पळसधरीजवळील 'गंभीरनाथाची गुहा'

 

महाराष्ट्रामध्ये बऱ्याचश्या अनवट आणि अनगड जागा आजही अस्तित्वात आहेत. या जागा फिरायच्या असतील तर आपल्याला त्या जागांचा मागोवा घेत फिरण्यासाठी आजही त्यांचा मागोवा घेण्यासाठी काही ट्रेक करावे लागतात अश्याच काही अनवट आणि हटके जागा या लोणावळा आणि खंडाळा परिसरामध्ये वसलेल्या आहेत. फारश्या प्रसिद्धी झोतामध्ये नसलेल्या या जागा आजही आपले अस्तित्व व्यवस्थित टिकवून आहेत. अश्या अनवट जागांच्यापैकी एक जागा म्हणजे 'गंभीरनाथाची गुहा'.


मुंबई ते पुणे हा प्रवास रेल्वेने सगळेच खुपवेळेस करतात याच परिसरात मंकी हिल हे स्थानक फार प्रसिद्ध आहे. या स्थानकाजवळ गाडी कायमच थांबते. येथून दिसणारे पावसाळ्यातील दृश्य अत्यंत मनमोहक असते. त्यामुळे बऱ्याचवेळेस पावसाळ्यात जेव्हा लोक गाडी मंकी हिल याठिकाणी थांबते तेव्हा रेल्वेच्या दारामध्ये दृश्य पहायला गर्दी करतात. याचठिकाणी मंकी हिल आणि ठाकरवाडी या दोन स्थानकाच्यामध्ये बोगदा क्रमांक २८ आणि २९  बोगद्याच्या वर कातळामध्ये एक गुहा खोदलेली पहावयास मिळते. ही कातळातील गुहा म्हणजेच गंभीरनाथाची गुहा होय. 


ठाकूरवाडी येथून दिसणारा राजमाची किल्ला.

या गंभीरनाथाच्या दर्शनाला जायचे झाल्यास आपल्याला वाट वाकडी करूनच जावे लागते. गंभीरनाथाच्या गुहेला जायचे असल्यास आपल्याला रेल्वेचे वेळापत्रक नक्कीच माहिती हवे. सकाळी ६ वाजता निघणारी सिंहगड हा एक उत्तम पर्याय आपल्याला या गुहेपर्यंत जायला आहे. सिंहगड ही रेल्वे मंकी हिल नंतर ठाकूरवाडी येथे जाऊन थांबते आणि जेव्हा गाडी थांबते तेव्हा आपण उतरून घेणे सोयीचे ठरते. येथून आपला प्रवास सुरु होतो तो गंभीरनाथाच्या गुहेकडे जाण्यासाठी. येथून पुढे आपला प्रवास सुरु होतो ते रेल्वे मार्गावरून. मुंबई ते पुणे हा रेल्वे प्रवासमार्ग हा सगळ्यात व्यस्त मार्ग असल्याने येथून सतत रेल्वे जात असतात त्यामुळे गंभीरनाथाच्या गुहेला जाताना शक्यतो रेल्वेच्या रुळावरून जाण्याचा प्रवास टाळावा. 


साधारणपणे दोन ते अडीच किलोमीटर अंतर रेल्वे रुळाच्या बाजूने चालत गेल्यावर रेल्वेच्या मिडल लाईनवर असलेला २७ आणि २८ क्रमांकाचा बोगदा पार करायचा आणि लगेचच आपल्याला डावीकडे २९ नंबरच्या बोगद्यामधून आलेली रेल्वेलाईन बघावयास मिळते. ही रेल्वे लाईन आपण ओलांडली असता आपल्याला डोंगरावर जाणाऱ्या पायऱ्या दिसू लागतात याच पायऱ्यांवरून आपल्या ट्रेकला सुरुवात होते. थोड्याचवेळात डोंगराचा खडा चढ आपल्याला लागतो परंतु वर जाणारी वाट ही मळलेली असल्याने कुठेही चुकायला होत नाही. याच पाऊलवाटेने आपण साधारणपणे अर्ध्या तासात खिंडीमध्ये पाेहोचलेलो असतो. 


रेल्वेचा रूळ आणि बोगदा. 

