गिरवी गावातील 'गोपालकृष्ण'


आपल्या महाराष्ट्रामध्ये अशी बरीचशी ठिकाणे लपलेली आहेत त्यापैकी काही ठिकाणे पाहण्यासाठी मुद्दाम आडवाटेवर भटकणे महत्वाचे ठरते. अश्याच काही आडवाटेवर वसलेल्या ठिकाणांच्यापैकी एक ठिकाण हे फलटण पासून अगदी हाकेच्या अंतरावर वसलेले आहे. ते ठिकाण म्हणजे गिरवी गावातील मध्ययुगातील गोपालकृष्णाचे मंदिर. फलटण गावापासून साधारणपणे १२ किलोमीटर अंतरावर गिरवी हे गाव वसलेले आहे. या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे या गावामध्ये असलेले गोपालकृष्णाचे मंदिर. 


जेव्हा आपण गिरवी गावामध्ये पोहोचतो तेव्हाच हे सुंदर मंदिर आपल्याला खुणावते. या मंदिराला सभोवती चुनेगच्ची असलेला तट आणि त्याच्या सभोवताली असलेल्या ओवऱ्यावर आपल्याला आदिलशाही वास्तूरचनेची छाप पहावयास मिळते. जेव्हा आपण मंदिरामध्ये प्रवेश करतो तेव्हा आपल्याला दर्शन होते ते गोपालकृष्णाचे. गिरवी येथील मंदिरातील गोपालकृष्णाची मूर्ती ही धेनुसहित असून ही अत्यंत सुंदर मूर्ती एकाच अखंड शिळेमध्ये घडवलेली आहे. या गोपालकृष्णाच्या मूर्तीचा इतिहास नक्कीच पाहण्यासारखा आहे. 


गिरवी येथील श्रीकृष्णाचे मध्ययुगीन मंदिर.

श्री. बाबुरावमहाराज आजूबाजूच्या खेड्यात शासकीय दौर्‍यावर असताना विजापुरचा आदिलशहा यांच्यासमवेत तैनात असलेले श्री. राव रंभाजी यांच्या समवेत असत. श्री. बाबुरावमहाराज हे भगवान गोपाळकृष्णांचे एकनिष्ठ आणि निष्ठावान भक्त होते. त्यांच्याबरोबर मुरलीधराची चांदीची मूर्ती होती व त्याची  ते श्रद्धेने  त्या मूर्तीची नित्य पूजा करीत असत. आपल्या गावी गिरवी येथे भगवान गोपालकृष्णाची शळिग्राम रूपातील अशीच मूर्ती घडवून मंदिर स्थापन करण्याची प्रेरणा झाली. तथापि, वर्षानुवर्षे एकत्र शोध घेऊनही इच्छित शिळा (शळिग्राम) उपलब्ध झाली नसल्यामुळे ते अस्वस्थ झाले. त्यांनी कळकळीने श्रीकृष्णाला प्रार्थना केली. भजनाच्या तिसर्‍या दिवशी एक ध्वनी आला. त्यानंतर काही दिवस असेच घडत राहिले व ध्यानात श्री. बाबुराव यांना एक स्थान दाखवले गेले व खोदाई करणयाची सूचना दिली गेली. श्री. बाबुराव यांनी त्या जागेवर मजूर लावून खोदण्याचे काम सुरु केले परंतु आदिलशाहकडे काही व्यक्तींनी खोदाईबद्दल तक्रार केली. 


एका अधिकाऱ्याने तातडीने घटनास्थळाला भेट दिली व ते  उत्खनन थांबवले. त्यानंतर बाबुराव विजापूर येथे दाखल झाले आणि राजाला केवळ मूर्तीसाठीच दगड (शळिग्राम) मिळावा म्हणून बादशाहकडून शाही परवानगी देण्याची विनंती केली. उत्खनन करण्याचा त्यांचा हेतू कोणतीही संपत्ती शोधाशोध नव्हताच. राजाने उत्खनन करण्यास त्वरित संमती दिल्यावर अधिकारी, तसेच उत्खननासाठी स्थगिती हुकूम देणार्‍याने मुदत दिली. बाबुराव यांना आवश्यक ती मदत पण दिली. खोदाई  सुमारे ४० मीटर झाल्यानंतर एक मोठी शिळा प्राप्त झाली, बादशहाला सांगुन अर्ज सादर केला व ही शिळा त्यांच्या गावात (गिरवी) येथे नेण्यासाठी परवानगी मागितली व त्यानुसार परवानगी मिळाली. शिळेवर काही मूर्ती कोरीव काम आहे का हे शोधण्यासाठी श्री. बाबुराव देशपांडे यांनी दगडाची तपासणी केली. 


