पुणे शहरातील 'दोन गद्धेगाळ'

 

पुणे आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये आपल्याला विविध ऐतिहासिक वास्तू आणि वारसास्थळे आपल्याला पहावयास मिळतात. पुणे शहराच्या दृष्टीने ही वारसास्थळे अत्यंत महत्वाची आहेत याचे मुख्य कारण म्हणजे ही वारसास्थळे आपल्याला इतिहास सांगण्यास मदत करतात. अश्याच वारसास्थळांच्यापैकी दोन ऐतिहासिक गोष्टी आजही पुण्याचे मूकसाक्षीदार बनून पुण्याच्या दोन मंदिरांच्यामध्ये विराजमान आहेत. हे पुण्याच्या जडणघडणीतले मूकसाक्षीदार म्हणजे पुण्यात असलेले 'गद्धेगाळ' आहेत. त्यापैकी एक गद्धेगाळ हा पुण्याच्या कर्वेनगर भागामध्ये असून दुसरा गद्धेगाळ हा धनकवडी आणि आंबेगाव पठार यांचा रस्ता जिथे मिळतो तिथे भरवस्तीमध्ये लपलेला आहे.


पुणे शहरामध्ये असलेले दोन गद्धेगाळ.

पुण्यामध्ये जसे आपल्याला वाडे, मंदिरे पहावयास मिळतात तसेच आपल्याला वीरगळ, समाध्या यादेखील ऐतिहासिक गोष्टी पहावयास मिळतात. अश्या ऐतिहासिक गोष्टींच्यापैकी एक गोष्ट म्हणजे 'गद्धेगाळ' आपल्याला पुणे शहरामध्ये पहावयास मिळतात. परंतु त्याआधी आपण गद्धेगाळ म्हणजे काय ते समजून घेणे महत्वाचे आहे. लेखामध्ये शापवचने घालण्याची पद्धत ही साधारणपणे ५ व्या शतकापसून सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते. ही शापवचने जो कोणी ताम्रपट किंवा शिलालेखामध्ये लिहून किंवा कोरून दिलेले दान मोडेल किंवा त्याला बाधा आणेल अश्या व्यक्तीला ते उद्देशून असते आणि त्याची रचना साधारणपणे सारखी असते. या शापवचनामध्ये फरक पडला तर वाचनाच्या संख्येत किंवा शब्दांमध्ये बदल होतो बऱ्याचदा सर्व लेखामधून पुढील श्लोक आपल्याला वाचायला मिळतो.    


स्वदत्तां परदत्तां वा यो हरेत वसुंधरां।

षष्टी वर्षसहस्त्राणी विष्टायां जा यते कृमी:।।


या श्लोकाची रचना शापवचनाच्या कामी केली जाते. बऱ्याचदा मराठी लेखामधून हेच शापवचन आपल्याला आढळून येते. शिलाहारांच्या आणि यादवांच्या लेखातून शापवचने मराठी भाषेत घालण्याची प्रथा रूढ झालेली आपल्याला पहायला मिळते आणि यातून 'गद्धेगाळ' म्हणजेच (ass-curse) या नावाने प्रसिद्ध असणारे वचन पुढे रूढ झालेले आपल्याला दिसते.  गद्धेगाळ ही कधी शब्दरूपाने किंवा चित्ररूपाने किंवा शब्द आणि चित्र अशा रूपांनी व्यक्त होते. म्हणूनच पुणे शहरातील दोन गद्धेगाळ अत्यंत महत्वाचे आहेत. 


पुणे शहरातील पहिला गद्धेगाळ हा आपल्याला पहावयास मिळतो तो म्हणजे पुण्याच्या कर्वेनगर मध्ये असलेल्या मधुसंचय सोसायटी येथे. कर्वेनगरच्या मधुसंचय सोसायटीमध्ये जे गणपती मंदिर आहे तिथेच आपल्याला एक शेंदूर लावलेली शिळा आढळून येते. ही शेंदूर लावलेली शिळा म्हणजे गद्धेगाळ असून सध्या या गद्धेगाळाचा गणपती बनवला आहे. त्यामुळे या गद्धेगाळाची अवस्था फारशी चांगली राहिली नाही परंतु हा गद्धेगाळ आहे हे लगेच ओळखू येतो. 


कर्वेनगर  येथील मधुसंचय सोसायटीमधील गद्धेगाळ.


