गोष्ट पुण्यातील 'क्रिकेट खेळाची'

 

जगप्रसिद्ध खेळांच्यामध्ये आज 'क्रिकेट' या गणना होते. आपल्या भारतामध्ये क्रिकेट खेळ म्हणजे अगदी जिवाभावाचा विषय. याच क्रिकेट खेळामुळे भारताला विनू मंकड, दि. बा.देवधर, चंदू बोर्डे,  सुनील गावस्कर, कपिल देव, सचिन तेंडुलकर ते आत्तापर्यंतच्या विराट कोहली असे मोठे आणि नामवंत आणि प्रतिभावंत खेळाडू मिळालेले आहेत आणि या खेळाडूंनी संपूर्ण जगामध्ये भारताचे नाव अजरामर केलेले आहे. परंतु क्रिकेट खेळामध्ये पुणेकर देखील मागे नव्हते हे पुढे पाहूच पण त्याच्या आधी आपल्याला क्रिकेट खेळाची भारतामध्ये सुरुवात कशी झाली थोडक्यात पाहणे महत्वाचे आहे.

तसे पहायला गेले तर आपल्या भारत देशामध्ये पहिला क्रिकेटचा सामना खेळला गेला तो इ.स. १७२१ साली या क्रिकेट सामन्यामध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या जहाजावरील ब्रिटिश खलाश्यांनी भाग घेतला होता. तत्कालीन भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना ब्रिटिशांनी कलकत्त्याला केली होती त्यामुळे तसे पहायला गेले तर हा खेळ भारताच्या पूर्व भागामध्ये खेळायला सुरुवात झाली असे आपल्याला दिसते. इंग्रजांनीच कलकत्ता येथे इ.स. १७९२ साली 'कलकत्ता क्रिकेट ग्रुप' याची स्थापना केली त्यामुळे 'कलकत्ता क्रिकेट क्लब' हा भारतातील पहिला क्रिकेट क्लब तर जगातील दुसरा क्रिकेट क्लब म्हणून हा क्लब ओळखला जाऊ लागला. या कलकत्ता क्रिकेट क्लबमुळे कलकत्ता आणि आजूबाजूच्या परिसरात क्रिकेट खेळाचा प्रसार होण्यास सुरुवात झाली आणि हा खेळ खेळला जाऊ लागला. 

इ.स. १८८५ मध्ये इंग्रज सैनिकांनी 'पूना क्लब' याची स्थापना केली.
(छायाचित्र क्रेडीट:-https://www.poonaclubltd.com/about-club/club-history)

या खेळाचे महत्व पुढच्या काळात पसरले आणि इ.स. १७९७ च्या दरम्यान क्रिकेट हा खेळ महाराष्ट्र राज्यात आला आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबई येथे क्रिकेट हा खेळ रुजू लागला. मुंबई मध्ये सुरुवातीला पहिले सगळे इंग्रजांचेच क्रिकेट सामने होत असत परंतु यानंतर क्रिकेट या खेळाला नंतर सामावून घेतले ते पारशी लोकांनी आणि नंतर हिंदू आणि मुस्लिम यांनी. पारशी लोकांमुळे क्रिकेट या खेळाला खेळायला सुरुवात केली. साधारणपणे इ.स. १८४० पासून १८८३ सालापर्यंत मुंबई शहरामध्ये विविध क्रिकेट क्लब आणि जिमखाने अस्तित्वात आलेले आपल्याला पाहायला मिळतात. आज या विविध क्रिकेट क्लब आणि जिमखान्यांच्यामुळे भारताची आर्थिक राजधानी मुंबई येथील ठिकाणे देखील ओळखली जातात. अश्या पध्दतीने क्रिकेट महाराष्ट्रात रुजले आणि हा क्रिकेट हा खेळ पुण्यामध्ये येऊन दाखल झाला.

