निसर्गरम्य 'रामदरा'



महाराष्ट्रामध्ये अशी काही ठिकाणे लपलेली आहेत ती आजही तेथे गेले कि मनाला भुरळ पडतात. मग यामध्ये मंदिर असो कि लेणी असो किंवा किल्ला हि सर्व ठिकाणे त्या त्या ठिकाणची माहिती सांगत आजही उभे आहेत. अश्याच काही ठिकाणांमध्ये थोडेसे आडवाटेवर लपलेले ठिकाण पुण्यापासून अगदी ४० कि.मी. अंतरच्या परिघात लपलेले आहे. आता हे कोणते ठिकाण असा प्रश्न आपल्याला नक्की पडू शकतो हे पुण्यापासून अगदी जवळ लपलेले ठिकाण म्हणजे  निर्सगरम्य असलेले 'रामदरा'.


रामदरा येथील शिवमंदिर आणि तळे.

पुण्याहून हडपसर मार्गे सोलापूर रस्ता पकडून लोणी येथून 'रामदरा' अशी आपल्याला पाटी दिसते त्या पाटीच्या शेजारून एक रस्ता आपल्याला 'रामदरा' या निसर्गरम्य ठिकाणी घेऊन जातो. दोन्ही बाजूनी हिरवीगार शेते,मधुन मधून वस्ती, अरूंद पण पक्का डांबरी रस्ता  आपले मन नक्कीच मोहवून टाकतो. 'रामदरा' मुळातच वैशिष्ट्यपूर्ण आहे ते त्याच्या नैसर्गिक दरीमुळे आणि तळ्यामुळे. या रामदऱ्याची सुंदरता पाहून मन हरखून जाते. 'रामदरा' येथील परिसर हिरवाकंच वनराई नटलेला असून आपल्याला वारंवार येण्यासाठी भुरळ घालतो. हिरव्यागार टेकडीच्या पायथ्याला असलेले तळे जणू काही आपण केरळ मध्ये आहोत असा भास निर्माण करते.


निसर्गरम्य वातावरणात वसलेले रामदरा मंदिर.

पुण्यापासून अगदी जवळ असे कोणते ठिकाण आहे हे बऱ्याच पर्यटकांना माहिती देखील नसते. अगदी हाकेच्या अंतरावर वसलेला हा 'रामदरा' म्हणजे निसर्गाशी एक वेगळी ओळख करून देणारे ठिकाणच. पुण्यापासून जवळ भटकंती करायची असेल तर 'रामदरा' हा पर्याय अत्यंत सहज आणि सोपा ठरेल. रामदऱ्याची हि भटकंती सुखद बनवते ती त्याच्या सुंदर तळ्यामुळे. या तळ्यामध्ये एक शिवमंदिर असून एक रामपंचायतन देखील आपले लक्ष वेधून घेते.


रामदरा येथील शिवमंदिराच्या नक्षीदार महिरपी.

'रामदरा' येथे नुसते पर्यटकांना आकर्षित करणारी जागा नसून डोंगरभटक्यांना देखील आकर्षित करेल अशी हि जागा आहे. येथे एक टेकडी देखील आहे जी डोंगरभटक्यांना नक्कीच गिर्यारोहण करायला आकर्षित करते. 'रामदरा' येथे एक जुने शंकराचे मंदिर असून हे मंदिर नव्याने जीर्णोद्धार केलेले आपल्याला बघायला मिळते. या शिवमंदिराचा कारभार लोणी येथील एक विशवस्त मंडळ पहाते. मंदिराच्या प्रदक्षिणा पथात दगडी  फरसबंदी असून खाबांना नुकताच नवीन काळा संगमरवर बसवलेला दिसतो. संपूर्ण मंदिराच्या भोवती  एक चौथरा बांधून चार कोपर्‍यात आपल्याला देवीची मंदिरे बांधलेली बघायला मिळतात. ही चारही मंदिरे मूळ मंदिरात नव्हती. हि मंदिरे नंतर बांधलेली आहेत हे आपल्याला नीट बघितल्यावर समजते. 


गणेश मंदिर.