गिरवी येथील मंदिराच्या मागे असलेली बारव.


फक्त विष्णू चिन्हांच्या रेषा तेथे आढळल्या तसेच मुहूर्त बघून ही शिळा गिरवी येथे नेण्यात आली. या शिळेचा पहिला टप्पा पूर्ण झाला होता. आता पुढचा आणि सर्वात मह्रत्वाचा म्हणजे योग्य मूर्तिकारांचा शोध घेणे हा होता. शर्थीचा प्रयत्न करूनही मूर्तिकार मिळेनात. श्री. बाबुराव यांच्या मानसपूजेसारखीच मूर्ती हवी आणि ही मूर्ती घडवताना कोडेठही छेद जाता कामा नये ही अट पूर्ण करणे तसे अशक्यप्रायच होते. श्री. बाबूराव यांनी साकडे घातले व प्राणांतिक उपोषणाला आरंभ केला. नंतर दोन मूर्तिकार गिरवीला श्री. बाबूराव यांचा शोध घेत आले व जशी हवी तशी मूर्ती घडवून देण्याची तयारी दर्शवली. 


परंतु श्री. बाबूराव अचंबित झाले कारण दोघांपैकी एकास हात नाहीत (थोटा) तर दुसऱ्यास डोळे नाहीत (आंधळा). हे लक्षात येताच लगेचच अजिबात काळजी करू नका, हे कार्य आम्ही अपूर्ण ठेवणार नाही, परंतु एकाच्या दृष्टीने आणि दुसऱ्याच्या हाताने एकत्र काम करू. असे मूर्तिकार म्हणाले. तसेच श्री. बाबुराव याना त्यांचा अपेक्षित मूर्तीचे तपशीलवार वर्णन पण केले "भगवान श्रीकृष्ण बासरी वाजवत उभे आहेत. दोन गायी लक्षपुर्वक कान देऊन आणि तल्लीन होऊन ऐकत आहेत असे हे रूप असून गोपाळकृष्णचे सर्व अलंकारही मूर्तीतच कोरलेले असावेत. हे अशक्यप्राय कार्य सुरु करतानाच शिल्पकारांनी स्पष्ट केले की, या कार्यसाठी साधारण एक ते दिड महिना लागेल. तसेच या कामासाठी स्वतंत्र असणे देखील आवश्यक आहे. तसेच त्यांना पूर्ण एकांत हवा असून मूर्ती  घडवून पूर्ण झाल्यावरच मूर्तीचे  दर्शन घेता येईल. या अवधीते हे कारागीर स्वतः आपले अन्न शिजवून खातील आणि आपले कार्य चालू ठेवतील. 


श्री. बाबुराव यांनी शिल्पकारांना स्वतंत्र जागा, इंधन आणि स्वयंपाकासाठी आवश्यक वस्तू  पुरवल्या. ईश्वराने स्वत:च ही मूर्ती घडविल्याने एका रात्रीत ही दिव्य मूर्ती साकार झाली. दुसर्‍या दिवशी पहाटेच श्री. बाबुराव यांना मूर्ती पाहण्यासाठी आमंत्रित केले गेले. श्री. बाबुराव यांना मूर्ती कडे पाहून अतीव आनंद झाला, क्षणभर आपण गो - लोकांत  आहोत  आणि  समोर श्रीकृष्ण पहात आहेत असे त्यांना जाणवले. आपल्या मानस पूजेमध्ये वर्षानुवर्षे ज्या स्वरूपाचे ध्यान केले तेच समोर साक्षात उभे आहे श्री. बाबुराव यांनी श्रीकृष्णास साष्टांग प्रणाम केला आणि श्री. बाबूराव यांना आपले जीवन कृतार्थ झाल्याचे जाणवले. भगवान श्रीकृष्णाचे. प्रथम दर्शन घेतल्यावर बाबुराव यांनी शिल्पकारांचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला. त्यांना पोषाख / वस्त्रे आणि मानधन देण्याचा मानस व्यक्त केला.  त्यानंतर  त्यानंतर मूर्तिकारांनी प्रत्युत्तर दिले की, तुम्ही श्री. बाबुराव भगवान गोपालकृष्णांचे श्रेष्ठ भक्त आहात व तुमचा संतोष हीच आमची बिदागी आहे. 


गिरवी येथील श्रीकृष्णाची अत्यंत रेखीव आणि सुंदर मूर्ती.

