शिवपूर्वकालीन महाराष्ट्रातील 'सुलतानांची स्वभावचित्रे'


इ.स. १३१८ साली अल्लादिन खिलजीने यादवांचा पराभव केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्य सुरु झाले ते दिल्लीच्या सुलतानांचे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात अंदाधुंदी माजलेली आपल्याला दिसते. शिवाजी महाराजांच्या आधी किंवा शिवपूर्वकालखंडात महाराष्ट्रामध्ये बहामनी सुलतानांनी काहीकाळ महाराष्ट्रावर राज्य केले आणि नंतर याच बहामनी सत्तेची शकले बनून बिदर येथील बरीदशाही, गोवळकोंडा येथील कुतुबशाही, अहमदनगर येथील निजामशाही, विजापूर येथील आदिलशाही, वऱ्हाड येथील इमादशाही तसेच खानदेशातील फारुखी घराणे अशी शकले तयार झाली. 

मध्युगातील या महाराष्ट्रातील राजवटींची माहिती बघताना या प्रत्येक राज्याचे जे सुलतान आहेत त्यांची काही महत्वाची ठळक वैशिष्ट्ये आपल्याला दिसून येतात त्यामध्ये आपल्याला शौर्य, सहिष्णुता, क्रौर्य, मदांधता, स्त्रैणपणा हे सारे गुण दिसून येतात. आजपर्यंत आपण फक्त एवढेच ऐकत आलो की हे सगळे क्रूर होते यांनी जनतेवर खूप कर बसवून प्रजेला त्रास दिला पण काही सुलतानांची चरित्रे ही मध्ययुगात लिहिली गेली त्यातील काही महाराष्ट्रातील विशेष 'सुलातानांची स्वभावचित्रे' नक्कीच बघण्यासारखी आहेत.

अल्लादिन खिलजी. छायाचित्र अंतरजालावरून घेतले आहे.

हुमायूनशहा बहमनी:-

बहमनी सुलतानांच्या कालखंडातील क्रूरपणाचा मूर्तिमंत पुतळा असे ज्याचे वर्णन आपल्याला इतिहासात आढळून येते तो बहमनी सुलतान म्हणजे 'अल्लाउद्दीन हुमायूनशहा बहमनी'. याची कारकीर्द अगदी जेमतेम तीन वर्षांची होती. परंतु या तीन वर्षात त्याने माणुसकीला काळीमा फासणारी अनेक कृत्ये केलेली आपल्याला आढळतात. 'अल्लाउद्दीन हुमायूनशहा बहमनी' याच्याविरुद्ध बंड पुकारणाऱ्या त्याच्या 'हसन' या धाकट्या भावाला हरविल्यानंतर 'अल्लाउद्दीन हुमायूनशहा बहमनी' याने आपल्या विरोधकांवर शस्त्रे उगारले. संपूर्ण शहरातील दोन हजार सैनिकांना त्याने ठार केले एवढे करून त्याने शहराच्या कोतवालाला कैद केले आणि प्रत्येक दिवशी त्याचा एक एक अवयव छाटण्याची त्याला शिक्षा दिली.

'राजपुत्र हसन' याच्याविरुद्ध पाठविलेल्या सैन्याचा जेव्हा पराजय झाला तेव्हा त्याने सैन्यातील अधिकाऱ्यांच्या बायका मुलांना पकडले आणि सैन्याने जय न मिळविल्यास त्या सगळ्यांना ठार मारायची धमकी दिली परंतु तो एवढ्यावरच न थांबता 'राजपुत्र हसन' याचा पराभव झाल्यानंतर त्याला आणि त्याच्या अनुयायांना त्याने भरचौकात वाघाच्या तोंडी दिले. तसेच काही अनुयायांची सर्व लोकांच्या देखत कत्तल देखील केली गेली. तसेच त्यांच्या स्त्रियांची देखील भर चौकात विटंबना देखील केली गेली.

हुमायूनशहा बहमनी याची कबर छायाचित्र अंतरजालावरून घेतले आहे.

'अल्लाउद्दीन हुमायूनशहा बहमनी' याने काही छळ जे शोधून काढले होते त्या छळाच्या प्रकारामध्ये खंजिराने वारंवार भोसकणे, कुऱ्हाडीने तुकडे करणे, उकळते तेल किंवा उकळते पाणी अंगावर टाकून कातडी सोलणे हे अमानुष प्रकार त्याने चालू केले होते. इतिहासामध्ये अशी फारच क्वचित उदाहरणे मिळतील. 'अल्लाउद्दीन हुमायूनशहा बहमनी' याच्या या वागणुकीचे खूप मोठे परिणाम सर्वसामान्य प्रजेवर आणि अमीरउमरावांवर झालेले आपल्याला दिसतात.

