मुंबई आणि अहमदनगरचा 'डॉक्टर'

 

पोर्तुगीज खलाशांनी विविध प्रदेश शोधत जगभरात आपला ठसा उमटवला. 'वास्को द गामा' हा भारतामध्ये आला आणि भारताच्या इतिहासाला एक वेगळे वळण मिळाले. जेव्हा पोर्तुगीज लोकांची सत्ता भारतामध्ये स्थिर होत होती तेव्हा इ.स. १५३८ मध्ये 'गार्सीया द ओर्ता' हा पोर्तुगीज 'मुंबई' आणि 'अहमदनगर' येथील डॉक्टर बनला आहे की नाही मजेशीर.

या 'गार्सीया द ओर्ता' चा जन्म हा इ.स. १५०० च्या सुमारास काशतील येथील सीमेला लागून असलेल्या काश्ताल द व्हिड या खेड्यामध्ये झाला. स्पेनमधील सालामांक आणि अलकाला द हेनारिश या त्याकाळातील सर्वात उत्कृष्ट समजल्या जाणाऱ्या विद्यापीठामध्ये त्याचे शिक्षण झाले. शिक्षण संपवून 'गार्सीया द ओर्ता' वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी परत पोर्तुगाल येथे आला. गार्सीया द ओर्ता याचे वैद्यकीय कौशल्य इतके उत्तम होते की इ.स. १५३३ मध्ये लिसबन विद्यापीठामध्ये खास त्याच्यासाठी वैद्यकीय अध्यासनाची स्थापना करण्यात आली. परंतु पुढच्याच वर्षी 'इस्तादू दि इंडिया' म्हणजेच पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनी मध्ये नोकरी करण्यासाठी त्याने विद्यापीठामधील नोकरी सोडली. 

मुंबई आणि अहमदनगरचा डॉक्टर 'गार्सीया द ओर्ता'

इ.स. १५३४ साली 'मेर्तीम अफॉन्स द सुझा' हा उमराव घरण्यातला योद्धा आणि प्रशासक त्याच्या जहाजांचा ताफा घेऊन गोव्याला निघाला होता तेव्हा त्याचा खासगी डॉक्टर म्हणून 'गार्सीया द ओर्ता' त्याच्या नोकरीमध्ये रुजू झाला. सुझाशी झालेल्या ओळखीमुळे त्याला थेट पोर्तुगीज वसाहतवादाच्या मुख्य धारेत आणून सोडले. भारतामध्ये दिव आणि मलबार येथे झालेल्या मोहिमांच्यामध्ये 'गार्सीया द ओर्ता' याने सुझा याला साथ दिली. अश्या पध्दतीने 'गार्सीया द ओर्ता' हा भारतात आला आणि १५३८ नंतर तो भारतामध्ये वास्तव्य करून राहिला. इ.स. १५४२ मध्ये 'मेर्तीम अफॉन्स द सुझा' याची  पोर्तुगीज व्हाइसरॉय म्हणून गोव्यामध्ये नेमणूक झाली तेव्हा 'गार्सीया द ओर्ता' हा सुझा या वरीष्ठ अधिकाऱ्याचा नोकर बनला. 

इ.स. १५५४ साली नव्याने व्हाइसरॉय म्हणून आलेल्या वयस्कर असलेल्या 'पेद्रो मस्कारेन्हास' याच्या सेवेत देखील राहण्यासाठी याचा करार झाला. एक वर्षाच्या आतमध्ये 'पेद्रो मस्कारेन्हास' आजारी पडून निधन पावला.  याच 'पेद्रो मस्कारेन्हास' याला 'गार्सीया द ओर्ता' खूप आदराने वागवत असे. या गोष्टीमुळे 'पेद्रो मस्कारेन्हास' याने 'गार्सीया द ओर्ता' याच्या निष्ठेवरती खुश होऊन 'गार्सीया द ओर्ता' याला 'मुंबई बेट' हे भाड्याने दिले. जेव्हा मुंबई बेट 'पेद्रो मस्कारेन्हास' याने ओर्ता याला दिले तेव्हा ते बेट पोर्तुगीजानी नुकतेच जिंकले होते. 

