गुहागर आणि त्याचा आजूबाजूचा परिसर मुळातच निसर्गरम्य असून आजही तेथील गर्द वनराई आणि समुद्र किनारा सगळ्यांना आकर्षित करतो. याच गुहागर आणि परिसरामध्ये आजही बरेच ऐतिहासिक अवशेष लपलेले आपल्याला आढळून येतात. गुहागर पासून अगदी हाकेच्या अंतरावर समुद्रकिनारी वसलेले पालशेत गाव आजही जास्त प्रसिद्ध नाही. समुद्र किनाऱ्यावर वसलेले निसर्गरम्य पालशेत गाव आजही आपल्याला खुणावते तेथील समुद्रकिनाऱ्यामुळे तसेच एवढेच नव्हे तर या पालशेत गावामधील लक्ष्मीकेशव मंदिर हे देखील अत्यंत सुंदर आणि बघण्यासारखे आहे. पेशवे काळातील या मंदिरासोबतच पालशेत गावामध्ये लपले आहेत ते म्हणजे प्राचीन बंदरांचे अवशेष.
गुहागर पासून हाकेच्या अंतरावर वसलेल्या पालशेत गावाला मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. पालशेत गावामध्ये असलेले 'लक्ष्मी नारायण' मंदिर नक्कीच पाहण्यासारखे आहे. हे पेशवे काळातील मंदिर नक्कीच गावातील आकर्षणाचा केंद्रबिंदू असून येथूनच जवळ पालशेत गावामध्ये २००१ मध्ये प्राचीन बंदराचे अवशेष मिळालेले आहेत. तसे पहायला गेले तर खाडी किंवा नदीकिनारी हे पालशेतचे प्राचीन बंदर आपल्याला दिसून येत नाही पालशेत गावातील 'लक्ष्मी नारायण' मंदिराला लागून आपण निट पाहिले तर आपल्याला पालशेत येथील पचिन बंदराची भिंत व्यवस्थित पाहता येते.
प्राचीन बंदराची गाडलेली भिंत हि आपल्याला मंदिराच्या मागे जमिनीत गाडलेली गेल्याची पहायला मिळते. पालशेत येथील 'लक्ष्मी नारायण' मंदिराच्या जवळून साधारणपणे एक किलोमीटर अंतर नदीच्या पात्राच्या बाजूने चालत गेल्यावर आपल्याला पालशेत येथील प्राचीन बंदरांचे अवशेष आपल्या नजरेस पडतात. प्राचीन पालशेत बंदराचा शोध घेताना इ.स. १८८४ सालचा कोकणचा नकाशा घेऊन या गावाची पुरातत्व अभ्यासकांच्या कडून स्थाननिश्चिती करण्यात आली आणि शोधकार्य चालू झाले. डॉ. गोगटे यांनी या बंदराच्या उत्खननाचे काम केलेले असून या कामी त्यांना डॉ. प्रकाश जोशी, डॉ श्रीकांत प्रधान, नितीन हडप यांचे सहकार्य हे उत्खनन करताना त्यांना झाले. पालशेत बंदराचा शोध घेत असताना बंदराच्या सुरक्षेसाठी नदीपात्रामध्ये बांधण्यात आलेली तीन मीटर उंचीची भिंत पहिल्यांदा आढळली त्याच्यानंतर पुढील शोध घेत असताना मातीमध्ये गाडल्या गेलेल्या प्राचीन बंदराच्या खुणा डॉ. गोगटे यांना सापडल्यानंतर येथेच त्यांना विशीष्ट आकाराच्या दगडी खुणा देखील सापडल्या म्हणून या प्राचीन पालशेत बंदराच्या परिसरात पुढे उत्खनन करण्यात आले.
जवळपास नव्वद मीटर लांबीच्या या प्राचीन बंदरामध्ये जहाजे उभी करण्यासाठी चार धक्के आढळून आले. तसेच येथूनच जवळ श्री. भावे यांच्या घराजवळ नदीकाठी जवळपास ८०० वर्ष जुने तीन गोडाऊन देखील आढळून आले. या गोडाऊनचा वापर व्यापारी माल ठेवण्यासाठी देखील करत असावेत. या गोडाऊनच्या अवशेषांपासून समुद्रापर्यंत थेट जवळपास दोन ते अडीच किलोमीटर लांबीचे हे बंदर होते हे येथील अवशेषांच्या वरून समजते. तसे प्राचीन संदर्भ पहायला गेले तर सम्राट अशोकाच्या कालखंडामध्ये गुजरात ते कन्याकुमारी हा समुद्र किनाऱ्यावरून जाणारा व्यापारी मार्ग होता. या प्राचीन मार्गाच्या खुणा या पालशेत म्हणजेच प्राचीन काळातील 'पालपट्टमयी' बंदरामधून वेळणेश्वर येथे जाणाऱ्या मार्गावर पुरातत्व अभ्यासकांना खुणा सापडलेल्या आहेत. तसेच या प्राचीन महामार्गावर पायऱ्या असलेल्या विहिरी तसेच निवाऱ्याची जागा देखील सापडलेली आहे. तसेच या भागाचा प्राचीन व्यापार चीनशी चालत असे याचा पुरावा दर्शवणारा ड्रॅॅगन असलेला एक चीनी जार(जग) देखील सापडलेला आहे.
