ पौंड वजनाचे गोळे डागू शकत असे.


इथून पुढे आपण आतमध्ये आलो असता आपल्याला 'महात्मा ज्योतिबा फुले' यांचा अर्धपुतळा आपल्याला बघायला मिळतो. 'महात्मा ज्योतिबा फुले' यांचा पुतळा पाहून पुढे आलो असता आपल्याला इ. स. १८७० मधल्या एका मगरीचे खूप मोठे कातडे पहायला मिळते. तसे पहायला गेले तर या 'महात्मा फुले संग्रहालयामध्ये' खूप दालने आहेत. येथे आपल्याला शरीरशास्त्राचे देखील दालन बघायला मिळते. या दालनामध्ये मानवी शरीरातील अवयव आणि त्यांचे अंतरंग उलगडून दाखवलेले वेगवेगळ्या प्रतिकृतीमधून पहायला मिळतात. तसेच या संग्रहालयात आपल्याला औषधांचे आणि विविध जीवाणू आणि परजीवी तसेच आहार पद्धत यांचे तक्ते देखील बघावयास मिळतात. 


'महात्मा ज्योतिबा फुले' यांचा पुतळा.


'महात्मा फुले संग्रहालय' हे मुळातच औद्योगिक संग्रहालय म्हणून स्थापन करण्यात आलेले होते म्हणून या संग्रहालयात आपल्याला कागद, चीनी माती, काच, फायबर तसेच वेगवेगळे उद्योग धंदे यांचे दर्शन आपल्याला घडते. हे संपूर्ण  दालन हे मुळातच उद्योग धंद्यांवर आधारलेले आहे त्यामुळे आपल्या महाराष्ट्रात कोणते उद्योग धंदे चालतात त्याबाबत इथे खूप छान माहिती समजायला मदत होते. तसेच आपल्याला काही यंत्रे आणि अभियांत्रिकी वस्तू तसेच औद्योगिक उद्योगांमध्ये वापरले जाणारे विद्युत यंत्रे, हत्यारे, तसेच विविध यंत्र सामुग्री यांच्याशी संबंधित यंत्रे आणि त्यांच्या प्रतिकृती या संग्रहालयात आपल्याला पहायला मिळतात.


सिंह, बिबट्या, गोड्या पाण्यातील आणि खाऱ्या पाण्यातील मासे आणि पक्षी यांच्या भुसा भरून ठेवेलेल्या प्रतिकृती.


तसेच या 'महात्मा फुले संग्रहालय' इथे आपल्याला वाफेवर चालणाऱ्या इंजीनाशी संबंधित असलेले यंत्रे आपल्याला इथे पहायला मिळतात. औद्योगिक विकासासाठी लागणारा कच्चा माल, खनिजे यांचे देखील आपल्याला दर्शन घडते तसेच अणुशक्तीसाठी लागणारे खनिजे, धातुके, काच - सिमेंट - लोखंड यांच्याशी संबंधित उद्योगधंदे यांच्याशी संबंधित देखील सगळ्या गोष्टी इथे पहायला मिळतात. खडकांच्यामध्ये राहणारे जीवाश्म, प्रवाळ, विविध स्फटिक आणि दगडांचे विविध प्रकार हे देखील आपल्याला नक्कीच आकर्षित करतात.


एक दालन हे शस्त्रास्त्रे यांचेही बघायला मिळते.


याच संग्रहालयाच्या एका दालनामध्ये आपल्याला इमारतींच्या बांधकामासाठी लागणारे लाकडांचे प्रकार, लाकडी वस्तू, तसेच वल्कले म्हणजेच झाडांच्या सालीपासून तयार केलेली वस्त्रे, औषधी वनस्पती आणि त्यांच्यापासून केलेल्या वस्तू, तसेच रबर - कागद - बांबू - लाख यांच्यापासून केलेल्या विविध वस्तू नक्कीच बघण्यासारख्या आहेत. तसेच या संग्रहालयामध्ये आपल्याला शेतीवर रोग निर्माण करणारे कीटक, रेशीम किडे, तसेच साप, सिंह, बिबट्या, खवले मांजर, सील, गोड्या पाण्यातील आणि खाऱ्या पाण्यातील विविध मासे यांचे भुसा भरून ठेवेलेल्या प्रतिकृती देखील बघायला मिळतात. 'महात्मा फुले संग्रहालय' इथे आपल्याला एक दालन हे शस्त्रास्त्रे यांचेही बघायला मिळते. या दालनामध्ये आपल्याला शिवपूर्वकालीन शस्त्रात्रे, शिवकालीन शस्त्रात्रे, युरोपातील शस्त्रात्रे, चिलखत, तोफगोळे अशी विविध शस्त्रात्रे आपल्याला मंत्रमुग्ध करतात. विशेष म्हणजे आपल्याला या संग्रहालयामध्ये महाराष्ट्रातील किल्ल्यांची छायाचित्रे देखील पहायला मिळतात. 'महात्मा फुले संग्रहालय' इथे आपल्याला हस्तकला आणि कुटीरउद्योग यांचे देखील एक दालन पहायला मिळते. 


हस्तीदंत याच्या कलाकृती आणि गेटवे ऑफ इंडिया याची प्रतिकृती.


लाकडी, धातू वापरून, संगमरवरी, चंदन, हस्तीदंत माती, कापड, वनस्पती यांच्यापासून विविध सुंदर गोष्टी बनविलेल्या आपल्याला या दालनामध्ये पहायला मिळतात. या संग्रहालयात आपल्याला कोयना जलविद्युत प्रकल्पाची प्रतिकृती देखील बघायला मिळते. तसेच पुण्याचे भूषण असलेला 'लकडी पूल' याची देखील प्रतिकृती या संग्रहालयात आपल्याला बघावयास मिळते. संग्रहालये महत्वाची का असतात हे आपल्याला नक्कीच 'महात्मा फुले संग्रहालय' बघितले कि समजायला मदत होते. या संग्रहालयांच्या माध्यमातून आपल्याला मानवी संस्कृतीची प्रगती कशी झाली हे समजण्यास नक्कीच मदत होते. असे हे पुण्यातील घोले रस्त्यावर असलेले 'महात्मा फुले संग्रहालय' हे पुण्याचा  महत्वाचा वारसा आहे.

______________________________________________________________________________________________  

कसे जाल:-

पुणे - घोले रस्ता - महात्मा फुले संग्रहालय.

संग्रहालय वेळ:- 

सकाळी ८ ते संध्याकाळी ५.

दूरध्वनी क्रमांक:- 

०२० - २५५३२७५०.    

______________________________________________________________________________________________


महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात.

४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.

______________________________________________________________________________________________


लिखाण आणि छायाचित्रे © २०२१ महाराष्ट्राची शोधयात्रा

 

1 comment:

  1. प्राचीन इतिहास आणी आपल्या पुण्याची माहिती चा खजाना त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.

    ReplyDelete

Thank You For Comment...!!! :)

INSTAGRAM FEED

@maharashtraheritage