पालशेत येथील 'लक्ष्मी नारायण मंदिर'

 

कोकणच्या परीसरामध्ये आपल्याला खूप ऐतिहासिक आणि ठिकाणे बघायला मिळतात. नारळी पोफळीच्या बागांच्यामध्ये वसलेल्या या कोकणच्या भूमीमध्ये आपल्याला ऐतिहासिक भौगोलिक गोष्टींचा वारसाच जणू लाभलेला आपल्याला बघायला मिळतो. तसेच कोकणातील वैशिष्ट्यपूर्ण मंदिरे हि आपल्याला नेहमीच आकर्षित करतात. असेच एक सुंदर मंदिर गुहागर पासून अगदी हाकेच्या अंतरावर पालशेत गावामध्ये असून आजूबाजूच्या परीसरामध्ये ते मंदिर 'लक्ष्मी केशव मंदिर' म्हणून ओळखले जाते.


कोकण  परिसरामध्ये जशी किल्ले, लेणी प्रसिद्ध आहेत तशीच कोकणातील मंदिरे देखील नक्कीच वैशिष्ट्यपूर्ण आणि पाहण्यासारखी आहेत तसेच येथील मंदिरांना इतिहास देखील लाभलेला असून हि मंदिरे त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण बांधणीमुळे ओळखली जातात. असेच एक  मंदिर गुहागर पासून केवळ सात किलोमीटर अंतरावर पालशेत येथे लक्ष्मी केशवाचे एक सुरेख देऊळ आपल्याला बघायला मिळते. तसेच पालशेत गावाला समुद्रकिनारा देखील लाभला असल्याने पालशेत गावाच्या सौंदर्यात अजून भर नक्कीच पडते.


पालशेत येथील लक्ष्मी नारायण आणि श्रीकाशीविश्वेश्वर मंदिर.


जेव्हा आपण मंदिराच्या आवरात पोहोचतो तेव्हा मंदिर रचना आपले नक्कीच लक्ष वेधून घेते. संपूर्ण मंदिराला दगडी तटबंदी असून या मंदिराची उंच शिखरे नक्कीच आकर्षित करतात. लक्ष्मी केशव मंदिराच्या  दगडी तटबंदीच्या प्रवेशद्वारातून आपल्याला आतमध्ये मंदिराच्या आवारात प्रवेश करता येतो. जेव्हा आपण या प्रवेशद्वारातून आतमध्ये येतो तेव्हा आपल्याला मंदिराच्या आवारामध्ये दोन सुंदर दीपमाळा आणि काही समाध्या आपल्याला पाहायला मिळतात. मंदिराचा आवार जवळपास दोन एकर असून यामध्ये आपल्याला लक्ष्मी केशव मंदिरासोबत काशीविश्वेश्वर याचे देखील मंदिर पहायला मिळते.


मंदिराच्या आवारामध्ये दोन सुंदर दीपमाळा आणि काही समाध्या आपल्याला पाहायला मिळतात.


येथील काशी विश्वेश्वर मंदिराची रचना हि नक्कीच पाहण्यासारखी असून श्री काशीविश्वेश्वर याच्या मंदिराला आपल्याला सभामंडप पहावयास मिळतो. तसेच काशी विश्वेश्वर मंदिराचा गाभारा हा जवळपास पाउण मीटर खोल असून त्यामध्ये आपल्याला शिवलिंग पाहायला मिळते. शिवलिंगाचे दर्शन घेऊन बाहेर आल्यावर आपल्याला काशीविश्वेश्वर याच्या गाभाऱ्याच्या बाहेर डाव्या बाजूला आपल्याला काळ्या पाषाणातील सुंदर गणपतीची मूर्ती पहावयास मिळते. तसेच गणपतीची मूर्ती नीट पाहिली असता गणपतीने मांडी घातलेली असून त्याच्या उजव्या हातामध्ये आपल्याला मोदक पहायला मिळतो तसेच त्याच्यावर गणपतीने सोंड देखील टेकवलेली पहावयास मिळते. तसेच गणपतीचा डावा हात हा अभयमुद्रेत असून हि मूर्ती नक्कीच बघण्यासारखी आहे. तसेच सभामंडपामध्ये आपल्याला नंदी देखील पहावयास मिळतो.


श्री काशीविश्वेशर मंदिरातील शिवलिंग, नंदी आणि गणपती.


श्री काशीविश्वेशराचे दर्शन घेऊन बाहेर आल्यावर लक्ष्मीनारायणाच्या मंदिरात आपण जेव्हा प्रवेश करतो तेव्हा येथील लक्ष्मी नारायणाची मूर्ती नक्कीच आपले लक्ष वेधून घेते. छोट्या चौथऱ्यावर लक्ष्मी आणि केशव यांच्या वेगवेगळ्या मूर्ती येथे आपल्याला पहायला मिळतात. केशवाच्या मूर्तीच्या मागे प्रभावळ देखील आपल्याला पहावयास मिळते. तसेच केशवाच्या बाजूस गरुडाची देखील मूर्ती आपल्याला कोरलेली पहावयास मिळते. या लक्ष्मी केशवाच्या दोन्ही मूर्ती या संगमरवरी असून नक्कीच आपले लक्ष वेधून घेतात. तसेच लक्ष्मी केशवाच्या या मूर्ती जवळपास २५० ते ३०० वर्ष जुन्या असून या मंदिराची बांधणी हि पेशवेकाळात झालेली असावी हे या मंदिराच्या रचनेवरून आपल्याला समजते.


पालशेत येथील लक्ष्मी केशवाची संगमरवरी मूर्ती.


असे हे पालशेत समुद्रकिनाऱ्यापासून अगदीच जवळ असलेले लक्ष्मी नारायणाचे सुंदर मंदिर नक्कीच पालशेतच्या सौंदर्यामध्ये नक्कीच भर घालते. आजही फारसे प्रसिद्ध नसलेले पालशेत येथील पेशवे काळातील लक्ष्मी नारायण मंदिर पालशेत गावाचे नक्कीच आकर्षणाचे केंद्रबिंदू बनू शकते. अश्या या फारसे प्रसिद्ध नसलेल्या पालशेतच्या 'लक्ष्मी नारायण' मंदिराला नक्कीच भेट देणे गरजेचे ठरते. 

______________________________________________________________________________________________  

कसे जाल:-

पुणे - स्वारगेट - नसरापूर - सातारा - उंब्रज - पाटण - चिपळूण - शृंगार तळी - पालशेत.


संदर्भग्रंथ:-

१) साद सागराची:- पराग पिंपळे, बुकमार्क पब्लिकेशन, २०१४. 

______________________________________________________________________________________________


महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात.

४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.

______________________________________________________________________________________________


लिखाण 
आणि छायाचित्रे © २०२१ महाराष्ट्राची शोधयात्रा        


No comments:

Post a Comment

Thank You For Comment...!!! :)

INSTAGRAM FEED

@maharashtraheritage