नैसर्गिक डाईक रचनेची कातळभिंत 'तैलबैला'


महाराष्ट्राला मुळातच नैसर्गिक सौंदर्य मोठ्या प्रमाणात लाभलेले आहे. या नैसर्गिक सौंदर्यामध्ये भर घालणारे डोंगर, नद्या, किल्ले, लेणी, मंदिरे ह्या सगळ्या गोष्टी मोठ्या प्रमाणात भटक्यांना आकर्षित करतात अशीच काही महत्वाची भौगोलिक आश्चर्य देखील महाराष्ट्रात आपल्याला आढळून येतात. त्यामध्ये प्रामुख्याने पहिले नाव घेतले जाते मावळामध्ये सुधागडच्या अगदी तोंडावर आणि घनगडाच्या समोर एका तटस्थ पुराणपुरुषाप्रमाणे लाखोवर्षे उभ्या असलेल्या  'तैलबैला' या नैसर्गिक डाईक रचनेच्या  कातळभिंतीचे. 

लोणावळा आणि मुळशीच्या निसर्गरम्य आणि ऐतिहासिक परिसरात किल्ले आणि लेण्या या कायमच खुणावत असतात तसेच लोणावळ्याच्या परिसरात कायमच पर्यटकांची गर्दी असते परंतु या गर्दीकडे लक्ष न देता गिर्यारोहकांना कायम खुणावते  ती 'तैलबैला' येथील कातळभिंत. कोरीगड किल्ल्याच्या पुढे सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील 'तैलाबैला' या नैसर्गिक  कातळभिंतीचा कडा गिर्यारोहकांना नेहमीच साद घालत असतो. 


पावसाळ्यात घनगड येथून दिसणारी 'तैलबैलाची अजस्त्र भिंती.
  
पुणे येथील स्वारगेट बस स्थानकामधून रोज दुपारी ३.०० वाजता 'तैलबैला' या गावाला जायला एस.टी. निघते. या गावाचे हे नाव पडले ते मुळात या अजस्त्र भिंतींवरून जशी हि गाडी भांबुर्डे जवळ येते तसे  दूर क्षितिजावर उभे असलेल्या कातळभिंती या आपले लक्ष वेधून घेतात. याच अजस्त्र कातळभिंती म्हणजे 'तैलबैला'. लोणावळ्याच्या दक्षिणेकडे घाटामाथ्याशेजारून एक वाट ‘आयएनएस शिवाजी’ वरून थेट भांबुडर्य़ापर्यंत जाते. या वाटेवरून सालथर येथील खिंड सोडली कि डाव्या बाजूला या अजस्त्र भिंतींच्या  कुशीत वसलेले 'तैलबैला' गाव हे निसर्गाने नटलेले आहे. लोणावळा येथून तेलबैलाचे अंतर हे ३५ किलोमीटर असून लोणावळा येथून भांबुर्डा येथे सुटणारी एसटी बस दुपारी १२.०० आणि संध्याकाळी ५.०० वाजता इथे येण्यासाठी सोयीची ठरते. पुण्यावरून हे अंतर जवळपास १०० कि.मी. आहे. याव्यतिरिक्त ताम्हिणी घाटाच्या अलीकडे निवे पिंपरी येथूनही एक वाट तेलबैलाकडे येते. पुण्याहून स्वारगेट येथून सुटणारी बस याच भागातून तैलबैला येथे जाते.


पावसाळ्यात मनमोहक दिसणाऱ्या 'तैलबैलाच्या' कातळभिंती.
   
तैलबैला हे ठिकाण करायचे असेल आणि हातामध्ये एक ते २ दिवस असतील तर आपल्याला कोरीगड घनगड करता येतील किंवा जर कोकणात उतरायचे असेल तर तैलबैला याला खेटून जाणाऱ्या वाघजाई घाटवाटेने ठाणाळे लेणी  आणी सुधागड किंवा सरसगड अशी डोंगरयात्रा देखील करता येईल. हि डोंगरयात्रा आपल्याला नक्कीच सुखद अनुभव देखील देते. तैलबैला फाट्यावरून आपण आजूबाजूचा निसर्ग पाहत जेव्हा गावात पोहोचतो तेव्हा हि तैलबैलाची भिंत आपल्याला जास्त आकर्षित करते. येथून पुढे सुरु होतो तो तैलबैलाच्या भिंतीकडे जाण्याचा प्रवास. मुळात जर आपल्याला भिंत चढायची असेल तर प्रस्तरारोहण येणे आपल्याला अत्यंत आवश्यक आहे तसेच सेफ्टी बाळगणे देखील आवश्यक आहे. परंतु ज्यांना ट्रेक करायचा आहे त्यांना 'तैलबैलाच्या' या कातळभिंती निराश अजिबात नाही करत कारण त्या भिंतींच्या मध्ये जी भेग आहे तिथे जाण्यास व्यवस्थित  पाऊलवाट आहे त्यामुळे हा ट्रेक नक्कीच आपल्याला तैलबैलाची डोंगरवाट चढताना भौगोलिक दर्शन घडवतो.     

