महाराष्ट्राची आणि सह्याद्रीची भौगोलिक रचना


मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा
राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा
नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा

असा हा आपला महाराष्ट्राचा प्रदेश जर आपण पहिला तर हा महाराष्ट्र संपूर्ण भारतामधल्या कोणत्याही भूप्रदेशापेक्षा आकाराने मोठा आहे. आपल्या महाराष्ट्राच्या सीमा पहायला गेले तर महाराष्ट्राची पश्चिम सीमा ही अरबी समुद्राच्या किनाऱ्याबाजूने दमणपासून थेट कारवार पर्यंत पसरलेली आहे तसेच सोनगडावरून नर्मदेपर्यंत पसरलेली आहे तसेच ओंकारमांधाता (आजचा मध्यप्रदेशचा भाग) येथून जबलपूरपर्यंत महाराष्ट्राची उत्तर सीमा पसरलेली आहे. महाराष्ट्राची पूर्व सीमा ही राजनांदगाव येथून बेळगाव ते कारवार पर्यंत पसरलेली आहे. एवढ्या मोठ्या भूप्रदेशात महाराष्ट्राचा विस्तार झालेला आपल्याला पहायला मिळतो. अश्या पद्धतीमध्ये महाराष्ट्राच्या सीमा पसरलेल्या आपल्याला बघायला मिळतात.

आपला महाराष्ट्र देश सौंदर्याने आणि विविधतेने नटलेला आहे हे सौंदर्य अनुभवायचे असेल तर महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या दऱ्या-डोंगर पायी फिरून अनुभवावे परंतु हा प्रवास करताना डोळे उघडे ठेवून फिरणे फार गरजेचे आहे. यामुळे महाराष्ट्रातील सृष्टीसौंदर्य, लोकसंस्कृती, लोकजीवन अनुभवता येईल. भौगोलिक दृष्ट्या पहिले तर सह्याद्री हा महाराष्ट्राचा निर्माता आहे. गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक हे भारताच्या पश्चिम किनाऱ्याचे तीन मुख्य भाग. ह्या तीनही भागांची विभागणी सह्याद्रीनेच केली आहे. कोकण, घाटमाथा , पठार, आणि मैदाने हे महाराष्ट्राचे मुख्य भौगोलिक विभाग या सर्वांचा मूळ गाभा हा सह्याद्रीच आहे.

कोकण, घाटमाथा , पठार, आणि मैदाने हे महाराष्ट्राचे मुख्य भौगोलिक विभाग.

भारतामधल्या डोंगररांगांची भौगोलिक परिस्थिती बघावयास गेले तर हिमालयाच्या डोंगररांगानंतर सह्याद्रीच्या डोंगररांगांचा  विस्तार हा सगळ्यात मोठा आहे. सह्याद्रीची मुख्य डोंगररांग ही तापी नदीपासून कन्याकुमारीपर्यंत पसरलेली आहे. सह्याद्रीच्या रांगेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तब्बल १२०० मैल लांबी ही सह्याद्रीची रांग भारताच्या पश्चिम किनाऱ्याला चिटकून जरी असली तरी ही रांग समुद्रात कोठेही शिरलेली आपल्याला आढळत नाही. तापी नदी पासून पालघाटापर्यंत सह्याद्रीच्या एकसलग रांगेची लांबी जवळपास सुमारे ८०० मैल आहे. महाराष्ट्रातील सह्याद्रीचे सर्वात उंच शिखर म्हणजे ' कळसूबाई ' या शिखराची उंची जवळपास ५४०० फुट आहे.

भौगोलिक शास्त्रानुसार पहिले असता सह्याद्रीचे दोन भाग पडतात एक भाग म्हणजे सिंधुदुर्गापर्यंतचा प्रदेश आणि दक्षिणेकडील खानापूर पर्यंतचा प्रदेश. यातील सिंधुदुर्गपर्यंत पसरलेल्या प्रदेशातील सह्याद्रीचा प्रस्तर हा कृष्णप्रस्तरांचा असून सह्याद्रीचा दक्षिणेकडील प्रस्तर हा ठिसूळ आहे आणि त्याच्या मातीचा रंग देखील लाल आहे. हा फरक आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात जाणवतो. सातपुडा, सातमाळ, बालाघाट, आणि महादेव या महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या मुख्य शाखा आहेत. सह्याद्रीच्या डोंगररांगांची रचना पाहिली असता सह्याद्री आणि सातपुडा हे पर्वत एकमेकांशी काटकोनात जोडलेले आहेत. सह्याद्री आणि सातपुडा यांचा गाभा एकच आहे. ज्वालामुखीच्या तप्त रसातून तयार झालेल्या खडकांना ' ट्रॅॅप रॉक ' म्हणजेच कृष्णप्रस्तर म्हणतात. हे सगळे थर एकावर एक बसून थंड झाले असता जो प्रदेश तयार होतो त्या प्रदेशाला  ' ट्रॅॅप रिजन ' म्हणजेच  कृष्णप्रस्तर प्रदेश म्हणतात. महाराष्ट्रातील संपूर्ण पठारांची निर्मिती ही या कृष्णप्रस्तर खडकांनी झाली.

