सफर पुणे शहरातील 'वारसा स्थळांची'


आज 'जागतिक वारसा दिवस' हा दिवस साजरा केला जातो तो जगातील महत्वाच्या आणि जुन्या स्थळांसाठी. या स्थळांमध्ये आपल्याला फार मोठी विविधता आढळून येते. प्राचीन काळातील स्थळे तसेच जगातील भौगोलिक आश्चर्याचा वारसा जपणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश. अशीच काही वारसास्थळे हि पुणे शहरामध्ये लपलेली आहेत. पुण्यातील काही वारसा हा प्राचीन आहे तर काही मध्ययुगीन आहे. वेगवेगळ्या कालखंडात घडवलेल्या या कलाकृती आजही पुण्याच्या जडणघडणीमधील त्यांचा वाटा मूकपणे इतिहासाच्या साक्षीदार बनून पर्यटकांना आपल्या अवशेषांंमधून दर्शवत आहेत. पुण्यातील वाढते शहरीकरण यामुळे हे इतिहासाचे मूक साक्षीदार आज पुण्यातील विविध जागांमध्ये आपल्या अस्तित्वाच्या खुणावत उभ्या आहेत.

मेट्रो सिटी झालेल्या या पुण्यामध्ये इतिहासाच्या काही पाऊलखुणा या मुळा, मुठा, आणि नाग या नद्यांच्या संगमावर आजही आपली आठवण करून देत उभ्या आहेत. या त्रिवेणी संगमावर ‘पुण्यक’ नावाचे प्राचीन तीर्थ होते. काळाच्या ओघात ‘पुण्यक’ या नावाचे ‘पुनवडी’ असे नाव झाले आणि याच ‘पुनवडी’ चे पुढे आजचे ‘मेट्रो सिटी आणि स्मार्ट सिटी’ बनलेले ‘पुणे’ शहर झाले. असा हा प्राचीन इतिहास लाभलेले पुणे शहर आजही या इतिहासाच्या पाउलखुणा सांभाळत उभे आहे. अश्याच काही पुण्यातील 'ऐतिहासिक वारसा स्थळांचा' घेतलेला हा मागोवा या पुण्यातील सफरी मधून घेणार आहोत.

जुना काळभैरवनाथ मंदिर:-

पुणे शहराच्या भरवस्तीत वसलेले हे मंदिर आपल्या प्राचीनतेची साक्ष हि या मंदिराती काळभैरवाच्या मूर्तीमधून देत आहे साधारण पणे हि मूर्ती १० व्या ते ११ व्या शतकात घडवलेली असून हि मूर्ती काळ्या पाषाणात एकसंध कोरलेली दिसते. अत्यंत सुबक असलेल्या या मूर्तीमध्ये काळभैरवनाथाच्या हातामधील प्रत्येक शस्त्र आपल्यालाह्याला मिळते. या मंदिराच्या आवारामध्ये दोन प्राचीन मूर्तींचे अवशेष आजही ठेवलेले आपल्याला बघायला मिळतात. कदाचित ते मंदिराचे अवशेष असावेत असे वाटते. छोटेखानी असलेले हे जुने काळभैरव मंदिर हे पुण्याचे एकेकाळचे ग्रामदैवत होते असे काही उल्लेख सापडतात. कसबा पेठेतील 'जुना काळ भैरवनाथ' या मंदिराच्या उत्सवातील मंदिराच्या पालखी सीमोल्लंघनासाठी दसऱ्याला व वार्षिक उत्सव असणाऱ्या चैत्री पौर्णिमेला जुन्या जिल्हा परिषदे शेजारी असलेल्या बोलाई या देवीच्या दर्शनास आणण्यात येतात. या काळ भैरवनाथाला भेट द्यायची असल्यास  कमला नेहरू हॉस्पीटल येथून मागे कागदीपुरा येथे रस्ता जातो त्याच रस्त्यावर एक नळकोंडे लागते तेथून उजवीकडे गेले असता हे प्राचीन मूर्तीचे साक्ष देणारे 'काळभैरवनाथ मंदिर' पाहायला मिळते.

