निजामशाही काळात उभारलेला 'मांजरसुभा किल्ला'

 

महाराष्ट्रात अनेक परिचित आणि अपरीचीत गड आणि किल्ले आहेत. यातील बऱ्याच किल्यांना ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली आहे तर काही किल्ले आजसुद्धा इतिहासाचे मूक साक्षीदार बनुन सह्याद्रीमध्ये वर्षानुवर्षे उन, वारा, पाऊस झेलत ताठ मानेने उभे आहेत. निजामशाहीची राजधानी म्हणून 'अहमदनगर' हे प्रसिद्ध शहर. याच इतिहास प्रसिद्ध शहराजवळ निजामशाहीच्या काळात 'अहमदनगर-वांबोरी' रस्त्यावर असणाऱ्या एका छोट्या डोंगरावर 'मांजरसुभा' नावाचा किल्ला उभारला गेला. निजामशाही स्थापत्याचे उत्तम उदाहरण असलेला हा किल्ला आजही तसा फारसा प्रसिद्ध नाही.


अहमदनगर पासून अगदी १७ कि.मी. अंतरावर 'अहमदनगर-औरंगाबाद' या महामार्गावर असलेला 'मांजरसुभा' हा किल्ला वसलेला असून सध्या किल्ल्यावर लोकांची वर्दळ मात्र वाढलेली आहे ही नक्कीच सुखावह गोष्ट आहे. फारसा प्रसिद्ध नसलेला मांजरसुभा किल्ला २०१३-२०१४ नंतर जास्त प्रसिद्ध झाला. तोपर्यंत हा किल्ला कोठेही फारसा परिचित नव्हता. मांजरसुभा इथे जायचे असेल तर स्वत:चे वाहन असलेले उत्तम तसेच महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बस देखील आपल्याला वांबोरी गावापर्यंत येऊन सोडतात. 'मांजरसुभा' किल्ल्याला जाण्यासाठी आपल्याला अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावरील पोखर्डी गावामधून डावीकडे वळावे लागते. याच पोखर्डी गावापासून डावीकडे  एक रस्ता जातो येथून पुढे गेल्यावर आपल्याला एक कमान पहावयास मिळते त्याच्यावर आपल्याला ‘श्री चैतन्य गोरक्षनाथ देवस्थान ट्रस्ट, आदर्शगाव मांजरसुंबा ता. जि. अहमदनगर, असे लिहिलेले पहावयास मिळते. याच रस्त्याने जात असताना उजवीकडे असलेल्या डोंगरावर छोटेखानी मांजरसुभा किल्ला आणि त्याच्यावर असलेल्या इमारती आपले लक्ष वेधून घेत असतात. या कमानीमधून आतमध्ये आले असता आपण 'मांजरसुंबा' गावामध्ये येऊन पोहोचतो.


पायथ्यापासून दिसणारा मांजरसुभा किल्ला.


आजूबाजूच्या पंचक्रोशीमध्ये हा किल्ला 'मांजरसुंबा' या नावाने प्रसिद्ध आहे. आपण जेव्हा गावातून मांजरसुभा किल्ल्याकडे जायला निघतो तेव्हा मातीच्या रस्त्याने जाताना आपल्याला शनीमारुती मंदिर पहावयास मिळते. मंदिरातून दर्शन घेऊन आपण जेव्हा पुढे निघतो तेव्हा मांजरसुभा किल्ल्याचे आपल्याला व्यवस्थित दर्शन होत असते. निजामशाही काळातील मांजरसुभा या किल्ल्याला मुळातच तीनही बाजूंनी नैसर्गिक दरीचा खंदक आपल्याला आढळून येतो त्यामुळे किल्ला अत्यंत महत्वाच्या ठिकाणी बांधलेला आहे हे आपल्याला समजण्यास मदत होते. जेव्हा आपण किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचतो तेव्हा आपल्याला वेगळ्या बांधणीचा स्वतंत्र बुरुज पहावयास मिळतो. हा बुरुज व्यवस्थित न्याहाळून पाहिला तर याच्या चारही बाजूस दगडी चिरे आपल्याला पहावयास मिळतात. यावरूनच आपल्याला हा अंदाज व्यवस्थित लावता येतो कि हे ठिकाण म्हणजे किल्ल्याचे चौकी पहाऱ्याचे ठिकाण आहे. 


