लोखंडी रस्त्याचे कायदे


लोखंडी रस्त्याचे कायदे नाव ऐकून नक्कीच गंमतीशीर वाटेल परंतु हे 'लोखंडी रस्त्याचे कायदे' म्हणजे दिनांक १६ एप्रिल १८५३ साली भारतामध्ये पहिली रेल्वे धावली आणि महाराष्ट्रातीलच नव्हे भारतीय लोकांचे जीवन बदलले. हळूहळू हे रेल्वेचे जाळे संपूर्ण भारतामध्ये पसरले आणि भारतामध्ये विविध शहरे या रेल्वेने जोडली गेली. याच रेल्वेच्या पहिल्या प्रवासानंतर काही कायदे इंग्रज सरकारने बनवले. या रेल्वेच्या कायद्यांचे मूळ इंग्रजी भाषेमध्ये लिहिले गेलेले 'अ शॉर्ट अकाऊंट ऑफ रेल्वेज, सिलेक्टेड फ्रॉम लार्डनर्स रेल्वे इकॉनॉमी' या इंग्रजी पुस्तकामध्ये आहे. 


महाराष्ट्रात रेल्वे धावायला लागल्यानंतर आपल्या लोकांना या रेल्वेची माहिती व्यवस्थित मिळावी म्हणून 'अ शॉर्ट अकाऊंट ऑफ रेल्वेज, सिलेक्टेड फ्रॉम लार्डनर्स रेल्वे इकॉनॉमी' या पुस्तकाच्या काही भागाचा मराठी अनुवाद हा 'कृष्णशास्त्री भाटवडेकर' यांनी इ.स.१८५४ साली केला या पुस्तकाचे मराठी मध्ये नाव हे 'लोखंडी रस्त्याचे संक्षिप्त वर्णन' असे आहे. भारतीय 'रेल्वे' बद्दल सर्वात जुनी हाताने काढलेली चित्रे आणि रेल्वेमार्गाबद्दल लिहिलेले पहिले पुस्तक. 


'अ शॉर्ट अकाऊंट ऑफ रेल्वेज, सिलेक्टेड फ्रॉम लार्डनर्स रेल्वे इकॉनॉमी' या पुस्तकाचे मुखपृष्ठ.

'लोखंडी रस्त्याचे संक्षिप्त वर्णन' या पुस्तकामध्ये त्यांनी रेल्वे, रेल्वेचे डबे तसेच इंजिन यांना स्थानिक भाषेमध्ये कोणतेही शब्द नसल्याने सोपे शब्द वापरले आहेत. यामध्ये यंत्र या शब्दाला 'डब्यांचा हार' असा गमतीदार शब्द वापरलेला आहे. या रेल्वे बाबत जे कायदे केले त्याला त्यांनी 'लोखंडी रस्त्याचे कायदे' असा शब्द वापरून हे कायदे देखील काय होते ते सांगितले आहेत हे रेल्वेचे इंग्रज सरकारने बनवलेले कायदे पुढीलप्रमाणे:-


कायदा १:- 

आगीची गाडी चालत असता तिची गती कितीही मंद असली तरी आत बसलेल्या मनुष्याने बाहेर निघण्यास झटू नये. 


कायदा २:-

जेव्हा गाडी चालत आहे, तेव्हा तिची गती कितीही कमी दिसली तरीही तिच्यामध्ये शिरण्यास झटू नये.


कायदा ३:-

जेथे बसण्यास सांप्रदाय नाही, अश्या कोणत्याही ठिकाणी अथवा भलत्याच आसनाने बसू नये. 


वाफेच्या इंजिनचे काढलेले पुस्चितकातील चित्र.

कायदा ४:-

लोखंडी रस्त्याने मार्गक्रमणामध्ये एक उत्कृष्ट नियम आहे की, जेथे आपल्यास जायचे आहे, तेथे जाऊन  पोहोचेपर्यंत कारणावाचून गाडीच्या बाहेर उतरू नये. मलमूत्र विसर्जनार्थ अथवा रोगपीडित असल्यास बाहेर गेल्यावाचून राहवतच नाही अथवा दुसरे एखादे मोठे कारण असेल तर मात्र क्वचीत जावे. 


कायदा ५:-

आगीच्या गाडीतून भलत्याच बाजूने बाहेर निघू नये.


कायदा ६:-

लोखंडी रस्त्यावरून एका बाजूकडून दुसरीकडे जाऊ नये, व कदाचित जाण्याची फार जरूर असल्यास परकाष्ठेच्या बंदोबस्ताने जावे. 


वाफेच्या इंजिनाची मराठी मधील नावे.

