गद्धेगाळावरील शापवचने


लेखामध्ये शापवचने घालण्याची पद्धत ही साधारणपणे ५ व्या शतकापसून सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते. ही शापवचने जो कोणी ताम्रपट किंवा शिलालेखामध्ये लिहून किंवा कोरून दिलेले दान मोडेल किंवा त्याला बाधा आणेल अश्या व्यक्तीला ते उद्देशून असते आणि त्याची रचना साधारणपणे सारखी असते. या शापवचनामध्ये फरक पडला तर वाचनाच्या संख्येत किंवा शब्दांमध्ये बदल होतो बऱ्याचदा सर्व लेखातून 


स्वदत्तां परदत्तां वा यो हरेत वसुंधरां।
षष्टी वर्षसहस्त्राणी विष्टायां जायते कृमी:।।

या श्लोकाची रचना शापवचनाच्या कामी केली जाते. बऱ्याचदा मराठी लेखामधून हेच शापवचन आपल्याला आढळून येते याची उदाहरणे म्हणजे आंबेजोगाई आणि वेळापूर येथील लेख. शिलाहारांच्या आणि यादवांच्या लेखातून शापवचने मराठी भाषेत घालण्याची प्रथा रूढ झालेली आपल्याला पहायला मिळते आणि यातून 'गद्धेगाळ' म्हणजेच (ass-curse) या नावाने प्रसिद्ध असणारे वचन पुढे रूढ झालेले आपल्याला दिसते. 


अक्षी गावातील 'गद्धेगाळ'.

गद्धेगाळवर काही श्लोक आढळतात त्यांचे प्रकार पुढीलप्रमाणे:-

१) तेहाची माय गाढवे झविजे (हा परळ येथे असलेल्या गद्धेगाळ वर कोरलेला लेख आहे)
२) तेयाचीऐ माऐसि गाडो घोडु (वेळूस येथील गद्धेगाळ वर कोरलेला लेख आहे)
३) तेआची माए गर्धभे झवीजे (वेळूस येथील गद्धेगाळ वर कोरलेला लेख आहे)
४) एआ सर्गा षल उद्रे करि लोपी तेहाचि मए गाढवु जवे (कोपराड येथील गद्धेगाळ वर कोरलेला लेख आहे)
५) कोणू हुवि जो वा लोपी तेहाचिए माये गाढो झवे (कालवार येथील गद्धेगाळ वर कोरलेला लेख आहे)
६) जो लोपी अथवा लोपावी यो गर्दभुनाथु गर्दभु तेहाचीए माए सुर्यपूर्वे गर्दभु झवे (लोनाड येथील गद्धेगाळ वर कोरलेला लेख आहे)
७) हे जो मोडी राजा आथवा प्रजा तेयाची माएसि गाढोऊ (कांटी येथील गद्धेगाळ वर कोरलेला लेख आहे)

गद्धेगाळ ही कधी शब्दरूपाने किंवा चित्ररूपाने किंवा शब्द आणि चित्र अशा रूपांनी व्यक्त होते. वेळूस येथील गद्धेगाळ दोन शिलालेखानी उद्धृत केलेली असून लेखांच्या खाली तश्या अर्थाची आकृती कोरून व्यक्त केलेली पाहायला मिळते. कोपराड, कालवार, वेहरली येथील शिलालेखांमध्ये हीच द्विवद पद्धत आपल्याला दिसून येते. ताम्रपटातुन आपल्याला कोणतेही गद्धेगाळ आपल्याला शब्दरूपाने किंवा चित्ररूपाने दिसून येत नाहीत.

तसेच काही शापवचने आपल्याला मराठी लेखांच्या शेवटी दिसून येतात ती पुढीलप्रमाणे:-

१) कवणू अतिसो देई तेआसी वीठलाची आण। ए काज जो फेडी तो धात्रूदोहि (पंढरपूर येथील कोरलेला लेख आहे)
२) जो फेडी लोपी तेआ योगिनींचा वज्रदंड पडे (वेळूस येथील गद्धेगाळ वर कोरलेला लेख आहे)
३) कालांतरी पैआंते फेडी तेआ श्रीगिरीजादेवीची आण  (आपगाव येथील गद्धेगाळ वर कोरलेला लेख आहे)

या सर्व वचनातून आपल्याला दिसणारी विविधता लक्षात घेण्यासारखी आहे यामध्ये आपल्याला दैवतांची उदाहरणार्थ विठ्ठल, योगिनी, किंवा गिरीजा तसेच आण किंवा गो, ब्राम्हण, मातापिता आणि बाल यांच्या हत्येचा दोष किंवा नरकप्राप्ति किंवा श्वानगर्दभचांडाळ इत्यादी अपशब्द किंवा ब्राम्हणभोजनभंगाचे पाप, किंवा या सर्व दोषांचा मुकुट म्हणजे 'गद्धेगाळ' हे मराठी लेखांमधील शापवचनाचे मुख्य आशय आहेत.


पुण्यातील कर्वेनगर येथील 'गद्धेगाळ'.

गद्धेगाळ बांधण्याची प्रथा फार जुनी असेल असे यावरून वाटत नाही साधारणपणे इ.स. ७ व्या किंवा ८ व्या शतकात ती सुरू झाली असावी यावरून देखील मतभेद आहेत. गुजरात मधील काठेवाडी येथील काही लेखांमध्ये गद्धेगाळ हा 'गधेडे गालय' म्हणून ओळखला जातो. माळव्यात जे लेख आहेत त्यामध्ये  गद्धेगाळ हा 'गधागाळ' म्हणून ओळखला जातो. तसेच माळव्यात हे सर्व लेख 'गधागाळ' म्हणून प्रसिद्ध आहेत याचे कारण त्यांच्या शेवटी 'या 'गधागाळ' लिख दीवी' हे वाक्य कोरलेले असते. 

महाराष्ट्रामध्ये ही प्रथा आपल्याला पुढे उत्तरकाळात चालू राहिली होती असे दिसून येते उदाहरणार्थ दाभोळ येथील जामी मशिदीत जो शिलालेख आहे त्याच्यात सगळ्यात शेवटी एक वाक्य लिहिलेले आपल्याला दिसते ते पुढीलप्रमाणे:-

'यासि कोणि हिंदू वा मुसलमान इरे वा इस्ती करील त्यावरिश त्याचे मएवरि गडदा (गाढव)' असे जाणिजे असे शापवचन कोरलेले आपल्याला बघायला मिळते. असे गद्धेगाळ महाराष्ट्र राज्य आणि आजूबाजूच्या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत.


सासवड येथील 'गद्धेगाळ'
______________________________________________________________________________________________

संदर्भग्रंथ:-
१) प्राचीन मराठी कोरीव लेख:- डॉ. शं. गो. तुळपुळे
२) यादव कालीन मराठी भाषा:- डॉ. शं. गो. तुळपुळे
३) गधागाळ:- भा.रा.भालेराव (भारत इतिहास संशोधक मंडळ पंचम संमेलन वृत्तांत)

______________________________________________________________________________________________


महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात.

४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.
_________________________________________________________________________________________________

लिखाण आणि छायाचित्रे  © २०१९  महाराष्ट्राची शोधयात्रा   





No comments:

Post a Comment

Thank You For Comment...!!! :)

INSTAGRAM FEED

@maharashtraheritage