मराठी भाषेचा उदय सांगणारे महत्वपूर्ण 'शिलालेख'


कर्नाटक हे महाराष्ट्राला चिटकून असलेले ऐतिहासिक राज्य. या कर्नाटक राज्यामध्ये मोठ्या मोठ्या राजसत्ता होऊन गेला त्यापैकी 'विजयनगर' हे साम्राज्य कोणाला माहिती नाही असे आजीबात नाही अत्यंत मोठी भरभराट असलेले हे राज्य. या विजयनगर साम्राज्यात काही काळ महाराष्ट्राचा काही भाग सामावलेला होता. याच कर्नाटक राज्यामध्ये असणाऱ्या 'हसन' हा ऐतिहासिक आणि निसर्गरम्य जिल्हा. या सुंदर निसर्गरम्य 'हसन जिल्ह्यामध्ये' जवळपास २३०० वर्षांचा इतिहास लाभलेले सुंदर गाव आहे. ते सुंदर गाव दुसरे तिसरे कोणते नसून जैन धर्माच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे ठिकाण म्हणजे 'श्रवणबेळगोळ' होय. 

'श्रवणबेळगोळ' मुळात प्रसिद्ध आहे ते तेथील 'गोमटेश्वर' याच्या मूर्तीसाठी हि मूर्ती तब्बल ५८ फुट असून अशी मूर्ती बाकी जगात कोठेही बघायला मिळत नाही. हीच ती प्रसिद्ध गोमटेश्वराची मूर्ती 'गंगराज राजमल्ल यांचा प्रमुख सेनानी आणि पंतप्रधान चामुंडराय याने आपली माता कालिकादेवी हिच्या सांगण्यावरून हा गोमटेश्वरचा पुतळा उभारला. या चामुंडरायाचे नाव हे गोमटे असे देखील होते'. हा या पुतळ्याचा इतिहास. परंतु हा इतिहास लोकांना फारसा ज्ञात नसतो कारण लोक फक्त फिरण्यासाठी येथे आलेले असतात आणि जैन लोकांचे श्रद्धास्थान असल्याने या भागात पर्यटक आणि श्रद्धाळू लोकांची बरेच येणे जाणे असते.गोमटेश्वर येथील बाहुबली याची मूर्ती किंवा पुतळा आणि डाव्या आणि उजव्या बाजूस कोरलेले मराठी, कन्नड, तामिळ शिलालेख.
  (छायाचित्र:- आंतरजाल येथून घेतले आहे) 

गोमटेश्वरच्या या एकसंध मूर्तीचे जेवढे महत्व आहे तेवढेच महत्व आहे ते त्याच्या पायाखाली कोरलेल्या शिलालेखाचे. या गोमटाने म्हणजेच चामुंडरायाने बाहुबली याची 'कायोत्सर्ग' रुपामध्ये हि मूर्ती बनवली. या मूर्तीच्या पायाच्या इथल्या बैठकीवर तमिळ आणि कानडी भाषेबरोबर डाव्या अंगाला एक महत्वपूर्ण मराठी शिलालेख आपल्याला बघायला मिळतो तो मराठी भाषेतील आद्य शिलालेख म्हणून ओळखला जातो. तो शिलालेख पुढील प्रमाणे.
श्री चामुंडराये करवियले ।
श्री गंगाराये सुत्ताले करवियले ।

या प्रकारे त्या शिलालेखात उल्लेख आढळतो. कोणत्याही राजाचा उल्लेख असलेला हा मराठी भाषेतील आद्य शिलालेख असून त्यावरील अक्षरे अत्यंत व्यवस्थितरित्या कोरलेली आहेत. या शिलालेखामध्ये पुढील प्रमाणे म्हटले आहे. 'चामुंडरायाने बाहुबली याचा पुतळा उभा केला आणि गंगराजाने त्याभोवतालचे कुंपण उभारले'. यातून कर्नाटक आणि महाराष्ट्राचे सांस्कृतिक संगमाचे उदाहरण आपल्याला मिळते. 