इ.स. १८८५ मध्ये इंग्रज सैनिकांनी 'पूना क्लब' याची स्थापना केली सुरुवातीच्या काळामध्ये 'पूना क्लब' याचे नाव 'कौन्सिलर्स क्लब' असे होते. या पूना क्लबला जोडून एक मोठे मैदान तयार करण्यात आले तिथे इंग्रजांनी क्रिकेटची खेळपट्टी तयार केली आणि पूना क्लबच्या याच मोठ्या मैदानावर क्रिकेटचा सराव देखील केला जात असे. याच पूना क्लबच्या मैदानावर पुण्यातील अगदी सुरुवातीचे क्रिकेटचे सामने खेळले गेले. जेव्हा पुण्यात 'पूना क्लबची' स्थापना झाली तेव्हा हा क्रिकेट क्लब फक्त इंग्रज लोकांसाठीच होता. पुण्यातील इंग्रज अधिकारी मेजर जे. जी. ग्रेग हे त्याकाळात खूप मोठे प्रसिद्ध क्रिकेटपटू होते. 

पुना क्लब याची आजची वास्तू.

याच मेजर जे. जी. ग्रेग यांनीच या पूना क्लबच्या संघाला वरच्या थराला नेण्यास मदत केली आणि पूना क्लबचे नाव उंचावण्यास देखील मदत केली. याच दरम्यान लॉर्ड हॅरीस हे मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर होते ते देखील अत्यंत प्रसिद्ध क्रिकेटपटू होते. तसेच लॉर्ड हॅरीस यांचा वर्षातील काहीकाळ मुक्काम हा पुण्यामध्ये असायचा या आपल्या मुक्कामी काळामध्ये लॉर्ड हॅरीस हे पूना क्लबचे क्रिकेटचे सामने पाहण्यास हजर असत. तसेच लॉर्ड हॅरीस यांनी स्वतः जातीने मुंबईमधील क्रिकेट खेळाकडे देखील जातीने लक्ष दिलेले होते. त्यामुळे मुंबई आणि पुण्यामध्ये क्रिकेट खेळाचे महत्व वाढण्यास सुरुवात झालेली आपल्याला पहावयास मिळते.

पुण्यामध्ये क्रिकेटच्या प्रातिनिधिक स्पर्धांना इ.स. १८९५ पासून सुरुवात झाली होती परंतु त्याच्या आधी मुंबईमध्ये क्रिकेटची स्पर्धा खेळली गेली या प्रातिनिधिक स्पर्धेमध्ये इंग्रजी लोकांचा संघ आणि पारशी लोकांचा संघ या दोनच संघांचा सहभाग असायचा. या स्पर्धांना त्याकाळात 'प्रेसिडडेन्सी' किंवा 'दुरंगी' सामने म्हणत असत. इ.स. १८९६ सालापासून या महत्वाच्या स्पर्धेमधला एक क्रिकेटचा सामना पुण्यामध्ये होण्यास सुरुवात झाली आणि पुण्यातील मोठा सामना खेळला गेला. तत्कालीन पूना क्लब हा पुण्यातील आद्य क्रिकेट क्लब हा पुण्याच्या कॅम्प भागामध्ये होता. आजही हा पूना क्लब पुण्याच्या कॅम्प भागामध्ये येतो. परंतु तत्कालीन पुण्यामध्ये क्रिकेट क्लब नव्हता परंतु इंग्रज लोकांचे हे क्रिकेट वेड पाहून पुणेकर देखील क्रिकेटच्या प्रेमात पडले तत्कालीन पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेजच्या आजूबाजूचा परिसर हा मोकळा माळ म्हणून तत्कालीन पुण्यात प्रसिद्ध होता.