'रामदरा' येथील मुख्य मंदिरात एका फरसबंदीतून जावे लागते. याठिकाणी अजून एक मजा आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे या मंदिराचा ओटा ज्याठिकाणी एकत्र येतो तिथे अजून दोन छोटी मंदिरे बांधलेली आपल्याला बघायला मिळतात. मूळ मंदिर हे दगडी असून त्याच्यावर बांधलेला कळस हा आत्ताच्या काळातला आहे हे आपल्याला मंदिराची धाटणी बघितल्यावर समजून येते.मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावर अनेक संतांच्या मूर्ती कोरण्यात आल्या असून त्यांची नवे देखील आपल्याला बघयला मिळतात.


सुंदर आणि रेखीव संगमरवरी नंदी.




मारुतीची मूर्ती.


संगमरवरी गाभाऱ्यामध्ये एक सुरेख शिवलिंग असून त्याच्यामागील बाजूस आपल्याला राम, लक्ष्मण, सीता यांच्या सुबक मूर्ती असून मागे दत्तात्रेय यांची मूर्ती बघायला मिळते. बाहेर जशी निर्व शांतता आहे तशीच शांतता हि गाभाऱ्यात देखील अनुभवायला मिळते. या मंदिराच्या बाहेरील बाजूस संगमरवरामध्ये घडवलेला एक सुबक आणि सुंदर नंदी मात्र आपले लक्ष वेधून घेतो. मंदिराच्या बाहेरील निसर्ग आणि समोरील तलाव या संपूर्ण परिसराला एक वेगळीच झळाळी देतो.





राम लक्ष्मण आणि सीता यांच्या सुबक घडवलेल्या मूर्ती आणि दत्तात्रेय यांची देखील मूर्ती आपल्याला बघायला मिळते.


रामदरा येथील शिवलिंग.

'रामदरा' या नावामध्ये 'दरा' हा जो शब्द आहे याचा अर्थ देखील आपल्याला हि भटकंती करताना समजून घेणे महत्वाचे ठरते. 'दरा' म्हणजे मोठी दरी किंवा डोंगरांनी वेढलेला थोडा जो खोलगट भाग असतो त्यामध्ये निर्माण होणारी जी जागा असते त्याला 'दरा' असे म्हणतात. 'रामदरा' येथील भाग डोंगरांनी वेढलेला असल्यामुळे येथे निसर्ग आपले एक वेगळेच रूप दाखवतो. 'रामदरा' येथील परिसर डोंगरांनी वेढला असल्याने येथील वातावरण कायम शांत आणि थंड असते. 


मंदिरात कोरलेली देवी देवतांची चित्रे आणि संतांची चित्रे. 

'रामदरा' येथे लोणी गावातील लोकांनी या परिसरात भरपुर देशी  वृक्ष लावल्याने येथील वनराई मध्ये विविध पक्ष्यांचे दर्शन आपल्याला होते. सुंदर आणि मोठे तळे, शांत आणि स्वच्छ हवा आणि हवाहवासा निसर्ग हे 'रामदरा' या ठिकाणाला वैशिष्ट्यपूर्ण बनवते. खुद्द पावसाळ्यात तर कमालीचे सुंदर दृष्य आपल्याला बघावयास मिळते. 'रामदरा' येथे एक वेगळेच गुढ असे भारलेपण असून, या 'रामदरा' परीसरामध्ये एक शांत स्तब्धता अनुभवयाला  मिळते.     



संपूर्ण हिरवाईने नटलेल्या या 'रामदरा' परिसरात मनसोक्त भटकंती करून येथील निसर्ग आपल्याला कायमच खुणावत राहतो आणि येथील निसर्गाचे सुंदर रूप आपल्याला कायमच खुणावत राहते. या निसर्गाच्या रुपामुळे आपली पावले नक्कीच 'रामदरा' येथे नक्कीच परत फिरकतात.    


'निसर्गरम्य रामदरा' येथील एक शांत संध्याकाळ.
________________________________________________________________________________________________

कसे जाल:-
पुणे – हडपसर – लोणी काळभोर – रामदरा.

______________________________________________________________________________________________

महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात.

४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.

_________________________________________________________________________________________


लिखाण आणि छायाचित्रे © २०१७ महाराष्ट्राची शोधयात्रा

No comments:

Post a Comment

Thank You For Comment...!!! :)

INSTAGRAM FEED

@maharashtraheritage