वसिष्ठीच्या मुखाजवळचे अपरिचित गिरीशिल्प 'पांडव लेणे'महाराष्ट्रामध्ये अशी काही ठिकाणे आहेत कि त्यांची माहिती मिळवण्याचा किंवा शोधून काढायचा कितीही प्रयत्न केला तरी म्हणावी तशी माहिती आपल्याला सापडत नाही अशीच काहीशी गत काही आडवाटेवर असलेल्या लेण्यांच्या बद्दल होते. महाराष्ट्रात अनेक परिचित आणि अपरिचित 'लेण्या आणि किल्ले' आहेत. यातील बऱ्याच लेण्यांना भटके आणि पर्यटक मोठ्या संख्येने भेट देत असतात तर काही सुंदर 'गिरीशिल्पे' आजसुद्धा इतिहासाचे मूक साक्षीदार बनुन सह्याद्रीमध्ये वर्षानुवर्षे उन, वारा, पाऊस झेलत ताठ मानेने त्यांचे अस्तित्व दाखवत उभे असलेले आपल्याला बघायला मिळतात.

एकेकाळी हीच सुंदर गिरीशिल्पे कोकणातून घाटावर जाण्यासाठी पांतस्थांच्या मुक्कामाची ठिकाणे आणि धर्म तत्वज्ञानासाठी म्हणून कोरली गेली. या लेण्यांचा वापर बौद्ध भिक्षु त्यांच्या वर्षावासाच्या काळात राहण्यासाठी करत असत अश्याच अनेक ऐतिहासिक घटनांची मूक साक्ष देत कोकणातील वासिष्ठीच्या मुखाजवळ 'पांडव लेणे’ नावाचे सुंदर गिरीशिल्प सह्याद्रीच्या पोटात खोदले गेलेले सुंदर गिरीशिल्प आजही भटक्यांची आतुरतेने वाट पाहात आहे.


कोकणच्या भूमीची जीवनदायनी वसिष्ठीच्या मुखावर चिपळूण हे सुंदर टुमदार तालुक्याचे ठिकाण वसलेले आहे. या चिपळूण गावाला हजारो वर्षांची ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली आहे. परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन असलेले चिपळूण गावापासून हाकेच्या अंतरावर कोरलेले अपरिचित गिरीशिल्प ' पांडव लेणी ' हे गिरीशिल्प पाहायचे असेल तर स्वतःची गाडी असणे कधीही उत्तम.

या अपरिचित लेण्या बघायच्या असतील तर चिपळूण शहरातून गुहागर शहराकडे जाण्यासाठी नवा बायपास (पर्यायी मार्ग) काढण्यात आला आहे. चिपळूण-गुहागर या मार्गावरून प्रवास करताना एक छोटासा घाट लागतो त्याच्या पहिल्याच टर्न वरती डाव्या हाताला महालक्ष्मी नावाचा डोंगर लागतो या महालक्ष्मी डोंगराच्या पोटात 'पांडव लेणी' ची सुंदर गिरीशिल्प खोदलेली आपल्याला बघावयास मिळतात.

आडवाटेवरच्या डोंगरात वसलेल्या लोक आख्यायिके प्रमाणे पांडवांच्या (बौद्ध भिक्षूंच्या) या लेणी मध्ये तीन लेण्यांचा समूह आपल्याला बघावयास मिळतो. तसेच या लेण्यांच्या बाजूला एक छोटे टाके देखील खोदलेले असून त्या टाक्याकडे जाण्यासाठी दगडी पायऱ्या देखील खोदलेल्या आढळतात. लेण्यांचा समूह अत्यंत लहान असून लेण्या पाहायला फारसा वेळ लागत नाही.


लेणी क्रमांक १:- 

पहिली लेणी हि अत्यंत छोटी असून साधारणपणे तिची लांबी आणि रुंदी १० x १० आहे. या लेणी मध्ये बौद्ध भिक्खूंना झोपण्यासाठी एक दगडी बाक देखील दिसतो परंतु त्याची आज फारच बिकट अवस्था आहे. 

लेणी क्रमांक २:- 

दुसरे लेणे हे पहिल्या लेण्यापेक्षा थोडेसे मोठे असून त्या लेण्यामध्ये काहीतरी खोदायचा प्रयत्न केला गेला असावा असे दिसून येते.


लेणी क्रमांक ३:-

तिसरी लेणी हे सर्वात मोठे आणि प्रमुख लेणे आहे. ह्या लेण्यामध्ये एक स्तूप म्हणजे दागोबा होता परंतु आज हा स्तूप अर्ध्या अवस्थेत राहिला असून त्याच्या दागोबा वर आज गणपती आणि महादेवाच्या लिंगाची स्थापना झाली असून हे एक ' पांडव कालीन महादेवाचे ' स्थान म्हणून चिपळूण आणि आजूबाजूच्या गावातील लोक इथे दर्शनास येतात. या लेण्यामध्ये वरच्या बाजूस हार्मिका देखील बघावयास मिळते. तसेच या लेण्यांमध्ये काही पोस्ट होल्स व दिवे ठेवण्यासाठी खाचा केलेल्या आढळून येतात. तसेच या लेण्याच्या बाजूला एक छोटे टाके देखील खोदलेले असून त्या टाक्याकडे जाण्यासाठी दगडी पायऱ्या देखील खोदलेल्या आढळतात.


या लेण्या साधरणतः इ.स. २ ते इ.स ३ ऱ्या शतकात खोदल्या असाव्यात असे या लेण्या पाहिल्यावर वाटते. या लेण्या गुहागर आणि चिपळूण यांना जोडणाऱ्या बायपास वर असल्यामुळे या लेण्यांचे महत्व पूर्वीच्या काळी बरेच असावे कारण या लेण्यांपासून समोरच्या बाजूस पाहिले तर जंगली जयगड आणि कुंभार्ली घाटमाथा नजरेस पडतो तसेच या लेण्यांच्या आजूबाजूला कोळकेवाडी आणि कळंबस्तेच्या लेण्या अगदीच जवळ आहे तसेच वसिष्ठी नदी या लेण्यांच्या समोरच आपल्याला बघावयास मिळते तसेच या लेण्यापासून अगदी जवळ गोवळकोट किल्ला आहे आणि गुहागरचे अंतर या लेण्यांपासून सुमारे ३५ कि.मी. आहे तर चिपळूणचे अंतर ५ कि.मी. आहे.

एखादी छान 'लाँग ड्राईव्ह' करायची असेल तर चिपळूणवरून गुहागरला या रस्त्यावरून जाताना इतिहासाच्या अपिरीचीत पांडव लेणी या मूकसाक्षीदाराला नक्की भेट द्या हे गिरीशिल्प नेहमी तुमचे आनंदाने स्वागतच करेल.

______________________________________________________________________________________________

संदर्भग्रंथ:-
१) Cave Temples of India- Jamesh Burges & James Ferguson. 1880.   

कसे जाल:-
पुणे – कात्रज – सातारा – पाटण – कुंभार्ली घाट – चिपळूण – पांडव लेणे.

______________________________________________________________________________________________
महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात.

४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.

______________________________________________________________________________________________

लिखाण आणि छायाचित्रे © २०१६ महाराष्ट्राची शोधयात्रा.

No comments:

Post a Comment

Thank You For Comment...!!! :)

INSTAGRAM FEED

@maharashtraheritage