पुण्याच्या कसबा पेठेतील वाड्यामध्ये मिळालेली 'प्राचीन विष्णूमूर्ती'

 

पुणे शहरामध्ये आपल्याला बऱ्याच ऐतिहासिक गोष्टी पहायला मिळतात तसेच शहरामध्ये काही ऐतिहासिक गोष्टी या खाजगी मालकीच्या देखील आहेत त्यामुळे पुणे शहरामध्ये आपल्याला विविध ऐतिहासिक वस्तू खूप मोठ्या प्रमाणात पहावयास मिळतात. अशीच एक प्राचीन ऐतिहासिक आणि सुंदर विष्णू मूर्ती आपल्याला पुण्याच्या कसबा पेठेमध्ये लोखंडे यांच्याकडे पहावयास मिळते.



पुण्याच्या कसबा पेठेमध्ये लोखंडे यांच्या वाड्यामध्ये सापडलेली प्राचीन विष्णूमूर्ती.


पुण्यातील कसबा पेठेमध्ये जेव्हा लोखंडेवाडा येथे जेव्हा २३ डिसेंबर १९९९ मध्ये नवीन बांधकाम करायला घेतले तेव्हा नवीन बांधकामाचे खड्डे खोदताना श्री. लोखंडे यांना एक प्राचीन मूर्ती सापडली. पुण्याच्या कसबा पेठेतील लोखंडे वाडा हा श्री. अनंत नारायण लोखंडेशास्त्री यांचा असून हा वाडा जवळपास दोनशे वर्षे जुना आहे. जेव्हा ही  प्राचीन विष्णूमूर्ती लोखंडे वाड्यामध्ये सापडली तेव्हा श्री. अनंत नारायण लोखंडेशास्त्री यांचे सध्याचे वंशज श्री. सतीश लोखंडे यांनी या प्राचीन विष्णूमूर्तीबाबत प्रसिद्ध इतिहास संशोधक आणि भारत इतिहास संशोधक मंडळाचे सध्याचे चिटणीस श्री. पांडुरंग बलकवडे आणि श्री. संजय गोडबोले यांच्याशी संपर्क साधला तेव्हा या प्राचीन विष्णूमूर्तीबद्दल अभ्यास सुरु झाला. 


यानंतर काही दिवसांनी डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे माजी कुलपती आणि ज्येष्ठ मूर्ती आणि मंदिर अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी देखील हि मूर्ती व्यवस्थित रीतीने अभ्यासली. डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्यामते पुण्याच्या कसबा पेठेमध्ये सापडलेली ही प्राचीन विष्णूमूर्ती ही साधारणपणे इ.स. ६ व्या ते ७ व्या शतकातील असून या प्राचीन मूर्तीवर गुप्तकाळामुर्तीकलेचा मोठा प्रभाव जाणवतो.


श्री. संजय गोडबोले यांनी भारत इतिहास संशोधक मंडळाच्या त्रैमासिकामध्ये या मूर्तीचे संशोधन प्रसिद्ध केले आहे.


काळ्या पाषाणामध्ये असलेली ही विष्णूमूर्ती साधारणपणे २ फुट उंच असून १ फुट रुंद आहे. समभंग अस्वस्थेमधील ही उभी विष्णूमूर्ती आहे. या प्राचीन विष्णूमूर्तीच्या हातामधील आयुधक्रम पहावयास गेले तर खालच्या उजव्या हातामध्ये कमळ असून वरच्या उजव्या हातामध्ये आपल्याला गदा पहावयास मिळते. वरच्या डाव्या हातामध्ये चक्र तसेच खालच्या डाव्या हातामध्ये आपल्याला शंख धारण केलेला स्पष्टपणे पहावयास मिळतो. पुण्यातील या प्राचीन विष्णूमूर्तीचे कटिवस्त्र आणि मेखला अत्यंत स्पष्ट आपल्याला पहावयास मिळतात. 


तसेच या विष्णूमूर्तीच्या दंडामध्ये बाजूबंद तसेच हातामध्ये कडे, कानामध्ये कर्णभूषणे आणि गळ्यामध्ये मोत्याची माळ रेखीवपणे घडवलेले आपल्याला पहावयास मिळते. तसेच विष्णूमूर्तीच्या डोक्यावर आपल्याला करंडक मुकुट देखील पहावयास मिळतो. विष्णूमूर्तीच्या अंगावर आपल्याला कोठेही यज्ञोपावित पहावयास मिळत नाही हे विशेष म्हणावे लागेल. तसेच मूर्तीच्या डाव्या बाजूस आपल्याला कौमुदकी आणि उजव्या बाजूस पद्महस्त पुरुष पहावयास मिळतात. सदर मूर्ती ही उत्तर भारतातील असून इ.स. ५ व्या ते ६ व्या शतकातील आहे. तसे पहावयास गेले तर श्री. लोखंडे यांच्याकडची प्राचीन विष्णूमूर्ती नीट पाहिल्यास आपल्याला असे दिसते कि हि मूर्ती चारही बाजूंनी कोरीव काम केलेली आहे. याचाच अर्थ असा कि ही प्राचीन विष्णूमूर्ती कोणत्याही मंदिराच्या गाभाऱ्याच्या भिंतीला टेकवून ठेवलेली नसावी असे वाटते. त्यामुळे ही प्राचीन विष्णूमूर्ती पूजामूर्ती नसावी.


या विष्णूमूर्तीच्या डावीकडे कौमुदकी आणि उजव्या बाजूस पद्महस्त पुरुष पहावयास मिळतात. 


अशी हि प्राचीन विष्णूमूर्ती कधी कसबा पेठेमध्ये वारसा अभ्यास सहल आयोजित केली असेल तेव्हाच पहावयास मिळते. इतर वेळेस श्री. लोखंडे यांची अनुमती घेतल्याशिवाय हि प्राचीन विष्णूमूर्ती आपल्याला पाहता येत नाही. अशी ही प्राचीन विष्णूमूर्ती पुणे शहराचा एक महत्वाचा वारसा असून जेव्हा केव्हा ही मूर्ती सगळ्या लोकांना पहावयास मिळते तेव्हा बघायला नक्की विसरू नका.

______________________________________________________________________________________________

संदर्भग्रंथ:-
१) ऐतिहासिक टिपणे प्रकरण ७ उपप्रकरण (ड) प्राचीन विष्णूमूर्तीचा शोध:- संजय गोडबोले, भारत इतिहास संशोधक मंडळ त्रैमासिक, पान क्रमांक ९१, अंक १ ते ४, वर्ष ७८, जुलै २०००-एप्रिल २००१.
२) मुठेकाठचे पुणे:- प्र. के. घाणेकर, स्नेहल प्रकाशन, २०१६.

______________________________________________________________________________________________


महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात.

४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.

_______________________________________________________________________________________


लिखाण आणि छायाचित्रे © २०२१ महाराष्ट्राची शोधयात्रा

No comments:

Post a Comment

Thank You For Comment...!!! :)

INSTAGRAM FEED

@maharashtraheritage