पुण्यामधील नारायण पेठेमध्ये असलेले अपरिचित 'शेषशायी विष्णू मंदिर'


पुणे हे जसे विद्येचे माहेरघर समजले जाते तसेच पुणे हे विविध मंदिरांसाठी देखील प्रसिद्ध आहे म्हणूनच पुणे शहराची ओळख हि 'मंदिरांचे शहर' म्हणून देखील सगळीकडे आहे. अश्याच या पुणे शहरातील मंदिरांची नावे देखील आपल्याला गमतीशीर आढळून येतात परंतु या मंदिराच्या शहरामध्ये नारायणपेठेमध्ये एक छानसे आणि वैशिष्ट्यपूर्ण 'शेषशायी विष्णूचे' फारसे परिचित नसलेले सुंदर मंदिर पुण्याच्या मध्यवस्तीमध्ये आपल्याला पहायला मिळते. 

पुण्यामधील हे अपरिचित 'शेषशायी विष्णूचे' मंदिर पाहायचे असल्यास आपण 'अप्पा बळवंत' चौकातून केळकर रस्त्यावर लागावे तेथून रमणबाग चौकाकडे जाताना आपल्या डाव्या बाजुस एच.डी.एफ.सी. बँकेची नारायण पेठ ब्रांच लागते तेथेच अलीकडे डाव्या बाजूस आपल्याला या 'श्री शेषशायी मंदिर' अशी पाटी वरच्या बाजूस आपल्याला पाहायला मिळते. अजून एक मंदिराच्या जवळची खून म्हणजे श्रीकृष्ण ब्रॉस बँँड हे दुकान याच्या शेजारून  आपल्याला या मंदिराकडे आतमध्ये जाता येते.

'श्री शेषशायी विष्णू मंदिर'

नारायण पेठेतील एका जुन्या  वाड्याच्या आतमध्ये असलेले हे मंदिर खरोखरच एकवेळ शंका आणते कि आपण खरच पुण्याच्या मध्यवस्तीत आहोत कि काय एवढी शांतता तिथे अनुभवयाला मिळते. वाड्याच्या दरवाजातून आतमध्ये गेल्यावर आपल्याला उजवीकडे एक आड देखील पाहायला मिळतो आजही तो आड तेथील लोक वापरतात. तेथून पुढे सरळ गेल्यावर आपल्याला झाडीमध्ये मंदिर समोरच बघायला मिळते. 

मंदिराच्या दरवाजातून आतमध्ये गेल्यावर आपल्याला एक समाधी पाहायला मिळते. ह्या समाधीचा चौथरा हा संगमरवरी असून याच्या माथ्यावर आपल्याला शिवलिंग पाहायला मिळते. हि समाधी केशव नारायण दामले उर्फ सच्चीदानंद स्वामी यांची आहे. इ.स. १९०६ साली केशवराव दामले यांनी काशी येथे जाऊन  संन्यास घेतला आणि इ.स. १९१० साली त्यांनी या मंदिरामध्ये संजीवन समाधी घेतली. 

वाड्याच्या आतमध्ये असलेला 'आड'. 

हि समाधी पाहून समोरच्या बाजूस आपल्याला एका लाकडाच्या देवघरात 'शेषशायी विष्णूची' सुंदर मूर्ती पाहायला मिळते. हि मूर्ती धातूची असून या 'शेषशायी विष्णूचे' मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हि मूर्ती 'पद्मनाभ' आहे. 'पद्मनाभ' मूर्ती म्हणजे विष्णूच्या बेंबीमधून लांब देठाचे कमळ वर आलेले आहे आणि त्या कमळाच्या मध्ये चार तोंडे असलेली तसेच दोन हात असलेली अशी ब्रम्हदेवाची छोटी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. ह्या विष्णूमूर्तीचे अजून एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये असलेल्या ब्रम्हदेवाची मूर्ती तसेच कमळ हे सुटे देखील करता येतात. 

मंदिरामधील 'शेषशायी विष्णूची' मूर्ती नीट पाहिली तर आपल्याला त्याच्या उजव्या खालच्या हातामध्ये गदा पाहायला मिळते. तसेच उजवा वरचा हात हा मानेखाली डोक्याला आधार देणारा घेतलेला पाहायला मिळतो. तसेच विष्णूने डाव्या वरच्या हातामध्ये शंख घेतलेला असून डावा खालचा हात मांडीवर ठेवलेला पाहायला मिळतो. तसेच विष्णूचा उजवा पाय हा लक्ष्मीच्या मांडीवर असून विष्णुपत्नी लक्ष्मी हि विष्णूचा पाय चेपताना दाखवली आहे. या मूर्तीमध्ये लक्ष्मीची केश रचना आणि वेशभूषा आणि अलंकार हे पेशवे काळातील वाटतात.

मंदिराचा सभामंडप आणि समोर असलेल्या मोठ्या देवघरात विष्णूमूर्ती आहे.

 हि समाधी केशव नारायण दामले उर्फ सच्चीदानंद स्वामी यांची आहे. 

अशी हि सुंदर 'शेषशायी विष्णू' मूर्ती पहायची असेल तर नारयण पेठेमधील हे मंदिर नक्कीच पाहावे. ह्या मंदिराची व्यवस्था तेथील विश्वस्तांकडे असून या मंदिराची सध्याची अवस्था जास्त चांगली नाहीये. मंदिरासाठी कोणताही कर्मचारी वर्ग नाही कारण मंदिराला तेवढे उत्पन्न नाहीये. हे मंदिर बघायचे असल्यास आपल्याला सकाळी १० ते १०.३० या वेळेमध्ये जावे लागते पूजेसाठी हे मंदिर तेवढ्यावेळ उघडे असते त्यानंतर मात्र हे मंदिर दिवसभर बंद असते. 'वझे' नावाचे गृहस्थ हे येथे पूजा करतात ते असताना आपल्याला हि मूर्ती आणि मंदिर पाहायला मिळते. असे हे पुण्याच्या मध्यवस्तीमध्ये असलेले सुंदरमंदिर नक्कीच पाहावे या मंदिरातील धातूची 'शेषशायी विष्णू' मूर्ती आपल्याला नक्कीच मंत्रमुग्ध करते.

'शेषशायी विष्णूचे' मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हि मूर्ती 'पद्मनाभ' आहे. 

______________________________________________________________________________________________

कसे जाल:-
शिवाजीनगर – अप्पा बळवंत चौक – नारायण पेठ.  

टीप:-

मंदिर सकाळी फक्त १० ते १०.३० या वेळेत उघडे असते.

______________________________________________________________________________________________


महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात.

४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.
_________________________________________________________________________________________________

लिखाण आणि छायाचित्रे  © २०१९  महाराष्ट्राची शोधयात्रा

      
   
5 comments:

 1. छान माहिती साठी धन्यवाद

  ReplyDelete
 2. खुपचं सुंदर माहिती दिली आहे मनःपुर्वक धन्यवाद.अशी अपरिचित ठिकाणे दाखवावित हि विनंती

  ReplyDelete
 3. खूपच चांगली आणि नवीन गोष्ट माहिती झाली. धन्यवाद !

  ReplyDelete
 4. खुप छान व वेगळी माहिती मिळाली ..धन्यवाद🙏🏻

  ReplyDelete
 5. खुप छान व वेगली माहिती मिलाली.
  धन्यवाद

  ReplyDelete

Thank You For Comment...!!! :)

INSTAGRAM FEED

@maharashtraheritage