या गद्धेगाळावर आपल्याला मंगल कलश असून या कलशाची पाने थोडी झीजल्याने फिकट झालेली आहेत. तसेच स्थानिक लोकांनी याला डोळे काढले असून खालच्या भागामध्ये आपल्याला चंद्र आणि सूर्य पहावयास मिळतात. यातील चंद्राचा कोपरा हा वर मंगल कलशाला चिकटलेला आपल्याला पहावयास मिळतो त्यामुळे स्थानिक लोकांनी त्याला गणपतीचे रूप दिलेले दिसते. तसेच या शिळेमध्ये खालच्या भागामध्ये आपल्याला स्त्री आणि गाढवाचा संकर असलेले शिल्प कोरलेले पहावयास मिळते. या शिल्पामध्ये जे गाढव कोरलेले आहे त्याला गणपतीचे वाहन उंदीर बनवलेले असून त्याला कला रंग देखील फासण्यात आलेला आपल्याला पहावयास मिळतो. अश्या या पुण्याच्या कर्वेनगर भागामध्ये असलेल्या गद्धेगाळावर आपल्याला कोणताही शिलालेख पहावयास मिळत नाही. सध्या या गद्धेगाळाची पूजा देखील केली जात असलेली आपल्याला पहावयास मिळते. 


पुणे शहरातील दुसरा गद्धेगाळ हा आपल्याला धनकवडी आणि आंबेगाव पठार यांचा रस्ता जिथे मिळतो तिथे भरवस्तीमध्ये लपलेला आहे. सध्या त्याच्यावर खंडोबाचे छोटे मंदिर बांधून त्यामध्ये गद्धेगाळ ठेवलेला आहे. हा गद्धेगाळ आपल्याला धनकवडी-आंबेगाव यांच्या सीमारेषेवर पहावयास मिळतो. सध्या या गद्धेगाळाची खंडोबा म्हणून रोज पूजा केली जाते आणि हार फुले देखील त्याला वाहिले जातात. या गद्धेगाळावर आपल्याला चंद्र आणि सूर्य पहावयास मिळतात आणि त्याच्याखाली स्त्री आणि गाढव यांचा संकर देखील पहावयास मिळतो. धनकवडी-आंबेगाव यांच्या सीमेवर असलेल्या या गद्धेगाळावर आपल्याला कोणताही शिलालेख मात्र पहावयास मिळत नाही.


धनकवडी आणि आंबेगाव पठार यांच्या सीमेवरील गद्धेगाळ.

असे हे पुण्यातील इतिहासाचे महत्वाचे मूक साक्षीदार आपल्याला वारसा रूपाने नक्कीच महत्वाचे आहेत. या दोन्ही गद्धेगाळांवर शिलालेख जरी नसले तरी हे गद्धेगाळ आपल्याला कर्वेनगर आणि आंबेगाव-धनकवडी या गावांच्या इतिहासाची साक्ष मात्र देत मूकपणे उभे आहेत. कोणत्या काळामध्ये या गावांना दानपत्रे दिली होती हे मात्र गद्धेगाळांच्यावर लिहिलेले नसले तरी ते सध्याच्या पुण्याच्या जडणघडणीच्या इतिहासाचे साक्षीदार आहेत. अश्या या पुणे शहरातील दोन गद्धेगाळांना जाता येता नक्की भेट द्या.

______________________________________________________________________________________________

संदर्भग्रंथ:-
१) प्राचीन मराठी कोरीव लेख:- डॉ. शं. गो. तुळपुळे
२) यादव कालीन मराठी भाषा:- डॉ. शं. गो. तुळपुळे
३) गधागाळ:- भा.रा.भालेराव (भारत इतिहास संशोधक मंडळ पंचम संमेलन वृत्तांत)
४) Gaddhegal Stones: An Analysis of Imprecations and Engraved Illustrations:- Dr. Rupali Mokashi, International Journal of Innovative Research & Development, Page No 168, 170, 171. ( Similarly the ass curse stele at Dhanakawadi, (Fig.11) Pune is worshipped by the locals as ‘God Khandoba’.)
______________________________________________________________________________________________


महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात.

४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.
_________________________________________________________________________________________________

लिखाण आणि छायाचित्रे  © २०२२  महाराष्ट्राची शोधयात्रा           


   

1 comment:

  1. very informative blogs here that will really help for other business too. Thanks for sharing this contents. Thanks from Gruhkhoj Kolhapur Property

    ReplyDelete

Thank You For Comment...!!! :)

INSTAGRAM FEED

@maharashtraheritage