आडवाटेवरची मुशाफिरी


' मुसाफिर हुं यारो...ना घर है ठिकाना...मुझे बस चलते जाना है... '

ह्या गाण्याच्या ओळी कायम वेगवेगळ्या आडवाटेवरच्या जुन्या आठवणी ताज्या करून देतात. अनेक आडवाटांवर दरवेळेस येणारे नवीन अनुभव गाठीशी बांधून  महाराष्ट्रातील विविध डोंगर रांगा, समुद्र किनारे, नारळी-पोफळीच्या आत लपलेली अपरांतातील सुंदर छोटी छोटी गावे सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर बांधलेले किल्ले आणि सह्याद्रीच्या पोटात खोदलेल्या सुंदर लेण्या तसेच पावसाळ्यात बरसणारे सुंदर धबधबे आजही मनाला भुरळ घालतात .   

महाराष्ट्रात अश्या अनेक आडवाटा आहेत अश्या आडवाटांवर भटकताना त्या वाटांवरची केलेली 'मुशाफिरी' हि कायमच अनुभव समृद्ध असते. डोंगर-दऱ्या भटकताना विविध ठिकाणाची माहिती जमा करण्याचा छंद काही वेगळाच आनंद देऊन जातो. शालेय अभ्यासक्रमात वाचलेला इतिहास, भूगोल हे विषय जणू काही ह्या किल्यांवर आणि गिरीशिल्पांमधून आपल्याला खुणावू लागतात त्यांच्या अस्तित्वाची जाणीव ते करून देत असतात.

अश्याच अनवट वाटांवर भटकताना उन्हाळा,हिवाळा, पावसाळा या कालावधीमध्ये महाराष्ट्रातल्या डोंगर रांगा विविध रुपाने नटलेल्या असतात. पावसाळ्यात खळखळणारे असंख्य धबधबे त्यांची तार छेडतात तर उन्हाळ्यामध्ये आपली पाने गाळून विविध वनस्पती सोनेरी रंग जणू चमकवत असतात आणि वाट पाहात असतात ती पावसाची. हिवाळ्यामध्ये दऱ्या आणि डोंगर हे धुक्याची चादर पांघरून पहुडलेले असतात झाडांना नवी पालवी फुटली असल्यामुळे वातावरणात गोडवा निर्माण झालेला असतो आणि अश्या वातावरणात अनवट वाटांवर भटकताना हळूच एखाद्या 'मलबार व्हिसलिंग थ्रश' सारख्या सुंदर पक्ष्याची शिळ कानाला सुखावून जाते.

निसर्गातीची विविध रूपे बघताना बऱ्याचवेळेस काही नवीन गोष्टी देखील बघायला मिळतात यामध्ये जंगलांमध्ये लपलेले 'किल्ले' थोड्याश्या आडवाटेवर असणारी  सुंदर कलाकुसरीची 'गिरीशिल्पे' काही गावांमध्ये बांधलेले सुंदर 'वाडे आणि गढ्या' तसेच कोकणात असलेली 'गरम पाण्याची कुंडे' आणि सुंदर आखीव 'रेखीव मंदिरे' हे सगळे जणू आडवाटा फिरताना आपल्याभोवती फेर धरून नाचू लागतात त्यांचा इतिहास सांगू लागतात. 


कधी कधी तर असे देखील वाटते कि हि सुंदर 'गिरीशिल्पे' खोदणारे अनामिक लोक कोण? इतकी सुंदर शिल्पे त्यांनी कोणत्या अवजारांनी खोदली असावित? तसेच बऱ्याचदा गावाच्या मंदिराच्या एखाद्या कोपऱ्यात असणारे कोरीव काम केलेले सुंदर दगड आणि त्याच्यावर कोरलेले एका 'वीरगती' प्राप्त झालेल्या 'वीराचे चित्र' असे हे 'वीरगळ' कोणाचे असावेत? हे देखील प्रश्न मनामध्ये घर करून जातात. सह्याद्रीच्या आडवाटांवर उभारलेले अभेद्य किल्ले हे कोणत्या तंत्रज्ञाने बांधले असावेतमहाराष्ट्रातील अनेक गावात सुंदर कलाकुसर केलेली मंदिरे आढळतात ती मंदिरे उभारणारे ती अज्ञात लोक कोण? हि सगळी कुतुहुल आडवाटेवर भटकताना प्रत्येक भटक्यांना पडतात.