कायदा ७:-

साधारण रांगापेक्षा एक्स्प्रेस ट्रेन (विशेष त्वरेच्या रांगे) पासून फार भय आहे, जे लोक आपल्या जीवाला फार जपतात, त्यांनी जलदीच्या वेळेस मात्र त्या गाड्यातून जावे.


कायदा ८:-

(स्पेशीअल ट्रेन) म्हणजे विशेष त्वरेची रांग, सहल करण्याची रांग, आणि बाकीच्या सर्व अनियमित काळी जाणाऱ्या रांगा, साधारण व सुयंत्र रांगांपेक्षा फार भयंकर आहेत, म्हणून वाटसरुने त्यामध्ये बसून जाऊ नये. 


कायदा ९:- 

तुम्ही ज्या रांगेमध्ये बसून जात आहात, तिला जर एखादा (एकादा) अकल्पित अडथळा होऊन ती काही वेळ भलत्याच ठिकाणी उभी राहिली तर काही काळ गाडीत बसण्यापेक्षा गाडीतून बाहेर उतरावे हे फार हितावह होईल. परंतु गाडी सोडताना १ ला, ५ वा, आणि ६ वा कायदा लक्षात आणावा.


बोरीबंदर स्टेशनचे काढलेले तत्कालीन चित्र.

कायदा १०:-

जर गाडीच्या बाहेर तुमचे पागोटे किंवा टोपी उडाली असेल, किंवा एखादे(एकादे)पुडके गळून पडले असेल, आणि ती टोपी वा पुडके घेण्याकरिता गाडी बाहेर उडी टाकावी असे मनात येईल परंतु त्याविषयी सांभाळावे.


कायदा ११:-

तुम्ही लोखंडी रस्त्याने प्रवास करायला निघता, तेव्हा आपला जितका प्रयत्न चालेल तितका करून रांगेची मधली गाडी अथवा तिच्या जवळची तरी बसण्यास निवडून काढा. 


कायदा १२:-

रांग चालत असता आपल्या हातातला पदार्थ गाडीत बसणाऱ्याच्या हाती देण्याविषयी प्रयत्न करू नका.


भायखळा स्टेशनचे तत्कालीन चित्र

कायदा १३:- 

जर तुम्हाला घरची गाडी बरोबर घेऊन जाणे आहे, तर लोखंडी रस्त्याच्या गाडीवर तिला ठेवून तीत बसू नका. लोखंडी रस्त्याच्या चांगल्या व्यवस्थित गाड्यांपैकी एक गाडी पसंत करून तीत बसून जा.


कायदा १४:- 

साधारण रस्त्यावरून जाताना जेथे लोखंडी रस्ता आडवा आला असेल, तेथे द्वारपालाने खात्रीने जा म्हणून सांगितल्याशिवाय जाऊ नये.


रेल्वेचा पूल पूर्ण झाल्यावर खाडीच्या पुलावरून जाणारे वाफेच्या इंजिनाचे तत्कालीन चित्र.

कायदा १५:- 

लोखंडी रस्त्याने जाणे झाल्यास दिवसास जावे, कारण रात्रीपेक्षा दिवसास जाणे बहुधा निर्भय असते. तसेच दिवसा धुके असल्यास निकडीच्या कामाशिवाय जाऊ नये. 


असे हे लोखंडी रस्त्यावरून जाण्याचे सर्व साधारण कायदे आज नक्कीच गमतीशीर वाटतील परंतु त्याकाळात आपल्या लोकांनी हे कायदे मात्र कसोशीने पाळले देखील दिसतात. असे हे लोखंडी रस्त्याचे कायदे मात्र काळानुसार खूप बदलले आज आपल्याला पाहायला मिळतात आणि रेल्वे देखील मानवी जीवनाचा एक अविभाज्य भाग झालेली आपल्याला पाहायला मिळते. एक मात्र नक्की हे 'लोखंडी रस्त्याचे कायदे' आज मात्र नक्कीच वाचायला गमतीशीर वाटतील.

______________________________________________________________________________________________

संदर्भग्रंथ:-
१) लोखंडी रस्त्याचे संक्षिप्त वर्णन - कृष्णाशास्त्री भाटवडेकर, गणपत कृष्णाजी यांचा छापखाना, १८५४.

______________________________________________________________________________________________


महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात.

४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.

______________________________________________________________________________________________


लिखाण आणि छायाचित्रे © २०२१ महाराष्ट्राची शोधयात्रा

1 comment:

  1. वा‌‌: फारच सुंदर माहिती

    ReplyDelete

Thank You For Comment...!!! :)

INSTAGRAM FEED

@maharashtraheritage