'दि पूना यंग क्रिकेट क्लब' यातील सदस्य.
(छायाचित्र क्रेडीट:- https://www.pycgymkhana.com/history.shtml)

आजच्यासारखा रुपाली, वैशाली, वाडेश्वर आणि फर्ग्युसन कॉलेज रोडची प्रसिद्ध ठिकाणे अस्तित्वात नव्हती तेव्हा इ.स. १८९५-१८९६ मध्ये पुण्यातील लोकं या फर्ग्युसन कॉलेजच्या माळावर पुण्यातील कॉलेज मधील मुले देखील क्रिकेट खेळायला जात असत. परंतु पुण्यातील या कॉलेज तरुणांचा कोणताही क्रिकेट क्लब नव्हता. इ.स. १८९० साली पुण्यातील काही तरुण मंडळी एकत्र आली आणि त्यांनी पुण्याच्या कबुतरखान्यात 'यंग मेन्स क्रिकेट क्लब' याची सुरुवात केली तसेच काही कालावधीतच म्हणजे इ.स. १८९८ साली पुण्यामध्ये 'तपस्वी क्लब' देखील सुरू झाला या तपस्वी क्लबमध्ये शाळा आणि कॉलेज मधे असलेले पुण्याचे विद्यार्थी आणि तरुण मुले क्रिकेट खेळत असत. 

पुण्यातील श्री. ल. ब. भोपटकर आणि प्राध्यापक वामनराव काळे हे या तपस्वी क्लबचे खेळाडू होते. पुढे याच तपस्वी क्रिकेट क्लबचे नाव बदलून 'दि पूना यंग क्रिकेट क्लब' असे नामकरण झाले आणि याच 'दि पूना यंग क्रिकेट क्लब' याच्यामुळे इ.स. १९०० मध्ये 'पी. वाय. सी. जिमखाना' याचा जन्म झाला. परंतु त्याच्याआधी पुण्यामध्ये इ.स. १८९० मध्ये स्थापन झालेल्या 'यंग मेन्स क्रिकेट क्लब' यातील तरुण मुले ही पुण्यातील कबुतरखान्याच्या मैदानावर क्रिकेट खेळत असत तेव्हा या पुण्यातील क्रिकेट क्लबची माहिती मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर 'लॉर्ड हॅरीस' यांच्या कानावर गेली आणि पुण्यातील 'पूना क्लब' याचा सामना हा 'यंग मेन्स क्रिकेट क्लब' यांच्यासोबत ठेवला. तेव्हा 'पूना क्लब' विरुद्ध 'यंग मेन्स क्रिकेट क्लब' या सामन्यामध्ये पुणेकरांनी खूप उत्तम खेळ करून इंग्रजांच्या 'पूना क्लब संघाला' प्रभावित केले या गोष्टीवर खुश होऊन मुंबईचे गव्हर्नर 'लॉर्ड हॅरीस' यांनी या दोन संघाच्यामध्ये दरवर्षी दोन क्रिकेटचे सामने आयोजित करण्याचे ठरवले. 

मुंबईचे गव्हर्नर 'लॉर्ड हॅरीस' 

या क्रिकेटच्या सामन्याची जाहिरात ही एकतर 'पुणे गाव विरुद्ध कॅम्प' किंवा 'पुणेकर विरुद्ध इंग्रज' अशी केली जात असे. अत्यंत अटी-तटीने लढले जाणारे हे क्रिकेटचे सामने पाहायला सगळे पुणेकर गर्दी करत असत. या दोन्ही क्रिकेट क्लबचे सामने हे मुद्दाम शाळा आणि कॉलेज सकाळी लवकर भरवण्यात येत असे. याचे मुख्य कारण तत्कालीन पुणेकरांना आणि विद्यार्थ्यांना हे क्रिकेट सामने पाहण्याची संधी उपलब्ध करून खेळाबद्दल आवड रुजवली जात असे हे त्याच्या मागे मुख्य कारण होते. या गोष्टीमुळे पुणेकर क्रिकेट खेळाच्या प्रेमात पडले. तसेच 'यंग मेन्स क्रिकेट क्लब' मधील म्हणजेच पुणे गावातील लखु भिडे, सरदेसाई, नरसू, सायण्णा, मोडक, बाळू बापट हे पुणेकर तरुण खेळाडू पुण्यामध्ये प्रसिद्ध झाले. 'इंग्रज विरुद्ध पुणेकर' या सामन्यातील पहिले शतक काढण्याचा मान पुण्यातील नरसू या क्रिकेटपटूने मिळवला. तेव्हा तत्कालीन बडोद्याचे युवराज 'फत्तेसिंहराव गायकवाड' यांच्या अध्यक्षतेखाली हिराबागेमध्ये मोठा समारंभ होऊन 'नरसू' यांचे अभिनंदन करण्यात आले. 

