तुरळ येथील 'गरम पाण्याचे कुंडे'

 

महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्याला निसर्गाचे खूप मोठे वरदान लाभले आहे असे आपल्याला म्हणायला हरकत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये किल्ले आहेत, विपुल प्रमाणात वनस्पती आहेत, तसेच नैसर्गिक साधन संपत्ती देखील आहे. तसेच येथे आपल्याला काही भौगोलिक आश्चर्य देखील पहावयास मिळतात. आता हे भौगोलिक आश्चर्य कोणते हे हा प्रश्न नक्कीच पडला असेल तर हे भौगोलिक आश्चर्य म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असलेले गरम पाण्याचे कुंड होय. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला गरम पाण्याची कुंडे पहावयास मिळतात असेच गरम पाण्याचे कुंड आहे ते तुरळ या गावामध्ये. 


रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर ठिकाण इतिहासात अत्यंत प्रसिद्ध आहे. याच संगमेश्वरच्या अलीकडे अगदी हाकेच्या अंतरावर वसलेले तुरळ मात्र आजही फारसे प्रसिद्ध नाही. कारण तुरळ गावामध्ये असलेले गरम पाण्याचे कुंड आजीबात फारसे प्रसिद्ध नाही. यासाठी संगमेश्वर येथे आल्यावर नक्कीच वाट वाकडी करून तुरळ येथील गरम पाण्याचे कुंड पहावयास यायला हवे. 


तुरळ येथील बारागाव मंदिराचे अवशेष.

संगमेश्वर येथून साधारणपणे दहा किलोमीटर अंतरावर आपल्याला तुरळ गाव लागते. अगदी हायवे जवळ असणारी ही कुंडे फारशी प्रसिद्धी झोतामध्ये नाहीत. हायवे जवळ हॉटेल श्रम साफल्य ढाबा आणि मुकुंद कृपा हॉटेल आणि रिसॉर्ट यांच्याबरोबर मध्ये आपल्याला ही गरम पाण्याची कुंडे पहावयास मिळतात. मुख्य म्हणजे येथे आपल्याला दोन प्राचीन मंदिरांचे अवशेष आढळून येतात. हि दोन मंदिरे केदारनाथ मंदिर आणि बारागाव मंदिर म्हणून स्थानिक लोकांच्यामध्ये प्रसिद्ध आहेत. 


सध्या या दोन्ही मंदिरांची अवस्था फारशी उत्तम नाही. मध्ययुगात या मंदिरांना पाडले आहे असे एकंदरीत अवशेष पाहून आपल्याला समजते. यातील बारागाव मंदिराच्या समोर आपल्याला तुरळ येथील गरम पाण्याचे कुंड पहावयास मिळते. या बारागाव मंदिराच्या परीसरामध्ये आपल्याला सतीशिळा, वीरगळ, तसेच देवी देवतांच्या भग्न मूर्ती विखुरलेल्या पहावयास मिळतात तसेच येथे आपल्याला नंदी देखील पहावयास मिळतो. येथूनच पुढे गेले असता आपण थेट समोर येतो ते तुरळ येथील गरम पाण्याच्या कुंडाजवळ.


रत्नागिरी मधील तुरळ येथील गरम पाण्याचे कुंड.

तुरळ येथील गरम पाण्याच्या कुंडातील तापमान साधारणतः ४८ ते ५० सें च्या दरम्यान असते. ह्या निसर्गनिर्मित कुंडामधील पाणी हे गंधकयुक्त आहे. या पाण्याने आंघोळ केली असता आपल्या त्वचेचे रोग बरे होतात. या गरम पाण्याच्या कुंडांमध्ये रिकाम्यापोटी जाऊ नये अन्यथा चक्कर येणे किंवा हातापायात गोळे येणे अश्या अडचणी येऊ शकतात. संपूर्ण खबरदारी घेऊन कुंडामध्ये मनसोक्त जलतरणाचा आनंद घ्यावा. अश्या या तुरळ गावामध्ये येऊन या गरम पाण्याच्या कुंडाला भेट देणे म्हणजे जणू पर्वणीच. त्यामुळे जेव्हा केव्हा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तुम्ही फेरफटका मारायला जाल तेव्हा या तुरळ गावातील गरम पाण्याच्या कुंडाला आठवणीने भेट द्या. असे हे महाराष्ट्राचे भौगोलिक आश्चर्य तुम्हाला नक्कीच आवडेल. 

______________________________________________________________________________________________

कसे जाल:-

पुणे - भोर - वरंधा घाट - महाड - खेड - चिपळूण - सावर्डे - तुरळ. 

______________________________________________________________________________________________

महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात.

४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.

_________________________________________________________________________________________

लिखाण आणि छायाचित्र © २०२१ महाराष्ट्राची शोधयात्रा   


    

No comments:

Post a Comment

Thank You For Comment...!!! :)

INSTAGRAM FEED

@maharashtraheritage