मुशाफिरी पावसाळ्यातील 'चिंब वाटांची'


पावसाळा हा ऋतू प्रत्येकाला हवाहवासा वाटत असतो. पावसाळा सुरु झाला कि आजूबाजूचा निसर्ग देखील हिरवागार होतो आणि अश्या या सुंदर वातावरणात डोंगरभटक्यांना वेध लागतात ते डोंगरयात्रांचे. या डोंगरयात्रेमध्ये दिसणारे निसर्गाचे रूप मात्र डोळ्यात साठवण्यासारखे असते. डोंगर यात्रांमध्ये फक्त किल्लेच नव्हे तर लेणी मंदिरे यांची सफर देखील एक वेगळीच मजा आपल्याला देऊन जाते. अश्या या साद घालणाऱ्या चिंब वाटा कोणाला हव्याहव्याश्या नाही वाटत. या चिंब वाटांवर फिरण्याची एक वेगळीच मजा पावसाळ्यात येते. मग अश्या वेळेस बरेचसे लोकं वेगवेगळी ठिकाणे इंटरनेटच्या माध्यमातून शोधायला लागतात. बऱ्याचदा असेही दिसून येते कि पावसाळा सुरु झाला आहे आता मस्त मजा करा यासाठी अनेक लोकांचा कल हा आजकाल किल्यांकडे मोठ्या झपाट्याने वाढलेला आहे त्यामुळे एखादा 'वीक एन्ड' जवळ आला कि लोकांची किल्यांवर जायला रीघ लागते मग त्यामध्ये लोहगड, हरिहर, पेब असे बरेचसे जे किल्ले आहेत तिथे लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते आणि मग एखादा अपघात होतो.

या गोष्टी टाळण्यासाठी सुरक्षित भटकंती हि नक्कीच करावी. आपल्या महाराष्ट्रात फक्त किल्लेच नाहीत तर मंदिरे, लेणी, भौगोलिक ठिकाणे तसेच काही संग्रहालये या देखील गोष्टी आहेत. 'वीक एन्डची' ठिकाणे बघताना 'डोळे उघडे ठेऊन भटकंती' नक्की करावी याने आपल्याला अनेक गोष्टींची माहिती मिळते आणि आपली भटकंती हि आनंददायक होते. चला तर मग अश्याच काही 'वीक एन्ड' मध्ये भटकंती साठीच्या काही सुंदर जागांचा आस्वाद आपण  घेऊयात आणि सुरक्षित व अभ्यासपूर्ण भटकंतीचा अनुभव घेऊयात.

पोखरबेळ येथील लेणी:-

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विविध कालखंडात वेगवेगळ्या लेण्या खोदल्या गेल्या अश्या लेण्यांपैकी एक सुंदर आणि छोटीशी लेणी हि खोदली गेली ती पुरंदर किल्याच्या जवळ अगदी समोरील बाजूस असलेली हि लेणी फारशी परिचित देखील नाही. या लेणी ला जायला पोखर गावातून अगदी पाच मिनिटे लागतात आणि आपण समोर येतो ते एका लेणीच्या पोखरून काढलेल्या गुहेच्या समोर. हि लेणी किती खोल आहेत याचा पहिला आपल्याला अंदाज लागत नाही परंतु ज्यावेळेस आपण या लेणीच्या आतमध्ये शिरतो तेव्हा जे काय दृश्य बघतो ते नक्कीच विस्मयकारक असते. या लेणी मध्ये चक्क 'सदाशिव' रूपातील मूर्ती कोरलेली असून आपल्याला घारापुरी लेण्यातील प्रसिद्ध शिल्प 'सदाशिव' याची आठवण करून देते. साधारण ८ व्या ते ९ व्या शतकात हे लेणे खोदलेले असावे असा अंदाज आहे. मुख्य लेणीच्या वरच्या बाजूला देखील लेणी खोदायचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो परंतु दगड चांगला नसल्याने तेथे लेणे अर्धवट सोडलेले आहे. सध्या तिथे गावकऱ्यांनी शेंदूर लावून देवतांची स्थापना केलेली आपल्याला दिसते. या लेणी बरोबरच तुम्ही नारायणपूर गावचा नारायणेश्वर आणि एकमुखी दत्ताचे मंदिर पाहू शकता.


