गिर्यारोहकांचे लाडके 'नागफणी किंवा ड्युक्स नोज'

 

खंडाळ्याच्या घाटातून जाताना आपल्याला एक उंच सुळका कायम खुणावत असतो. बऱ्याच जणांना या उंच सुळक्याचे नाव देखील माहिती नसते परंतु जे लोक ट्रेकिंग करतात किंवा क्लायंबिंग करतात त्या भटक्या लोकांच्यामध्ये हा खंडाळ्याचा उंच सुळका फार प्रसिद्ध असतो. हा खंडाळ्याच्या घाटातील प्रसिद्ध सुळका म्हणजे 'नागफणी किंवा ड्युक्स नोज'. लोणावळ्यापासून अगदी जवळ असलेला हा सुळका गिर्यारोहण क्षेत्रात फार प्रसिद्ध आहे. या ड्युक्स नोज किंवा नागफणीला यायचे असेल तर सकाळी लवकर मुंबईला जाणारी सिंहगड एक्स्प्रेस पकडावी आणि खंडाळा स्टेशन गाठावे. येथूनच आपला 'ड्युक्स नोज किंवा नागफणी' याचा ट्रेक चालू होतो. येथेच रेल्वे रुळाच्या डाव्या-उजव्या बाजूंना गंजलेले रेल्वे रूळ पहावयास मिळतात. येथूनच आपण ड्युक्स नोजकडे चालायला लागावे. हे रूळ जिथे संपतात तेथून आपल्याला एक डांबरी रस्ता लागतो. हा रस्ता ओलांडला कि वळवण धरण आपल्याला लागते. येथूनच आपल्याला डाव्या बाजूची पायवाट हि ड्युक्स नोज कडे घेऊन जाते.


'नागफणी किंवा ड्युक्स नोज' याच्यावरील शिवमंदिर.

हि पाऊलवाट आपण आजीबात सोडायची नाही हि वात व्यवस्थित मळलेली असून कुठेही फारसे चुकायला होत नाही. याच पाऊलवाटेवर आपल्याला पुढे गेल्यावर एका धबधब्यामधून जावे लागते. बऱ्याचदा उन्हाळ्यात येथे पाणी नसते परंतु पावसाळ्यात या धबधब्या मधून जायचे झाल्यास व्यवस्थित काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच येथून उजवीकडे वळून परत आपण पाऊलवाटेवर येतो आणि ड्युक्स नोजकडे कूच करतो. येथून लोणावळा परिसर अत्यंत सुंदर दिसत असतो. येथून पुढे थोड्यावेळ चालत गेल्यास आपण डोंगरखिंडीत येऊन पोहोचतो. येथून थोडे वर चढून पाहिल्यास ड्युक्स नोज आणि डचेस नोज अत्यंत सुंदर दिसतात. जेव्हा केव्हा आपण जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावरून घाट चढून येत असतो तेव्हा हा नागफणी किंवा ड्युक्स नोज सुळका एखाद्या माणसासारखा दिसतो. याचे नीट निरीक्षण केले असता आपल्याला माणसाचा चेहेरा या डोंगरामध्ये पहावयास मिळतो. यामध्ये कपाळ, भुवई, डोळ्याची खोबण, नाक, ओठ, हनुवटी असे सगळे काही प्रमाणबद्ध पहावयास मिळते. येथून पुढे चालत गेल्यावर आपल्याला अजून एक धबधबा लागतो हा देखील क्रॉस करून आपण पुढे गेल्यास मळलेली वाट आपल्याला वरपर्यंत घेऊन जाते. 


