पेमगिरी गावातील 'लाकडी मारुती मंदिर'

 

महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यामध्ये विविध वैशिष्ट्ये लपलेली आहेत. आपल्याला नगर जिल्ह्यामध्ये भौगोलिक आश्चर्ये आणि ऐतिहासिक गोष्टी अश्या दोन्ही गोष्टी मोठ्या प्रमाणात आपल्याला पहावयास मिळतात. याच अहमदनगर जिल्ह्यामध्ये ऐतिहासिक पेमगिरी किल्ला असून याच पेमगिरी गावामध्ये आपल्याला लाकडी मारुतीचे मंदिर देखील पहावयास मिळते. पेमगिरी हे गाव सध्या पेमगिरी किल्ला आणि वडाच्या झाडासाठी जरी प्रसिद्ध असले तरी येथे असलेल्या लाकडी मारुती मंदिराला फारसे कोणी भेट देत नाहीत.


पेमगिरी गावातील 'लाकडी मारुती मंदिर' 

संगमनेर पासून अगदी हाकेच्या अंतरावर संगमनेर-अकोले रोडवर असलेल्या कळस गावातून आतमध्ये वळाले असता शहाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारा 'पेमगिरी' किल्ला वसलेला आहे. याच पेमगिरी किल्ल्याला भेट देऊन आपण जेव्हा गावामध्ये येतो तेव्हा आपल्याला गावामध्ये एक सुंदर मारुती मंदिर खुणावते. पेमगिरी गावातील मारुती मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे संपूर्ण मंदिर लाकडी आहे. 


पेमगिरी गावातील मारुतीराया.


संपूर्ण लाकडामध्ये बनवलेल्या या मंदिराची स्थापना ही इ.स. १८६४ मध्ये झाली आणि २४ ऑगस्ट १९४२ मध्ये हे मंदिर बांधून पूर्ण झाले. या मारुती मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये आपल्याला कोठेही सिमेंटचा वापर केलेला पहावयास मिळत नाही. संपूर्ण मंदिर हे गावकऱ्यांनी श्रमदानातून उभारले आहे. पेमगिरी गावातील मारुती मंदिर पूर्ण सागाच्या लाकडाचे असुन २०१७ मध्ये मंदिरास रंगाचा मुलामा देऊन आणि थोडी डागडुजी करून या सुंदर  मंदिरास नावसंजीवनी प्राप्त झाली आहे. तसेच आपल्याला या मंदिराच्या परिसरात एक वीरगळ देखील पहावयास मिळतो. मंदीराच्या पहिल्या मजल्यावरून आपल्याला पेमगिरी किल्ला अत्यंत सुंदर दिसतो.


मारुती मंदिरातून दिसणारा 'पेमगिरी किल्ला'.

जेव्हा आपण या मारुती मंदिरामध्ये प्रवेश करतो तेव्हा आपल्याला एखाद्या मोठ्या वाड्यामध्ये प्रवेश केल्याचा भास होतो. मंदिरामध्ये जवळपास १० फुट उंच मारुतीरायाची मूर्ती स्थानापन्न असून मंदिरातील शांतता आपले मन नक्कीच प्रसन्न करते. असे हे पेमगिरी गावातील सुंदर लाकडी मारुती मंदिर नक्कीच भेट देण्यासारखे आहे. अश्या या पेमगिरी गावातील मारुती मंदिराला थोडीशी आडवाट करून नक्कीच भेट द्या काहीतरी वेगळे पाहिल्याचे नक्कीच समाधान आपल्याला मिळेल.

______________________________________________________________________________________________

कसे जाल:-
पुणे - भोसरी - चाकण - राजगुरुनगर - मंचर - नारायणगाव - आळेफाटा - घारगाव - संगमनेर - कळस - पेमगिरी.

______________________________________________________________________________________________


महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात.

४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.

_______________________________________________________________________________________


लिखाण आणि छायाचित्रे © २०२१ महाराष्ट्राची शोधयात्रा

No comments:

Post a Comment

Thank You For Comment...!!! :)

INSTAGRAM FEED

@maharashtraheritage