मुंबईमध्ये जेव्हा पहिल्यांदा 'विमान उडते'


मानवाची जीवनपद्धती प्रत्येक कालखंडामध्ये आपण बदललेली पाहत असतो. चाकाचा शोध जसा मानवाच्या आयुष्यात लागला त्याच्यानंतर मानवाचे आयुष्य बदलून गेले. तसाच प्रकार आपल्याला पहावयास मिळतो तो म्हणजे विमाने जेव्हा आकाशामध्ये उडू लागली तेव्हा लांबची अंतरे देखील अगदी जवळ भासू लागली. आज आपल्याला भारतातच नव्हे तर जगामध्ये विमानामुळे कुठेही जाता येते आणि फिरता येते. विमानाचा शोध हा मानवाच्या जीवनामध्ये लावलेल्या काही महत्वाच्या शोधांच्यापैकी अत्यंत महत्वाचा शोध आहे असे आपण नक्कीच म्हणू शकतो. परंतु जेव्हा विमान हे आपल्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये होते तेव्हा भारतामध्ये मराठ्यांची सत्ता जाऊन इंग्रजांची सत्ता स्थिरावत होती याच काळात मुंबई शहरामध्ये पहिल्यांदा विमान उडाले आणि महाराष्ट्रामध्ये या विमानाच्या उड्डाणामुळे एक इतिहास रचला गेला असे आपण म्हणू शकतो. जेव्हा मुंबईमधून विमान उडणार होते तेव्हा मुंबई आणि परिसरात 'विमानाच्या' स्वरूपाबद्दल खूप गमतीदार चर्चा चालत असे. तसेच आकाशात उडणाऱ्या विमानाला मुंबईमधल्या लोकांनी विविध नावे देखील दिलेली आपल्याला पहावयास मिळतात.


सत्ता बदलाच्या काळानंतर मुंबई आणि परिसरामध्ये विविध गोष्टी कायम घडत असताना नव्याने घडणाऱ्या विविध गोष्टींवर कायमच मुंबई आणि परिसरामध्ये लोकांच्यामध्ये खूप गोष्टी चर्चा केल्या जात असत. जसे कि जेव्हा मुंबई मध्ये जेव्हा रेल्वे धावणार होती तेव्हा 'रेल्वेच्या' स्वरूपाबद्दल खूप गमतीदार चर्चा चालत असे. 'बैल किंवा घोडे' नसलेले वाफेचे येणारे यंत्र कसे चालणार. लोखंडी रस्ते कसे करणार? काही लोकांना तर असाही प्रश्न पडला होता की ही 'भुताटकी' तर नाही ना? अशी देखील लोकांची चर्चा होत असे. अश्याच प्रकारची चर्चा हि जेव्हा मुंबईमध्ये लवकरच पहिल्यांदा विमान उडणार आहे असे समजल्यावर मुंबई आणि परिसरामध्ये लोकांच्यामध्ये झालेली आपल्याला दिसते. तर गोष्ट अशी कि इ.स. १८५३ साली युरोपमधून मुंबईमध्ये 'कॅट' नावाचा एक गृहस्थ आला होता. हा 'कॅट' मुंबईमध्ये आला म्हणून मुंबई आणि त्याच्या आसपासच्या गावातील सर्व लोकांना जसे समजले कि हा 'कॅट' विमानात बसून आकाशामध्ये दोन ते तीन कोस उंच जातो आणि ५० ते ६० कोस लांबपर्यंत आकशात उडून जातो अशी अफवा उठल्यामुळे मुंबई आणि परिसरामध्ये विविध अफवांचे पेव फुटले होते.


इंग्रजांच्या काळातील भारतात परीक्षण केले जाणारे विमान.