सह्याद्री मध्ये बेलाग किल्ले उभारले गेले ते या डोंगराच्या साहाय्याने.

'सातपुडा पर्वत' हा सहयाद्रीच्या मुख्य भागापैकी एक आहे. 'सह्याद्री' आणि 'सातपुडा' यांच्या काटकोनातील संलग्न भौगोलिक अवस्थेमुळे सातपुडा डोंगररांगेमध्ये जे किल्ले उभारले गेले त्यांचे महत्व आपल्याला समजून घेणे देखील महत्वाचे ठरते. 'नाशिक' जिल्ह्यातील वायव्य दिशेने 'सातमाळ डोंगर' रांगेचा प्रारंभ होतो. या सातमाळा शाखेतील 'चांदूर' शाखा ही 'हातगड' किल्यापासून 'मनमाड' पर्यंत सलग पसरलेली आहे. या परिसरात एकाहून एक सरस असे बेलाग डोंगरी किल्ले उभारण्यात आले. सातमाळा डोंगर रांगेतील सर्वोच्च शिखर म्हणजे डोंगरभटक्यांना आपल्या वैशिष्ट्यपूर्ण डाईक आणि शेंडीने खुणावणारा 'धोडप किल्याचे' शिखर या शिखराची उंची ही ४८२९ फुट असून या सातमाळा डोंगररांगेमध्ये साडे तीन शक्ती पीठांपैकी एक महत्वाचे अर्धे शक्तीपीठ ' सप्तश्रुंग देवीचे ' स्थान आहे तसेच हातगड, अचला, अहिवंत, मार्कंडेय, रवळया-जवळ्या, धोडप, कांचना- मंचना यांसारखे बेलाग आणि अभेद्य डोंगरी किल्ले उभारलेले आहेत. चांदूर येथील प्राचीन किल्ला देखील या रांगेत येतो. मनमाडच्या पलीकडच्या बाजूने सातमाळा डोंगररांगेची अजंठा शाखा पसरलेली आपल्याला पहायला मिळते. यातील एक शाखा कन्नड येथून बुलढाणा पर्यंत पसरलेली आपल्याला बघायला मिळते आणि दुसरी शाखा ही देवगिरी आणि सिंदखेड येथून परभणीपर्यंत पसरलेली दिसते.

यातील पहिल्या रांगेत सह्याद्रीच्या पोटात जगप्रसिद्ध अजिंठा लेण्याचा सुंदर अलंकार कोरलेला आहे तर दुसऱ्या रांगेत साक्षात कैलास म्हणजेच वेरूळचे सुंदर कातळशिल्प कोरलेले आपल्याला बघायला मिळते. पहिल्या रांगेतील अजिंठाच्या लेण्यामध्ये बौद्ध धर्माचा चित्रपट आपल्या डोळ्यासमोर उभा केलेला आपल्याला मिळतो तर दुसऱ्या रांगेत वेरुळच्या लेण्यातील साक्षात कैलास मंदिर डोळे दिपवून टाकते.

सह्याद्रीच्या डोंगररांगा. 

हरिश्चंद्रगडापासून पश्चिमेकडे विस्तारलेली सह्याद्रीची शाखा अकोले (नेरे) येथून पठारात विलीन होते आणि जेऊर येथे परत डोके वर काढते. तसेच अजून एक शाखा ही बेदर येथून सुरु होऊन थेट गुलबर्ग्यापर्यंत जाते ह्या शाखेमध्ये साडेतीन शक्तीपीठांपैकी एक शक्तीपीठ तुळजापूरची तुळजाभवानी वसली आहे तर समस्त कोकणस्थ ब्राम्हणांची कुलदेवता आंबेजोगाई देखील निवास करून आहे. ह्या संपूर्ण रांगेला बालाघाट डोंगररांग असे म्हणतात. रायरेश्वर पासून शिखर शिंगणापूरपर्यंत ज्या डोंगररांगेचा विस्तार झालेला आहे ती डोंगररांग महादेव डोंगररांग म्हणून ओळखली जाते.