बहामनी साम्राज्याच्या विघटनाला कारणीभूत झालेल्या अनेक गोष्टींमध्ये त्यांच्या सुलतानांची वागणूक तसेच या जोडीला मद्यपान या दुर्गुणाची जोड यामुळे हे महाराष्ट्रावर राज्य गाजवणारे साम्राज्य स्वतःच्या विघटनास कारणीभूत झाले.

शम्सुुदिन बहमनी:-

'शम्सुुदिन बहमनी तिसरा' याच्या कारकीर्दीत बहमनी साम्राज्य हे वैभवाच्या पराकोटीला पोहोचले होते. याला मुख्य कारणीभूत होता तो 'महमूद गावान'. 'शम्सुुदिन बहमनी तिसरा' याचा वजीर हा 'महमूद गावान' हा होता. 'महमूद गावान' याचा उत्कर्ष काही आजूबाजूच्या सरदारांना सहन न झाल्याने त्यांनी 'महमूद गावान' याला कपटाने मारण्याचा डाव रचला. यासाठी 'महमूद गावान' याच्या विरुद्ध असणाऱ्या सरदारांनी एक खोटे पत्र तयार केले. ते खोटे पत्र त्यांनी 'महमूद गावान' याच्या नावाने तयार करून 'शम्सुुदिन बहमनी तिसरा' हा मद्यधुंद अवस्थेत असताना त्याच्या पुढे ते पत्र ठेवण्यात आले. दारूच्या नशेत ते खोटे पत्र नीट शहानिशा न करता 'शम्सुुदिन बहमनी तिसरा' याने 'महमूद गावान' याची शिरच्छेद करण्याची आज्ञा दिली. या दारूच्या नशेमुळे 'शम्सुुदिन बहमनी तिसरा' याला एक वेगळीच धार चढली आणि त्याने स्वतःच्या साम्राज्याचा वजीर 'महमूद गावान' याचा हकनाक बळी घेतला.

शम्सुुदिन बहमनी तिसरा याची मागची कबर छायाचित्र अंतरजालावरून घेतले आहे.

'महमूद गावान' याचा बळी घेतल्यावर बहमनी साम्राज्याचे विघटन होण्यास फारसा वेळ लागला नाही आणि त्यातून बिदर येथील बरीदशाही, गोवळकोंडा येथील कुतुबशाही, अहमदनगर येथील निजामशाही, विजापूर येथील आदिलशाही, वऱ्हाड येथील इमादशाही तसेच खानदेशातील फारुखी घराणे अशी शकले तयार झाली.

मूूर्तजा निजामशहा:-

'मूूर्तजा निजामशहा' हा क्रूर होताच परंतु 'मूूर्तजा निजामशहा' याच्या क्रूरपणात वेडेपणाची एक लहर होती हे दिसून येते. एकदा राजवाड्यातील सईस, डांग या खालच्या नोकरवर्गापैकी एक 'अनुचर' जनानखान्यामधून बाहेर पडताना 'मूूर्तजा निजामशहा' याने बघितला. यात 'मूूर्तजा निजामशहा'  याला वेगळाच संशय आला म्हणून त्याने रागाच्या भरात सगळ्या 'अनुचरांची' कत्तल करण्याचा हुकुम दिला. या हुकुमाबरोबर सईस, डांग, दिवटे या सर्व 'अनुचरांची' कत्तल करण्यात आली.

तसेच अजून एक स्वभावचित्र आपल्याला 'मूूर्तजा निजामशहा' याचे आपल्याला बघायला मिळते. याचा उल्लेख 'सय्यद अली आणि फेरीश्ता' असे दोघेही करतात. 'मूूर्तजा निजामशहा' याचे दोन गुलामांवर प्रेम बसले. एकाचे नाव 'साहिबखान आणि दुसऱ्याचे फत्तू उर्फ फत्तेशाह. 'साहिबखान' याच्या नादाने 'मूूर्तजा निजामशहा' इतका चाळावला की जवळजवळ त्याला वेड लागल्यासारखे झाले. एखाद्या प्रेयसीने आपल्या प्रियकरावर रुसावे तदनुसार 'मूूर्तजा निजामशहाकडून' काही एक हट्ट  पूर्ण न झाल्यास 'साहिबखानाने' सोडले.

