महाराष्ट्रातील किल्यांवरचा 'पुष्प महोत्सव'


नुकताच श्रावण संपलेला असतो हिरवाई सगळीकडे बहरलेली असते सुंदर छोटे छोटे झरे खळखळ करत आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत वाहत असतात. सगळीकडे प्रसन्न वातावरण असते आणि या प्रसन्न वातावरणात छोटी छोटी सुंदर रानफुले आपले डोके वर काढून सह्याद्रीच्या अंगा खांद्यावर उमलायला लागली असतात. अश्या या डोंगर माथ्यावर उगवलेल्या रानफुलांनी सह्याद्रीचे 'शिरोमणी' असणारे 'किल्ले आणि उत्तुंग शिखरे' यांच्या डोक्यावर पिवळ्या, लाल, निळ्या अश्या विविध फुलांचा 'मुकुट' या किल्यांनी आणि शिखरांनी आपल्या डोक्यावर चढवलेला असतो. हा पुष्पमहोत्सव म्हणजे भटक्यांसाठी एक पर्वणीच असते.

अश्या या फुलांचा महोत्सव पहायचा असेल तर कोणत्याही किल्यावर जावे आणि मनमुराद भटकावे ह्या फुलांच्या महोत्सवात प्रत्येक किल्ला हा आपले वेगळे रूप दर्शवत असतो. आपल्या सह्याद्रीवर निसर्गाने भरपूर माया केली आहे या मायेचे एक सुंदर रूप आपल्याला सह्याद्री मध्ये उमलणाऱ्या सुंदर सुंदर फुलांमधून आपल्याला पाहायला मिळते अनुभवायला मिळते. सह्याद्रीत उमलणाऱ्या फुलांचे एक अद्भूत जग आपल्याला अनुभवायचे असेल तर सह्याद्रीतील अनवट किल्ले, मोठी मोठी पठारे, अनवट घाटावाटांवर फिरून निरनिराळ्या रंगाची फुले आपल्याला बघायला मिळतात ह्या फुलांचा जणू मेळावा हा अनवट वाटांवर भरलेला असतो. 

नाणेघाटाच्या पठारावर उमललेली सोनकी.

सह्याद्रीमध्ये उगवणाऱ्या प्रत्येक फुलाचा आकार, रंग, सुवास हा वेगवेगळा असतो आणि या सुंदर रानफुलांच्या भोवती फुलपाखरे आणि विविध प्रकारचे छोटे छोटे किडे, मधमाश्या ह्या फुलांभोवती फेर धरून नाचत असतात आनंदाने बागडत असतात. या सुंदर सुंदर रानफुलांमध्ये काही फुले हि औषधी देखील असतात तर काही रानफुले हि कीटकभक्षी देखील असतात. सह्याद्रीतील अनवट पठारे, किल्ले  ह्या रानफुलांनी नुसती भरून गेलेली असतात. ह्या पठारांवर आणि किल्यांवर जणू गालिचे पसरलेले असतात आणि या गालिच्यांवरून आपण चालत असतो. गालिच्या प्रमाणे पसरलेल्या गवतावर उगवलेली हि फुले वारे आले असता या सुंदर गालिच्यावर अनेक लाटा उमटतात आणि ह्या लाटांमुळे या फुलांचे विविध रंग आपल्याला दुरवर बघायला मिळतात.

सह्याद्री मधील सर्वोच्च शिखर असणारे 'कळसूबाई', अत्यंत दुर्गम आणि अस्त व्यस्त पठारे असणारे 'अलंग, मदन, कुलंग' हे दुर्गत्रिकुट, दुर्ग भटक्यांची पंढरी ज्याला समजले जाते तो 'हरिश्चंद्रगड', प्रवरेचा उगम असणारा किंवा सह्याद्रीतल्या 'रत्नाची' उपमा ज्याला दिली जाते तो 'रतनगड' यांचा साज जणू हि रानफुले बदलून टाकतात. निळ्या, पिवळ्या, लाल, गुलाबी फुलांची चादर हे किल्ले स्वतःच्या अंगावर पांघरून घेतात आणि भटक्यांना आपल्याकडे आकर्षित करतात. विविध किल्यांवर उगवणाऱ्या या फुलांचे सौंदर्य नजरेत आणि शब्दांत कधी न मावणारे.

नासिक जवळील 'अचला' किल्ल्यावर फुललेला तेरडा.

उन्हाळ्यात उघडा बोडका दिसणारा 'कोरीगड' हा श्रावण संपल्यानंतर रंगीबेरंगी फुलांची साडी  नेसून नववधू सारखा लाजत असतो तर घनगड आणि 'तैलबैलाची' पठारे सुंदर सुंदर इवल्या इवल्या रान फुलांनी बहरून गेलेली असतात. 'राजगड आणि तोरण्यावर' तर जणू फुलांचे संमेलन भरलेले असते. 'राजगड आणि तोरण्यावर' जणू सप्तरंगांची उधळण असते आणि जर रुसून बसलेली कारवी सात वर्षांनी उगवली तर या किल्यांचा साज बघत राहण्यासारखा असतो. सगळा सह्याद्री हा जणू निळ्या रंगाने मोहरून जातो. 