'चामुंडरायाने बाहुबली याचा पुतळा उभा केला आणि गंगराजाने त्याभोवतालचे कुंपण उभारले'
(छायाचित्र:- आंतरजाल येथून घेतले आहे)

अश्याच प्रकारचा दुसरा मराठी शिलालेख हा  कुडल संगम, ता. दक्षिण सोलापूर येथे सापडला असून या शिलालेखामध्ये पुढीलप्रमाणे वाक्ये लिहिलेली संशोधकांना आढळून आली आहेत.  

"वाछि तो विजेया होईवा ।।" 

या शिलालेखामध्ये शके ९४० असे उल्लेख केलेले आहे यावरून मात्र हा शिलालेख गोमटेश्वरच्या शिलालेखाच्या आधी आहे असे दिसून येते. तसे पाहायला गेले तर गोमटेश्वर येथील शिलालेख मात्र हा सगळ्याच दृष्टीने मराठी भाषेचा महत्वाचा दुवा मानला जातो. अश्याच पद्धतीमध्ये अक्षी येथील जो शिलालेख आहे हा शिलालेख अलिबाग आणि चौल या मार्गावर आजही उन पावसाचा मारा सहन करत उभा राहिलेला आपल्याला दिसतो. अक्षी येथील गाद्धेगाळ फार महत्वाचा असून महाराष्ट्राच्या प्राचीन इतिहासावर प्रकाश टाकतो तो शिलालेख हा डॉ. शं. गो. तुळपुळे यांनी वाचला असून त्याबाबत त्यांचे संशोधन फार महत्वपूर्ण ठरते. 


गीं सुष संतु । स्वस्ति ओं। पसीमस 

मुद्राधीपती । स्त्री कोंकणा चक्रीवर्ती।

स्त्री केसीदेवराय। महाप्रधान भइर्जु सेणुई तसीमीनी काले प्रव्रतमने।

सकु संवतुः ९३४ प्रधावी सवसरे : अधीकू दीवे सुक्रे बौलु।

भइर्जुवे तथा बोडणा तथा नऊ कुवली अधोर्यु प्रधानु।

महालषुमीची वआण। लुनया कचली। 

या शिलालेखामध्ये लिहिलेल्या ओळी पुढीलप्रमाणे:- 

पश्चिम समुद्राधिपती श्री. कोकण चक्रवर्ती, श्री. केसीदेवराय याचा महाप्रधान भइर्जु सेणुई याने शक संवत ९३४ प्रभव संवत्सर अधिक कृष्ण पक्ष शुक्रवार या दिवशी देवीच्या बोडणासाठी नऊ कुवली धान्य नेमून दिले. जगी सुख नांदो.

हा अक्षी येथील शिलालेख महाराष्ट्र आणि मराठीच्या इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा पुरावा  ठरतो सन २०१२ मध्ये या ऐतिहासिक पुराव्याला १००० वर्ष पूर्ण झाले तरीही हा पुरावा आज आपल्याकडे दुर्लक्षित स्वरुपात आहे. अश्या या ठेव्याचे आपण नक्कीच जतन करून ठेवणे गरजेचे आहे. 


राजा केसिदेवराय याचा अक्षी येथील गद्धेगाळावर असणारा शिलालेख.
(छायाचित्र:- आंतरजाल येथून घेतले आहे)   

या संपूर्ण दुव्यांवरून बघायला गेले तर अक्षीच्या शिलालेखाचा अग्रक्रम मात्र पहिला येतो याचा अर्थ असा कि साधारणपणे मराठी भाषा हि ५ व्या ते ६ व्या शतकापासून बोलायला किंवा लिहिण्यासाठी नक्की वापरायला लागले असावेत हा अंदाज लावता येतो.
________________________________________________________________

संदर्भ ग्रंथ:-

१) प्राचीन मराठी कोरीव लेख:- डॉ. तुळपुळे, शं.गो. (१९६३)

२) भारताचे संस्कृतीवैभव:- डॉ.शोभना गोखले.
________________________________________________________________

महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात. 

Comments

Popular posts from this blog

पुण्यामधील नारायण पेठेमध्ये असलेले अपरिचित 'शेषशायी विष्णू मंदिर'

पुणे शहर आणि आजूबाजूच्या परिसरातील शेक्सपिअर यांनी काढलेली '१९१५ मधील छायाचित्रे'

पुणे शहराच्या विस्मृतीमध्ये गेलेला 'किल्ले हिस्सार किंवा पांढरीचा कोट'