सेनापती बापट रोडवरील डोंगराच्या कुशीत वसलेले 'चतु:शृंगी मंदिर'


पुणे आणि परीसराला चारही बाजूंनी टेकड्यांचे नैसर्गिक कोंदण लाभलेले आहे. या संपूर्ण टेकड्यांवर आपल्याला कोणते ना कोणते मंदिर हे पहायला मिळतेच. असेच ‘चतुशृंगी देवीचे’ मंदिर हे पूर्वीच्या पुण्यापासून साधारणपणे ५ कि.मी. अंतरावर वसलेले असून पुण्यातील अत्यंत महत्वाचे हे देवस्थान आहे. आजच्या नविन पुण्यामध्ये हे मंदिर पुण्यातील सेनापती बापट या प्रसिद्ध आणि मोठ्या रस्त्यावरून डोंगराच्या कुशीत वसलेले आपल्याला पहायला मिळते. काळानुसार मंदिराच्या परिसराचा देखील मोठा कायापालट झालेला आहे.

मोठ्या मोठ्या इमारती आणि आय.टी पार्क यांच्या घेऱ्यामुळे हे ‘चतुशृंगी मंदिर’ आज मात्र लपलेले आहे परंतु या डोंगरावरील देवीच्या मंदिरात जायला सेनापती बापट रस्त्यावरून कमान आणि पायऱ्या देखील आज बांधल्या गेल्या आहेत त्यामुळे मंदिरामध्ये सहज जाता येते. १९६१ पूर्वी चतुशृंगी देवीच्या मंदिरात जायचे झाल्यास कृषीविद्यापीठावरून पुणे विद्यापीठाच्या रस्त्याने यावे लागत असे. इ.स. १९६१ साली जेव्हा पानशेतचा पूर आला त्याच्यानंतर येथे गोखले नगर वसवले गेले आणि पानशेत पुराच्या वेळेस ज्यांचे घर उध्वस्त झाले त्यातील बरीचशी पुणेकर मंडळी याठिकाणी राहायला आली म्हणून बालभारती, पुणे येथून खिंड फोडून एक मोठा रस्ता बनवला गेला तोच हा सेनापती बापट रस्ता होय. त्यामुळे ‘चतुशृंगी मंदिरात’ येण्यासाठी हा एक अजून एक पर्यायी मार्ग देखील उपलब्ध पुणेकरांना झाला आणि चतुशृंगी मंदिरातील भाविकांची गर्दी वाढली. 

चतु:शृंगी देवीच्या मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार. 

‘चतु:शृंगी देवी’ हे पुण्यातील एक जागृत स्थानांपैकी एक महत्वाचे स्थान मानले जाते. वर्षभर येथे भक्तांची वर्दळ ही चालूच असते. ‘चतुशृंगी देवीच्या’ मंदिरात जाण्यासाठी आपल्याला मोठ्या पायऱ्या बांधलेल्या आजही दिसून येतात. या पायऱ्यांवरून सुमारे दीडशे फूट उंच चढून गेल्यावर ‘चतु:शृंगी देवीचे’ विलोभनीय दर्शन होते. या देवी संदर्भात एक आख्यायिका आजही सांगितली जाते ती पुढीलप्रमाणे:-

साधारणपणे दोनशे वर्षापूर्वी ‘सवाई माधवराव पेशवे’ यांच्या काळामध्ये पुणे शहरामध्ये ‘दुल्लभशेठ’ नावाचे खूप मोठे सावकार राहत होते. पेशव्यांचे आणी त्यांचे चांगले संबंध देखील  होते आणि त्यांचे वजन देखील पेशव्यांच्या दरबारात होते आणि दरबारात त्यांना मोठा मान होता. बऱ्याचवेळेस पेशव्यांना काही आर्थिक मदत लागली तर प्रसंगानुसार पेशवे ‘दुल्लभशेठ’ यांच्याकडून कर्ज घेत असत. तसेच ‘दुल्लभशेठ’ यांना सरकारी पालखीचा मान होता आणि पेशव्यांच्या सरकारी टांकसाळीचा मक्ता देखील त्यांच्याकडे होता. ही आख्यायिका त्यांच्याबाबत सर्वत्र प्रसिद्ध आहे.

चतु:शृंगी मंदिराच्या पायऱ्या.

दरवर्षी नित्यनियमाने ‘दुल्लभशेठ’ सावकार हे नाशिक जवळील ‘सप्तशृंग देवीच्या’ दर्शनाला जात असत. जेव्हा त्यांचे वय झालेत्या त्याच्यानंतर त्यांना प्रवासाची दगदग झेपेनाशी झाली तेव्हा त्यांना दरवर्षीच्या ‘सप्तश्रृंगी देवीच्या’ न चुकणाऱ्या वारीची चिंता वाटू लागली. तेव्हा त्यांना एकेदिवशी स्वप्नात देवीचे दर्शन झाले. देवीने त्यांची मनस्थिती ओळखून त्यांना स्वप्नामध्ये संगीतले कि ‘पुण्याजवळील एका डोंगरात माझे स्थान आहे. त्या ठिकाणावरील मूर्तीला तु माझी मूर्ती समजून त्याची नित्यनियमाने पुजा केलीस तर प्रत्येकवर्षी तुला ‘सप्तशृंगी गडाची’ वारी करायची आवश्यकता नाही. या स्वप्नामुळे दुसऱ्या दिवशी त्यांनी त्वरित आपली माणसे जमा करून या देवीच्या स्थानाबाबत शोध घ्यायला पाठविली.