जुना काळभैरवनाथ मंदिर कसबा पेठ.

पर्वतीच्या कुशीतील लेणे:-

पुणेकरांच्या लाडक्या पर्वतीवर लपलेले आहे चक्क एक सुंदर कातळ 'लेणे' ज्यांना हे माहिती आहे ते 'पर्वतीची लेणी' असा त्याचा उल्लेख करतात. पुण्यामध्ये आणि आजूबाजूच्या परिसरात राष्ट्रकुट कालखंडात काही लेण्या खोदल्या गेल्या अश्या या पुण्याचा प्राचीन इतिहास जपणाऱ्या लेण्या पुणे परिसरात बऱ्याच खोदलेल्या आपल्याला बघायला मिळतात. खुद्द पुण्यामध्ये असलेल्या या अपरिचित लेण्या मात्र आज उपेक्षेच्या गर्तेत सापडल्या आहेत. पर्वतीच्या लेण्यांना जर भेट द्यायची असेल तर 'शाहु कॉलेजच्या' मागच्या बाजूने जाऊन किंवा 'पर्वती' येथे जी पाण्याची टाकी जेथे आहे तेथे आपल्याला पोहोचणे जरुरीचे आहे. या पर्वतीच्या पाण्याच्या टाकीजवळ आले असता या पाण्याच्या टाकीच्या खालच्या बाजूस आपल्याला काही खोदकाम केलेले पहावयास मिळते हे खोदकाम म्हणजे दुसरे तिसरे काही नसून पर्वती वरील राष्ट्रकुट काळात खोदली गेलेली लेणी आहे.

पर्वतीची राष्ट्रकुट कालीन लेणी.

बोलाई देवी मंदिर:-

पुणे रेल्वे स्टेशन याठिकाणी सतत वर्दळ चालू असते याच्या समोरील बाजूस जो रस्ता नरपतगीर चौकातून खाली जातो तेथे जुनी जिल्हापरिषद हि बिल्डींग आहे याच्या बरोबर समोर डाव्या बाजूच्या कोपऱ्यात फार पूर्वीपासून बोलाई देवीचे मंदिर वसलेले आहे. इंग्रजांनी जो पुण्याचा नकाशा बनवला तेथे देखील सीमा म्हणून ह्या बोलाई मंदिराची जागा दाखवलेली आपल्याला बघायला मिळते. वाडे बोलाई हे नगर रस्त्यावरील प्रसिद्ध स्थान या ठिकाणची बोलाई देवी आणि हि पुण्यातली बोलाई देवी एकच असे मानतात मंदिर छोटेखानी असून आतमध्ये देवी तांदळा स्वरुपात आहे. सध्या देवीच्या येथे मुखवटा देखील बसवला आहे मंदिराच्या  बाहेरील बाजूस सिंह आहे. पूर्वी या बोलाई मंदिरामागे तळे होते आता हे तळे बुजवले असून ससून क्वार्टर त्याच्यावर वसवलेले आहे. इंग्रजांच्या काळात लष्कर विभागास पाणी उपलब्ध व्हावे म्हणून इंग्रजांनी बोलाई मंदिरामागील व गारपीरामागील तळे खोदले. तसेच हे तळे रुंद केल्याच्या देखील नोंदी आपल्याला सापडतात. या नोंदींमध्ये बोलाई मंदिराचा उल्लेख आढळतो. हे मंदिर त्याही पूर्वीचे आहे.

   बोलाई देवीचा मुखवटा.


पुणे आणि परीसरामध्ये इतिहासाच्या बऱ्याच पाउलखुणा लपलेल्या आहेत. या पाउलखुणांचा मागोवा घेताना आपल्याला खूप गोष्टी पाहायला मिळतात.बऱ्याचदा असेही होते कि या इतिहासाच्या  पाउलखुणा आपल्याजवळ असून देखील त्या माहिती नसतात किंवा आपले त्या ठिकाणी जाणे होत नाही त्यापैकीच बाणेर येथील 'बाणेश्वरचे गुंफा मंदिर' किंवा 'बाणेश्वरची लेणी' हे ठिकाण होय. बाणेर ची हि लेणी वसलेली आहे खुद्द 'बाणेर' या मूळ गावठाणात. बाणेर गावामध्ये आल्यावर आपल्याला उजव्या बाजूला एक टेकडी दिसते या टेकडीवर जिथे सध्या नव्याने बांधलेल्या 'तुकाईदेवी' मंदिराच्या टेकडीच्या मधल्या भागात काही लेण्या खोदलेल्या आहेत. हेच ते बाणेर येथील. 'बाणेश्वरचे लेणे'.