तैलबैलाच्या डोंगराच्या उजव्या धारेने, उजव्या हाताच्या भिंतीखालून साधारणपणे ३० मिनिटात आपण या दोन भिंतींच्या मधल्या खिंडीत पोहोचतो. जेव्हा आपण या खिंडीत पोहोचतो तेव्हा मात्र आपण एका वेगळ्या जगात पोहचलो असतो या खिंडीतून दिसणारा नजारा आपल्या डोळ्यांचे पारणे फेडतो. किल्ला म्हणावे असे काही अवशेष इथे आढळत नाहीत. थोडी फार पाण्याची टाकी सोडली तर एक भैरवाचे मंदिर आहे पण टेहेळणी करण्याची जागा म्हणून तैलबैल एकदम योग्य असल्याचे आपल्याला आजूबाजूच्या परिस्थिती वरून समजते. तैलबैला येथून सुधागड अगदी नजरेच्या टप्यात आपल्याला दिसतो तर घनगड किल्ला दक्षिणेला आपले घाटवाटांवर आजही लक्ष आहे हे दर्शवत असतो. पालीचा सरसगड देखील समोरील बाजूस आपल्याला खुणावत असतो. तैलबैला येथून उन्हाळ्यात दिसणारा 'सालथरचा डोंगर' 

आजूबाजूच्या महत्वाच्या किल्ल्यांमुळे आणि जवळच असलेल्या 'ठाणाळे' आणि 'खडसांबळे' या प्राचीन बौद्ध लेण्या यांच्यामुळे या भागाला ऐतिहासिक महत्व प्राप्त झालेले आहे. तसेच इथून खाली कोकणात अनेक वाटा उतरतात. वाघजाई घाट तर अगदी 'तैलबैला' च्या शेजारून आपल्याला ठाणाळे या प्राचीन लेण्यांपर्यंत आपल्याला घेऊन जातो तर सवाष्णी किंवा सव घाट, आणदांड आणि नाणदांड या महत्वाच्या प्राचीन घाटवाटा देखील याच परिसरातून कोकणात उतरतात. नैसर्गिक दृष्ट्या पाहायला गेलं तर पावसाळ्यात धो धो पाऊस आणि उन्हाळ्यात कडक उन असं वातावरण पाहायला मिळते. त्यामुळे शहाणा असेल त्याने भर पावसात जाऊच नये. कारण दोन फुटांवरचे दिसणे सुद्धा मुश्किल. पावसाळा उतरला की सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात इकडे गेल्यास सोनकीच्या फुलांनी बहरलेला प्रदेश पहायला मिळतो. 

तैलबैलाचे पूर्वीचे नाव इतिहासात डोकावले तर 'बैलतळ' असे दिसते. मात्र हा किल्ला होता त्याला ठोस पुरावा आपल्याला मिळत नाही आजकाल इंटरनेट द्वारे लोकांनी 'तैलबैला' हे नाव शोधले कि 'तैलबैला फोर्ट' असे येते परंतु  हा किल्ला नाही  हा गैरसमज कृपया टाळावा. प्राचीन घाटवाटांवर असणारे  टेहळणी करण्याचे ठिकाण आहे असे आपण नक्की म्हणू शकतो. असा हा 'तैलबैला' पाहताना आपण नक्कीच आपल्या प्राचीन इतिहासाच्या नाळेशी नकळत जोडले जातो अश्या या  नैसर्गिक डाईक रचनेची कातळभिंत 'तैलबैला' याला भटकंती करताना भेट देणे नक्कीच सुखकारक ठरते.'तैलबैला' कडे जाण्याची वाट. 
डाईक अश्मरचना:-


