कान्हेरीची ' दीपतारा ' पश्चिमेची स्वामिनीमहाराष्ट्रामध्ये सुमारे १२०० च्या आसपास सह्याद्रीच्या कठोर कातळात खोदलेल्या सुंदर लेण्या आहेत ह्या लेण्यांमध्ये काही लेण्या या आज जगप्रसिद्ध आहेत उदाहरण द्यायचे झाले तर अजंठा, वेरूळ, कार्ले, भाजे या सारख्या सुंदर आणि कातळकोरीव लेण्यांमधील शिल्प पहिली असता आपल्या मनाला अनेक प्रश्न सतावतात त्या काळामध्ये आजसारखी प्रगत हत्यारे नसताना एवढी सुंदर शिल्प कशी काय कोरली असतील किंवा या गुहा खोदायला मानवाला किती वेळ लागला असेल हे सारे प्रश्न आपल्याला या सुंदर कातळातील लेण्या आणि शिल्प बघताना पडतात.

मुंबई मधील बोरीवली येथील संजय गांधी वन उद्यानात 'कान्हेरी' हि जगप्रसिद्ध लेणी आहे. बोरिवलीच्या 'कृष्णगिरी डोंगरामध्ये' खोदलेली हि सुंदर लेणी आपले मन थक्क करते. कान्हेरीची हि सुंदर लेणी अत्यंत सुरेख आहे. या कान्हेरी लेणी मध्ये बरीच सुंदर रेखीव शिल्प लपलेली आहेत. सगळे भटके, पर्यटक या कातळ लेणीमध्ये येतात फोटोग्राफी करतात आणि निघून जातात. परंतु येथील शिल्प अभ्यासकांसाठी फार महत्वाची आहेत. या शिल्पांवरून 'मुंबई' आणि प्रांताची प्राचीन संस्कृती अभ्यासाला हि शिल्प मदत करतात. या शिल्पांमध्ये एक शिल्प लपलेले आहेत ते 'दीपतारा' या देवतेचे.

'दिपतारेचे' सुंदर आणि रेखीव शिल्प कान्हेरी लेणीच्या तिसऱ्या चैत्य गुहेमध्ये जी ओवरी आहे त्या ओवरीच्या डाव्या बाजूस 'भगवान गौतम बुद्धाची' वरद मुद्रारुपात २५ फुट उंच मूर्ती पहायला मिळते  त्या मूर्तीच्या  उजव्या बाजूस 'दीपतारा' आपल्याला बघायला मिळते. जसे कान्हेरी लेणी मध्ये आपण जातो तसा प्राचीन बौद्ध धर्म प्रसारकेंद्र असलेल्या कान्हेरीच्या लेण्यांचा शिल्पपट आपल्या डोळ्यासमोर उलगडत असतो त्यातच 'दीपतारा' हे शिल्प आपल्या डोळ्यांचे पारणे फेडते. या दीपतारेच्या शेजारी आपल्याला 'अवलोकितेश्वर' देखील बघायला मिळतो. कान्हेरी लेणी मध्ये स्थानापन्न असलेली हि सुंदर 'दीपतारा' अत्यंत उत्कृष्ट रित्या कारागिराने कोरलेली आहे.
'भगवान गौतम बुद्धाची' वरद मुद्रारुपात असलेली मूर्ती आणि उजवीकडे असलेली 'दीपतारा' 

कान्हेरी या लेणी मध्ये बौद्ध धर्मातील वज्रयान पंथ हा 'द्वितीय कपर्दकीच्या' काळामध्ये आला हे त्याच्या कान्हेरीच्या शिलालेखांवरून आपल्याला समजते. त्याचा एक मुख्य पुरावा म्हणजेच ही 'दीपतारा' असून 'दीपतारा' ह्या देवतेला बौद्ध धर्माच्या वज्रयान पंथामध्ये एक महत्वाची देवी मानले जाते. वज्रयान पंथामध्ये 'दीपतारा' या देवतेचे स्वतंत्र स्थान आहे. दीपतारा ही भक्तांची तारिणी असल्यामुळे दीपतारा या देवतेची भक्तांनी तिला वेगवेगळी रूपे आणि नावे दिलेली आढळतात.  लेह-लडाख तिबेट या भागामध्ये वज्रयान पंथ मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्या भागातील 'तारा' या देवतेची शिल्प बघण्यासारखी आहेत.

'दीपतारा' ही सर्व भयापासून आपल्या भक्तांना मुक्त करते अशी ही तारिणी आहे. 'तारा' या दैवताचे उल्लेख फक्त बौद्ध धर्मात आढळत नसून हिंदूधर्मात देखील मिळतात. हिंदू धर्मामध्ये तारा देवतेस 'नौकेश्वरी' असे म्हटलेले आहे. 'दीपतारा' या देवतेचे शिल्प कान्हेरी लेणी वगळता आपल्याला नाशिक, वेरूळ येथेही आहेत परंतु कान्हेरीची 'दीपतारा' ही जास्त वेगळी आणि कोरीव आहे.