प्राचीन नागेश्वर:-

पुण्याच्या भरवस्तीमध्ये २६० सोमवार पेठेमध्ये आपल्या प्राचीनतेचा दाखला देत 'नागेश्वर मंदिर' आजही दिमाखात उभे आहे. १३ व्या शतकातील कलाकुसर दर्शवणारे हे मंदिर शहराच्या मध्यवर्ती भागात असून देखील फारसे प्रसिद्ध नाही. तटबंदीच्या आतमध्ये असलेले हे मंदिर आणि त्यावर असलेली कलाकुसर मनाला नक्कीच भुरळ पाडते. वेगळ्या धाटणीचा कळस आणि वेगळ्या रचनेची कलाकुसर असलेला मंदिराचा गाभारा हि या मंदिराची वैशिष्ट्ये अधिक खुलवतात. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांनी देखील या मंदिराचे उल्लेख केलेले आहेत.असे हे सुंदर रेखीव मंदिर आत्ता जीर्णोद्धार केला असल्याने त्याचे सौंदर्य अधिक खुलून दिसायला लागले आहे. अश्या या प्राचीन मंदिराला भटकंती एक वेगळीच मजा देऊन जाते.

  नागेश्वर मंदिराची कोरीव कमान.

लेणी मध्ये बसलेला तारकेश्वर:-

पुण्यामध्ये जशी पाताळेश्वर, पर्वती, बाणेश्वर यांची लेणी आहे तशीच एक लेणी पुणे शहरातील येरवडा जवळ टेकडी मध्ये खोदली गेली या लेणी मध्ये काही कालांतरापूर्वी तारकेश्वराचे शिवलिंग स्थापन झाले हेच ठिकाण आज तारकेश्वर टेकडी म्हणून ओळखले जाते. तारकेश्वर मंदिराचा गाभारा आणी त्याच्या भिंती लेण्याचे स्वरूप स्पष्ट करतात. हे तारकेश्वर लेणे हे देखील पाताळेश्वर, बाणेश्वर, पर्वती यांच्या समकालीन असावे. अश्या या लेणी मंदिराला नक्की भेट द्यावी. 

तारकेश्वर मंदिरातील शिवलिंग 

कलात्मक त्रिशुंड गणपती मंदिर:-

महाराष्ट्रामध्ये अनेक सुंदर सुंदर मंदिरे आहेत. या मंदिरांच्या प्रदेशात अनेक लहानमोठ्या गावांमध्ये असलेली प्राचीन मंदिर ही महाराष्ट्राचे वेगळेपण दर्शवतात. अश्याच जुन्या मंदिरांपैकी एक सुंदर शिल्पांनी अलंकृत असलेले एक सुंदर मंदिर पुणे शहराच्या सोमवार पेठेत वसलेले आहे. कोरीव काम असणारे आणि १७ व्या शतकाची ओळख जपणारे एक ऐतिहासिक 'त्रिशुंड गणपती' मंदिर एका वेगळ्याच जगात आपल्याला घेऊन जाते. त्रिशुंड गणपती मंदिर हे पुण्यात राहूनही बऱ्याचश्या लोकांना आजही परिचित नाही. उत्तर पेशवाई मधील हे सुंदर मंदिर म्हणजे जणू शिल्पांचा खजिनाच. मंदिराच्या बाह्यांगावर कोरलेली हि अलंकृत शिल्पे आणि वैशिष्ट्यपूर्ण तीन सोंडा असलेली गणेश मूर्ती आपले डोळे दिपवून टाकतात. जणू काही आपण एखादे सुंदर लेणे बघत आहोत कि काय असा आपल्याला भास होतो इतक्या सुंदर पद्धतीमध्ये त्रिशुंड गणपती मंदिराच्या बाहेरील प्रवेशद्वार अलंकृत केलेले आहे.

