रत्नागिरी जिल्ह्यातील 'खेडची लेणी'


निसर्गरम्य कोकणात जाणे आणि मनसोक्त समुद्रकिनारी भटकंती करायला सर्वांनाच आवडते याच निसर्गरम्य कोकणात विविध राजवटीत विविध जलदुर्ग उभारले गेले अनेक गिरीशिल्पे तयार केली गेली अशीच काही गिरीशिल्पे रत्नागिरी जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असणाऱ्या खेड या गावी लपलेली आहेत. थोडीशी उपेक्षित असणारी हि सुंदर लेणी खेड बस स्थानकाजवळ आहेत. अत्यंत सहज रीतीने या लेण्यांना जायला रस्ता असल्याने फारशी दमछाक देखील होत नाही.


रत्नागिरी जिल्ह्यातील खेड गावामध्ये आपल्याला काही बौद्ध लेणी कोरलेली पहावयास मिळतात. हि लेणी अगदी खेड गावाच्या बस स्थानकाच्या जवळ कोरलेली आपल्याला पहावयास मिळतात. बस स्थानकाच्या जवळूनच  जायला या लेण्यांना रस्ता असल्याने वाट अगदी मळलेली आहे. त्यामुळे अगदी सहजपणे आपण येथील लेण्यांना जाऊन पोहोचतो. हा लेणी समूह आपण जर नीट पाहिला तर येथे आपल्याला एक चैत्य पहावयास मिळते.  


खेड गावामध्ये असणाऱ्या बौद्ध लेण्या.


तसेच या लेणीची रचना हि दोन स्तंभ, चार अर्धस्तंभ, एक छोटी पडवी आणि बाकी मोकळी जागा अश्या पद्धती मध्ये हि लेणी खोदली गेलेली आपल्याला पहावयास मिळते. या लेणी मधले मूळ स्तंभ सध्या जरी मोडलेले असले तरी त्यांचे खालचे भाग आजही शाबूत असलेले आपल्याला बघायला मिळतात तसेच या मोडलेल्या खांबांची चौकोनी बैठक पहावयास मिळते. या लेणीमध्ये जे अर्धस्तंभ आपल्कयाला पहावयास मिळतात ते कलाकुसरीचे नसले तरी देखील व्यवस्थित कोरलेले आहेत. खेड येथील लेण्यामधील चैत्यगृहाच्या डाव्या आणि उजव्या बाजूस एक असे आपल्याला गवाक्ष (खिडकी) कोरलेल्या पहावयास मिळतात. 


या गवाक्षांना नीट पाहिले असता पहिले ही गवाक्ष छोटी असावीत आणि नंतर त्यांना मोठे केले असावे असे नीट निरीक्षण केल्यावर समजते. तसेच या दालनामध्ये चैत्याची निर्मिती ही नंतरच्या काळात झाली असावी. खेडच्या लेणीमध्ये चैत्य देखील नंतरच्या काळात बांधलेले असावे असे आपल्याला उजव्या बाजूच्या लेण्यांच्या दालनावरून समजते. पूर्वी येथे विहार असावा आणि तेथे बाक असावेत याचे अजून एक मुख्य कारण म्हणजे येथे उजव्या बाजूस असणाऱ्या खोल्या आणि डाव्या बाजूस मागील बाजूस असणारी एक खोली. 


खेड येथील लेण्यामध्ये असलेले चैत्यगृह आणि विहार.

तसेच खेड येथील लेणीचा स्तूप हा देखील लेणीच्या मध्यभागी नसून थोडासा उजवीकडे आपल्याला पहावयास मिळतो. स्तूपाच्या मागील भिंतीमध्ये काही ना काही खोदकाम करण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला पहावयास मिळतो परंतु कालांतराने ते कां सोडून दिलेले असावे असे दिसते. चौकोनी बैठकीवर लांबट अंडभाग त्याच्यावर असणारी चौकोनी हार्मिका थेट छताला टेकलेली आपल्याला पहावयास मिळते. हार्मिका छताला टेकलेली असल्याने छत्री आपल्याला कोरलेली दिसत नाही. सध्या येथील लेणीच्या चैत्यगृहाला स्थानिक लोकांनी दारे आणि खिडक्या बसवलेल्या असल्यामुळे या लेणीचे चैत्यगृह जपले गेले आहे. तसेच स्थानिक लोकांनी येथे ऐतिहासिक बौद्ध लेणी असा बोर्ड देखील बसवलेला आपल्याला पहावयास मिळतो.    


खेडच्या या अगदी छोट्याश्या लेण्यामध्ये आपल्याला कोणताही शिलालेख पहावयास मिळत नाही हे विशेष म्हणावे लागेल. तसेच लेणी कोणत्या कालखंडात कोरलेली असावी यासंबंधी कोणतीही कालदर्शक नोंद पहावयास मिळत नाही. अभ्यासकांच्या मते या खेडच्या लेणीचा कालखंड हा इ.स  ३ ऱ्या शतकाचा उत्तरार्ध किंवा इ.स. ४ थ्या शतकाच्या सुरुवातीस ही खेड येथील लेणी कोरलेली गेली असावी असा अंदाज आहे. तसेच रत्नागिरी गॅझेटियर यामध्ये आपल्याला खेड येथील लेण्यांबद्दल जो उल्लेख वाचायला मिळतो तो पुढीलप्रमाणे:-


खेड येथील लेण्यामध्ये असलेला स्तूप.

No references to Khed have been traced. Before 1873, when it was made a separate Sub-Division, it was the head-quarters of a petty division under Dapoli or Suvarnadurg.


Rock Temples.

On the. side of a low hill to the east of the town are three small rock temples known as the 'Pandav Leni. Of their origin, nothing is locally known. Among several temples, none of architectural beauty, one is dedicated to the goddess Khedaji. There is also one Buddha Stupa.


खेडच्या लेणीच्या इथे असलेले विहार.

 

अत्यंत साधे असणारे हे सुंदर लेणे आजही उपेक्षित असून या लेण्या आजही भटक्यांना खुणावत आहे अश्या प्रकारे कोकणातील एका आडवाटेवर फिरताना एक वेगळाच आनंद मिळतो. अश्या ह्या लेण्या पाहून आपल्याला आपला प्राचीन वारसा जपणे किती गरजेचे आहे हे नक्की जाणवते. जेव्हा केव्हा रत्नागिरी येथील खेड मध्ये जाल तेव्हा ही  उपेक्षित लेणी तुमचे स्वागतच करेल.

______________________________________________________________________________________________

संदर्भग्रंथ:-
१) Ratnagiri District Gazeteer:- Directorate of Government Printing, Stationary and Publication Maharashtra State., 1962
२) लेणी महाराष्ट्राची:- डॉ. दाउद दळवी, ग्रंथाली प्रकाशन, २०१४.  

कसे जाल:-
पुणे - चांदणी चौक - पौड - ताम्हिणी - माणगाव - महाड - विन्हेरे - खेड. 
______________________________________________________________________________________________


महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात.

४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.
_________________________________________________________________________________________________

लिखाण आणि छायाचित्रे  © २०२१  महाराष्ट्राची शोधयात्रा

   


No comments:

Post a Comment

Thank You For Comment...!!! :)

INSTAGRAM FEED

@maharashtraheritage