पावसाळ्यामध्ये आपल्याला येथे विविध रानवनस्पती मोठ्या प्रमाणात पहावयास मिळतात. तसेच येथे काही दुर्मिळ वनस्पती देखील पहावयास मिळतात. अश्या या वनस्पतींचे निरीक्षण करून आपण पाऊलवाटेने डचेस नोज गाठावे. तसेच येथील मधील खिंडीमधून जो रस्ता जातो तो थेट आपल्याला ड्युक्स नोज किंवा नागफणी येथे घेऊन जातो. आपण जेव्हा नागफणी किंवा ड्युक्स नोज येथे वरती पोहोचतो तेव्हा आपल्याला एक छोटेसे शिवमंदिर पहावयास मिळते. तसेच याठिकाणी आपल्याला माथ्यावर अजून एक आश्चर्य पहावयास मिळते ते म्हणजे येथे नैसर्गिक बनलेले पॉट होल्स म्हणजे रांजण खळगे. हे पॉट होल्स पहावयास मिळायचे कारण म्हणजे पूर्वी येथील भूभाग हा वेगळा होता परंतु येथे भूकंप आणि ज्वालामुखीमुळे उलथापालथ झाली आणि रांजणखळग्याचा भाग वर आला असे काही संदर्भपुस्तकातून वाचावयास मिळते. 


जवळ आल्यावर दिसणारे ड्युक्स नोज.

येथून आपल्याला राजमाची, लोहगड, विसापूर, तुंग तिकोना आणि कोकणातील सर्वप्रदेश पहावयास मिळतो. पावसाळ्यात येथे फार गर्दी असते. त्यामुळे पावसाळ्यात येथे येणे शक्यतो टाळावे. ड्युक्स नोज हा सुळका क्लायंबिंग म्हणजेच प्रस्तरारोहण करणाऱ्या लोकांच्या क्षेत्रात फार प्रसिद्ध आहे. प्रसिद्ध गिर्यारोहक कै. अरुण सावंत यांच्या नेतृत्वाखाली ड्युक्स नोज सुळका चढण्याची मोहीम आयोजित करण्यात आली होती. केव्ह्स एक्सप्लोरर्स या संस्थेच्या मार्फत याचे आयोजन केले होते. सौ. मेघा देव, सौ. शुभांगी सोहोनी-आगाशे, श्री. प्रदीप पोतदार, श्री. अनिल खांडेकर, श्री. सुमित नंदा, श्री. कपिल वनारसे, श्री. दत्ता फोपे, श्री. दगडू बोडके, श्री. श्याम मंचेरकर, श्री. अनंत सावंत, श्री चारुदत्त दुखंडे, श्री. संजय रांगणेकर, श्री. प्रताप तावडे, श्री. दिलीप लागू, श्री. गणेश अत्राम, श्री. हेमू पांचाल, श्री. बिभास आमोणकर या सगळ्यांचा या तुकडीमध्ये समावेश होता. तसेच कै. अरुण सावंत, श्री. सतीश आंबेरकर, श्री. अभिजित पाटील या अनुभवी गिर्यारोहकांनी यामध्ये नेतृत्व केले होते. दिनांक १० मे १९८५ या दिवशी या सगळ्या टीमने ड्युक्स नोज येथे प्रस्तरारोहण करून पाऊल ठेवले आणि इतिहास रचला.    

ड्युक्स नोज येथे जाण्याची वाट आणि ड्युक्स नोज.

नागफणी येथील सर्व गोष्टी पाहून झाल्यावर येथून एक सरळ रस्ता आपल्याला थेट आय.एन. एस. शिवाजीपर्यंत घेऊन जातो. अगदी थोड्याच वेळात या रस्त्याने आपण खाली पोहोचतो आणि परतीच्या मार्गावर लागतो. येता येता भुशी धरणावर थोडावेळ घालवून आपण आपली ड्युक्स नोजची यात्रा संपवून परत पुण्याला परतू शकतो. 

______________________________________________________________________________________________

संदर्भग्रंथ:-
१) आडवाटेवरचा महाराष्ट्र:- प्र. के घाणेकर, स्नेहल प्रकाशन.
२) डोंगरयात्रा:- आनंद पाळंदे, प्रफुल्लता प्रकाशन.  

कसे जाल:-
पुणे - खडकी - पिंपरी - चिंचवड - तळेगाव - लोणावळा - खंडाळा. 
______________________________________________________________________________________________


महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात.

४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.
_________________________________________________________________________________________________

लिखाण आणि छायाचित्रे  © २०२२  महाराष्ट्राची शोधयात्रा

  

No comments:

Post a Comment

Thank You For Comment...!!! :)

INSTAGRAM FEED

@maharashtraheritage