मूूर्तजा निजामशहा. छायाचित्र अंतरजालावरून घेतले आहे.

त्याच्यापाठोपाठ रानोमाळ, गावोगाव 'मूूर्तजा निजामशहा' सैरावैरा पळत राहिला. आपल्या पूर्ण काबूमध्ये 'मूूर्तजा निजामशहा' सापडला आहे याची जेव्हा 'साहिबखानाला' जाणीव झाली तेव्हा त्याने कहर केला. स्वत:ला सुलतान समजून त्याने जहागिरी देण्यास केली. अहमदनगरमध्ये अनेक कत्तली घडवून आणल्या. निजामशाहीची राजधानी असलेल्या 'अहमदनगरमध्ये' हाहाकार उडाला. सरतेशेवटी 'निजामशाहीचा' मुख्य प्रधान 'सलाबतखान' याने युद्ध करून 'साहिबखान' याचा वध करविला आणि 'मूूर्तजा निजामशहा' याच्या  मानगुटीवरचे भूत उतरविले.

एवढे करून 'मूूर्तजा निजामशहा' याचा हा छंद काही सुटला नाही. वर सांगितल्याप्रमाणे 'मूूर्तजा निजामशहा' हा आता 'फत्तू उर्फ फत्तेशाह' याच्या मागे लागला. जामदारखान्यातील एका रत्नजडित कंबरपट्ट्याची फत्तेशाह याने केलेली मागणी पूर्ण करण्याची आज्ञा 'मूूर्तजा निजामशहा' याने प्रधान 'सलाबतखान' याला दिली. उघड्या डोळ्यांनी होत असलेला राजवैभवाचा नाश 'सलाबतखान' याला बघवला नाही. त्याने खरा कंबरपट्टा द्यायच्या ऐवजी खोटा कंबरपट्टा 'फत्तेशहाला' दिला. 'फत्तेशहाने' 'मूूर्तजा निजामशहाकडे' खोट्या कंबरपट्ट्याबद्दल 'सलाबतखान' याच्या विरुद्ध तक्रार केली. 'मूूर्तजा निजामशहा' याने यानंतर आपल्या प्रिय पात्राची समजूत देखील घातली आणि 'सलाबतखान' याला समक्ष बोलावून त्याची हजेरी घेतली. एवढ्यावरच 'मूूर्तजा निजामशहा' थांबला नाही तर त्याने संपूर्ण 'जमादारखान्याला' आग लावून दिली.

दुसरा बुरहाण निजामशहा:-

जी गत 'मूूर्तजा निजामशहाची' तीच गत त्याचा भाऊ 'दुसरा बुरहाण निजामशहा' याची. मुळात 'दुसरा बुरहाण निजामशहा' याला राज्य मिळाले तेच याच्या वृद्धापकाळात याच्या क्रूरतेचे रूप मात्र वेगळे होते. दक्षिणी मुसलमान यांच्यावर त्याचा विशेष द्वेष होता. 'दुसरा बुरहाण निजामशहा' याच्या कारकीर्दीत 'चौल' येथे  करण्यात आली. या 'चौल' स्वारीवर जे मुसलमान सैन्य पाठविले होते  ते बहुतांशी दक्षिणी मुसलमान  होते. 'चौल' येथील 'पोर्तुगीजांनी' या स्वारी मध्ये अहमदनगरच्या 'दुसरा बुरहाण निजामशहा' याच्या फौजेचा पार धुव्वा उडविला. इतकेच नव्हे तर जवळपास दहा ते बारा हजार दक्षिणी मुसलमानांची कत्तल पोर्तुगीजांच्या अगदी थोड्याश्या सैन्याने केली.

दुसरा बुरहाण निजामशहा. छायाचित्र अंतरजालावरून घेतले आहे.
(छायाचित्र संग्रह क्रेडीट:- रझा लायब्ररी कलेक्शन) 

या दक्षिणी मुसलमानी सैन्याच्या झालेल्या कत्तलीचा 'दुसरा बुरहाण निजामशहा' याला अतिशय आनंद झाल्याचे 'फेरीश्ता' नमूद करतो. 'दुसरा बुरहाण निजामशहा' याने त्यादरम्यान अहमदनगरमध्ये परदेशी मुसलमानांना मोठ्या प्रमाणात बढत्या दिल्या. 'दुसरा बुरहाण निजामशहा' याने कोणतीही मदत 'चौल' येथे पराभूत झालेल्या सैन्याला पाठवली नसल्याने या दक्षिणी मुसलमान सैन्याला नामुष्कीची माघार घ्यावी लागली होती. यावृत्तीचे परिणाम फारसे चांगले झाले नाहीत. आणि त्यानंतर थोड्याच काळात 'दुसरा बुरहाण निजामशहा' याचा मृत्यू झाला.