तेव्हा देवीच्या स्थानाचा शोध घेताना ‘दुल्लभशेठ’ सावकारांना असे कळले कि गणेशखिंडीच्या डोंगरात देवीचे एक उपेक्षित स्थान आहे. हे जसे त्यांना समजले तसे त्यांची पावले देवीच्या दर्शनाच्या ओढीने गणेशखिंडीच्या डोंगराच्या वाटेच्या दिशेने चालू लागली. साधारणपणे अर्धा डोंगर त्यांनी चढल्यावर ते एका लेणीसदृश ठिकाणी डोंगराच्या मध्यभागी येऊन पोहोचले आणि त्यांना साक्षात ‘चतु:शृंगी देवीची’ अत्यंत सुंदर मूर्ती एका दगडी खोबणीत त्यांना आढळून आली. ही देवीची मूर्ती पाहिल्यावर त्यांनी या मूर्तीभोवती सुंदर मंदिर गणेशखिंडीच्या डोंगरात बांधले. आणि नित्याची पुजा अर्चा करण्यासाठी त्यांनी पुजारी देखील नेमले. इ.स. १७८६ सालची ही आख्यायिका आजही प्रसिद्ध आहे.

अशी ही आख्यायिका असणारा गणेशखिंडीमध्ये असणारा चतु:शृंगी मंदिर’ आणि परिसर पुण्याच्या पंचक्रोशी मध्ये मोडत असे. येथून जवळच उत्तर दिशेस ‘भांबुर्डे’ नावाचे एक गाव वसले होते तेच गाव आज शिवाजीनगर म्हणून प्रसिद्ध आहे. या गावापासून ज्या डोंगररांगा जातात त्या आडबाजूला हे देवीचे स्थान येत असे तसे ते उपेक्षित देखील होते. पेशवाईमधील दुल्लभशेठ सावकारांमुळे या आडवाटेवर असलेल्या ‘चतु:शृंगी देवीच्या’ स्थानाला महत्व प्राप्त झालेले आपल्याला पहायला मिळते. दुल्लभशेठ सावकार हे पेशव्यांच्या टांकसाळीचे प्रमुख होते. दुल्लभशेठ सावकारांनी पुण्याच्या चलनात ‘दुदांडी आणि शिवराई’ अशी नाणे प्रचलित केली आणि त्यांनी ‘चतु:शृंगी देवीच्या’ नावाने ‘चतरसिंगी’ हे रुपयाचे नाणे टांकसाळीमध्ये पाडले  होते. सवाई माधवराव पेशवे यांच्या रोजनिशी मध्ये इ.स. १७८८ च्या जमाखर्चाच्या नोंदीमध्ये ‘चतरसिंगी रुपया’ असा उल्लेख देखील केलेला आहे.

चतु:शृंगी देवीची तांदळा रूपातील मूर्ती.

पुढील काळामध्ये या ‘चतरसिंगी रुपया’ बाबत काही जास्त नोंदी मिळत नाहीत. हे नाणे कदाचित देवीच्या नावाने देखील पाडले असावे आणि काही काळापुरते चलनात आणले असावे असे दिसते. आजही याप्रकारची देवाची नाणी पाडली जातात. इ.स. १८१८ साली पेशवाई संपली आणि पुण्यातील देवस्थानांना मिळणारी वर्शासने देखील संपली अशीच काही वर्षासनाची रक्कम ‘पर्वती संस्थानाकडून’ ही चतु:शृंगी मंदिर’ देवस्थानास मिळत होती परंतु काळ बदलला परंतु लोकांच्या देणग्या या मात्र या देवस्थानास कायम येत राहिल्या.

प्लेगच्या दिवसांमध्ये बऱ्याच लोकांनी तात्पुरते पुणे शहर सोडले आणि तात्पुरती सोय म्हणून काही पुणेकर लोकं या ‘चतु:शृंगी मंदिर’ परिसराच्या भागामध्ये येऊन वसले. इ.स. १७६० सालानंतर धनिकांनी या भागामध्ये बंगले बांधायला सुरुवात केली. आणि एकेकाळी निर्मनुष्य असलेला आणि निसर्गाने नटलेला चतु:शृंगी मंदिर’ परिसर मात्र गजबजू लागला.चतु:शृंगी देवीची’ यात्रा ही अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून सुरु होते आणि दशमीपर्यंत चालते. ‘अनगळ’ घराण्याने आजही पिढ्यानपिढ्या या चतु:शृंगी मंदिराचे’ स्थान अबाधित राखलेले आहे. नवरात्रामधील या उत्सवात सगळे पुणेकर आजही मोठ्या भक्तीभावाने येतात. ह्या जत्रेचे स्वरूप खूप मोठे असे होते. ही जत्रा आजच्या पत्रकार नगरपासून सुरु होत असे ते गणेशखिंडीच्या रस्त्याच्या शेवटच्या टोकापर्यंत ही जत्रा पसरलेली होती. परंतु आता मात्र हे स्वरूप अगदी छोट्या स्वरूपाचे झालेले आहे अगदी २००० सालापर्यंत ह्या जत्रेचे स्वरूप खूप मोठे होते. आता मात्र चतु:शृंगी मंदिरच्या समोरील’ जागेत ही जत्रा नवरात्रात भरते.

