मुठा नदीकाठी असलेले 'गंगाधर रघुनाथ केळकर' यांचे दुर्लक्षित स्मारक

 

पुणे शहर आणि परिसरामध्ये विविध ऐतिहासिक गोष्टी तसेच ऐतिहासिक पुरुषांच्या समाध्या आणि स्मारके आपल्याला पहावयास मिळतात. असेच एक स्मारक आपल्याला मुठा नदीच्या पात्रामध्ये बघावयास मिळते. तसे पहावयास गेले तर आपल्याला मुठा नदीकाठी बऱ्याच ऐतिहासिक समाध्या पहावयास मिळतात यातील काही समाध्या १९६१ साली आलेल्या पानशेत पुरामध्ये वाहून गेल्या तर काही समाध्या या नष्ट झाल्या त्यामुळे काही समाध्यांवर असलेली नावे किंवा शिलालेख आपल्याला सापडत नाहीत. अश्याच काही वैशिष्ट्यपूर्ण स्मारकांच्यापैकी एक कोरीव काम असलेले स्मारक आपल्याला मुठा नदीकाठी कायम खुणावत असते ते स्मारक आहे ते 'गंगाधर रघुनाथ केळकर' यांचे. 


'गंगाधर रघुनाथ केळकर' यांचे दुर्लक्षित स्मारक.
  

पुणे शहरामध्ये नदीपात्रामधून जाण्यासाठी महानगरपालिकेने एक रस्ता बनवलेला आहे हा रस्ता मुळातच नदीपात्राचा रस्ता म्हणून पुण्यात प्रसिद्ध आहे तसेच या रस्त्याचा वापर पुणेकर रोजच्या जाण्यायेण्यासाठी करतात त्याचे मुख्य कारण म्हणजे बरेचसे अंतर कमीतकमी वेळामध्ये या रस्त्यामुळे गाठता येते. हाच नदी पात्राचा रस्ता पुण्यातील ऐतिहासिक ओंकारेश्वर मंदिराच्या शेजारून जातो तिथून अगदी थोडे पुढे आलो असता आपण शिंदे पुलाखालून पुढे येतो तिथेच उजवीकडे रस्त्याच्या अगदी कडेला आपल्याला एक सुंदर स्मारक  वृंदावन पहावयास मिळते. हे स्मारक वृंदावन राजा केळकर संग्रहालयाचे संस्थापक 'दिनकर गंगाधर केळकर' यांच्या वडिलांचे आहे. 


बऱ्याच वेळेस हे स्मारक नदीकाठावरून जाताना लोकांच्या लक्षात देखील येत नाही त्याचे मुख्य कारण म्हणजे जिथे 'गंगाधर रघुनाथ केळकर' यांचे स्मारक आहे तिथे कोणतीही त्यांच्याबद्दल पाटी लावलेली नाही. त्यामुळे 'गंगाधर रघुनाथ केळकर' यांचे स्मारक कायमच दुर्लक्षित राहिलेले आहे. ओंकारेश्वर मंदिराच्या अगदी जवळ असलेले 'गंगाधर रघुनाथ केळकर' यांचे स्मारक नीट पहावयास गेले तर आपल्याला या स्मारकाच्या मध्यभागी असलेल्या चौकोनी चौथऱ्यावर दोन टप्प्यांच्यामध्ये एक अष्टकोनी आकाराचा चौथरा आणि त्याच्यावर एक शिवपिंडी पहावयास मिळते. 


स्मारकाच्या येथील स्तंभावरील विष्णू. 

तसेच शिवपिंडीच्या मार्गाखाली नागाचा फणा देखील पहावयास मिळतो. तसेच या देखण्या स्मारक स्तंभाच्या बाजूंवर आपल्याला ओंकार चिन्हे देखील पहावयास मिळतात आणि या स्मारकावर संगमरवरी माहिती फलक देखील बघायला मिळतो. तसेच हे स्मारक व्यवस्थित न्याहाळून पाहिले तर आपल्याला मुख्य स्तंभाच्या चारही बाजूंना थोडे कमी उंचीचे चार चौकोनी स्तंभ आपल्याला आढळून येतात. त्याच्यावर आपल्याला देवीदेवतांची चित्रे देखील कोरलेली आढळून येतात. 


तसे पहायला गेले तर 'गंगाधर रघुनाथ केळकर' यांच्या स्मारकाच्या मधल्या स्तंभावर आणि चारही दिशांना असलेल्या उपदिशांना वरच्या टप्प्यामध्ये संगमरवरी पाट्यांवर आपल्याला मजकूर कोरलेला पहावयास मिळतो. यामध्ये उत्तरेकडे आपल्याला "|| श्री || तीर्थस्वरूप, गंगाधर रघुनाथ केळकर, यांचे पुण्यस्मरणार्थ," असा मजकूर कोरलेला आपल्याला पहावयास मिळतो. तर पश्चिमेला, "जन्मतिथी, शनिवार फाल्गुन शु ५ शके १७७६, तारीख ४ मार्च १८५४" असे कोरलेले आढळून येते. तसेच पूर्वेला आपल्याला "देहावसान स्वगृही पुणे, सोमवार नागपंचमी, निजश्रावण शु. ५ शके १८५०, तारीख २० ऑगस्ट १९२८" असे कोरलेले वाचायला मिळते. तर दक्षिणेस "वास्तव्य, शांतिकुंज, जाईचे गेटाजवळ, सदाशिव पेठ, पुणे शहर" असा मजकूर कोरलेला आपल्याला दिसतो.