जायचे कसे:-
पुणे - नसरापूर - कापूरव्होळ - नारायणपूर - पोखर    

जाईबाईची गुहा:-

पुणे - मुंबई हे अंतर तसे काळाच्या ओघात फारच कमी झाले आहे या नवीन रुजलेल्या 'सेकंड होम' या संस्कृतीमुळे या मुंबई - पुणे महामार्गावर अनेक गावांचा विकास झाला आहे या गावांपैकी एक असलेले गाव म्हणजे 'ओझर्डे' ह्या गावामध्ये कड्यावर 'जाईबाई माता' हिचे ठाणे आहे. ओझर्डे गावाची ग्रामदेवता देखील 'जाईबाई' हिला मानतात. या ओझर्डे गावामधून अगदी डोंगरावर थोडी  चढाई करून गेले कि लेणी सदृश बांधकाम आपल्याला नजरेत पडते तेच हे 'जाईबाई' चे मूळ ठाणे. एखाद्या अर्धवट खोदलेल्या लेणीमध्ये 'जाईबाई' हिची स्थापना झालेली आपल्याला बघायला मिळतो. 'जाईबाई' च्या ठाण्याजवळून पडणारा धबधबा या भागाचे मुख्य आकर्षण आहे. अश्या या सुंदर ठिकाणी नक्कीच भेट द्यायला हवी.


जायचे कसे:-
पुणे - हिंजेवाडी -ओझर्डे.

छोटेखानी पेमगिरी किल्ला:-

इतिहासाची माहिती देत पुणे-अकोले मार्गावर शहाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारा 'पेमगिरी' नावाचा एक छोटेखानी पण सुंदर किल्ला बाळेश्वर डोंगर रांगेत वसलेला आहे. हा किल्ला दिसायला जरी छोटेखानी असला तरी या किल्याच्या साथीने निजामशाही वाचवुन आपले स्वतंत्र असे प्रस्थापित राज्य निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवणाऱ्या शहाजी महाराजांनी जो लढा दिला होता तो या 'पेमगिरी' किल्ल्यावरुनच. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील यांनी स्वराज्य स्थापनेची जी स्वप्न पहिली त्या स्वराज्य स्वप्नातील पहिले पाउल म्हणजे पेमगिरी किल्ला होय. गडाची अधिष्ठात्री ‘श्री पेमाई देवी’ ही गडदेवता पंचक्रोशीचे दैवत असल्यामुळे गावकऱ्यांनी वरपर्यंत व्यवस्थित डांबरी गाडीरस्ता केलेला आहे. गडाच्या वाटेवर ठिकठिकाणी पांढऱ्या रंगानी खुणा केल्या आहेत त्यामुळे कुठेही चुकण्याचा धोका नाही. जसेजसे वर चढत असतो तसे तसे बाळेश्वर डोंगररंगांचे आणि आजूबाजूच्या परिसराचे सुंदर रूप  आपल्याला पाहायला मिळते. असा हा थोडासा आडवाटेवर असलेला किल्ला आपण नक्कीच पाहायला हवा.


जायचे कसे:-
पुणे - संगमनेर - कळस - पेमगिरी.

मुळशीचा कैलासगड:-

मुळशी तालुका म्हणजे पुणे जिल्ह्याचे जणू काश्मीर. या मुळशी तालुक्यात थोडासा आडवाटेवर 'कैलासगड'' नावाचा छोटेखानी सुंदर किल्ला हा मुळशी आणि लोणावळा यांच्या सीमारेषेवर वसलेला आहे. किल्यावर जायला साधारणपणे १ तास खूप होतो किल्याच्या वरच्या बाजूस असलेले पठार आणि अथांग पसरलेले मुळशी धरणाचे दृश्य किल्यावरुन अत्यंत सुंदर दिसते. गडाचा फारसा इतिहासात उल्लेख आढळत जरी नसला तरी गडाचे आकर्षण ठरते ते म्हणजे किल्यावर असलेली खांबटाकी. बहुतेक करून 'कैलासगड' हा किल्ला 'कोराईगडावर' लक्ष ठेवायला किंवा कोराईगडाच्या प्रभावळीमधला किल्ला असावा असा अंदाज येतो. पावसाळ्यात अत्यंत सुंदर असलेल्या या छोटेखानी किल्याला डोळस नजरेने भेट दिली तर नक्कीच काहीतरी गवसल्याचा आनंद होतो.


जायचे कसे:-
पुणे - पौड - मुळशी - वाघवाडी - भादसकोंड - कैलासगड.