अमीर अली बरीद:-

'अमीर अली बरीद' या बिदरच्या सुलतानाच्या जनानखान्यात दोन अतिशय सुंदर गुलाम होते. फेरीश्ता आणि सय्यद अली या मध्ययुगातील इतिहासकारांनी 'अमीर अली बरीद' आणि त्याच्या या दोन गुलामांचे रसभरीत वर्णन केलेले आहे. अहमदनगरच्या निजामशहाने जेव्हा 'बिदर' येथे हल्ला केला, तेव्हा 'अमीर अली बरीद' याने विजापूरच्या 'अली आदिलशाह' याच्याकडे मदत मागितली. तेव्हा विजापूरच्या 'अली आदिलशहा' याने एका अटीवर मदत देण्याचे मान्य केले आणि ही अट म्हणजे 'अमीर अली बरीद' याने आपल्या ताब्यातील त्या दोन सुंदर गुलामांना विजापूरकडे म्हणजेच 'अली आदिलशाह' यांच्या स्वाधीन करावे. राज्य वाचविण्यासाठी 'अमीर अली बरीद' याने ही विकारविलसित मागणी मान्य केली.

अमीर अली बरीद. छायाचित्र अंतरजालावरून घेतले आहे.

अली आदिलशाह:-

'बरीदशाह आणि निजामशाह' यांच्या युद्धानंतर 'अमीर अली बरीद' याने त्या सुंदर गुलामांची रवानगी विजापूरला 'अली आदिलशाह' याच्याकडे केली. ह्या सर्व घटनांमध्ये एक गोष्ट आपल्याला दिसून येते ती म्हणजे त्या दोन सुंदर गुलामांना देखील 'अमीर अली बरीद' याला सोडून जाणे जीवावर आले होते. तरीदेखील त्यांच्या मर्जीविरुद्ध 'अमीर अली बरीद' याने  विजापूरला 'अली आदिलशाह' याच्याकडे त्यांची पाठवणी केली. मध्ययुगातील इतिहासकार 'सय्यद अली आणि फेरीश्ता' हे दोघेही असे सांगतात की, 'अली आदिलशाह' याच्या जनानखान्यात गेल्यावर 'अली आदिलशाह' याने या गुलामांबरोबर वेडेवाकडे आणि फाजिल वर्तन करण्यास सुरुवात केली. 'अली आदिलशाह' याची लगट त्या दोन्ही सुंदर गुलामांना आवडली नाही आणि त्यांच्यापैकी एकाने 'अली आदिलशाह' याच्या छातीत शस्त्र खुपसून त्याचा प्राण घेतला. हे सर्व पाहिल्यानंतर 'अली आदिलशाह' याच्याविरुद्ध तिरस्कार वाटण्याऐवजी मनात अनुकंपा आणि कीव मात्र निर्माण होते.

अली आदिलशाह. छायाचित्र अंतरजालावरून घेतले आहे.

अश्या या शिवपूर्वकाळातील सुलतानांच्या कथा पाहिल्यानंतर त्यांच्यापैकी बऱ्याच जणांच्या अंगी अनैसर्गिक वागणूक करण्याची जि वृत्ती दिसून येते ती निंद्य आणि गर्हणीय होती इतकेच नव्हे तर या वागणुकीला मानवी शब्दकोशात क्षमा हा शब्द निश्चितच नसावा अशी ही शिवपूर्वकालीन महाराष्ट्रातील 'सुलतानांची स्वभावचित्रे' होती.           
______________________________________________________________________________________________

संदर्भग्रंथ:-
१) गुलशन-ई-इब्राहिमी (गुलशने इब्राहिमी):- लेखक फेरीश्ता, अनुवाद कॅॅ. डॉ. भ.ग.कुंटे., महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक महामंडळ, १९८२. 

______________________________________________________________________________________________

महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात. 

४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.
______________________________________________________________________________________________

No comments:

Post a Comment

Thank You For Comment...!!! :)

INSTAGRAM FEED

@maharashtraheritage