याच बुरुजाच्या मागे आपल्याला एक महादेवाचे मंदिर देखील पहावयास मिळते. याच मंदिराच्या जवळून आपण चालत जातो ते मांजरसुभा किल्ल्याकडे. अत्यंत छोटेखानी असलेल्या या मांजरसुभा किल्ल्यावर जाण्यासाठी आपल्याला साधारणपणे १५ मिनिटे लागतात. तसेच सध्या या किल्ल्यावर जाण्यासाठी लोकांनी रस्ता देखील केलेला आहे. त्यामुळे कच्च्या रस्त्याने आपण लगेच वर पोहचू देखील शकतो. तसे पहावयास गेले तर मांजरसुभा किल्ल्याचे प्रवेशद्वार हे पश्चिमेकडे आहे. जेव्हा या पश्चिमेकडच्या मजबूत बांधणी असलेल्या दरवाज्याचा आतमध्ये आपण जातो तेव्हा आपल्याला प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना असलेल्या देवड्या आपले लक्ष वेधून घेतात. आजही चांगल्या अवस्थेत असणाऱ्या या देवड्या नक्कीच बघण्यासारख्या आहेत. या देवड्यांच्या आतमध्ये आपल्याला दोन मोठी भव्य दालने पहावयास मिळतात. तसेच या देवड्यांच्या आतमध्ये उजेड येण्यासाठी चारही बाजूंनी झरोके ठेवण्यात आलेले आपल्याला पहावयास मिळतात. 


मांजरसुभा किल्ल्याचे भव्य प्रवेशद्वार आणि देवड्या.


येथूनच पुढे उजवीकडे आपल्याला वर जाणाऱ्या पायऱ्या पहावयास मिळतात तसेच दरवाज्याच्या माथ्यावर आपल्याला येथूनच जाता येते. जेव्हा आपण दरवाज्यातून वर चढून जातो तेव्हा आपल्याला संपूर्ण गड पहावयास मिळतो. गडाचे भौगोलिक महत्व समजून घेण्यास ही एक उत्तम जागा आहे. येथूनच पुढे नंतर आपण आतील रस्त्याने वळून पुढे जावे लागते. जेव्हा आपण आतमध्ये जातो तेव्हा आपल्या नजरेच्या समोरच एक भग्नअवस्थेत असणारी तीन मजली इमारत आपल्याला पहावयास मिळते. जेव्हा आपण पायऱ्या चढून या इमारतीसमोर जातो तेव्हा तेव्हा येथे आपल्याला नक्षीदार देवळ्या, आणि चुन्यामध्ये बनवलेले कोनाडे पहावयास मिळतात. तसेच आपल्याला महालाचे लाकडी खांब आणि नक्षीदार खिडक्या मात्र लोकांनी काळानुसार उखडून नेल्या आहेत याच्या खाणाखुणा आपल्याला दिसतात. या गोष्टीमुळे एकेकाळी सुंदर असणाऱ्या या इमारतीची रया मात्र निघून गेलेली आपल्याला दिसते. हा राजमहाल असावा हे मात्र या वास्तूवरून समजून येते.


याच इमारतीच्या मागे असणारी भटारखान्याची वास्तू आजही बऱ्यापैकी शाबूत असून ही इमारत दोन दालने असलेली बैठी इमारत आहे. या दोन्ही दालनांच्यावर आपल्याला धूर जाण्याकरीता धुराडे केलेली दिसून येतात. राजमहालाच्या इमारतीच्या दक्षिणेस आपल्याला प्रशस्त तलाव पहावयास मिळतो. राजमहालाच्या दक्षिणेला असलेला हा हौद नक्कीच आपले लक्ष वेधून घेतो. हा हौद सुस्थितीमध्ये असून त्यामध्ये आपल्याला एक अष्टकोनी कारंजे देखील पहावयास मिळते. येथील बांधीव चर देखील सुस्थितीमध्ये असून येथून तांब्याची पाईपलाईन हौदामध्ये सोडलेली आपल्याला पहावयास मिळते. याच तलावातून संपूर्ण किल्ल्यावर पाणीपुरवठा करण्यात येत असे.