अडबळसिद्धनाथ मंदिर:-

पुणे-बंगळूर मुख्यरस्त्यावर जाताना येताना अनेक ठिकाणे आपल्याला बघायला मिळतात. अश्या ठिकाणांपैकी एक ठिकाण भोर फाट्याच्या पुढे गेल्यावर रस्त्यामध्ये पाहायला मिळते ते म्हणजे 'अडबळसिद्धनाथ मंदिर'. हेमाडपंथी असलेले हे मंदिर अगदी मुख्य रस्त्यावर बांधलेले आहे. प्राचीन काळी याठिकाणी नक्कीच एखादे गाव असावे आणि त्याचे हे ग्रामदैवत. अत्यंत सुंदर रचना असलेले हे मंदिर सध्या रंगवलेल्या अवस्थेत आहे फारशी कलाकुसर आपल्याला या मंदिरात पाहायला  मिळत नाही परंतु मंदिराचे खांब यादवकाळातील रचनेचे आहेत हे  त्याच्या खुणांवरून दर्शवतात. असे हे 'अडबळसिद्धनाथ मंदिर' नक्की भेट देण्यासारखी जागा आहे.


जायचे कसे:-
पुणे - नसरापूर - कापूरव्होळ -  अडबळसिद्धनाथ मंदिर.

दुर्योधन मंदिर:-

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील 'दुर्गाव' आपले आगळे वेगळे महत्व आजही वर्षानुवर्षे जपून आहे ते म्हणजे महाभारतातील  एका वैशिष्ट्यपूर्ण गोष्टीमुळे. आता महाभारतातील कोणते वैशिष्ट्य हे गाव सांभाळून आहे असा प्रश्न नक्की पडला असणार तर या गावात चक्क आपल्याला महाभारतातील 'दुर्योधनाचे मंदिर' बघायला मिळते. दुर्योधनाचे हे मंदिर गावाच्या अगदी सीमेला खेटून आहे. तसेच गावातल्या लोकांची दुर्योधनाच्या या मंदिरावर श्रद्धा देखील आहे. दुर्योधनाच्या मंदिराआधी मुख्य मंदिर हे शंकराचे आहे. हे मंदिर दगडी बांधकामात बांधलेले आपल्याला बघायला मिळते. शंकराचे हे मंदिर एका दगडी चौथऱ्यावर बांधलेले आपल्याला बघावयास मिळते. मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केला असता आपल्याला गाभाऱ्याच्या भागात पोकळ कळस बघायला मिळतो आणि याच कळसाच्या आतमध्ये एक पूर्वेच्या बाजूस कोनाडा बांधलेला आपल्याला बघावयास मिळतो या कोनाड्यामध्ये आपल्याला दुर्योधनाची बसलेली मूर्ती बघायला मिळते.  असे एक आगळे वेगळे दुर्गाव चे दुर्योधनाचे मंदिर नक्कीच लक्षवेधक ठरते आणि आपल्या महाराष्ट्राचे वेगळेपण सिद्ध करते.


जायचे कसे:-
पुणे – हडपसर – यवत – पाटस – दौंड – श्रीगोंदा – हिरडगाव – दुर्गाव

घोरावडेश्वरची अग्निजजन्य गुहा:-

तळेगाव पासून जवळ असलेला घोरावडेश्वर डोंगर हा प्रसिद्ध आहे ते त्याच्या प्राचीन लेण्यांमुळे येथील प्राचीन लेणी मानवाच्या अतित्वाच्या पाउलखुणा सांगतात तर येथेच घोरावडेश्वर डोंगरावर  लेण्यांच्यापेक्षा प्राचीन एक गुहा आजही आपले अस्तित्व दाखवून लोकांना खुणावत आहे ती प्राचीन गुहा हि ज्वालामुखीची अग्निजजन्य गुहा आहे. आता ह्या गुहा किंवा हि विवरे बनतात कशी हा प्रश्न पडलाच असेल तर त्यासाठी आपल्याला काही गोष्टी अभ्यासाव्या लागतात. आपले दख्खनचे पठार हे निर्माण होण्यासाठी पृथ्वीच्या पोटातून लाव्हारस बाहेर आला पण तो कधी विशिष्ट मुखांमधून बाहेर पडला. लाव्हारस प्रवाह वाहत असताना आणि थंड होताना एक लांब पोकळी राहते. काही काळानंतर डोंगर उतारावर असलेल्या मातीची धूप होऊन जाते आणि पावसाळ्यात वाहत्या पाण्यामुळे अशी एखादी विवर-गुहा दृष्टीक्षेपात पडू लागते. सह्याद्रीतल्या अग्निजन्य बेसॉल्ट खडकात अशी विवरे मोठ्या प्रमाणात आढळतात. ज्वालामुखीच्या उद्रेकाची मोठी केंद्रे आपल्या महाराष्ट्रात फार कमी ठिकाणी पाहायला मिळतात परंतु लहान लहान केंद्रे खूप डोंगरांवर आणि टेकड्यांवर दिसून येतात. या ज्वालामुखी विवरांबद्दल एकदा आपल्याला माहिती समजली तर ज्वालामुखीचे इतके जुने अवशेष किंवा ज्वालामुखीच्या या गुहा आपल्या भटकंती मध्ये पहिल्याचा नक्कीच आनंद होतो.जायचे कसे:-
पुणे - हिंजेवाडी -घोरावडेश्वर.