मुंबईमध्ये पहिले विमान उडण्याच्या पंधरा दिवस आधीच अफवांना सुरुवात झाली होती. मुंबई आणि परिसरामध्ये या पहिल्या  विमानाच्या उड्डाणाबद्दल लहानांच्या पासून मोठ्यांच्यापर्यंत रोज या विमानाच्याबद्दल चर्चा होत असे. जेव्हा हा 'कॅट' मुंबईमध्ये आला तेव्हापासून रोज विविध वर्तमानपत्रे विविध मथळे छापून या ऐतिहासिक विमान उड्डाणाबद्दल विविध अफवा उठवत असत. तत्कालीन मुंबई आणि परिसरातील लोकांनी आणि विविध वर्तमानपत्रांनी या विमानाला आकाशरथ, डबा अशी नावे देखील दिली होती. मुंबई मध्ये पहिल्यांदा उडणाऱ्या विमानाबद्दल तत्कालीन विविध वर्तमानपत्रात खूप काही छापून आले होते परंतु या ऐतिहासिक विमानाच्या उड्डाणाबद्दल सविस्तर माहिती आपल्याला ज्ञानप्रकाश या वर्तमानपत्रात वाचायला मिळते. त्याबद्दल पुढीलप्रमाणे ज्ञानप्रकाश या वृत्तपत्रामध्ये जे वर्णन लिहिले आहे ते पुढीलप्रमाणे:-


"बलून म्हणजे विमानयंत्र. हे कसे उडते हा अभिनव चमत्कार जान्युआरीच्या (जानेवारी) अठराव्या तारिखेस(तारीखेस) मुंबईच्या लोकांनी पाहिला. हे विमानयंत्र तयार करून अमुक मनुष्य त्यामध्ये बसून आकाशमार्गे उडवून दाखविणार आहे, असे जाहीर करून सरकारी सर्व कारखान्याला त्या दिवशी सुट्टी नेमिली. हा समारंभ भायखळ्याच्या पटांगणात झाला. तेथे पाहणाऱ्या लोकांकरिता मंडप घालून तीन चार प्रतींच्या जागा दोन, तीन, आणि पांच रुपयांचा दर ठरवून नेमिल्या होत्या. आणि हा चमत्कार पाहण्यासारिखाच(पाहण्यासारखाच). म्हणून अकरा वाजल्यापासून चार वाजेपर्यंत गाड्या घोड्यांनिशी माणसांची अशी रहदारी चालली होती कि, कोटाच्या बाजूने समुद्रच फुटून वाहत आहे असे वाटले. दाटीत जायला नाईलाज म्हणून बहुत स्त्रिया आणि पुरुष गच्च्या व घरांची छपरे, यांवर चढून बसले होते. एवढा समुदाय एकत्र कधी जमला नसेल. हे यंत्र उडविण्याचे अगोदर कासऱ्यांनी बांधून टाकिले असता डोलत होते, ते पाहून लोकांस नवल वाटे. मग सुमारे पाच वाजता ते उडविले ते प्रथम मोठ्या वेगाने काही दक्षिणेकडे वळून अर्धकोस उंच जाऊन अगदी ताऱ्याएवढे दिसू लागले. मग थोड्यावेळाने पूर्वेकडे वाहून पनवेलीच्या आसपास पडले.


भारतातील पहिले व्यावसायिक विमान.

एवढी गोष्ट कमी झाली की, त्याचा कर्ता आंत बसून जाणार होता, तो गेला नाही. त्यामुळे पैका(पैसा) भरून सन्निध बसणारे लोक खंती झाले; कां की त्यावर बसून जाण्याच्या कसबामुळे लोकांनी पैसा दिला. परंतु तो न बसण्याची कारणे पुष्कळ सांगतात. ती असी(अशी). त्यामध्ये मनुष्ये बसून जाण्यापूरती वाळू भरली नव्हती. कोणी म्हणतात बसणारा भ्याला. कोणी म्हणतात कि बसण्याचे कळसूत्र बिघडले, असे त्यांच्या नजरेस आले. कोणी म्हणतात कि तो दारू प्यायल्याने बेफाम झाला होता, म्हणून जवळच्याने बसू दिले नाही. तयारी झाली तेव्हा त्याणे(त्याने) मी अमक्या ठिकाणी असा बसेन, म्हणून वर चढून सारा अदा, करून दाखविला पण उडते वेळेस कमरेचे दोर कापून उडी टाकून पळाला. आणि ते सोडताच (विमान)उडून गेले. जर त्या यंत्रात काही बिघडले नसून तो दारूमुळे मस्त झाला असेल, तर त्याणे(त्याने) मोठी चूक केली, आणि तो ठक, व सरकारच्या कामास एक दिवस अडथळा केला म्हणून गुन्हेगार असेही म्हणायला चिंता नाही. हि या गृहस्थाने बेअदबीचि गोष्ट केली, असे लोकांच्या ध्यानी येऊन चुकले.