इ.स. १८६८ साली पुणे शहरावर ना. वि. जोशी यांनी ‘पुणे वर्णन’ या नावाचे पुस्तक लिहिले हे पुणे शहरावर लिहिले गेलेल्या पहिल्या पुस्तकात ते चतु:शृंगी मंदिर’ आणि परिसराचे वर्णन करताना पुढीलप्रमाणे लिहितात:-

चतु:शृंगी मंदिराचा बाह्य परिसर.

“पुण्याचे ईशान्ये दिशेस एक जागा आहे तिला गणेशखिंड असे म्हणतात; तेथे गणपतीचे देवालय असून ह्यावरून ह्या खिंडीचे नाव पडलेले आहे असे वाटते. तेथे डोंगरावर ‘चतु:शृंगी’ ह्या नावाची स्वयंभू देवी आहे. काही दिवसांपूर्वी ह्या देवीचे देऊळ चांगले बांधण्यात आले नव्हते पण ती एका गोसाव्यास नवसास पावली म्हणून त्याने तिचे देवळाचा जीर्णोद्धार करून यात्रेकरूस बसण्यासाठी सभामंडप बांधला व डोंगराखाली चांगली विहीर बांधली आहे. प्रदक्षिणा डोंगरावरून घालण्यासाठी आणि खालून वर देवीपर्यंत जाण्यासाठी पायऱ्या केल्या आहेत. तसेच ह्याच डोंगराच्या अलीकडल्या डोंगरावर एक पांडवकृत्य (कोरीव लेणे) आहे, त्यात सांब आहे.” म्हणजेच हे मंदिर देखील एका लेण्यामध्ये बांधले आहे नीट निरखून पाहिल्यावर लगेच लक्षात येते.             

चतु:शृंगी मंदिर’ जसे पुण्याच्या हद्दीमध्ये आले तशी या भागातील गर्दी वाढू लागली तसेच रस्ते देखील गजबजले. १९४७ सालानंतर या संपूर्ण परिसरात अनेक मोठ्या इमारती बांधल्या गेल्या आणि निसर्गसंपन्न असलेल्या या चतु:शृंगी मंदिर’ परिसराचा कायापालट झाला. आता काळाच्या ओघात हा संपूर्ण परिसर आय.टी पार्क म्हणून ओळखला जातो. या परिसरात चतु:शृंगी मंदिर’ देखील आहे हे पुणे शहर फिरायला येणाऱ्या लोकांना तसेच नोकरीनिमित्त स्थायिक होणाऱ्या लोकांना आवर्जून सांगावे लागते. एकेकाळी प्रदुषणमुक्त असलेले चतु:शृंगी मंदिर’ आज मात्र वाहनाच्या आवाजात आणि मोठ्या मोठ्या बिल्डींगच्या कचाट्यात आलेले असल्यामुळे येथील निरव शांतता मात्र आज कुठेतरी हरवलेली आहे. असे हे ऐतिहासिक चतु:शृंगी मंदिर’ आजही पुण्यनगरीमधले महत्वाचे देवस्थान आहे अश्या या देवस्थानाला जाऊन नव्या युगातील पुण्याचा नजारा पाहणे नक्कीच सुखावह ठरते.

चतु:शृंगी मंदिराचा जुना फोटो.

______________________________________________________________________________________________

संदर्भग्रंथ:-
१) Gazetteer of The Bombay Presidency Poona District:- पान क्रमांक ६५४, इ.स. १८८५.
२) पुणे वर्णन, लेखक:- ना. वि. जोशी, वरदा प्रकाशन इ.स. १८६८.
३) पुण्याची स्मरणचित्रे शतकापूर्वी व आता, लेखक:- अजित फाटक, मंदार लवाटे, सकाळ, २०१६.
४) हरवलेले पुणे, लेखक:- डॉ अविनाश सोवनी, उन्मेष प्रकाशन, २०१७.

______________________________________________________________________________________________

महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात.

४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.
________________________________________________________________________________________

लिखाण आणि छायाचित्रे  © २०१९  महाराष्ट्राची शोधयात्रा   

No comments:

Post a Comment

Thank You For Comment...!!! :)

INSTAGRAM FEED

@maharashtraheritage