ह्या अनवट वाटांवर भटकताना अनेक सवंगडी आणि जिवाभावाचे डोंगरभाऊ मिळतात ह्यामध्ये काहींची साथ हि थोड्या कालावधी साठी असते तर काहींची साथ हि शेवटपर्यंत असते. अश्या डोंगरभावांबरोबर केलेल्या अनेक 'सह्ययात्रा' स्मरणात राहतात. ह्या सह्ययात्रांमध्ये कोणी कोणाचा प्रतिस्पर्धी नसतो. आडवाटेवरच्या या सुंदर सह्ययात्रांमध्ये 'सह्याद्री' आणि त्याच्या डोंगररांगा कायम एकच गोष्ट शिकवत असतात 'आयुष्यात खंबीर राहा'. आडवाटेवर फिरताना गावांमधील माणुसकी टिकून आहे हे कायम जाणवत असते.  

आडवाटा फिरताना आणि दऱ्या डोंगरात फिरण्याचा छंद हा जीवनाकडे बघण्याचा संपूर्ण दृष्टीकोन बदलून टाकतो याचा प्रत्यय प्रत्येक वेळेस येतो. यामुळे आडवाटेवर फिरताना किंवा सह्ययात्रेत 'निखळ माणूस' बनतो आणि आयुष्याकडे वेगळ्या नजरेने बघण्याची सवय लागते. अनवट वाटा, किल्ले, लेण्या हा समृद्ध ठेवा डोळसपणे बघत सह्याद्रीचा निसर्ग मनाला अशी काही भुरळ घालतो कि आपल्याला विविध ठिकाणांचे कुतूहल वाटायला हवे. ह्या कुतूहलापोटी भटक्यांची पावले एका अनामिक ओढीने सह्याद्रीतील सुंदर शिल्पांकडे आणि तंत्रज्ञानाने मंत्रमुग्ध करणाऱ्या सुंदर रचनेच्या किल्यांकडे वळतात आणि मग सुरु होते एक सुंदर आडवाटेवरची यात्रा. हि यात्रा कधी विविध 'घाटवाटांवर' तर कधी एखाद्या अनोळखी 'किल्यावर' किंवा आडवाटेवर डोंगराच्या कुशीत लपलेल्या सुंदर कातळ कोरीव 'गिरीशिल्पांवर' कधी कधी तर माणसाला खुणावणाऱ्या सह्याद्रीतील उत्तुंग रांगड्या 'सुळक्यांवर'...!!!

अश्या अनेक कडे कपारी, घाटवाटा, धबधबे, ह्या अनवट वाटांवर लपलेल्या असून त्यांच्या शोधात प्रत्येक 'डोंगरभाऊहा आज या सह्याद्रीच्या दऱ्या-खोऱ्यात मुक्तपणे फिरत आहे. सह्याद्रीतील आडवाटा आजही अनेक जणांना खुणावत आहेत आणि बोलावत आहेत अश्या आडवाटांची सफर आयुष्यात एकदा तरी नक्कीच अनुभवा...!!!   
______________________________________________________________________________________________

महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात.

४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.

_________________________________________________________________________________________

लिखाण आणि छायाचित्रे  © २०१६ महाराष्ट्राची शोधयात्रा

No comments:

Post a Comment

Thank You For Comment...!!! :)

INSTAGRAM FEED

@maharashtraheritage