महाराष्ट्राचे हवामान हे संपूर्ण सह्याद्रीवर अवलंबून असल्याचे आपल्याला दिसते. यामध्ये महाबळेश्वर आणि ताम्हिणी येथे सर्वात जास्त पाऊस पडतो. परंतु सध्याच्या शहरीकरण आणि जंगलतोडीमुळे या भागांमध्ये देखील पावसाचे प्रमाण घटले आहे. बागलाण आणि त्याच्या आजूबाजूला पर्जन्याचे प्रमाण कमी आहे. कोकणात हे प्रमाण थोड्या प्रमाणात अधिक दिसते. सह्याद्रीचे कडे हे कोकणभागात तुटलेले आहेत हे कडे पहिल्यांदा पाहणाऱ्याला जास्त भयावह वाटतात या तुटलेल्या कड्यांना ' ढाळ ' जास्त आहे यामुळे कोकणामध्ये लांब,रुंद, नद्या नाहीत. या नद्यांची लांबी जी वाढते ती फक्त वळणावळणाने आणि यामुळे समुद्राच्या मुखांजवळ रुंदी वाढते ती होणाऱ्या खाड्यांमुळे. कोकणातील नद्या या पावसाळ्यात अति रौद्ररूप धारण करतात परंतु इतरवेळेस त्यांना पाणी देखील नसते.

घाटमाथ्याची रचना ही कोकणापासून तुटक असली तरी त्याच्यावर कोकणाची  छटा कायम दिसते.

सह्याद्रीमुळे महाराष्ट्राची नैसर्गिक विभागणी झाली आपल्याला पहायला मिळते. 'कोकण' व 'देश' हा एक भाग  आणि 'मावळ' व 'नेरे' हा दुसरा भाग. महाराष्ट्राचा एक संपूर्ण भाग हा सह्याद्रीच्या नेतृत्वाखाली आहे तर वरच्या बाजूस दुसरा भाग हा सातपुड्याच्या. घाटमाथ्याची रचना ही कोकणापासून तुटक असली तरी त्याच्यावर कोकणाची  छटा कायम दिसते आणि मावळाची छटा ही देशावर दिसून येते. ' मावळ ' म्हणजे देशाच्या मावळतीला म्हणजे पश्चिमेला असलेला प्रदेश म्हणजेच मावळतीकडे असणारी नद्यांची खोरी. तसेच 'नेर' म्हणजे 'नहर' किंवा 'पाण्याचा प्रवाह'. सह्याद्रीच्या घाटमाथ्याचा पूर्वेकडील प्रदेश ज्या प्रदेशातून नद्या वाहतात तसेच मुबलक प्रमाणात पाऊस पडतो आणि विपुल प्रमाणात तांदूळ पिकवला जातो त्या भागाला ' मावळ किंवा नेरे ' असे म्हणतात. अश्या पद्धतीत 'मावळ' आणि 'नेरे' यांची व्युत्पत्ती झालेली आहे.

महाराष्ट्राची जडण-घडण ही सह्याद्रीने केलेली आहे.

सह्याद्रीने महाराष्ट्राची उत्पत्ती केलेली आहे एवढेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची जडण-घडण ही सह्याद्रीने केलेली आहे. हा सह्याद्री बाहेरून दिसायला जरी खडबडीत असला तरी आतून एकदम सौम्य आणि निर्जल आणि वत्सल आहे. म्हणूनच आपल्या सर्वांना हा सह्याद्री प्रिय आहे तसेच पवित्र आहे. म्हणून सह्याद्री हा संपूर्ण भारतातातील सगळ्या पर्वतांमध्ये अद्वितीय आणि अनोखा आहे. म्हणूनच सह्याद्रीतील गड-किल्ले हे सह्याद्रीच्या स्वातंत्र्यप्रेरक्तेचे पुजन आहे. तर सह्याद्रीमधील लेणी ही महाराष्ट्राच्या संस्कृतीची प्रतिक आहेत. गड-किल्ले आणि सह्याद्रीतील अलंकृत लेणी यांचे दर्शन घेणे म्हणजे सह्याद्री आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीची एकप्रकारे पुजा  करण्यासारखे आहे. अश्या प्रकारे आपल्याला महाराष्ट्राची आणि सह्याद्रीची भौगोलिक रचना पहाणे गरजेचे असते यातून आपल्याला नवीन गोष्टी कळतात महाराष्ट्र देश समजवायला मदत होते हेच आपल्याला गड-किल्ले भटकंती करताना मदतीचे असते म्हणूनच आपल्याला महाराष्ट्राची आणि सह्याद्रीची भौगोलिक रचना समजून घेणे उपयुक्त ठरते.

गड-किल्ले समजून घेताना महाराष्ट्राची आणि सह्याद्रीची भौगोलिक रचना समजून घेणे उपयुक्त ठरते.
______________________________________________________________________________________________

महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात.

४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.

_________________________________________________________________________________________

लिखाण आणि छायाचित्रे © २०१६ महाराष्ट्राची शोधयात्रा


2 comments:

Thank You For Comment...!!! :)

INSTAGRAM FEED

@maharashtraheritage