वरळी येथील 'गद्धेगाळ'


महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी इतिहासाच्या पाऊलखुणा आपल्याला आढळून येतात. यामध्ये महाराष्ट्राची राजधानी आणि भारताची आर्थिक राजधानी असलेले मुंबई शहर हे तरी कसे मागे राहील. मुंबई शहराला प्राचीन इतिहास फार मोठा असून या प्राचीन इतिहासाच्या पाऊलखुणा आजही आपल्याला मुंबई शहरामध्ये सापडतात. अश्या काही इतिहासाच्या पाऊलखुणा या वरळी गावामध्ये देखील लपलेल्या आहेत. वरळीमधील लोकांना वरळीचा किल्ला माहिती आहे तसेच वरळीचा किल्ला अत्यंत प्रसिद्ध देखील आहे परंतु वरळी येथील निळकंठेश्वर मंदिरामध्ये असलेला  गद्धेगाळ आजही फारसा परिचित नाही. 


मुंबई आणि परिसराला फार मोठा प्राचीन इतिहास लाभलेला आहे. मुंबई बेटावरील बरीचशी गावे आजही त्यांच्या प्राचीन नावाने ओळखली जातात त्यापैकी वरळी हे देखील प्राचीन गाव असून या गावाचा उल्लेख आपल्याला महिकावतीच्या बखरीमध्ये आढळून येतो. याच वरळी गावामध्ये कोळीवाड्यामध्ये असलेला वरळीचा किल्ला सर्वत्र प्रसिद्ध आहे परंतु याच्यापासून जवळच निळकंठेश्वर मंदिरामध्ये असलेला गद्धेगाळ आजही फारसा लोकांना माहिती नाही. वरळी येथील बी.डी.डी चाळीजवळ असलेल्या निळकंठेश्वर मंदिरामध्ये हा गद्धेगाळ आपल्याला पहायला मिळेल.



निळकंठेश्वर मंदिरामध्ये हा गद्धेगाळ आपल्याला पहायला मिळेल.


नव्याने जीर्णोद्धार झालेल्या या निळकंठेश्वर मंदिरामध्ये तुळशी वृंदावनाच्या बाजूला आपल्याला वरळी येथील गद्धेगाळ पहावयास मिळतो. वरळी येथील गद्धेगाळ पाहण्याआधी आपल्याला गद्धेगाळ म्हणजे काय हे समजून घेणे फार महत्वाचे आहे. लेखामध्ये शापवचने घालण्याची पद्धत ही साधारणपणे ५ व्या शतकापसून सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते. ही शापवचने जो कोणी ताम्रपट किंवा शिलालेखामध्ये लिहून किंवा कोरून दिलेले दान मोडेल किंवा त्याला बाधा आणेल अश्या व्यक्तीला ते उद्देशून असते आणि त्याची रचना साधारणपणे सारखी असते. या शापवचनामध्ये फरक पडला तर वाचनाच्या संख्येत किंवा शब्दांमध्ये बदल होतो बऱ्याचदा सर्व लेखामधून पुढील श्लोक आपल्याला वाचायला मिळतो.    


स्वदत्तां परदत्तां वा यो हरेत वसुंधरां।

षष्टी वर्षसहस्त्राणी विष्टायां जा यते कृमी:।।


या श्लोकाची रचना शापवचनाच्या कामी केली जाते. बऱ्याचदा मराठी लेखामधून हेच शापवचन आपल्याला आढळून येते.  शिलाहारांच्या आणि यादवांच्या लेखातून शापवचने मराठी भाषेत घालण्याची प्रथा रूढ झालेली आपल्याला पहायला मिळते आणि यातून 'गद्धेगाळ' म्हणजेच (ass-curse) या नावाने प्रसिद्ध असणारे वचन पुढे रूढ झालेले आपल्याला दिसते.  गद्धेगाळ ही कधी शब्दरूपाने किंवा चित्ररूपाने किंवा शब्द आणि चित्र अशा रूपांनी व्यक्त होते. म्हणूनच वरळी येथील गद्धेगाळ अत्यंत महत्वाचा ठरतो. 


हा गद्धेगाळ आहे हे आपल्याला त्याच्यावर असलेल्या स्त्री आणि गाढवाच्या संकरावरून समजते.


मुंबई येथील वरळीमध्ये आज ज्या निळकंठेश्वर मंदिरामध्ये आपल्याला हा गद्धेगाळ पहावयास मिळतो तिथे नक्कीच प्राचीन काळामध्ये एखादे मंदिर किंवा एखादे दान दिलेले असावे असे वाटते. तसे पहायला गेले तर मुंबई आणि परिसरावर शिलाहार राजांची सत्ता होती त्यामुळे हा गद्धेगाळ त्यांच्या काळातील असू शकतो. तसे पहायला गेले तर आज वरळी येथील गद्धेगाळाची फार मोठ्या प्रमाणात झीज झालेली आपल्याला पहावयास मिळते. लोकांनी त्याच्यावर तेल आणि फुले वाहून मोठ्या प्रमाणात झीज केलेली असून केवळ हा एक गद्धेगाळ आहे हे आपल्याला त्याच्यावर असलेल्या स्त्री आणि गाढवाच्या संकरावरून समजण्यास आपल्याला मदत होते. या गद्धेगाळावर शिलालेख असावा कि नाही हे गद्धेगाळ झिजल्यामुळे समजून येत नाही.


असा हा वरळी येथील गद्धेगाळ आजही उपेक्षित असून मुंबई मधील प्राचीन इतिहासाचा साक्षीदार आहे. वरळी येथील गद्धेगाळ आजही उपेक्षित असल्यामुळे या गद्धेगाळाबद्दल नक्कीच प्रबोधन व्हायला हवे आणि मुंबईच्या वरळीचा प्राचीन सांस्कृतिक इतिहासाचा साक्षीदार असणारा हा गद्धेगाळ नक्कीच जपायला हवा.

______________________________________________________________________________________________

संदर्भग्रंथ:-
१) प्राचीन मराठी कोरीव लेख:- डॉ. शं. गो. तुळपुळे

______________________________________________________________________________________________


महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात.

४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.
_________________________________________________________________________________________________

लिखाण आणि छायाचित्रे  © २०१९  महाराष्ट्राची शोधयात्रा   

No comments:

Post a Comment

Thank You For Comment...!!! :)

INSTAGRAM FEED

@maharashtraheritage