प्राचीनतेची साक्ष देणाऱ्या खंबाटकी घाटाची 'खांब टाक्यावरील खामजाई देवी'


सह्याद्रीमध्ये प्राचीनतेची साक्ष देणारी अनेक ठिकाणे दडलेली आहेत. हि सर्व प्राचीनतेची साक्ष देणारी ठिकाणे काही आडवाटांवर वसलेली आहेत तर काही मुख्य महामार्गांवर वसलेली आहेत. महाराष्ट्राच्या प्राचीनतेच्या इतिहासाची साक्ष देणारे एक ठिकाण वसलेले आहेत प्रत्यक्ष खंबाटकी घाटामध्ये. आता हा विचार कराल की खंबाटकी घाटामध्ये कोणते असे ठिकाण आहे कारण हा खंबाटकी घाट म्हणजे मुंबई-बंगळूर(बेंगलोर) हमरस्त्यावरील प्रमुख घाट.

खंबाटकी घाटाच्या मध्यावर घाटदेवता 'खामजाई देवीचे' छोटेसे मंदिर आहे या मंदिराकडे जाताना येताना जास्त कोणाचे लक्ष देखील जात नाही हे 'खामजाई देवीचे' मंदिर ज्या ठिकाणी बांधलेले आहे ते दुसरे तिसरे काहीही नसून खंबाटकी घाटाची प्राचीनतेची साक्ष देणारे सुंदर 'खांब टाके' आहे. महाराष्ट्रामध्ये देशावरून कोकणात जाण्यासाठी या सर्व प्राचीन घाटवाटांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असे त्या प्राचीनतेची साक्ष देत असलेला एक पुरातन घाट म्हणजे खंबाटकी घाट.


या खंबाटकी घाटाचे पूर्वीचे नाव हे पारगाव खंडाळा या पायथ्याच्या नावामुळे खंडाळा घाट असे होते. या घाटाच्या मध्यावर असलेल्या खांब टाक्यांंमुळे हा घाट खंबाटकी घाट म्हणून ओळखला जाऊ लागला 'खांबटाकी घाट' या नावाचा अपभ्रंश होऊन खंबाटकी घाट असे नामकरण झाले आणि खंबाटकी घाट हे नाव सर्वश्रुत झाले. उत्तर आणि दक्षिण भारत जोडणारा हा एक प्रमुख प्राचीन घाटमार्ग आहे. तसेच खंबाटकी घाटाच्या आजूबाजूस असणाऱ्या शिरवळ आणि पारगाव खंडाळा येथील लेण्या यामुळे या घाटाचे महत्व भरपूर असावे असे दिसून येते.

खंबाटकी घाटाच्या अलीकडे यादव कालीन पाणपोई आहे तिचा आणि या घाटाचा संबंध जुळून येतो कारण त्या पाणपोई नंतर खंबाटकी घाटामध्ये ही पाण्याची टाकी आहेत हे आपल्याला दिसून येते. ही खांब टाकी कोणी कोणत्या काळात खोदली हे मात्र ठामपणे सांगता येत नाही. थोडासा ऐतिहासिक शोध घेतला असता इ.स.वी. १८ व्या शतकात पेशव्यांच्या काळामध्ये या घाटाचे महत्व खूप होते हे दिसून येते राबता मोठ्या प्रमाणात होता तेव्हा या घाटामध्ये असलेल्या खांबटाक्यांवर पेशव्यांचे गुरु 'ब्रम्हेंद्र स्वामी' यांनी त्याकाळामध्ये ४५ हजार रुपये खर्च करून या प्राचीन टाक्यांची डागडुजी केली याचा संदर्भ धावडशी येथे जी  'ब्रम्हेंद्र स्वामी' यांची समाधी आहे. तेथे फलकावर देखील याबाबत सविस्तर लिहिलेले आहे.


कोल्हापुरला जाणाऱ्या बहुतांश गाड्या याठिकाणी  देवीच्या दर्शनासाठी थांबतात या प्राचीन टाक्यांमधील सुंदर आणि निर्मळ पाणी प्राचीन काळापासून आजही येणाऱ्या पांथस्थांंची तहान भागवत आहे. येणारे पांथस्थ हे आजही या खांबटाक्यामध्ये पैसे टाकतात मात्र लवकरच ही ऐतिहासिक खांबटाकी काळाच्या आड होणार आहेत कारण रस्ता रुंदीकरणामुळे ही पाणटाकी नष्ट करत असून घाटामधील एका महत्वपूर्ण ऐतिहासिक वारश्याला आपण लवकरच मुकणार आहोत हे या रस्ता रुंदिकरणाने साध्य होणार आहे.

अश्या या ऐतिहासिक वारश्याला आपण लवकरच मुकत आहोत. प्राचीन काळापासून प्रवाशांची तहान भागवणारी ही सुंदर टाकीमात्र लवकरच काळाच्या पडद्याआड होणार आहेत त्यामुळे भविष्यात प्रगतीच्या दिशेने आपण आपला ऐतिहासिक वारसा नष्ट करणार कि आपली ऐतिहासिकता पुसणार हा प्रश्न मात्र ही खांबटाकी पाहताना पडतो.


______________________________________________________________________________________________

संदर्भग्रंथ:-
१) सातारा गॅझेटीयर.
२) मध्ययुगीन कालखंड- महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक महामंडळ.
______________________________________________________________________________________________

कसे जाल:-

पुणे - नसरापूर - शिरवळ - खंबाटकी घाट.
______________________________________________________________________________________________

महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात. 

लिखाण आणि छायाचित्रे  © २०१६ महाराष्ट्राची शोधयात्रा
      

Comments

  1. खंभ राजामुळे नाव खंबाटकी , ह्या मंदिरात भाविकांसाठी पूर्वी ची पायरी वाट आहे. तसेच महामार्ग लगत पारगाव जवळ भिमाशंकर मंदिर पुरातन मंदिर आहे. मांढरदेवी मंदिर जवळपास आहे.

    ReplyDelete

Post a Comment

Thank You For Comment...!!! :)

Popular posts from this blog

पुण्यामधील नारायण पेठेमध्ये असलेले अपरिचित 'शेषशायी विष्णू मंदिर'

पुणे शहर आणि आजूबाजूच्या परिसरातील शेक्सपिअर यांनी काढलेली '१९१५ मधील छायाचित्रे'

पुणे शहराच्या विस्मृतीमध्ये गेलेला 'किल्ले हिस्सार किंवा पांढरीचा कोट'