मांजरसुंबा गडावरील इमारत.


आज हा तलाव जरी कोरडा असला तरी त्याचे सौंदर्य खुलून दिसते. साधारणपणे ६ ते ७ फुट खोल असणाऱ्या या तलावाच्याकाठावर एक चिंचेचे झाड आपल्याला पहावयास मिळते. या झाडामुळे कोरड्या तलावाचे रूप नक्कीच सुंदर दिसते. गडावर असणाऱ्या महालाजवळच  एक वास्तू कशीबशी टिकून आहे. या वास्तूमध्ये आपल्याला दालने पहावयास मिळतात. जेव्हा या वास्तूच्या व्हरांड्यामधून आतमध्ये प्रवेश करतो तेव्हा आपल्याला एक पिराचे थडगे पहावयास मिळते. स्थानिक लोक यास दर्गा असे संबोधतात. काही जण असेही म्हणतात कि हे थडगे निजामशाहीमधील एखाद्या राणीचे(?) थडगे आहे. तर काही जण म्हणतात कि गडावर राहणाऱ्या दावलमलिक यांचा दर्गा आहे. या दर्ग्याचा उरूस हा चैत्र पुनवेस असतो.  


या दर्ग्यावरून थोडे पुढे गेले असता एक उंच इमारत आपले लक्ष वेधून घेते या इमारतीस उंच खिडक्या असून या खिडक्यांच्याखाली एक हौद आपल्याला पहावयास मिळतो. या हौदामध्ये डोंगरावरून येणारे पाणी साठविण्याची सोय केलेली आपल्याला पहावयास मिळते. हे हौदातील पाणी हत्तीच्या मोटेद्वारे येथील महालांना पुरविले जात असे. याला हत्तीमोट असे संबोधले जाते. येथूनच भुयारी इमारतीमधून हौदाकडे जाणारा पडका जीना आहे. येथील महालास 'मर्दानखाना' असे संबोधतात याचा संदर्भ आपल्याला नानासाहेब मिरीकर यांच्या टिपणवहीमध्ये मिळतो.  या ठिकाणावरून आपल्याला आजूबाजूचा परिसर उत्तम पहावयास मिळतो. ही सुंदर मोट गडाचे एक आकर्षण आहे. 


मांजरसुभा किल्ल्यावर असलेल्या निजामशाही काळातील वाड्याची सध्याची अवस्था.


ही मोट पाहून झाल्यावर आपण पूर्वेकडे जाताच आपल्याला काळ्या पाषाणामध्ये बांधलेल्या दुसऱ्या दरवाज्याकडे जातो येथूनच खाली उतरणाऱ्या पायऱ्यांनी आपण मध्यभागी कातळात कोरलेल्या खांबटाक्यापाशी जाऊन पोहोचतो. येथील खांबटाक्यातील पाणी आजिबात पिण्यायोग्य नाही. हे खांबटाके पाहून आपण आपली गडफेरी पूर्ण करून आपल्या परतीच्या वाटेवर लागावे. साधारणपणे सगळा किल्ला नीट व्यवस्थित फिरायला दीड तास पुरेसा आहे. किल्ल्यावर फिरताना आपल्याला अहमदनगरच्या निजामशाहीच्या वैभवाची जाणीव नक्कीच होते. अश्या या आडवाटेवर वसलेल्या 'मांजरसुभा' किल्ल्याला नक्कीच भेट द्यायला हवी. 


मांजरसुभा किल्ल्याचा इतिहास:-


मांजरसुभा किल्ल्याचा इतिहास पाहता किल्ल्याचा पहिला उल्लेख हा आपल्याला सय्यद अली तबातबा याने लिहिलेल्या बुरहाने मासिर या ग्रंथामध्ये वाचयला मिळतो. सय्यद अली तबातबा याने या किल्ल्याचा उल्लेख 'मंजरेशन' असा केलेला आहे. नगरचा चौथा सुलतान मूर्तजा निजामशाह याने या स्थळास भेट दिल्याची एक हकीकत आपल्याला बुरहाने मासिर या ग्रंथात वाचायला मिळते ती अशी की, "हिरवळीच्या खोऱ्यात, ओढ्याच्या काठावर वसलेले हे गाव आहे. प्रसिद्ध शिल्पशास्त्रज्ञ वजीर सलाबतखान याने कारंजी आणि प्रेक्षणीय वाडे बांधून गावाची रमणीयता वाढवली." असे सय्यद अली तबातबा म्हणतो. तसेच 'मांजर सुंभा' या नावाबद्दल दंतकथा जरी प्रचलित असल्या तरी 'मंजिले सुभा' असे त्याचे नाव असावे असे मुन्शी उमीद यांचे म्हणणे आहे. 