'बागलाण' चे शान असलेले 'साल्हेर, मुल्हेर, सालोटा' तरी या पुष्पमहोत्सवाला कसे अपवाद राहतील. सप्टेंबर जसा संपतो तसे तसे बागलाण मधील या किल्यांवर पुष्पमहोत्सव रंगायला सुरुवात होते तो थेट नोव्हेंबर च्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्या पर्यंत 'साल्हेर' चे शिखर या विविध रंगी फुलांनी बहरून गेलेले असते. 'सालोटा आणि मुल्हेर' त्यांच्या हिरव्या शालीवर जणू पिवळ्या रंगाची झालर चढवतात आणि माना  वर काढून काढून सगळ्यांना खुणावतात. 

'रायरेश्वर' पठारावर फुललेली फुले.

या सगळ्यांना 'रायरेश्वर, रायगड, अवचितगड' हे तरी कसे अपवाद राहतील. 'रायरेश्वर आणि केंजळगड' हि जोडगोळी अनेकविविध फुलांनी बहरून गेलेली असते या पठारांवर फिरताना जणू आपण एखाद्या बागेत फिरत असल्याचा आपल्याला भास होतो. मधूनच एखादा सुंदर झरा खळखळून वाहत असतो आणि त्याच्या आवाजावर हि पिवळी, लाल, गुलाबी रंगाची फुले डोलत असतात. 'रायगडाच्या' गंगासागरतलावाच्या जवळ हि छोटी छोटी सोनकी या-ना त्या रुपाने सगळ्यांना भुरळ घालत असते. 'अवचित' गडावरील पठारावर या रानफुलांनी आपले बस्तान बसवलेले असते आणि विविध रंगांची मुक्तपणे उधळण करत विविध रंगीबेरंगी फुलपाखरांना साद घालत आपल्याकडे आकर्षित करत असतात.

सह्याद्रीतल्या या रानफुलांमध्ये सगळ्यात जास्त भाव खाणारी सोनकी दर आठ- पंधरा दिवसांनी आपल्याला विविध रंगांची मुक्त उधळण करत अनवट किल्यांवर मुक्त संचार करत असते. सह्याद्रीतील काही चिमुकल्या फुलांचे आयुष्य हे फक्त दोन दिवसांकरिता असते त्या दोन दिवसात हि फुले आपल्या आयुष्याचा संपूर्ण आनंद लुटतात आणि आपल्याला देखील आनंदाने कसे जगायचे हि शिकवण देतात.

'रोहीडा' किल्ल्यावर फुललेली सोनकी.

आजकाल 'कास' चे पठार हे सगळीकडे प्रसिद्ध झाले आहे परंतु या पठारावर उगवणारी फुले पाहायला लोकांचे लोंढेचे लोंढे येत आहेत त्याचे कारण एकच आहे त्याठिकाणी जायला कमी कष्ट आहेत. लोकांनी कासचे पठार पहावे तेथील निसर्गाने मुक्त हस्ताने केलेली फुलांची उधळण पहावी आणि निसर्गाची विविध रूपे अनुभवावी परंतु तेथील फुलांची आणि निसर्गाची दिवसेंदिवस होणारी हानी कशी थांबवता येईल हे देखील पहावे. या 'कासच्या' पठारामुळे सह्याद्रीमधील इतर अनवट ठिकाणे अनगड दऱ्या-डोंगरांमुळे या अश्या पर्यटकांच्या लोंढ्यांपासून वाचली आहेत आणि त्यामुळे किल्यांवर भरणारा 'पुष्पोत्सव' हा भटक्यांना खुणावत असतो आणि किल्यांचे एक आगळे वेगळे रूप अनुभवणे हि एक पर्वणीच असते.  

अश्या या अनवट आणि सुंदर रानफुलांचे क्षणांच आयुष्य अत्यंत सुंदर असते ते आपण देखील अनुभवत सह्याद्रीतल्या किल्यांवरील पुष्पोत्सव अनुभवणे आणि या सुंदर छोट्या छोट्या फुलांना जगू देणे हे आपल्याच हातात आहे नाही का…?? चला तर मग येताय ना?  सह्याद्रीतील किल्यांवरचा पुष्प महोत्सव बघायला छोटी छोटी सुंदर पिवळी सोनकी, कारवी आणि  किल्यांवर फुललेली इतर रानफुले आपली वाट बघत आहेत…!!!

श्रावणातील 'जीवधन' किल्ल्याचा साज. संपूर्ण किल्ला विविध रंगाच्या फुलांनी नटलेला असतो.  

_____________________________________________________________________

महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात. 

४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.
_________________________________________________________________________________________

 लिखाण आणि छायाचित्रे  © २०२० महाराष्ट्राची शोधयात्रा       

    

No comments:

Post a Comment

Thank You For Comment...!!! :)

INSTAGRAM FEED

@maharashtraheritage