स्मारकाच्या येथील स्तंभावरील मारुती.

मुख्य स्मारक स्तंभाच्या वरच्या अष्टकोनामध्ये उपदिशांना जे मजकूर आपल्याला बघायला मिळतात ते पुढीलप्रमाणे:- 


आग्नेय दिशेस "ॐ, हा स्तूप, भास्कर व दिनकर, यांनी आपल्या वडिलांचे, दहनभूमीवर डिसेंबर १९२८ मध्ये बनविला" असा मजकूर आपल्याला कोरलेला पहावयास मिळतो. तसेच नैऋत्य दिशेस "||श्री|| तीर्थरूप, गंगाधर रघुनाथ केळकर, यांचे पुण्यस्मरणार्थ" असे कोरलेले आहे. तर वायव्य दिशेस "ॐ, परं ब्रम्ह परं धाम, पवित्रं परमं भवान ||, गीता अध्याय १०.१२" असा लेख पहायला मिळतो. तसेच ईशान्य दिशेस "ॐ, नमो नमस्तेऽस्तु सहस्त्र कृत्व:, पुनश्च भूयोऽपि नमो नमस्ते || गीता अध्याय ११-३९" असा मजकूर कोरलेला आढळून येतो. 


'गंगाधर रघुनाथ केळकर' यांच्या स्मारकाच्या आग्नेयेकडे म्हणजेच पाठीमागच्या डावीकडे असलेल्या स्तंभावर आपल्याला उत्तरेला धनुर्धारी(राम), पूर्वेला केशवविष्णू, दक्षिणेकडे गरुड आणि पश्चिमेला रुक्मिणी अश्या मूर्ती कोरलेल्या आपल्याला बघायला मिळतात. तसेच नैऋत्येस म्हणजेच पाठीमागील उजवीकडे असलेल्या स्तंभावर उत्तरेला आपल्याला विठ्ठल, पूर्वेकडे मारुती, दक्षिणेला माधवविष्णू, पश्चिमेला धनुर्धारी अशी सुंदर शिल्पे कोरलेली पहावयास मिळतात. तर वायव्य दिशेस असलेल्या म्हणजेच पुढच्या उजवीकडे असलेल्या स्तंभावर आपल्याला उत्तरेस मुरलीधर(कृष्ण) पूर्वेला गणपती दक्षिणेला धनुर्धारी तर पश्चिमेस विष्णू अशी शिल्पे कोरलेली आढळून येतात. तसेच ईशान्य दिशेस असलेल्या म्हणजेच पुढून डावीकडे असलेल्या स्तंभावर आपल्याला उत्तरेकडे मुरलीधर, पूर्वेकडे माधवविष्णू, तसेच दक्षिणेकडे दोन हात कमरेवर आणि दोन हात वर केलेली मूर्ती आणि पश्चिमेला आपल्याला मोर आणि सरस्वती यांच्या मूर्ती कोरलेल्या पहायला मिळतात. या स्मारकावर केलेले शिल्पांकन अगदी सुबक आणि देखणे आहे.


स्मारकाच्या येथील स्तंभावरील गरुड आणि विष्णू .

अश्या या 'गंगाधर रघुनाथ केळकर' यांच्या दुर्लक्षित स्मारकाच्या समोर जो हौदासारखा भाग आपल्याला पहावयास मिळतो त्याची मधून अधून स्वच्छता सध्या केली जात अन्यथा पूर्वी यामध्ये पाणी साठले जायचे आणि त्यामध्ये डेंग्यू सारख्या डासांचा धोका निर्माण व्हायला लागला म्हणून हे स्मारक सध्या स्वच्छ ठेवले जात आहे. तसेच महाशिवरात्रीला याठिकाणी या 'गंगाधर रघुनाथ केळकर' यांच्या स्मारकामध्ये जो मुख्य स्तंभ आहे त्याच्यावर असलेल्या शिवपिंडीची मोठ्या प्रमाणात पूजा देखील केली जाते अनेक भाविक महाशिवरात्रीच्या दिवशी दर्शनाला येथे येतात त्यामुळे मुठा नदीकाठी असलेले 'गंगाधर रघुनाथ केळकर' यांचे स्मारक भाविकांच्या गर्दीने गजबजून जाते.  


स्मारकाच्या येथील स्तंभावरील मुरलीधर (कृष्ण).

असे हे पुण्यातील मुठा नदीकाठी असलेले दुर्लक्षित 'गंगाधर रघुनाथ केळकर स्मारक' नक्कीच पुण्यातील नदीपात्रामधून जाता-येता भेट देण्यासारखे आहे. जेव्हा केव्हा पुण्याच्या नदीपात्र परीसरामधून फेरफटका मारायला जाल तेव्हा या 'गंगाधर रघुनाथ केळकर' यांच्या दुर्लक्षित स्मारकाला एकदा तरी भेट नक्की द्या एक आगळेवेगळे स्मारक बघितल्याचे नक्कीच समाधान मिळेल.

______________________________________________________________________________________________

संदर्भग्रंथ:-
१) मुठेकाठचे पुणे:- प्र. के. घाणेकर, स्नेहल प्रकाशन, २०१६.  

______________________________________________________________________________________________


महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात.

४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.

_______________________________________________________________________________________


लिखाण आणि छायाचित्रे © २०२१ महाराष्ट्राची शोधयात्रा

                                        

No comments:

Post a Comment

Thank You For Comment...!!! :)

INSTAGRAM FEED

@maharashtraheritage