असो, तो कोणत्या कारणामुळे बसला नसेल तो नसो. परंतु इतक्यावरूनच 'बलूनात' बसून जातात, हि गोष्ट खोटी असे समजू नये. कारण कि, शेकडो वेळा अशा विमानात बसून लोकं गेले आहेत. सन १७८३ मध्ये म्हणजे एकूण ऐंशी वर्षांमागे या विमानाची युक्ती निघाली. मंटगालफियर नामे कागद करणारा एक सधन गृहस्थ फ्रांस देशात होता. धूर वगैरे वर चढतात, या तर्कावरून तसे काही यंत्र करून उडवावे असे त्याला वाटले. प्रथम त्याणे(त्याने) रेशमाची घट्ट पिशवी करून, तीत पाण्याची वाफ कोंडून ठेवून पाहिली, ती वर चढून लौकर खाली पडे. मग त्याणे(त्याने) पिशवीचे तोंड पसरट करून तिच्याखाली काही जिन्नस जाळून याप्रकारची मोट वर उडविली. तरी त्याला ते बराबर साधले नाही. मग त्याला हायड्रोजन ग्यासची(गॅस) युक्ती सुचली. तेव्हा त्याची मोट बांधून वर उडविली.


भारतातील सुरुवातीचे विमान.

ती त्याच्या मनाप्रमाणे झाली. नंतर त्याणे त्यांत बसून वर चढण्याची व उतरण्याची चांगली परीक्षा करून पारीस(पॅरिस) शहरातील लोकांस कळविले तेव्हा तो चमत्कार पहायला तीन लक्ष लोक मिळाले होते. त्यामध्ये कोणी बसले नव्हते. ते विमान फार त्वरेने वर गेले नंतर दोन घटिकांनी वरती जाऊन फुटले. कारण ग्यास(गॅस) फार भरला होता. मग ते आठ कोसांवर जाऊन पडले. तेव्हा तेथील रानटी लोकांस मोठे अद्भुत वाटले. त्यात काही पिशाच्च किंवा जनावर आहे का म्हणून त्यांनी त्याच्यावर गोळ्या घातल्या. मग एकदम सर्व मिळून कत्तल केली. नंतर तऱ्हेतऱ्हेच्या हत्यारांनी त्याला छिन्नविछिन्न  करून टाकले. तेव्हा त्यातल्या ग्यास(गॅस) वगैरे पदार्थाची घाण येऊ लागली. हे पाहून त्यांनी ते घोड्याच्या शेपटीला बांधून कोसभर ओढून घेतले. आणि त्याला अगदी ठार करून टाकावे असा त्यांचा मतलब होता, परंतु हा वृत्तांत सरकारला कळल्यावर जाहीर केले कि, ते यंत्र आहे त्याल असे कृ नये, परंतु उचलून आणावे. 


प्रथम त्याची उतरण्याची वगैरे अटकळ समजायला आंत जनावर बसून उडविले. मग मनुष्ये हि बसावयास धजू लागली. याप्रमाणे पुष्कळ वेळा करीत आले. त्यामुळे तिकडे आता विमानाविषयी काही नवल वाटत नाही. 'ग्रीन' नामक मनुष्य तर पांचशेपेक्षा अधिकवेळा बलुनात बसून गेला आहे, असे म्हणतात. आणखी कितीएक वेळा चमत्कारासाठी बलुनाला बैल किंवा घोडे बांधून त्यावर बसून उडाले आहेत. एक मदम(मॅडम) बैलावर बलुनात बसून गेली होती. लंडन व पारीस(पॅरिस) शहरांमध्ये हायड्रोजन ग्यास(गॅस)उत्पन्न करण्यास चांगली साधने आहेत म्हणून हे विमानयंत्र तेथे हमेशा करीत असतात.


विमानाने जेव्हा पत्र पाठवले तेव्हा भारतामधील पहिले एअर मेल.

