ठाण्यातील चरईमधील 'शिलाहारकालीन गणपती'

 

महाराष्ट्रामध्ये आपल्याला ठिकठिकाणी इतिहासाच्या पाऊलखुणा लपलेल्या आढळून येतात. कधी या खुणा एखाद्या प्राचीन मंदिराच्या रुपामध्ये तर कधी वीरगळ, गद्धेगाळ तर कधी मंदिरांच्या मूर्तींच्या रुपामध्ये या विखुरलेल्या इतिहासाच्या खुणा आपल्याला आढळून येतात. अश्या पाऊलखुणांचा मागोवा घेतला तर आपल्याला असे दिसून येते कि आपला हा प्राचीन वारसा आपल्याला विविध गावे आणि शहरांच्यामध्ये आढळून येतो अश्याचा काही ऐतिहासिक पाऊलखुणा लपलेल्या आहेत त्या ऐतिहासिक ठाणे शहरातील चरई भागामध्ये. याच चरई भागामध्ये आपल्याला शिलाहार काळातील गणपतीची मूर्ती पहावयास मिळते.


चरई भागामध्ये असलेल शिलाहार काळातील गणपतीची मूर्ती.


तसे पहावयास गेले तर ठाणे हि शिलाहारांची राजधानी होती त्यामुळे आपल्याला शिलाहार काळातील बऱ्याच गोष्टी आजही आपल्याला ठाणे शहर आणि परीसरामध्ये पहावयास मिळतात. ठाणे शहराला फार मोठी ऐतिहासिक परंपरा असून इ.स. ९ व्या शतकापासून इ.स. १२ व्या शतकापर्यंत ठाणे म्हणजेच श्रीस्थानक हे शहर शिलाहार राजांची राजधानी होते. तसे पहावयास गेले तर ठाणे शहर आणि परीसरामध्ये जशी प्राचीन मंदिरे प्रसिद्ध आहेत तश्याच इतिहासाच्या पाऊलखुणांचा जर आपण मागोवा घेतला तर ठाणे शहरामध्ये आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये शिलाहार काळातील मूर्ती सापडल्या आहेत. 


ठाणे शहरामध्ये आजपर्यंत काही प्राचीन मूर्ती मोठ्या प्रमाणात सापडलेल्या आहेत. त्यामध्ये महिषासुरमर्दिनी, विष्णू, श्रीधर, कार्तिकेय, तसेच ब्रम्हदेव याची मूर्ती देखील सापडलेली आहे याचसोबत गणपतीच्या देखील दोन मूर्ती सापडलेल्या आहेत. त्यापैकी काही मूर्ती या छत्रपती शिवाजी महाराज वास्तूसंग्रहालय येथे ठेवण्यात आल्या आहेत तर काही मूर्ती या ठाणे येथील प्राच्यविद्या संशोधन केंद्रामध्ये ठेवण्यात आल्या आहेत. अश्याच काही शिलाहार काळातील मूर्तींच्यापैकी एक सुंदर गणपतीची मूर्ती आपल्याला पहावयास मिळते ती चरई येथील 'गौतम लब्धी' या इमारतीमध्ये. 


१९८२ साली इमारतीच्या बांधकामावेळी खोदकाम करताना हि शिलाहार काळातील गणपतीची मूर्ती सापडली .


ठाण्याच्या चरई भागात १९८२ साली इमारतीच्या बांधकामावेळी खोदकाम करताना एक सुंदर प्राचीन गणपतीची  मूर्ती सापडली. खोदकामात ११ फुटावर खाली कामगारांना सर्वप्रथम गणपतीच्या हातातील मोदक असलेली बाजू दिसली, तेव्हा सर्व काम थांबवून हि गणपतीची मूर्ती व्यवस्थित रीतीने बाहेर काढण्यात आली. येथील स्थानिकांनी मूर्ती सापडल्योयानंतर योग्य पद्धतीने इमारतीच्या आवारात ठेवली होती परंतु सदर मूर्तीचा काही भाग खंडित असल्याकारणाने या गणपतीच्या मूर्तीची स्थानिक लोकांना म्हणजेच इमारतीमध्ये राहणाऱ्या लोकांना  प्राणप्रतिष्ठापना करता येत नव्हती. नंतर २००० साली या इमारतीच्या आवारातच इमारतीमध्ये राहणाऱ्या सगळ्या लोकांनी लहान मंदिर उभारून गणपतीची स्थापना केली. सध्या या मूर्तीची नित्य पूजा स्थानिकांकडून केली जात आहे. 


तसे पहावयास गेले तर शिलाहार काळातील गणपतीची मूर्ती अत्यंत सुंदर असून हि गणपतीची मूर्ती चकचकीत काळ्या पाषाणात (बेसॉल्ट) घडवलेली आपल्याला पहावयास मिळते. गणपतीची हि मूर्ती डाव्या सोंडेची असून आपल्याला या मूर्तीला चार हात पहावयास मिळतात. तसेच गणपती मूर्तीच्या हातात आपल्याला  दंत, पाश, परशु आणि मोदकाने भरलेले पात्र पहावयास मिळते. हि शिलाहार काळातील गणपतीची मूर्ती संपूर्ण अलंकारांनी युक्त असून आपल्याला पोटावर सर्प फणा काढून बसलेला पहावयास मिळतो. तसेच हि मूर्ती डावा पाय दुमडलेल्या स्थितीत विराजमान असून पायाजवळ आपल्याला  मूषक पहावयास मिळतो.


गणपतीची मूर्ती संपूर्ण अलंकारांनी युक्त असून आपल्याला पोटावर सर्प फणा काढून बसलेला पहावयास मिळतो.

असा हा ठाणे शहरामधील चरईमध्ये असलेला शिलाहार काळातील गणपती ठाणे शहराचा प्राचीन सांस्कृतिक वारसा आहे. तसेच सध्या हा शिलाहार काळातील गणपती सध्या ज्या इमारतीमध्ये विराजमान आहे त्या इमारतीचे नाव देखील 'गौतम लब्धी' असे ठेवण्यात आले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे नवीन इमारतीचे बांधकाम करताना ऐतिहासिक शिलाहारकालीन गणपती मूर्तीचा लाभ झाला, म्हणून या जुन्या इमारतीचे पूर्वीचे नाव बदलले आणि 'गौतम लब्धी' असे ठेवले गेले. असा हा ठाणे शहराच्या प्राचीनत्वाचा वारसा असलेला शिलाहारकाळातील गणपती आजही 'गौतम लब्धी' या इमारतीमध्ये विराजमान आहे. अश्या या ठाणे शहराचे प्राचीनत्व सांगणाऱ्या गणपतीचे दर्शन घ्यायला नक्कीच जावे.      

______________________________________________________________________________________________

संदर्भग्रंथ:-
१) तुमचे आमचे ठाणे:- सदशिव टेटविलकर, श्रीकृपा प्रकाशन, २०१६.
२) असे घडले ठाणे:- दाऊद दळवी, श्रीकृपा प्रकाशन, २०१०.
३) विखुरलेल्या इतिहास खुणा:- सदाशिव टेटविलकर, २००८.

विशेष सहाय्य:- 

प्रणय शेलार. 

______________________________________________________________________________________________


महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात.

४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.

_______________________________________________________________________________________


लिखाण आणि छायाचित्रे © २०२१ महाराष्ट्राची शोधयात्रा


    

No comments:

Post a Comment

Thank You For Comment...!!! :)

INSTAGRAM FEED

@maharashtraheritage