आपल्या महाराष्ट्रामध्ये जश्या ऐतिहासिक गोष्टी आहेत तश्याच भौगोलिक गोष्टींचा देखील वारसा आपल्या महाराष्ट्राला लाभलेला आहे. या महत्वाच्या वारश्यामध्ये महाराष्ट्रातील विविध भौगोलिक आश्चर्ये येतात. मग त्यामध्ये गरम पाण्याचे कुंड असुदे नाहीतर एखादी दुर्मिळ वनस्पती अशी विविध आश्चर्ये आजही महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये विखुरलेली आपल्याला पहावयास मिळतात. अश्या भौगोलिक आश्चर्यांच्यापैकी एक आश्चर्य कोकणामधील हेदवी गावामध्ये आपल्याला बघावयास मिळते हे भौगोलिक आश्चर्य हेदवी गावामध्ये 'बामणघळ' म्हणून प्रसिद्ध आहे.
हेदवी हे गाव मुळातच प्रसिद्ध आहे ते गणपती मुळे याच हेदवीच्या गणपती मंदिरापासून साधारणपणे तीन किलोमीटर अंतरावर आपण फिरत आलो असता आपल्याला समुद्रकिनारी 'उमामहेश्वर' मंदिर पहावयास मिळते. अगदी छोटेखानी असलेले 'उमामहेश्वर मंदिर' टुमदार आहे. या 'उमामहेश्वर' मंदिराला चिटकून जवळच एक डोंगरावरून खाली येणारा पाण्याचा ओहोळ असून या ओहोळामधून येणारी पाण्याची धार येथील जवळच्या कुंडामध्ये पडते. इथूनच आपण थोडीशी चढण चढून वर गेलो असता आपल्यासमोर एक कातळपठार आपल्याला पहावयास मिळते. या कातळपठाराच्या वरून दिसणारा समुद्राचा नजारा आपल्या डोळ्याचे पारणे नक्कीच फेडतो.
याच कातळ पठारावर आपण व्यवस्थित नजर फिरवली तर आपल्याला अरुंद आणि साधारणपणे एक मीटर रुंदी असलेली आणि जवळपास दहा मीटर लांबीची एक नाळ पहावयास मिळते. दोन्ही बाजुला दिसणाऱ्या कातळाखाली सुमारे ६ फुट लांब, २ फुट रुंद आणि ४ फुट उंच अशी कपार असून जेव्हा समुद्राच्या भरतीच्या वेळेस उधाणाच्या मोठ्या लाटांचे पाणी वेगाने या घळीत शिरते. तेव्हा हा वेग इतका असतो की निमुळत्या घळीतून हे पाणी ३० ते ४० फुट उंच उडते. या उंच उडणाऱ्या पाण्याला जलस्तंभ असे देखील संबोधतात. हेदवी येथील बामण घळी मधून होणाऱ्या तुषार स्नानामुळे हा नजारा अगदी बघत बसावासा वाटतो.

हेदवी येथील बामणघळीचा ह्या जलस्तंभाचा अनुभव घ्यायचा असेल तर आपण भरतीची वेळ गाठणे कधीही उत्तम. साधारणपणे समुद्राच्या भरतीचे कोष्टक आपण इथे लक्षात ठेवावे. घळीच्या येथील जलस्तंभ अनुभवायचा असल्यास हे समुद्राच्या भरतीचे कोष्टक आपल्याला महत्वाचे ठरते. 'बामणघळ' बघायला जाणार असाल तर ज्यादिवशी तुम्ही 'बामणघळ' याच्या जवळ असाल त्यादिवशीच्या तिथीची पाऊणपट केली असता आपल्याला भरतीची वेळ काढता येते. या भरतीच्या वेळेच्या अगदी थोडे मागे पुढे आले कि आपल्याला बामणघळीच्या जलस्तंभाचा आस्वाद घेता येतो.
साधारणपणे ऑगस्ट महिन्यानंतर ते दिवाळीपर्यंत अमावास्या, तसेच पौर्णिमेला देखील दुपारी १२ वाजता खात्रीने ही दृष्ये आपल्पयाला पहावयास मिळतात. तसेच त्यानंतर वर्षप्रतिपदेला येणाऱ्या उधाणाच्या भरतीचे वेळीही हा जलस्तंभाचा साक्षात्कार पहाण्याची संधी मिळते. परंतु मे महिन्यात समुद्र शांत असताना हे दृष्य सहसा पहाता येत नाही परंतु एखाद्याचे नशीब जोरात असेल तर क्वचित प्रसंगी हा 'बामणघळ' येथील जलस्तंभ पहावयास मिळतो. 'बामणघळ' येथे फार उन्हामध्ये आपण आलो असता तापलेले खडक इथे थांबणे असह्य करतात.

तसेच अष्टमी द्वादशी याच्यादरम्यान येथे आपण भेट दिली असता सकाळी सकाळी आपल्याला जलस्तंभाचा अविष्कार आपल्याला पहावयास मिळतो. तसेच आपण षष्ठीच्या आसपास जर याठिकाणी भेट दिली तर दुपारी ४ नंतर हा अविष्कार नक्कीच बघायला मिळतो. तसेच भरतीच्या आधी सहा तास आणि नंतरच्या सहा तासांनी समुद्राच्या लाटा 'बामणघळ' याठिकाणी पोहचू शकत नाही त्यामुळे हा जलस्तंभ आपल्याला पहावयास मिळणार नाही. त्यामुळे या वेळा पाळणे अत्यंत आवश्यक आहे. जेणेकरून आपल्याला या जलस्तंभाच्या आविष्काराचा मनसोक्त आनंद घेता येईल.
या घळीचे नाव 'बामणघळ' कसे पडले याबद्दल आजूबाजूच्या पंचक्रोशीमध्ये एक आख्यायिका प्रसिद्ध ती पुढीलप्रमाणे:-
कोणी एक ब्राम्हण अंधाऱ्या रात्री या घळीच्या पाउलवाटेने चालला होता तसेच या ब्राम्हणाला या घळीबद्दल काहीही माहिती नव्हती तेव्हा अंधार असल्याने हा ब्राम्हण या घळीमध्ये पडला आणि तेवढ्यात एक जोरदार लाट आली आणि त्या ब्राम्हणाचे शरीर या जोरदार लाटेमुळे अक्षरशः घुसळून निघाले. दुसऱ्या दिवशी त्या ब्राम्हणाच्या कलेवराचे अवशेष आणि रक्त व मांस यांचा चिखल पहावयास मिळाला तेव्हापासून या जागेस बामणघळ असे नाव पडले. आता हा ब्राम्हण कोण होता ? त्याचे नाव काय ? याचे कोणतेही पुरावे किंवा संदर्भ मात्र उपलब्ध नाहीत. हि केवळ एक लोक आख्यायिका आहे असेच आपल्याला तूर्तास म्हणावे लागेल.

अशी हि 'बामणघळ' हा महाराष्ट्राचा भौगोलिक वारसा असून पाण्याचा जलस्तंभाच्या आविष्काराला अनुभवायचे असेल तर हेदवी येथील 'बामणघळ' आजही आपल्याला साद घालत आहे. अश्या या भौगोलिक आश्चर्याला भेट देऊन आपण आपल्या मुक्कामी परतू शकता आणि या निसर्गनवलाबद्दल इतर लोकांना देखील नक्कीच माहिती सांगू शकता.
______________________________________________________________________________________________
_______________________________________________________________________________________
लिखाण आणि छायाचित्रे © २०२१ महाराष्ट्राची शोधयात्रा
No comments:
Post a Comment
Thank You For Comment...!!! :)