पुण्याजवळील 'भंडारा डोंगरावरील लेणी'

 

पुणे शहर आणि आजूबाजूच्या परीसरामध्ये आपल्याला विविध ऐतिहासिक गोष्टी आणि ठिकाणे पहावयास मिळतात. यातील काही ठिकाणे फार प्रसिद्ध असतात तर काही ठिकाणे आजही उपेक्षित आहेत. पुण्यापासून अगदी जवळ तुकोबारायांच्या स्पर्शाने पावन झालेला भंडारा डोंगर सर्वदूर प्रसिद्ध आहे. याच भंडारा डोंगरावर तुकाराम महाराज नेहेमी एकांत साधण्यासाठी जात असत. तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भंडारा डोंगरावर आजही आपले प्राचीनत्व जपणारी एक उपेक्षित लेणी भंडारा डोंगराच्या पोटामध्ये कोरलेली आपल्याला पहावयास मिळते. आजूबाजूच्या परिसरात ही लेणी भंडारा लेणी म्हणून ओळखली जाते. 


देहू गावापासून भंडारा डोंगर हा साधारणपणे ६ किलोमीटर अंतरावर वसलेला आहे. तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भंडारा डोंगरावर आता अत्यंत व्यवस्थित रस्ता देखील केला आहे. याच भंडारा डोंगराच्या वरती जाऊन आपण संतश्रेष्ठ  तुकाराम महाराज आणि विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेऊन आपला मोर्चा वळवायचा तो भंडारा डोंगराच्या पोटामध्ये असलेल्या लेण्यांकडे. याच भंडारा डोंगराच्या पश्चिम बाजूस प्राचीन लेण्या खोदलेल्या आहेत. सातवाहन काळामध्ये कोरलेले हे लेणे भंडारा डोंगराच्या पश्चिम बाजूस अगदी मधोमध आहे. 


सातवाहन काळामध्ये कोरलेले हे लेणे भंडारा डोंगराच्या पश्चिम बाजूस अगदी मधोमध आहे. 


या भंडारा लेण्यांकडे जायचे असल्यास मंदिराच्या अगदी विरुद्ध बाजूस एक पाऊलवाट जाते. वाट फारशी मळलेली नसल्याने काळजी मात्र घ्यावी. परंतु या लेणीकडे जायचे असेल तर आजूबाजूला कोणालाही गुहेकडे कसे जायचे विचारले तर लगेच मात्र सांगतात. साधारणपणे भंडारा डोंगराची पंधरा मिनिटांची पाऊलवाट आपल्याला थेट घेऊन जाते ते सातवाहन काळातील भंडारा लेणी समोर. जेव्हा आपण लेण्यापाशी पोहोचतो तेव्हा आपल्याला सुरुवातीस एक अर्धवट कातळात खोदलेले लेणे पहावयास मिळते. 


याच्यानंतर जेव्हा आपण पुढे जातो तेव्हा आपल्याला एक अत्यंत व्यवस्थित कातळात खोदलेला विहार पहावयास मिळतो. या विहाराला आपल्याला खोदीव पायऱ्या आणि व्हरांडा पहावयास मिळतो तसेच त्याच ठिकाणी आपल्याला भिक्षुंना झोपण्यासाठी खोदलेला बाक देखील पहावयास मिळतो आणि नंतर विहार पहावयास मिळते. बहुदा या दगडी बाकावर देखील दगडी छप्पर असावे परंतु काळानुसार ते पडलेले असावे अस वाटते. सध्या या लेण्याच्या विहारामध्ये विठ्ठलाची मूर्ती स्थापन केलेली आपल्याला पहावयास मिळते. तसेच याच विहाराच्या शेजारी आपल्याला एक स्तूप देखील पहावयास मिळतो. 


लेण्याच्या विहारामध्ये विठ्ठलाची मूर्ती स्थापन केलेली आहे.

या स्तूपाच्या दगडी पायऱ्या उध्वस्त झालेल्या असल्याने थोडे धाडस करून स्तूपाजवळ आपल्याला जाता येते. यानंतर आपल्याला अजून एक विहार पहावयास मिळतो. अत्यंत छोटेखानी पण महत्वाची असलेली हि भंडारा लेणी कार्ले-भाजे-बेडसे या लेण्यांच्या परिघात येते. भंडारा डोंगरावरील ही सातवाहनकाळातील बौद्ध लेणी हीनयान पंथीय आहे हे आपल्याला स्तुपावरून समजण्यास मदत होते. सध्या स्तुपाचा वरील भाग कोसळला असल्याने आपल्याला स्तुपाची हार्मिका आणि वेदिका पहावयास मिळत नाही. हि लेणी साधारणपणे  इ.स. १ ल्या ते २ ऱ्या शतकात बांधली असावी असे वाटते. भंडारा डोंगरावरील या बौद्ध लेणीशी संबंधित कोणताही शिलालेख कोरला नसल्यामुळे आपल्याला ही लेणी कोणत्या श्रेष्ठी म्हणजेच व्यापारी किंवा धनिक आणि कोणत्या राजाने कोरली होती का हे समजणे अवघड जाते. 


भंडारा डोंगरावरील स्तूप.

अशी ही देहू जवळील भंडारा डोंगरावर असलेली उपेक्षित लेणी आजही आपल्याला साद घालत आहे. जेव्हा कधी तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भंडारा डोंगराला भेट द्याल तेव्हा येथील सातवाहन काळातील उपेक्षित बौद्ध लेणीला नक्की भेट द्या. अशी ही आडवाटेवर वसलेली कोरीव लेणी आजही सर्व भटक्यांची वाट पाहत उभी आहे. 

______________________________________________________________________________________________

कसे जाल:-
पुणे - देहू - भंडारा डोंगर. 

संदर्भग्रंथ:-
१) The cave temples of India:- James Ferguson and James Burgess, 1880 
२) महाराष्ट्रातील प्राचीन लेणी:- ओंकार वर्तले, नाविन्य प्रकाशन, २०२१.

______________________________________________________________________________________________


महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात.

४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.

_______________________________________________________________________________________


लिखाण आणि छायाचित्रे © २०२२ महाराष्ट्राची शोधयात्रा  


 


    

  

No comments:

Post a Comment

Thank You For Comment...!!! :)

INSTAGRAM FEED

@maharashtraheritage