लगेचच मूर्तिकार जवळच्या एका विहिरीत आंघोळ करण्यासाठी. गेले व स्नान करून भोजनासाठी येतो असे सांगून गेले बराच अवधी गेला पण मूर्तिकार न आल्याने  श्री.बाबुराव अधीर आणि अस्वस्थ झाले. लगेचच कारागिरांना शोधण्यासाठी दूत पाठवले, पण सर्व प्रयत्न व्यर्थ ठरले. तेव्हा श्री. बाबुराव यांनी असा निष्कर्ष काढला की कारागीर सामान्य माणसे नसून साक्षात परमेश्वर होते व माझयावर कृपा करण्यासाठी येथे येऊन मूर्ती घडवून स्वतः विठ्ठल आणि गोपाळ यांनी मूर्तिकार रूपात हे मोठे काम केले व तत्काळ अदृश्य  झाले. गिरवी येथील गोपालकृष्ण मंदिराची ही कथा पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध आहे. 

गिरवी गावातील ही गोपालकृष्णाची मूर्ती ४ फुट उंचीची असून सुमारे ६ ते ७ वर्ष वय असलेल्या कृष्णाचे रूप साकारलेले आहे. गाईना घेऊन वनात जाणाऱ्या व बासरी वाजवणच्या गोपालकृष्णाचे हे रूप आपल्याला नक्कीच भावते. गिरवी येथील गोपालकृष्णाची मूर्ती व्यवस्थित पाहिली असता कोठेही जोड न लावता चार फूट उंचीची अप्रतिम मूर्ती घडवलेली आपल्याला पहावयास मिळते तसेच एका पायावर कृष्ण उभा असून दुसरा पाय देहुडा आहे. मूर्ती व दागिन्यांची शैली  वृंदावन / मथुरा पद्धतीची असुन पीतांबरही मूर्तीतच कोरलेला आहे. श्रीमदभागवत, हरी-विजय व गर्ग-संहित श्रेष्ठ ग्रंथातील वर्णनासारखीच ही मूर्ती आहे. मूर्तीचे दोन्ही हात अशा प्रकारे दिसतात की ते बासरी वाजवत आहेत. तसेच तळवे स्पष्टपणे आपल्याला पहावयास मिळतात. दोन्ही गायींच्या चेहर्‍यावरील भाव हे दर्शवतात की त्या बासरी वादन पूर्णपणे एकाग्रतेने ऐकत आहेत. तसेच पायाखालील एका सुशोभित पट्टीवर चार लहान मानवी आकृत्या देखील दिसतात. त्यापैकी एक जय आणि विजय (श्रीविष्णूचे द्वारपाल आणि दुसरे दोन शिल्पकार असल्याचे मानले जाते. अतिरिक्त वैशिष्ट्य हे की, मंदिर म्हणजे हरी (विष्णू) आणि  शिव (हर) यांच्या एकात्मतेचे दुर्मिळ दर्शन आहे. इतर मंदिराप्रमाणे श्रीगरुड आणि हनुमंत दिसतात. तसेच शिव व नंदी पण उपस्थित आहेत भगवान राम किंवा श्रीकृष्णासमोर शंकर व नंदी उपस्थित असलेले, हे एकमेव ठिकाण आहे. समोरच्या मंदिरात भगवान शिव आणि नंदी व गरुड आणि हनुमंतही आहेतच.

गिरवीच्या श्रीकृष्णाचा जवळून काढलेला फोटो.

सर्वात महत्वाचे म्हणजे कृष्णाच्या मुखावर विलक्षण प्रसन्नता आहे. असे हे गोपालकृष्णाचे अत्यंत सुंदर मंदिर नक्कीच बघण्यासारखे आहे. येथील गोपालकृष्हेणाची मूर्ती आपल्या डोळ्यांचे पारणे फेडते. असे हे आदिलशाही काळातील मंदिर आणि येथील कृष्णमूर्ती पाहण्यासाठी नक्कीच गिरवी येथे भेट द्यावी.

______________________________________________________________________________________________

अधिक माहितीसाठी संपर्क:- 
श्री. देशपांडे:- ९८२३०४९०५९.

कसे जाल:-
पुणे - सासवड - निरा - लोणंद - फलटण - गिरवी. 
______________________________________________________________________________________________

महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात.

४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.
_________________________________________________________________________________________________

लिखाण आणि छायाचित्रे  © २०२२  महाराष्ट्राची शोधयात्रा

        
 

No comments:

Post a Comment

Thank You For Comment...!!! :)

INSTAGRAM FEED

@maharashtraheritage