'गार्सीया द ओर्ता' याने महाराष्ट्रात लिहिलेले पुस्तक 'कोलोक्यूयुश'.

या गोष्टीवरून 'गार्सीया द ओर्ता' हा डॉक्टर आणि वसाहतीचा नोकर म्हणून पोर्तुगालशी किती निष्ठावंत होता हे समजण्यास मदत होते. याच 'गार्सीया द ओर्ता' याच्या त्याकाळी दोन बागा देखील होत्या एक बाग गोव्यामध्ये तर दुसरी बाग मुंबई मध्ये. इ.स. १५५४ मध्ये मुंबई बेटाचे रूप फार वेगळे होते. सध्याच्या मुंबईचा विस्तार हा त्याकाळात मलबार हिल पासून आत्ताच्या नौदलाच्या वेस्टर्न कमांड पर्यंत होता. त्याच्या पलीकडे कुलाबा बेट होते आणि उत्तरेकडे माझगाव हे लहानसे बेट होते. पोर्तुगीज लोकांनी जेव्हा मुंबईचा ताबा मिळवला तेव्हा त्यांनी 'मुंबई' शहराला 'इल्हा द बोआ विदा' असे नाव दिले. याचा अर्थ जिथे चांगले जीवन जगता येते. परंतु 'गार्सीया द ओर्ता' हा मुंबईचा उल्लेख 'बॉम्बाइम' असा करतो. 

सध्या जो वेस्टर्न नेव्हल कमांडचा भाग आहे तिथे 'गार्सीया द ओर्ता' याचे घर आणि बाग होती. सध्या 'गार्सीया द ओर्ता' याच्या जहागिरीमधील दोन गेट फक्त 'आयएनएस आंग्रे' या नौसेनेच्या तळावर सध्या शिल्लक आहेत. याच काळामध्ये 'गार्सीया द ओर्ता' याने एक ग्रंथ लिहिला त्याचे नाव 'कोलोक्यूयुश' यामध्ये आपल्याला त्याने केलेली सगळी वर्णने आढळतात. ओर्ता याची जी आंब्याची बाग होती त्या बागेमधल्या आंब्याच्या झाडाला खूप आंबे येत असत असे तो वर्णन करतो. या बागेची व्यवस्था सांभाळण्यासाठी 'गार्सीया द ओर्ता' याने 'सिमॉव तोस्काने' नावचा एक पोर्तुगीज माणूस ठेवला होता. 

'गार्सीया द ओर्ता' याच्या पुस्तकातील त्याने काढलेली चित्रे.

'कोलोक्यूयुश' या आपल्या ग्रंथामध्ये 'गार्सीया द ओर्ता' मुंबईच्या आंब्याचे औषधी गुणधर्म देखील नमूद केले आहेत. 'गार्सीया द ओर्ता' आंब्याला थंड प्रकृतीचे, रसाळ, ओलसर, तरीही आम्लवृत्तीचे फळ आहे असे मानतो. तसेच सडका आंबा खाल्याने ताप, पोटदुखी, रक्तस्राव, अंगावर चट्टे येणे असे आजार होऊ शकतात असे आपल्या ग्रंथामध्ये लिहितो. तसेच आंब्याचे औषधी गुण देखील तो सांगतो याबद्दल तो लिहितो की आंब्याची भाजलेली कोय ही संग्रहणीवर उपयुक्त असते आणि याचा प्रयोग मी स्वतःवर केला आहे असे तो सांगतो. 