असो, तारीख १० शनिवार यादिवशी सुमारे चार वाजता मिस्टर 'कॅट' हा विमानात बसून आकाशमार्गे गेला असता वाऱ्याच्या योगाने ते विमान फार उंच जाऊन समुद्राकडे गेले. ते समुद्रात पडेपर्यंत लोकांच्या पाहण्यात आले आणि त्यावरूनच इंडियन नेव्हीचा सरदार याने आगबोट वालुकेश्वरापासून सुमारे दीड कोसपर्यंत नेली होती व दुसरे पडाव शोधास गेले होते. त्यांनी सुमारे मध्यरात्रपर्यंत शोध केला, परंतु काहीच थांग लागला नाही. यांवरून अनुमान केले कि, तो बहुधा पाण्यात पडून बुडाला असावा. ताजा कलम. बुधवारी १४ व्या तारिखेस(तारखेस) मिस्टर 'कॅट' सुरतेहून आगबोटद्वारे मुंबईस आला. त्याच्या सांगण्यात कि, मी महालक्ष्मीपासून सुमारे पाच कोसांवर समुद्रात उतरलो, आणि तेथे लाचार होऊन राहिलो होतो, इतक्यात सुरतेस जाणारी आगबोट आली, तिजवर मला घेतले. नाहीतर मृत्युचे घर मला प्राप्त झाले असते."


मुंबईमध्ये जेव्हा पहिल्यांदा विमान उडाले त्याचे सगळे वर्णन आपल्याला तत्कालीन 'ज्ञानप्रकाश' या वृत्तपत्रात वाचायला मिळते. त्यातून मुंबई मध्ये जेव्हा हे विमान उडालेले लोकांनी पाहिले तेव्हाच्या या पहिल्या विमान उड्डाणाबद्दल झालेल्या चर्चा आणि विमानाबाबत असलेले लोकांना आकर्षण आणि उत्कंठा देखील नक्कीच वाचण्यासारखी आहे. अश्याच पद्धतीमध्ये इंग्रजांच्या काळात इ.स. १८७३-७४ मध्ये परळ येथे लालबागेमध्ये उडविण्यात आले होते. हे विमान देखील त्याकाळात मुंबई आणि परिसरात चर्चेचा विषय बनले होते. पहिल्या विमानाप्रमाणे देखील दुसऱ्या विमानाला बघायला मुंबई आणि आजूबाजूच्या लोकांनी गर्दी केलेली आणि त्याला देखील इंग्रजांनी तिकीट ठेवले होते असे काही संदर्भ मिळतात. 


पहिले भारतीय पद्धतीचे विमान हे शिवकर बापुजी तळपदे यांनी मुंबई येथील चौपाटी वरून उडविले होते.

तसेच इ.स. १८९५ साली पहिले भारतीय पद्धतीचे विमान हे शिवकर बापुजी तळपदे यांनी मुंबई येथील चौपाटी वरून उडविले होते. असे महत्वाचे संदर्भ आपल्याला मिळतात. शिवकर बापुजी तळपदे यांनी भारतीय बनावटीच्या विमानाचे नाव 'मरूत्सका' असे ठेवले होते. परंतु दुर्दैवाने शिवकर बापुजी तळपदे यांचे १९१७ मध्ये निधन झाले आणि त्यांनी बनवलेले विमान देखील लोकांच्या विस्मृतीमध्ये गेले. अश्या पद्धतीने मुंबईमध्ये पहिले विमान उडाले आणि बघता बघता आज 'मुंबई' हे भारताचे अत्यंत महत्वाचे आणि प्रसिद्ध असे आंतरराष्ट्रीय विमानतळ झालेले आहे. 

______________________________________________________________________________________________

संदर्भग्रंथ:-
१) मुंबईचे वर्णन:- गो. ना. माडगावकर, साकेत  प्रकाशन, २०११.
२) Gazetteer of The Bombay Presidency:- 1885. 
३) ज्ञानप्रकाश १८४९ ते १९५० महाराष्ट्राच्या जडणघडणीचा साक्षीदार:- अनुराधा कुलकर्णी, सकाळ पब्लीकेशन, २०१७      
४) मुंबईचा वृत्तांत:- बाळकृष्ण बापू आचार्य आणि मोरो विनायक शिंगणे, संपादक बाबुराव नाईक, महाराष्ट्र राज्य संस्कृती मंडळ, मुंबई, मूळआवृत्ती १८८९, पुनमुुद्रण २०११. 

______________________________________________________________________________________________

महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात.

४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.

_________________________________________________________________________________________

छायाचित्रे आंतरजालावरून

 

 

  

No comments:

Post a Comment

Thank You For Comment...!!! :)

INSTAGRAM FEED

@maharashtraheritage