'तैलबैला' या कातळभिंतीची रचना समजून घेण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम 'डाईक अश्मरचना' समजून घेणे महत्वाचे ठरेल. मुळात सह्याद्री हा तयार झाला आहे तो ज्वालामुखीमधून. हा सर्व भाग हा ‘डेक्कन ट्रॅप’ म्हणून प्रसिद्ध आहे. या ‘डेक्कन ट्रॅप’ ची रचना हि पायऱ्या पायऱ्यांची कठीण खडकांची असते. या प्रकारच्या रांगांमध्ये मध्येच कुठेतरी सुळके वर आलेले आपल्याला पाहायला मिळतात किंवा काही उभ्या कातळभिंती तयार झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. भू-शास्त्रीय भाषेत अशा या सुळक्यांना ‘व्होल्कॅनिक प्लग’ तर कातळभिंतींना ‘डाइक’ असे म्हणतात. 


'तैलबैलाच्या' खिंडीत असणारे भैरवाचे मंदिर आणि पाण्याचे टाके. 

'तैलबैला' येथील या अजस्त्र भिंती म्हणजे या ‘डाइक’ची अप्रतिम रचना आहे. समुद्रसपाटीपासून या 'तैलबैलाच्या' कातळभिंतीची उंची हि '३३२२ फूट' असून या भिंती या चारही बाजूने पहिली असता आपल्याला संपूर्ण सोलून काढलेल्या आपल्याला दिसतात. एखाद्या डोंगरावर ह्या भिंती ह्या आपल्याला  स्लाईस केकच्या तुकड्यासारख्या कापून  ठेवलेल्या असल्यासारख्या आपल्याला दिसते.  


भैरव आणि इतर देवतांच्या कोरीव मूर्ती.

अशी हि वैशिष्ट्यपूर्ण 'तैलबैलाची' नैसर्गिक डाईक रचनेची कातळभिंत अनेकांना भुलवते. हे 'तैलबैलाचे' आभाळात उंच घुसलेले ते कातळ जणू एकमेकांशी स्पर्धा करतच शेजारी ठाकलेले असतात. अश्या या तैलबैलाच्या खिंडीमध्ये एखाद्या रात्री मुक्काम नक्की करून आजूबाजूचे भूमंडळ न्याहाळावे आणि सकाळी 'सुधागड' आणि 'खिंडीतल्या भैरवाचे' दर्शन घेऊन 'घनगड' किल्याचे मोक्याचे ठिकाण पाहून तेथल्या 'गारजाई' देवीला माथा टेकवून परतावे.   
 'तैलबैलाच्या' उत्तुंग कातळभिंती.
________________________________________________________________________________________________
कसे जाल:-

पुणे - पौड - मुळशी - निवे - भांबुर्डे - तैलबैला.

टीप:- 
पुणे येथील स्वारगेट बस स्थानकामधून रोज दुपारी ३.०० वाजता 'तैलबैला' या गावाला जायला एस.टी. निघते.
लोणावळा येथून भांबुर्डा येथे सुटणारी एसटी बस दुपारी १२.०० आणि संध्याकाळी ५.०० वाजता इथे येण्यासाठी सोयीची ठरते.
________________________________________________________________________________________________
महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात. 

४) 'तैलबैला' किल्ला होता त्याला ठोस पुरावा आपल्याला मिळत नाही आजकाल इंटरनेट द्वारे लोकांनी 'तैलबैला' हे नाव शोधले कि 'तैलबैला फोर्ट' असे येते परंतु  हा किल्ला नाही  हा गैरसमज कृपया टाळावा. प्राचीन घाटवाटांवर असणारे  टेहळणी करण्याचे ठिकाण आहे असे आपण नक्की म्हणू शकतो.


लिखाण आणि छायाचित्रे  © २०१७ महाराष्ट्राची शोधयात्रा

Comments

Popular posts from this blog

पुण्यामधील नारायण पेठेमध्ये असलेले अपरिचित 'शेषशायी विष्णू मंदिर'

अंधेरी येथील भौगोलिक आश्चर्य 'गिल्बर्ट हिल'

पुणे शहराच्या विस्मृतीमध्ये गेलेला 'किल्ले हिस्सार किंवा पांढरीचा कोट'