हे प्रयोग करण्यासाठी त्याने स्थानिक वैद्य, हकीम या लोकांशी देखील मैत्री केली. 'गार्सीया द ओर्ता' याच्याकडे 'मालूपा' या नावाचा एक हिंदू वैद्य देखील येतो व  आलं आणि मातीच्या मिश्रणाने तापामधला दाह कसा कमी करता येतो याबाबत माहिती देतो त्याच्यावर गार्सीया द ओर्ता हा 'मालूपा' याच्यावर खूप खुश देखील झालेला आहे असे तो नमूद करतो. युरोपियन लेखनात उल्लेख झालेला पहिला भारतीय डॉक्टर म्हणजे हा मुंबईमधील 'मालूपा' होय. तसेच ज्या स्थानिक डॉक्टर लोकांच्याकडून वैद्यकीय ज्ञान 'गार्सीया द ओर्ता' याने प्राप्त केले त्यांचे देखील हा उल्लेख आवर्जून आपल्या 'कोलोक्यूयुश' या ग्रंथामध्ये करतो. 

'गार्सीया द ओर्ता' याच्या पुस्तकातील चित्र.

'कोलोक्यूयुश' मध्ये उल्लेख केलेले बहुतांश डॉक्टर हे हिंदू वैद्य व मुसलमान हकीम आहेत. पाऱ्याचा वापर करून कुष्ठरोग बरा करता येतो हे सांगणाऱ्या हकिमाचा देखील उल्लेख आहे तसेच एक गुजराती डॉक्टर हा अफू आणि जायफळाच्या साहाय्याने हगवण बरी करतो असे देखील नमूद करतो. तसेच अहमदनगर येथील कुणी 'मुला उसेम हा मुल्ला हुसेन' असे नाव असावे हा हकीम संधिवातावर आंबेहळद हा उत्तम उपाय असल्याचे सांगतो असे वर्णन या 'कोलोक्य'युश' ग्रंथात वाचायला मिळते. 

याच 'गार्सीया द ओर्ता' याने जे ज्ञान मिळवले ते मुंबई आणि इतर राज्यांमधून. इ.स. १५०३ ते १५५३ या काळामध्ये 'अहमदनगर' येथे सुलतान 'बुरहान निजामशाह' राज्य करीत होता. याच बुरहान निजामशाह  याचा खासगी डॉक्टर म्हणून 'गार्सीया द ओर्ता' याने बरीच वर्षे सेवा केली याच्यावरून याने स्थानिक डॉक्टर लोकांच्याकडून देखील बरेच वैद्यकीय ज्ञान मिळवलेले दिसते. याबाबत 'गार्सीया द ओर्ता' हा अहमदनगर बाबत लिहितो अहमदनगर हे जुन्या गोव्यापासून ४०० किलोमीटर अंतरावर वसलेले असून सीना नदीच्या पश्चिम किनाऱ्यावर वसलेले शहर आहे. 'बुरहान निजामशाह' याचा पिता 'मलिक अहमद' याने इ.स. १४४० च्या दशकात वसवलेले हे शहर अतिशय समृद्ध म्हणून प्रसिद्ध पावलेले आहे. तीव्र घ्राणेंद्रिय असलेला 'गार्सीया द ओर्ता' अहमदनगर येथे असलेल्या वास्तव्यात आपण चंदनाचा गंध दरवळत असलेल्या माडीवर कलावंतीणीच्या कोठ्यावर देखील गेल्याचे नमूद करतो. 

'गार्सीया द ओर्ता' याने त्याच्या पुस्तकात भारतातील औषधी वनस्पतींची केलेली नोंद.

वयाच्या सातव्या वर्षी अहमदनगरच्या गादीवर आलेला 'बुरहान निजामशाह' ही एक वेगळी वल्ली होती. नावापुरता शिया असलेल्या 'बुरहाण निजामशाह' याने एका नाचणाऱ्या बाईशी लग्न केले होते तसेच त्याला भांग फार आवडायची आणि तो खूप दारू प्यायचा मात्र त्याच्या कारकिर्दीत व्यापार, कला, संस्कृती भरभराटीस आल्या. त्याचा दरबार देखील बहूसांस्कृतिक होता. या निजामशाहचा तोफ प्रमुख हा 'सांचो पिरिश' हा पोर्तुगीज माणूस असून याच्यावर बुरहाण निजामशाहची त्याच्यावर खास मर्जी होती. पुढे हाच 'सांचो पिराशी' अहमदनगरचा घोडदळप्रमुख झाला. यासाठी तो वरकरणी मुस्लिम देखील झाला आणि त्याचे नाव पुढे 'फिरंगी खान' असे झाले. 