'दीपतारा' या देवतेबद्दल माहिती घ्यायला गेले तर ही देवता 'वज्रतारा' या देवतेच्या मंडल देवतांपैकी एक देवता असल्याची आपल्याला आढळते. मंडलदेवतांमध्ये चार दिशांची वेगवेगळी चार तारा रूपे सांगितलेली आहेत. यामध्ये पूर्वेची ही पुष्पतारा, पश्चिमेची दीपतारा, दक्षिणेची धूपतारा, आणि उत्तरेची गंधतारा अश्या चार रूपांमध्ये तारा आपल्याला बघायला मिळतात. कान्हेरीची तारा ही 'दीपतारा' असून हे शिल्प साधारणपणे तीन फुट उंच आहे. 'दीपतारा' ह्या शिल्पाच्या डाव्या हातामध्ये कमळ दाखवलेले असून उजव्या हातामध्ये दीपयष्टी आपल्याला बघावयास मिळते तसेच कुरळ्या केसांच्या बटा या दीपतारेच्या मुगुटावर बांधलेल्या असून डोक्यावर चंद्रलेखा देखील कोरलेली आहे.

'दीपतारा' या देवतेचे रूप हे सौम्यस्वरूप दाखवलेले असून २५ फुट उंच बुद्ध मूर्तीजवळ उभी असल्यामुळे दीपतारेची नजर बुद्ध मूर्तीच्या पायांजवळ दाखवलेली आपल्याला बघायला मिळते. या मूर्तीवरचे अलंकार अगदी थोडेसे बघायला मिळतात. हातामध्ये काकणे घातलेली आहेत तर दोन्ही पायांमध्ये आपल्याला वाळा बघायला मिळतात, तसेच कमरेमध्ये मेखला, गळ्यामध्ये घातलेला गळेसर आणि मेखलेपर्यंत घातलेले तमलवस्त्र अक्षरशः बघण्यासारखे आहे.

साधनमाला या ग्रंथामध्ये 'दीपतारा' या देवतेचे वर्णन पुढीलप्रमाणे केलेले आहे:-

        पश्चिमे दीपताराश्च दीपयष्टी करांकुली |
           पीतवर्णा महाभूषा चलत्क्नककुंडला ||  


कान्हेरी लेण्यामधील 'दीपतारा' या देवतेचे शिल्प.

या श्लोकाचा अर्थ पुढीलप्रमाणे:-

ही देवता पश्चिमेची अधिष्ठात्री देवता आहे. ती पीतवर्णा असून तिच्या कानामध्ये लोंबणारी सुवर्णकुंडले आहेत. दीपतारेच्या मस्तकावर चंद्रलेखा असून नाविकांना मार्गदर्शक असणारी दीपतारा हातामध्ये दीपयष्टी घेऊन उभी आहे. 

दीपतारेच्या मस्तकावर जी चंद्रलेखा दाखवली आहे ती यासाठीच दाखवलेली आहे त्याचे कारण म्हणजे प्राचीन काळामध्ये व्यापाऱ्यांना चंद्र ताऱ्यांंखेरीज दुसरे मार्गदर्शक नव्हते दीपतारेच्या मस्तकावरील चंद्रलेखा सागरी व्यापाऱ्यांना योग्य दिशा दर्शक होती. कल्याण, चौल, नालासोपारा या प्राचीन बंदरांचा व्यापार फार मोठ्या प्रमाणात जगाशी होता अरब आणि इटली या देशांशी व्यापार मोठ्या प्रमाणात चालत असे यासाठी आपला माळ समुद्रामधून व्यवस्थित नेता यावा म्हणून 'दीपतारा' या देवतेची पुजा भारतातील व्यापारी लोकांनी सुरु केली आणि त्याला पुढे मूर्त स्वरूप देण्यात आले .

अश्या प्रकारे ही 'दीपतारा'  आजही आपल्या दीपयष्टीमधून लोकांना प्रकाश देत वाट दाखवण्याचे काम करत आहे हे कान्हेरी येथील दीपतारेच्या सुंदर शिल्पावरून आपल्याला बघायला मिळते. असे हे सुंदर 'दीपतारेचे' शिल्प आजही कान्हेरी लेणीच्या एका कोपऱ्यामधून आपल्याला खुणावत आहे. कला आणि धर्म यांचा सुरेख संगम आजही ही कान्हेरी मधील पश्चिमेची अधिष्ठात्री असणारी 'दीपतारा' आपल्याला नक्कीच मंत्रमुग्ध करते.

'दीपतारा'
_________________________________________________________________________________

संदर्भ ग्रंथ:-
१) Research Paper Tara Sculptures From Kanheri:- Dr.Suraj Pandit
२) भारताचे संस्कृती वैभव लेखमाला:- डॉ. शोभना गोखले.     

______________________________________________________________________________________________

महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात.

४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.

_________________________________________________________________________________________

लिखाण आणि छायाचित्रे © २०१६ महाराष्ट्राची शोधयात्रा.
                  
        

   

              

No comments:

Post a Comment

Thank You For Comment...!!! :)

INSTAGRAM FEED

@maharashtraheritage