ब्रम्हगिरी किंवा त्र्यंबकगड किल्यावरच्या शंकराच्या जटा:-

या शंकराच्या जटा या नाशिक जिल्ह्यातील ‘ब्रम्हगिरी किंवा त्र्यंबकगड’ या किल्यावर आपल्याला बघायला मिळतात. किल्याच्या वर चालत गेले असता आपल्याला ‘जटा शंकर’ मंदिर बघायला मिळते. हे ‘जटा शंकर’ मंदिर जेथे उभारले आहे तेथे शंकराच्या जटांप्रमाणे दिसणारी भूअकृती तयार झाली आहे. हि भूआकृती म्हणजे आपल्या येथील दगडाचे वैशिष्ट्य आहे. भूगर्भीय शास्त्रात याला ‘रोपी स्ट्क्चर’ हे नाव असून ते दगडावर ठेवलेल्या दोरखंडाप्रमाणे दिसते. अशी वैशिष्ट्ये आपल्याला सह्याद्रीमध्ये बर्याच ठिकाणी पाहायला मिळतात. जेव्हा लाव्हारस बाहेर पडतो तेव्हा त्याचा हवेशी संपर्क झाला तर त्याचा वरचा भाग लवकर थंड पडतोलवकर थंड झाल्यामुळे त्याच्या आतील लाव्हारसा इतका हा जोरदार हा भाग पसरत नाही त्यामुळे हा भाग जसा जसा गार पडतो तश्या त्याला वळ्या पडलेल्या आपल्याला बघायला मिळतात. तसेच या थंड झालेल्या रसामुळे आतील लाव्हारसाच्या आतील भाग देखील तेथेच थांबायला लागतो आणि त्याला देखील आतून वळ्या पडतात. आणि या शंकराच्या जटा तयार होतात. अश्या या शंकराच्या जटा त्र्यंबकेश्वर प्रमाणे क्वचितच पुजल्या जातात.जायचे कसे:-
पुणे - संगमनेर - सिन्नर - नाशिक - त्र्यंबकेश्वर.

कोयनेच्या प्रांगणातील 'ओझर्डेचा धबधबा':-

कोयना आणि परिसर मुळातच घनदाट जंगलाने वेढलेला भाग. या भागात आजही आपल्याला विपुल प्रमाणात वनसंपत्ती मोठ्या प्रमाणात दिसून येते. याच भागात ओझर्डे गावाचा सुंदर धबधबा असून हा त्याच्या सौंदर्याने अनेकांना आकर्षित करतो. कोयनानगरपासून सुमारे ८ किलोमीटर अंतरावर नवजा गावाच्या हद्दीमध्ये असलेला ओझर्डे येथील धबधबा नेहमीच नयनरम्य आणि सुखावह भासतो. शेकडो मीटर उंचीवरून कोसळणाऱ्या, दुधासारख्या फेसाळणाऱ्या धबधब्याच्या तीन धारा जणू लांबून रेशीम वस्त्रासारख्या दिसतात. हमरस्त्यापासून दक्षिणेस डोंगराच्या दरीत सुमारे दोन किलोमीटर अंतरावर कोसळणारा हा पाण्याचा लोट जवळून पाहण्याचा मोह नक्कीच आकर्षित करतो. अश्या या सुंदर आणि मनमोहक धबधबा बघण्यासाठी भटकंती करावी परंतु ती जपूनच.


जायचे कसे:-
पुणे - सातारा - पाटण - नवजा.
______________________________________________________________________________________________

महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात.

४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.

_________________________________________________________________________________________

लिखाण आणि छायाचित्रे © २०१७ महाराष्ट्राची शोधयात्रा

No comments:

Post a Comment

Thank You For Comment...!!! :)

INSTAGRAM FEED

@maharashtraheritage