'गार्सीया द ओर्ता' अहमदनगरच्या निजामशाहला कधी भेटला याबाबत उल्लेख सापडत नाही परंतु या बुरहाण निजामशाहने आपल्या पदरी स्वतःसाठी तसेच आपल्या मुलांच्यासाठी अनेक वैद्य-हकीम मंडळी यांचे पथक बाळगले होते. निजामाशाहने 'गार्सीया द ओर्ता' याला भरभक्कम पगार दिला होता. असे 'गार्सीया द ओर्ता' नमूद करतो. याकाळात 'गार्सीया द ओर्ता' याने निजामशाह याच्यावर थरथर ज्वर, अंगावरचे चट्टे अशा विविध रोगांवर उपचार केले 'गार्सीया द ओर्ता' आपल्या 'कोलोक्यूयुश' या ग्रंथात नमूद करतो. या निजामशाहच्या पदरी असताना अनेक प्रसिध्द मुस्लिम हकिमांशी त्याचा संपर्क आला. 'गार्सीया द ओर्ता' असेही नमूद करतो की या सगळ्या हकिमांची एकमेकांशी स्पर्धा चालत असे. 

'गार्सीया द ओर्ता' याने त्याच्या पुस्तकात भारतातील विविध औषधी वनस्पतींची केलेली नोंद.

तसेच 'गार्सीया द ओर्ता' असेही नमूद करतो की भारतीय औषधे यांच्या बद्दल असलेल्या ज्ञानाबद्दल तो हकीम आणि वैद्य यांचे कौतुक देखील करतो. तसेच निजामशाह हा आपला जवळचा मित्र होता तसेच त्याला स्थानिक औषधांच्या बद्दल ज्ञान होते असे देखील तो नमूद करतो. कधीकधी हे ज्ञान मूर्खपणाचे होते असेही तो नमूद करतो यासाठी त्यामध्ये उदाहरण देखील तो देतो ते उदाहरण म्हणजे "घोड्याच्या शिंगाच्या चूर्णामध्ये तारुण्य परत मिळवून देणारे गुण असतात असा निजामशाह याचा विश्वास असल्याने तो खूप सारे सोने देण्यासाठी तयार होता". असे 'गार्सीया द ओर्ता' आपल्या ग्रंथात नमूद करतो. 

'गार्सीया द ओर्ता' याने त्याच्या पुस्तकात भारतीय वनस्पतींपासून बनवलेली औषधे.

असा हा मुंबई आणि अहमदनगर येथील डॉक्टर तसेच मुंबईचा पोर्तुगीज मालक 'गार्सीया द ओर्ता' याने अहमदनगर येथे असताना मुस्लिम मुलीशी लग्न केले पण ते दडवून ठेवले हे दडवण्याचा त्याचा उद्देश कधीच समोर येत नाही याचे कारण काय असावे तर याचे मुळ नाव होते 'अवराम बेन इझाक' नावाचा सेफर्डीक ज्यू होता हे त्याच्या 'कोलोक्यूयुश' ग्रंथात असलेल्या काही गोष्टींमध्ये तो नकळत नमूद करतो. असा हा मुंबई आणि अहमदनगर येथील डॉक्टर 'गार्सीया द ओर्ता' वैद्यकीय गोष्टी शिकण्यासाठी केलेल्या अट्टहसामुळे नक्कीच हुशार ठरतो...!!!

______________________________________________________________________________________________

संदर्भग्रंथ:-
१) Colloquies on the simples & drugs of India:- Garcia da Orta, Translation by Sir Clement Markham, Henry Sothern and Co., 1913.
२) Origins of Bombay:- Jose Gurson D Cunha, 1900.

______________________________________________________________________________________________


महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात.

४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.

______________________________________________________________________________________________


लिखाण आणि छायाचित्रे © २०२१ महाराष्ट्राची शोधयात्रा

No comments:

Post a Comment

Thank You For Comment...!!! :)

INSTAGRAM FEED

@maharashtraheritage