मंदिराच्या गाभाऱ्यात असलेली गणेश मूर्ती अत्यंत सुंदर आहे ह्या मूर्तीचे वैशिष्ट्य  म्हणजे या गणेशमूर्तीला एक मुख, तीन सोंडा, सहा हात आणि मोरावर आरूढ असलेली हि सुंदर मूर्ती नेत्रदीपक आहे. हि मूर्ती संपूर्ण शेंदुर्चर्चीत आहे या मूर्तीमध्ये शेजारी रिद्धी देखील बसलेली दाखवली आहे. या गणेशमूर्तीला तीन सोंडा दाखवल्या असून एक सोंड हि मोदकपात्रास स्पर्श करताना दिसते, दुसरी सोंड हि पोटावर रुळताना दिसते तिसरी सोंड हि रिद्धीच्या हनुवटीवर आहे असे आपल्याला दिसून येते. या सुबक गणेशमूर्तीस सहा हात असून वरच्या बाजूच्या डाव्या हातात परशु धरलेला आपल्याला दिसतो, खालच्या उजव्या हाताकडे पाहिले असता मोदकपात्र धरलेले आपल्या पहावयास मिळते, मधल्या उजव्या हातामध्ये शूल बघायला मिळते, वरच्या उजव्या हातामध्ये अंकुश बघायला मिळतो, मधल्या डाव्या हातामध्ये पाश बघायला मिळतो, तसेच खालचा डाव्या हाताने डाव्या बाजूच्या मांडीवर बसलेल्या रिद्धीला आधार दिलेला आपल्याला पहावयास मिळतो. अशी हि सुंदर गणेशमूर्ती अक्षरशः भुरळ पाडते.

सोमवार पेठेत वसलेले कोरीव त्रिशुंड मंदिर.

पाताळेश्वराचे कातळ लेणे:-

जंगली महाराज रस्त्यावर असलेले हे 'पाताळेश्वर लेणे' म्हणजे कलाकुसरीचा उत्तम नमुना. येथील नंदीमंडप बघण्यासारखा आहे नेत्रदीपक असलेला हा नंदीमंडप आपले डोळे नक्कीच दिपवतो. पुणे शहराच्या वारसा यादीमध्ये हे ठिकाण आहे. साधारण आठव्या शतकात खोदलेले हे 'कातळलेणे' पर्यटकांना नक्कीच भुरळ पाडते. शहरातील प्राचीन अवशेष दर्शवणारे हे महत्वाचे ठिकाण. पुणे शहरातील एक महत्वाचा वारसा म्हणून पाताळेश्वर पुण्याची एक वेगळी ओळख नक्की करून देते.  

पाताळेश्वरचे कातळलेणे.

घाशीराम कोतवाल वाडा:-

पुणे शहरातील कँप या भागातून हडपसर कडे जाताना  पुलगेट हे ठिकाण लागते याच्या बरोबर डाव्या बाजूस एक रस्ता आपल्याला पेशवाई मधील प्रसिद्ध कोतवाल 'घाशीराम सावळदास' यांचा वाडा आजही चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला बघायला मिळतो. या वाड्याच्या खिडक्यांवर असलेले कोरीव काम नक्कीच नजरेत भरण्यासारखे आहे. असा हा सुंदर वाडा हडपसरला जात असताना आपल्याला बघायला मिळतो. ह्या वाड्याबद्दल तेथे पाटी देखील लावली आहे परंतु हि पाटी कोणाच्या लक्षात देखील येत नाही त्यामुळे हि वास्तू आजही दुर्लक्षित आहे. अश्या या सुंदर वाड्यासाठी वाट नक्की वाकडी करावी.   

   घाशीराम कोतवाल यांच्या वाड्याची रेखीव खिडकी.