या खिंडीच्या बरोबर डाव्या बाजूचा डोंगर म्हणजे गंभीरनाथाचा डोंगर होय. या खिंडीच्या मार्गावरून पुढे गेल्यास आपल्याला दगडात कोरलेल्या काही पायऱ्या लागतात. साधारणपणे चाळीस ते पंचेचाळीस पायऱ्या वर चढून आलो असता एक लोखंडी कमान आपले स्वागत करते. या कमानीच्या उजवीकडे जाणाऱ्या रस्त्यवर वळले असता हि पाऊलवाट आपल्याला थेट गंभीरनाथाच्या गुहेकडे घेऊन जाते. या वाटेवरून जाताना आपल्याला एक पाण्याचे खोदीव कोरीव टाके पहावयास मिळते. याच टाक्याच्या मागे नैसर्गिक गुहा असून त्यामध्ये सध्या आपल्याला शिवलिंग आणि नंदी स्थापन केलेले दिसतात. 


यानंतर आपण थेट जाऊन पोहोचतो ते म्हणजे गंभीरनाथ गुहेजवळ. मुळातच ही नैसर्गिक गुहा असून अत्यंत मोठी आहे. या नैसर्गिक गुहेचा वापर नंतरच्या काळामध्ये व्यवस्थित बांधून ध्यानधारणेसाठी केला असावा असे वाटते. या गुहेला एक लोखंडी जाळी लावलेली असून ह्या जाळीचा दरवाजा उघडून आतमध्ये प्रवेश करावा लागतो. जेव्हा हे दार आपण उघडतो तेव्हा त्याच्यानंतर आपल्याला समोर दोन कोनाडे बघावयास मिळतात. यातील डाव्या बाजूच्या कोनाड्यामध्ये आपण डोकावले असता आपल्याला आतमध्ये मोठे पाण्याचे कुंड बघावयास मिळते आणि एक बसायला बाक देखील बघायला मिळतो. तसेच एक यज्ञ वेदी देखील येथे आहे. 


गंभीरनाथाची गुहा.

जेव्हा आपण दुसऱ्या कोनाड्याच्या आत डोकावून पाहतो तेव्हा आपल्याला खुप मोठी खोली बघावयास मिळते यातून जेव्हा आपण आतमध्ये जातो तेव्हा एका कोनाड्यात आपल्याला 'गंभीरनाथ' यांची मूर्ती पहावयास मिळते. गंभीरनाथांचे दर्शन घेऊन आपण गुहेतून बाहेर यावे येथूनच पुढे सरळ जाणारी पाऊलवाट पकडावी आणि पुढे गेले असता आपल्याला एक कोनाडेवजा गुहा बघावयास मिळते. या गुहेमध्ये तंतूवाद्य वाजवणारी एका वादकाची सुंदर मूर्ती बघावयास मिळते. तसेच या वादकाशेजारीच आपल्याला भैरव, गणपती आणि उंदराची मूर्ती कोरलेली आढळते. 


तंतूवाद्य घेतलेला वादक आणि कोनाड्यामध्ये असलेली भैरव, गणपती, आणि उंदराची शिल्पे.   

हे सर्व व्यवस्थित पाहून झाल्यावर आपण आलो त्या मार्गावर परत लागावे आणि खिंडीत येऊन पोहोचावे याठिकाणी आपल्याला दोन मार्ग असतात एकतर आलेल्या वाटेने ठाकूरवाडीच्या दिशेने जावे अन्यथा विरुध्द दिशेने नागनाथ केबिनकडे जाणे असे दोन्ही मार्ग आपल्याला उपलब्ध असतात. परंतु ठाकूरवाडी केबिन कडून जाणे कधीही सोयीस्कर ठरते त्यामुळे खिंडीमधून ठाकूरवाडी स्टेशन गाठून तेथून पुण्याला जाणारी रेल्वे गाठावी आणि आपली गंभीरनाथाची ही अनवट यात्रा सुफल संपूर्ण करावी.

______________________________________________________________________________________________

संदर्भग्रंथ:- 

१) सहली एक दिवसाच्या परिसरात पुण्याच्या:- प्र. के. घाणेकर, स्नेहल प्रकाशन पुणे, २१४.
      
कसे जाल:-
पुणे - तळेगाव - लोणावळा  - ठाकूरवाडी केबिन. 
______________________________________________________________________________________________

महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात.

४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.
_________________________________________________________________________________________________

लिखाण आणि छायाचित्रे  © २०२२  महाराष्ट्राची शोधयात्रा               


       

No comments:

Post a Comment

Thank You For Comment...!!! :)

INSTAGRAM FEED

@maharashtraheritage