सध्या येथील बंदराच्या ठिकाणी नारळी-पोफळीच्या बागा आहेत. तसे पहायला गेले तर पालशेत येथील प्राचीन बंदराचे आजही जे अवशेष आपल्याला सुंदरी नदीच्या किनारी पहायला मिळतात ते नक्कीच पाहण्यासारखे आहेत. याठिकाणी आपल्याला दगडामध्ये बांधून काढलेल्या बंदराचे अवशेष आणि विहीर देखील आपल्याला पहायला मिळते. हे सर्व बांधकाम हे जांभ्या दगडात केलेले असून बंदराच्या बांधकामासाठी कोणतेही मिश्रण वापरलेले दिसून येत नाही हे विशेष. या प्राचीन बंदरांचे जवळपास दीड मीटर उत्खनन आज झालेले असून याठिकाणी आपल्याला समांतर पायऱ्या तसेच साधारणपणे पाच ते सहा मीटर अंतरावर गोलाकार बुरुज देखील आपल्याला पहायला मिळतात.
याची रचना जर आपण नीट पाहिली तर पाण्याच्या अतिक्रमणाचा कोणताही त्रास होऊ नये आणि बोटी लावणे अत्यंत सोयीचे जावे तसेच मालाची ने आण करणे देखील सोयीचे जावे म्हणून येथे बुरुज बांधलेले असावेत असे वाटते. साधारणपणे बंदराच्या इतिहासाचा मागोवा घेतला तर इ. स. १ ल्या शतकात एक ग्रीक प्रवासी आला होता त्याने आपले सगळे वर्णन 'पेरिप्लस ऑफ द एरीथ्रीयन सी' या ग्रंथामध्ये नोंदवलेले आहे. या 'पेरिप्लस ऑफ द एरीथ्रीयन सी' या ग्रंथाच्या नोंदीप्रमाणे कोकण किनारपट्टीवर अनेक बंदरे होती असे उल्लेख आढळून येतात. या संदर्भावरून इ.स. २ रे शतक ते इ.स. १६ वे शतक यादरम्यान पालशेत येथे व्यापारी बंदर तसेच प्रशासकीय व्यवस्था होती असे काही संदर्भांच्यावरून तसेच पुराव्यांमधून दिसून येते.
पालशेत बंदराचे प्राचीन नाव हे 'पालपट्टमयी' असे असून या नावाने पालशेत बंदर ओळखले जात असे. इ.स. १६ व्या शतकापर्यंत वापरात असलेले बंदर हे कालौघात पडलेल्या दुष्काळामुळे तसेच समुद्राचे पाणी नदीत शिरून तयार झालेल्या वाळूच्या गाळाने हे बंदर बुजले असावे. असा पुरातत्व अभ्यासकांचा अंदाज आहे. तसे पहायला गेले तर आजही या बंदराचे अवशेष हे आपल्याला समुद्रापर्यंत पहावयास मिळतात. या बंदरांच्या एकंदरीत व्याप्तीवरून आपल्याला हे बंदर किती मोठे असू शकते याचा अंदाज देखील येतो. पहायला गेले तर या पालशेत बंदराच्या परिसरात नव्याने उत्खनन झाल्यास अजून काही पुरातत्वीय पुरावे देखील उपलब्ध होतील. अश्या या प्राचीन 'पालपट्टमयी' उर्फ पालशेत बंदराचे प्राचीन अवशेष पाहण्यासाठी तरी पालशेत येथे नक्कीच भेट द्यायला हवी.
कसे जाल:-
पुणे - स्वारगेट - नसरापूर - सातारा - उंब्रज - पाटण - चिपळूण - शृंगार तळी - पालशेत.
१) साद सागराची:- पराग पिंपळे, बुकमार्क पब्लिकेशन, २०१४.
______________________________________________________________________________________________
______________________________________________________________________________________________
No comments:
Post a Comment
Thank You For Comment...!!! :)