या झालेल्या स्पर्धेमुळे पुण्यातील शाळा कॉलेजमधील मुले क्रिकेट खेळाकडे आकर्षित व्हाल लागली. इ.स. १९०० साल येईपर्यंत 'यंग मेन्स क्रिकेट क्लब' याची भरभराट झाली परंतु काही काळामध्ये या क्लब मधील तरुण मुले नोकरीनिमित्त परगावी गेली आणि क्लबला उतरती कळा लागली. या गोष्टी घडत असताना तरुण मुले पुणे गावाच्या बाहेरील बाजूस मोकळ्या जागेवर मैदान बनवून क्रिकेट खेळायला मोठ्या प्रमाणात सुरुवात केली होती साधारण इ.स.१९०० च्या दरम्यान मुठा नदीच्या उत्तरेला रान होते आज हाच सगळा भाग 'डेक्कन जिमखाना' म्हणून प्रसिद्ध आहे. जेव्हा 'यंग मेन्स क्रिकेट क्लब' हा आपल्या अखेरच्या घटका मोजत होता तेव्हा या क्लबच्या सभासदांच्यामध्ये दोन गट पडले आणि त्यातील एका गटाने 'यंग क्रिकेटर्स हिंदू जिमखाना' हा क्लब तयार केला तर दुसऱ्या गटाने 'डेक्कन जिमखाना' ही संस्था उभी केली. 

'डेक्कन जिमखाना' ही संस्था १९०६ साली उभी राहिली
(छायाचित्र क्रेडीट:- https://www.pycgymkhana.com/tournaments.shtml)

आजची 'डेक्कन जिमखाना' ही संस्था १९०६ साली उभी राहिली ही संस्था फक्त हिंदूनाच नव्हे तर सर्व जातीमधील लोकांना खुली असावी म्हणून या संस्थेला 'डेक्कन जिमखाना' असे नाव द्यावे हे लोकमान्य टिळकांनी सुचवले आणि या डेक्कन जिमखान्याचे पहिले सहचिटणीस श्री. न. चिं. केळकर होते यानंतरच्या काळात आप्पासाहेब भागवत यांनी डेक्कन जिमखाना याचा चेहेरा बदलून टाकला आणि जिमखान्याची प्रगती केली. 'दि पूना यंग क्रिकेट क्लब' म्हणजेच आजचे (पी. वाय.सी) याची स्थापना पुण्यात झाली आणि पुण्याच्या क्रिकेटचा चेहरा मोहरा बदलण्यास सुरुवात झाली.

______________________________________________________________________________________________

संदर्भग्रंथ:-
१) शतकाकडे वाटचाल:- दि. बा. देवधर 
२) क्रिडा ज्ञानकोश:- सुरेशचंद्र नाडकर्णी
३) Cricket In Indian Mythology:- Ravi Chaturvedi
४) क्रिकेटमधील नवलकथा:- बाळ पंडित, 
५) पुणे शहर खंड १:- संपादक अरुण टिकेकर, निळूभाऊ लिमये फाउंडेशन

______________________________________________________________________________________________

महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात.

४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.

_________________________________________________________________________________________

छायाचित्रे आंतरजालावरून

1 comment:

  1. छान मोजक्या शब्दात माहीती !

    ReplyDelete

Thank You For Comment...!!! :)

INSTAGRAM FEED

@maharashtraheritage