कसबा गणपती:-

पुणे शहराचे ग्रामदैवत असलेले कसबा गणपती मंदिर सर्वाना परिचित आहेच परंतु हे मंदिर जास्त खुणावते ते त्याच्या मूर्तीमुळे आणि हेमाडपंथी धाटणीमुळे. कसबा गणपती हा आपल्याला अनघड तांदळा रुपात बघावयास मिळतो. मंदिराच्या आतील खांब आणि गाभारा वैशिष्ट्यपूर्ण आहेत. शिवाजी महाराजांनी या गणपतीची स्थापना केली. असे हे ग्रामदैवताचे मंदिर नक्कीच भेट देण्यासारखे आहे.

कसबा गणपती मंदिर.

नाना वाडा:-

पुण्याच्या भरवस्तीमध्ये बांधलेला नाना वाडा नक्की बघण्यासारखा आहे. नुकताच नूतनीकरण झाल्यामुळे या वाड्याची शोभा अजून वाढली आहे. आतमध्ये असलेली १७ व्या शतकातली कलाकुसर नक्कीच आपल्याला भुरळ पाडते. नाना वाड्यामधील छटावर असलेली कलाकुसर आपल्याला आवक करून सोडते. अश्या या सुंदर ऐतिहासिक वास्तूला भेट देणे नक्कीच एक वेगळा अनुभव देते. १७८० साली बांधलेला हा वाडा पुण्यातील एक महत्वाचा वारसा नक्कीच आहे.

नाना वाड्यामधील रचना.

सरदार रास्ते वाडा:-

सरदार रास्ते वाडा हा वाडा रास्ता पेठेमध्ये अपोलो थियेटर समोर वसलेला असून अप्रतिम संरचना या वाड्याची आपल्याला बघायला मिळते. सरदार रास्ते यांचा हा वाडा असून पुण्यातील पहिली मुलींची शाळा या वाड्यामध्ये सुरु झाली. हा वाडा खूप मोठा असून या वाड्यामधील देवघर आणि रास्ते यांचे दत्त मंदिर बघण्यासारखे आहे. या वाड्यामधील दरवाजे हे विशेष कलाकुसर केलेले असून वाड्यामधील नक्षीकाम विशेष भावते.

सरदार रस्ते वाडा.

पर्वती:-

पर्वती सर्वाना माहिती नाही असे कोणीच नाही. पेशवाई मध्ये पर्वती आणि शनिवार वाडा हे एक समीकरण झाले होते. पर्वती वरील मंदिरे आणि आजूबाजूची हिरवाई नेहमीच लोकांना आकर्षित करत आली आहे. पर्वती वर असलेले संग्रहालय हे देखील पाहण्यासारखे आहे. अशी हि पर्वती पुणेकर आणि इतर पर्यटकांना कायमच भुरळ घालते. 

पर्यटकांना नेहमीच भुरळ घालणारी पर्वती.

भारत इतिहास संशोधक मंडळ, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था, केळकर संग्रहालय, आगाखान पॅलेस, वासुदेव बळवंत फडके स्मारक, विश्रामबागवाडा, सरदार शितोळे वाडा, मुजुमदार वाडा, घोरपडे घाट अश्या अनेक प्राचीन आणि मध्ययुगीन वास्तू आजही पुणे शहरामध्ये असून त्या सर्व जपणे गरजेचे आहे. या इतिहासाच्या पाउलखुणा जपणे आणि त्यांचे जतन करून एका नव्या पिढीला याबाबतीत माहिती देणे हे या आपल्या अमुल्य वारसा स्थळांमधून नक्कीच अभ्यासाला मिळते. असा हा पुण्यातील वारसा बघायचा असेल तर नक्कीच दोन दिवसाची सवड काढावी आणि या आपल्या इतिहासाच्या पाउलखुणांकडे आपली पावले वळवावीत.
________________________________________________________________________________________________

कसे जाल:-

पुणे (शिवाजीनगर, स्वारगेट, पुणे स्टेशन) 

______________________________________________________________________________________________

महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात.

४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.

_________________________________________________________________________________________

लिखाण आणि छायाचित्रे © २०१७ महाराष्ट्राची शोधयात्रा


No comments:

Post a Comment

Thank You For Comment...!!! :)

INSTAGRAM FEED

@maharashtraheritage