थिबा राजवाड्यातील 'प्राचीन सूर्यमूर्ती'

 

आपल्या महाराष्ट्रामध्ये विविध मंदिरे आणि शिल्पे विखुरलेली आहेत. अशीच काही सापडलेली शिल्पे हि गावांच्या मंदिरांमध्ये किंवा काही महत्वाच्या मूर्ती या वास्तूसंग्रहालयामध्ये नेल्या जातात आणि त्यांचे व्यवस्थित जतन केले जाते. या जतन केलेल्या मूर्ती या अभ्यासकांच्या दृष्टीने फार महत्वाच्या असतात याचे मुख्य कारण म्हणजे या मूर्ती पाहून त्यांचा कालखंड ठरविणे तसेच कुठल्या काळात या मूर्ती बनविलेल्या आहेत किंवा कोणत्या राजसत्तेचा प्रभाव मूर्तींवर आहे या गोष्टी ठरवण्यात मदत होते. अशीच एक सुंदर आणि उंच सूर्याची मूर्ती आपल्याला पहावयास मिळते ती म्हणजे रत्नागिरी मधील थिबा राजवाड्यामध्ये.


रत्नागिरी मधील थिबा राजाचा राजवाडा प्रसिद्ध आहेच. दिनांक १३ नोव्हेंबर १९१० रोजी थिबा राजाचे बंदिवान कुटुंब हे रत्नागिरी येथे राहायला आले. दिनांक १५ डिसेंबर १९१९ रोजी थिबाच्या राजाचे या राजवाड्यामध्ये निधन झाले आणि १९२६ नंतर या थिबा राजवाड्याचे रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांचे वास्तव्यस्थान म्हणून वापरले गेले. यानंतर याठिकाणी शासकीय तंत्रनिकेतन सुरु झाले त्यानंतर येथे पंचतारांकित हॉटेल देखील काढण्याची शासनाची कल्पना होती परंतु काही काळानंतर येथे वस्तूसंग्रहालय स्थापन करण्याची कल्पना अमलात आणली गेली. सध्या या थिबा राजाच्या राजवाड्यामध्ये कोकणातील प्राचीन शिल्पांचे अत्यंत उत्तम संग्रहालय आपल्याला पहावयास मिळते.


रत्नागिरी मधील थिबा राजाचा राजवाडा.

याच संग्रहालयाच्या प्रवेशद्वारावर आपल्याला तब्बल साडे सहा फुट उंचीची एक सुंदर सूर्यमूर्ती पहावयास मिळते. ही सुंदर प्राचीन सूर्यमूर्ती रोहा शहराजवळ सापडली असून आज तिला अत्यंत व्यवस्थित रीतीने संग्रहालयामध्ये जतन करून ठेवण्यात आले आहे. आपण जर ही सूर्य मूर्ती बारकाईने पाहिली असता या सूर्य मूर्तीवर असणारा मुकुट हा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. उद्दीच्च वेषधारी म्हणजेच या सूर्यमूर्तीने एखादा अंगरखा किंवा चिलखत असे एखादे वस्त्र या सूर्यमूर्तीला परिधान केले आहे असे आपल्याला पहावयास मिळते. असा हा सूर्याचा पेहेराव नक्कीच पाहण्यासारखा आहे. 


तसेच आपल्याला या मूर्तीला माळा किंवा हार तसेच कंबरपट्टा, प्रलंबहार आणि यज्ञोपवित घातलेले दिसते. तसेच या सूर्याच्या कानामध्ये मोठी कुंडले असून अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण कोरलेली आहेत. तसेच या सूर्याचे रूप अत्यंत देखणे आहे. तसेच या सूर्यमूर्तीच्या डाव्या आणी उजव्या खांद्यावर अंधकाराला दूर करण्यासाठी हातामधील धनुष्यबाण सज्ज केलेल्या उषा आणि प्रत्युषा अत्यंत सुंदर आणि सुबक कोरलेल्या आपल्याला पहावयास मिळतात. परंतु या मूर्तीचे विशेष लक्षण म्हणजे या मूर्तीने गुडघ्यापर्यंत घातलेले बूट हे या मूर्तीचे आकर्षण ठरते. या बुटांच्यामुळे या सुंदर सूर्यमूर्तीवर इराणी प्रभाव मोठ्या प्रमाणात जाणवतो. अश्या इराणी प्रभावाच्या मूर्ती आपल्या महाराष्ट्रात तुलनेने फार कमी पहावयास मिळतात. या सूर्याच्या मूर्तीचा निर्मितीचा कालखंड हा इ.स. ३ ऱ्या शतकातील आहे असा अभ्यासकांनी ठरवलेला आहे.


रत्नागिरी येथील थिबा राजवाड्यातील प्राचीन सूर्यमूर्ती. 

अशी ही उंच आणि रेखीव सूर्यमूर्ती महाराष्ट्रामध्ये फार क्वचित पहावयास मिळते. ही सूर्यमूर्ती नक्कीच थिबा राजवाड्यामधली एक सर्वात सुंदर मूर्ती आहे. अश्या या मूर्तीला पाहण्यासाठी तरी नक्कीच आपण थिबा राजवाड्याला भेट द्यायला हवीच. रत्नागिरीच्या थिबा राजवाड्यामधील ही उंच मूर्ती नक्कीच तुमचे हस्तमुखाने स्वागत करेल. त्यामुळे ही उंच सूर्यमूर्ती पाहण्यासाठी नक्कीच रत्नागिरीला जावे.

______________________________________________________________________________________________

संदर्भग्रंथ:- 
१) सर्वसाक्षी:- संजीवनी खेर, ग्रंथाली प्रकाशन.

कसे जाल:-
पुणे - चांदणी चौक - पौड - ताम्हिणी - माणगाव - महाड - खेड - संगमेश्वर - रत्नागिरी. 
______________________________________________________________________________________________

महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात.

४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.
_________________________________________________________________________________________________

लिखाण आणि छायाचित्रे  © २०२२  महाराष्ट्राची शोधयात्रा

              

No comments:

Post a Comment

Thank You For Comment...!!! :)

INSTAGRAM FEED

@maharashtraheritage