हिंजवडी जवळील 'माण लेणी'

 

पुणे शहर आणि परीसरामध्ये आपल्याला विविध लेण्या पहायला मिळतात. त्यामध्ये पुण्यातील पाताळेश्वर लेणे तर प्रसिद्ध आहेच परंतु त्याचबरोबर बाणेर, चतु:शृंगी, पर्वती, पुण्याच्या प्रसिद्ध हनुमान टेकडीवर असलेले वृद्धेश्वर लेणे  तसेच येरवडा येथील तारकेश्वर मंदिर आणि लोहगाव विमान तळाजवळील लेणी या सर्व लेण्या या पुणे शहरामध्ये आजही आपल्याला बघायला मिळतात. अशीच एक अजून छोटेखानी लेणी पुणे शहरातील 'आय. टी. पार्क म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'हिंजवडी' गावाच्या परिसरात आपल्याला पहायला मिळते. या छोट्या लेणीला ट्रेकर्स हे 'माण' लेणी  म्हणून देखील ओळखतात. 


हिंजवडी जवळील 'माण लेणी'  


पुणे शहरापासून अगदी जवळ असलेले 'माण' येथील विहार आपल्याला पहायचे असेल तर हिंजवडी मधून आपल्याला बाहेर पडल्यावर 'माण' नावाचे गाव लागते या गावातून आपल्याला 'चांदे-नांदे' या गावाकडे जाण्यासाठी जो रस्ता लागतो त्याच्या डाव्या बाजूला आपल्याला एक छोटी टेकडी पहायला त्याच टेकडीवर आपल्याला पांढऱ्या रंगाने रंगवलेले ठिकाण खुणावते. ही पांढऱ्या रंगाने रंगवलेली जागा म्हणजे 'माण' येथील लेणी असून. येथे एक विहार आपल्याला पहायला मिळतो. 


माण येथील विहार.


ज्याठिकाणी 'माण' येथील विहार कोरलेला आहे त्याठिकाणी सोपे रस्ते शोधत चालत आपण सहज पाच ते दहा मिनिटात या 'माण' येथील विहारापर्यंत पोहचू शकतो. कारण या लेणीपर्यंत पोहोचण्यासाठी कोणतीही ठळक पाऊलवाट नाही. अजून एक छोटी खुण म्हणजे या 'माण' येथील विहाराच्या समोरच्या बाजूला एक छोटेसे टपरीवजा दुकान देखील आहे. त्याच्या समोरून आपण आरामात चालत 'माण' गावातील विहाराला पोहचू शकतो. लेणीच्या जवळ आपण पोहोचलो कि आपल्याला थोडासा सपाटीचा भाग दिसतो आणि आपल्यासमोर असते ते 'माण' येथील विहार


माण येथील विहाराच्या आतील भागात आपल्याला 'सारीपाट' आणि 'मंकला' खेळ पहायला मिळतो.


या 'माण' येथील विहाराला जर आपण नीट पाहिले तर विहाराच्या आजूबाजूला आपल्याला काही खड्डे खोदलेले पहायला मिळतात. तसेच 'माण' येथील हा विहार जवळपास ९ फुट रुंद असून ९ फुट उंच आहे. या 'माण' येथील विहाराचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या विहाराला आतमध्ये उतरण्यासाठी आपल्याला पायऱ्या देखील खोदलेल्या पहायला मिळतात. या 'माण' येथील विहारमध्ये आपल्याला बाकी बौद्ध भिक्षुंसाठी असलेले बाक किंवा इतर कोणतेही बौद्ध धर्मचिन्ह आढळून येत नाही परंतु विहाराच्या जमिनीवर कोरलेला 'सारीपाट' आणि 'मंकला' हा खेळ मात्र आपले लक्ष नक्कीच वेधून घेतो. 


माण येथील विहारातून दिसणारे बाहेरील दृश्य आणि विहाराच्या फरशीवर कोरलेला 'सारीपाट' आणि 'मंकला' खेळ. 


'माण' येथे असलेल्या या छोट्या विहारमध्ये आपल्याला विहाराच्या भिंतीवर गावातल्या स्थानिकांनी 'ओम' रंगवलेला पहायला मिळतो. या 'माण' येथील विहारामधून हिंजवडी फेज ३ येथील दृश्य फारच सुंदर दिसते. अशी ही छोटेखानी असलेली 'माण' येथील लेणी कोण्या अनामिकाने कोरली हे मात्र समजून येत नाही. परंतु या विहाराची रचना ही बरीचशी इतर आजूबाजूच्या प्रसिद्ध लेण्यांच्या विहारांशी मिळती जुळती असल्यामुळे हे विहार नक्कीच प्राचीन आहे हे मात्र आपल्याला समजू शकते. 


असे हे हिंजवडी जवळील प्राचीन 'माण' लेणे आजही फारसे प्रसिद्धी झोतात नाही तसेच एकुलते एक विहार असल्याने हा वारसा आपण नक्कीच जपायला हवा. शनिवार किंवा रविवार असा सुट्टीचा वेळ पाहून आपण या 'माण' येथील लेणीला नक्की भेट देऊ शकतो आणि आडवाटेवरची  छोटेखानी भटकंती नक्कीच करू शकतो.

______________________________________________________________________________________________

कसे जाल:-
पुणे - हिंजवडी - माण.   
          
______________________________________________________________________________________________

महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात.

४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.
_________________________________________________________________________________________

लिखाण आणि छायाचित्रे © २०२० महाराष्ट्राची शोधयात्रा

              


             



          

No comments:

Post a Comment

Thank You For Comment...!!! :)

INSTAGRAM FEED

@maharashtraheritage