मांजरसुभा किल्ल्याच्या वाड्यासमोर असणारे कारंजे आणि किल्ल्यावर फिरवलेल्या पाण्याची रचना पहावयास मिळते.


बुरहाने मासिर इंग्रजी मध्ये आपल्याला जो उल्लेख वाचायला मिळतो तो पुढीलप्रमाणे:-  

It was at this time that Murtaza Nizam Shah who was residing in Bag-i Hasht-Bihisht left the place and shifted to Bag-i-Farahbaksh. From here he left for a place called Manjreshan (Manjarsumbha) and from there shifted to Ahmadnagar fort.


तसेच आपल्याला इ.स. १८८४ सालच्या अहमदनगर गॅझेटीयरमध्ये देखील या किल्ल्याचा उल्लेख वाचायला मिळतो तो पुढीलप्रमाणे. 

Ma'njarsumba, a small village a mile west of Dongargan and eight miles north of Ahmadnagar lies at the foot of the Dongargan hill crowned by the fort which overlooks the Vambhori plain. The hill side has cisterns of spring water and the fort would make a fine health resort. [Mr. R. E. Candy, C. S.] The Manjarsumba pass is said to be a favourite haunt of Valmiki, the author of the Ramayan and the reputed founder of the Mahadev Kolis. [Mackintosh in Trans. Bom. Grog. Soc. I. 202]         


मांजरसुभा किल्ल्यावर असणारे पाण्याचे खांब टाके.

असा हा आजही फारसा प्रसिद्धी झोतात नसलेला निजामशाही काळातील मांजरसुभा किल्ला नक्कीच पाहण्यासारखा आहे. जेव्हा केव्हा अहमदनगर शहराला भेट द्यायला जाल तेव्हा आपली वाट थोडीशी वाकडी करून मांजरसुभा या किल्ल्याला नक्की भेट द्या. निजामशाही स्थापत्यशैलीमधील एक उत्तम किल्ला बघण्याचे समाधान नक्की मिळेल.   

______________________________________________________________________________________________

कसे जाल:-
पुणे - येरवडा - वाघोली - शिक्रापूर - रांजणगाव - शिरूर - अहमदनगर - पोखर्डी - मांजरसुंबा.   

संदर्भग्रंथ:-
१) बुरहाने मासिर:- मूळ लेखक सय्यद अली तबातबा, मराठी अनुवाद डॉ. भ. ग. कुंटे, मुरली प्रकाशन.   
२) Burhan-i-Masir:- मूळ लेखक सय्यद अली तबातबा, इंग्रजी अनुवाद सर वुस्ले हेग्स.   
३) History - Mediaeval Period:- Dr. B. G. Kunte, Maharashtra State Gazeteer.
४) Gazeteer of the Bombay Presidency Ahmadnagar District Volume XVII:- The Executive Editor and Secretary Gazeteer Department, Government of Maharashtra, 1884 Reprinted 2003.
५) अहमदनगर शहराचा इतिहास:- सरदार ना. य. मिरीकर, अहमदनगर ऐतिहासिक वास्तूसंग्रहालय, २०१६.
६) सफर अहमदनगरची:- संभाजी भोसले, स्नेहल प्रकाशन, २०१५.
७) निजामशाहीच्या गतवैभवाची स्फूर्तिस्थाने अहमदनगरचे गडकोट:- संदीप तापकीर, विश्वकर्मा प्रकाशन, २०२१.
           
______________________________________________________________________________________________


महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात.

४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.
_________________________________________________________________________________________________

लिखाण आणि छायाचित्रे  © २०२२  महाराष्ट्राची शोधयात्रा                       No comments:

Post a Comment

Thank You For Comment...!!! :)

INSTAGRAM FEED

@maharashtraheritage